आरोग्यसल्ला देणारा ‘फॅमिली डॉक्‍टर’

आरोग्यसल्ला देणारा ‘फॅमिली डॉक्‍टर’

रोग कुठून आला, का आला, कसा वाढला व त्याला कसा परतावयाचा तसेच पुन्हा तो रोग होऊ नये यासाठी शरीरात काय व्यवस्था करायची, रोगावर इलाज केले जात असताना इतर त्रास होणार नाहीत, रोग जाता जाता तो दुसरे काही नुकसान करणार नाही, तसेच दिलेल्या औषधांचा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही हे पाहायचे म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाची आणखी एक विशेषता अशी की आयुर्वेदिक औषधे, मग ती वनस्पतिज, खनिज, प्राणिज, अशी कुठलीही असली तर त्यांच्यातील गुणांची शरीरातील पेशींना भलतीच सवय लागणार नाही, शरीराला अनावश्‍यक असलेल्या संकल्पना कुठल्याही  प्रकारे भरल्या जाणार नाहीत आणि दिलेले औषध पेशींमध्ये सात्म्य होईल व इच्छित लाभ मिळेल यावर कटाक्ष ठेवलेला असतो. रासायनिक औषधे रोगाला दबविण्याच्या, नष्ट करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे शरीराला काही इतर अपाय होऊ शकतात. शरीरात असलेले जंतू, बॅक्‍टेरिया, व्हायरस यांना औषधांनी मारण्याच्या प्रयत्नात शरीरामध्ये इतरत्र नुकसान होऊ शकते. परंतु आयुर्वेदिक औषधे तयार करताना सर्व प्रकारची शुद्धी केलेली असल्यामुळे ही औषधे शरीरपेशींना सहजतेने सात्म्य होतात, कुठल्याही प्रकारे शरीराला नुकसान करत नाहीत. औषध बनविताना काळजी घेतलेली नसेल, औषध बनविताना अपेक्षित ती शुद्धी केली गेली नसेल, तर असे औषध शरीरात गेल्यावर होणाऱ्या शारीरिक क्रियांमध्ये किरकोळ फरक पडू शकतो (पुरळ उठणे, आग होणे वगैरे), परंतु आयुर्वेदिक औषधांमुळे नवीन रोगाची निर्मिती होऊन त्रास होत नाही. आयुर्वेदिक औषधे बनविताना वापरण्यात येणारी विषारी द्रव्ये खूप शुद्ध करून घेतलेली असतात. खनिज द्रव्यांवर निरनिराळे संस्कार केलेले असल्यामुळे, ती सूक्ष्म केलेली असल्यामुळे अशी औषधे गुणकारी ठरून मनुष्याला मदत करू शकतात. 

इलाज, रासायनिक असो, आयुर्वेदिक असो, थेरपी असो, अभ्यंग असो, शल्यकर्म असो, हे सगळे करण्यापूर्वी शरीराची पूर्ण माहिती, शरीराला चालविणाऱ्या मनाची माहिती असावी हा विचार धरून फॅमिली डॉक्‍टरची योजना समाजाने केली. फॅमिली डॉक्‍टरला सगळी माहिती असल्यामुळे इलाज करत असताना फायदा होतो, इलाज करणे सोपे होते, सुकर होते.

आयुर्वेदिक औषध कडू असले तर त्याची गुटी-वटी करून घेता येते, औषधांचा परिणाम त्वरित होण्याच्या हेतूने आसव-अरिष्टांची योजना केलेली असते, एक औषध दिल्यानंतर त्याचा इतरही उपयोग व्हावा म्हणून तुपात औषधांची योजना केलेली असते. 

विषद्रव्य शरीरात गेले तर तातडीने इलाज करणे भाग असते. तेव्हा शरीर वात-पित्त-कफ यातील कुठल्या प्रवृत्तीचे आहे हे फॅमिली डॉक्‍टरला माहीत असू शकते, ज्यामुळे इलाज करणे सुकर होते. 

फॅमिली डॉक्‍टरला सर्व उपचार करता येणार नसतील तर विशेष वैद्यांची, डॉक्‍टरांची मदत घेता येऊ शकते. एखाद्या रुग्णाचे शल्यकर्म करायचे असले तरी त्याला काय सहन होईल काय सहन होणार नाही, शस्त्रकर्म करण्यासाठी रुग्णाची सांपत्तिक स्थिती ठीक आहे का, कुठल्या ऋतूत शस्त्रकर्म केले तर रुग्णाला सोपे होईल, शस्त्रकर्म ताबडतोब करणे आवश्‍यक आहे की काही वेळ थांबले तरी चालेल हे सर्व फॅमिली डॉक्‍टरच्या मदतीने ठरविता येऊ शकते. 

असा फॅमिली डॉक्‍टर घराघरांत सर्वांना आरोग्यासाठी सल्ला देत असतो. त्यामुळे फॅमिली डॉक्‍टर ही केवळ औषध देणारी व्यक्‍ती नव्हे, तर रोग्याने काय खावे, ऋतुनुसार कसे वागावे, कोणते व्यायाम करावे, अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन नेमकी योजना करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते. हीच फॅमिली डॉक्‍टर संस्था पुस्तकरूपाने घराघरांत असावी या दृष्टीने दै. ‘सकाळ’ने ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी सुरू केली. या पुरवणीचा ७५०वा अंक आज प्रकाशित होत आहे. महाराष्ट्रात तरी या पुरवणीमुळे फॅमिली डॉक्‍टरांची रिकामी पडलेली जागा काही अंशी भरून निघालेली आहे. फॅमिली डॉक्‍टर जसा इतर सल्लामसलत देतो तशा बऱ्याच गोष्टी ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीतून लोकांना समजल्या. आयुर्वेद काम कसा करतो, आयुर्वेदिक औषधे कशी तयार होतात, आयुर्वेदाचे सिद्धांत काय आहेत वगैरे गोष्टी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचविल्यामुळे लोकांचा आयुर्वेदावर विश्वास बसू लागला, समाजात आयुर्वेदाबद्दल आपुलकी निर्माण झाली, प्रतिष्ठा निर्माण झाली, असेही म्हणायला हरकत नाही. आयुर्वेद अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला विद्यार्थी जसा शिकेल तशा पद्धतीने ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीमध्ये ‘आयुर्वेद उवाच’ या सदराखाली माहिती दिली जात आहे. हा विषय जनसामान्यांना कळेल अशा सोप्या भाषेत व सोपी सोपी उदाहरणे घेऊन समजावला गेला. वेगवेगळ्या रोगांची माहिती, त्यावरचे इलाज काय असू शकतील याचा माहिती ‘मुखपृष्ठकथा’ या सदरात दिली जात आहे. विषय सोपा व्हावा, जीवनाच्या इतर अंगांबरोबर याचा कसा संबंध असतो याचा विचार करून हलक्‍या-फुलक्‍या भाषेत ‘प्रस्तावना’ लिहिल्या गेल्या. ॲलोपॅथी, होमिओपॅथी वगैरेंत कशा प्रकारचे इलाज केले जातात हे कळण्यासाठी इतर पॅथींवर आधारित लेखही समाविष्ट केले गेले. एकूणच, ही पुरवणी अद्वितीय ठरली. अनेकांनी या पुरवण्या काळजीपूर्वक सांभाळून ठेवल्याचे वेळोवेळी कळविले आहे. ही दहा वेळा अमृतमहोत्सव (७५ X १०) साजरी करणारी ७५० वी पुरवणी आज प्रकाशित होत आहे. पुढेही ही ’फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणी सर्वांना आरोग्यरक्षणासाठी मदत करत राहील. 

‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीचा फॅमिली डॉक्‍टर म्हणून मी काम पाहिले. बऱ्याच वेळा खूप धावपळ असायची. वर्षातील चार-पाच महिने मी परदेशी किंवा प्रवासात असतो. अशा वेळी इमेल, रेकॉर्डिंग यासारख्या सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतल्याने काम सोपे झाले. प्रत्येक आठवड्याला पुरवणी प्रसिद्ध करायची असल्याने हा विषय कायम डोक्‍यात असतो. त्याप्रमाणे लेख तयार करून, अंकाचे संपादन, मांडणी, मुद्रण करून दर शुक्रवारी पुरवणी वाचकांच्या हातात पडते. शिवाय ही पुरवणी शुक्रवारच्या वेळेला बांधलेली असल्यामुळे कधी तरी इतर कामांच्या बाबतीत गैरसोय झाल्याची शक्‍यता आहे. परंतु सर्वच जण ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या प्रेमात असल्यामुळे हे कार्य पार पडत राहिलेले आहे.   

हे काम असेच पुढे चालत राहावे आणि वाचकांनी ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या पुरवणीवर असेच प्रेम करावे हीच इच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com