लोकशाही आरोग्याची

Health
Health

इंद्रियांवर नियंत्रण राहिले नाही व इंद्रिये स्वतःपुरती पाहू लागली तर दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार माजू शकतो. प्रत्येक इंद्रियाबरोबर मनावरही नैतिकतेचा अंकुश ठेवणे आवश्‍यक असते. शरीराचे व व्यक्‍तिमत्त्वाचे कल्याण हे पंचेंद्रिय व मन यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. याच सिद्धांतानुसार आपण असे म्हणू शकतो की, लहान गावाची पंचायत असो किंवा संपूर्ण देशाचा राज्यकारभार असो, त्यात स्वार्थाला वा भ्रष्टाचाराला जागा नसावी.

आत्मा हाच खरा आपल्या शरीराचा चालक; पण तो ज्या मनामार्फत सर्व शरीर चालवतो ते मन पाचामुखी ही संकल्पना अमलात आणण्यासाठी पंचेंद्रिय देतील त्या संवेदनेप्रमाणे व हुकमाप्रमाणे काम करायला लागते. पाचही इंद्रियांचे विचार वेगवेगळे असले तरी शरीरस्वास्थ्याचा, दीर्घायुष्याचा विचार करून आणि तरीही आत्मा जो परमात्म्याचा अंश आहे त्याच्या तत्त्वावर आधारित व मनाने निर्णय घेणे अपेक्षित असते. अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतले जाऊ लागतात. याचे कारण आहे मनात शिरलेला अहंकार व पंचेंद्रियांपैकी प्रत्येक इंद्रियाचा स्वार्थ. जीवनात पंचेंद्रियांशिवाय कुठलेच कार्य होऊ शकणार नाही, हे खरे असले तरी प्रत्येक इंद्रिय स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊ लागल्यास अनावस्थेचा प्रसंग ओढवून घेतला जाऊ शकतो.

संपूर्ण शरीराला आवश्‍यकता असते अन्नाची. नाकाला वास आवडतो म्हणून, जिभेला चव आवडते म्हणून, सजावट चांगली झालेली असल्याने डोळ्यांना सुखावह वाटते म्हणून अन्न स्वीकारले तर संपूर्ण शरीराचा फायदा कसा होणार? त्यातल्या त्यात रसनेचे म्हणजे जिभेचे थोडे अधिक मत लक्षात घ्यायला हरकत नाही, पण कोठले अन्न स्वीकार करावे यात डोळ्यांचा काय संबंध? पण सध्या पाककृती डोळ्यांना सुखावह वाटतील अशा रीतीने करण्यावर खूप भर दिलेला दिसतो. तसेच शरीराचे सातही घटक (सप्तधातू) वाढावेत म्हणून वीर्यवान अन्न सेवन केले पाहिजे; पण निकस व नुसते पोटभरू अन्न खाल्ले तर सर्व प्रजेचे म्हणजे शरीराचे कल्याण कसे होणार?
एखादी कल्पना एका विशिष्ट प्रकृतीच्या व्यक्‍तीला सुचत नाही म्हणून पाच लोकांनी विचार मांडून त्यातील बरे-वाईट बघून निर्णय घेणे फायद्याचे व सर्वांच्या हिताचे ठरते. पाचामुखी परमेश्वर म्हणजे सर्वमताने सर्वांच्या कल्याणाचे निर्णय घ्यावे लागतात. याच तत्त्वावर लोकशाही उभी राहते.

एकाच व्यक्‍तीच्या मनाप्रमाणे ज्या वेळी एखादी संस्था किंवा देश चालतो त्या वेळी त्या व्यक्‍तीमध्ये अहंकार प्रकट होऊ शकतो किंवा फक्‍त स्वतःच्या स्वार्थाचे निर्णय घेणे सुरू झाले तर सगळ्यांची अडचण होते. भारतात या लोकशाहीची सुरवात झाली २६ जानेवारी रोजी. हा प्रजासत्ताक दिन आपण दर वर्षी साजरा करतो. पंचायत ही कल्पना छोट्या गावांसाठी सर्वानुमते कारभार चालविण्यासाठी उपयोगी पडते; परंतु भारतासारख्या मोठ्या देशाला पाच पंच पुरत नाहीत म्हणून मोठे मंत्रिमंडळ व पंतप्रधान निर्णय घेतात. देशाच्या संविधानानुसार आणि महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या भल्याचा, लोकांच्या कल्याणाचा, देशाच्या हिताचा, देशाच्या संरक्षणाचा विचार करून घेतलेला निर्णय बरोबर ठरतो. 

लोकशाहीतही निर्णय घेणाऱ्या व्यक्‍तीने स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी निर्णय घेतले तर देश हलके हलके दिवाळखोरीकडे जाईल हे नक्की. अशी परिस्थिती सध्या जगात काही ठिकाणी आलेलीही दिसत आहे.

मनात असलेली वासना लोकांवर छाप पाडण्यासाठी व्यक्‍ती शरीर कमावण्याच्या पाठीमागे लागते; पण त्यातूनच जीवनाचे, कधी कधी आयुष्याचे नुकसान होऊ शकते. पंचेंद्रियांना संवेदना देणाऱ्या, त्यांना आज्ञा देणाऱ्या मेंदूचा कोणी विचारच करत नाही. सारखे काळाच्या पुढे धावत राहण्यामुळे तसेच भौतिक चमक-दमकच्या मागे लागण्यामुळे उत्पन्न झालेल्या ताणामुळे मेंदूचे रोग होऊ शकतात. यातूनच सध्या विस्मरण व अल्झायमर्ससारखे रोग अधिक प्रमाणात होत आहेत असे दिसते. 

प्रत्येकाच्या आत असलेल्या स्व-त्वाच्या विचारसरणीला गहाण ठेवले जाते तेव्हा भविष्याची वाट लागणार हे निश्‍चित होते. नैतिकता ही जीवनाची आवश्‍यकता आहे, ती असेल तेथे लोकशाही म्हणजेच हे पाचामुखी प्रकरण नीट चालते. ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा’ असे काही उगाचच म्हटलेले नाही. सतत ‘माझी’ आठवण ठेवूनच प्रत्येक कार्य झाले पाहिजे असे श्रीमद्‌भगवद्‌गीतेत तर एक सूत्रच धरून ठेवलेले आहे. येथे ‘मी’ म्हणजे अनाकलनीय, सर्वव्यापी परमात्मा असा अर्थ आहे. ‘त्याने’ सर्वांना सारखी संधी दिलेली आहे, ‘तो’ कुठल्याही तऱ्हेने कोणावरही अन्याय करत नाही, ‘तो’ गवताच्या पात्यापासून, फळा-फुलांपासून, पर्वत-नद्या-ताऱ्यांपासून, प्राणिमात्रांपासून ते मनुष्यमात्रापर्यंत ओतप्रोत भरलेला असून सर्वांना जीवनशक्‍ती देतो. या सर्वांच्या कल्याणाचे पाहणे म्हणजे ‘त्याची’ आठवण ठेवणे होय. 

इंद्रियविजयासाठी म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे. कार्य करवून घेणाऱ्या या इंद्रियांवर नियंत्रण राहिले नाही व इंद्रिये स्वतःपुरती पाहू लागली तर दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार माजू शकतो. प्रत्येक इंद्रियाबरोबर मनावरही नैतिकतेचा अंकुश ठेवणे आवश्‍यक असते.
शरीराचे व व्यक्‍तिमत्वाचे कल्याण हे पंचेंद्रिय व मन यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. याच सिद्धांतानुसार आपण असे म्हणून शकतो की, लहान गावाची पंचायत असो किंवा संपूर्ण देशाचा राज्यकारभार असो, त्यात स्वार्थाला वा भ्रष्टाचाराला जागा नसावी. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या कल्याणाची विचारधारा असणे आवश्‍यक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com