तयारी परीक्षेनंतरची

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Thursday, 8 March 2018

समाजाचे घटक असणाऱ्या व्यक्तींनी कर्माचे कौशल्य आत्मसात केलेले असणे आवश्‍यक असते. म्हणजे ज्ञान तर हवेच, बरोबरीने काम कसे-कोणी-कुठे करायचे, त्याचे नियम काय आहेत हेही सर्व नीट लक्षात घेणे आवश्‍यक असते, मग हे काम शेती करण्याचे असो, औषधे देण्याचे असो वा इतर कोणतेही असो. ज्ञान मिळविण्याबरोबरच ते ज्ञान कसे वापरायचे, याचे कौशल्यही विकसित केलेले असणे आवश्‍यक असते.

मागच्या वेळी आपण परीक्षेविषयी विचार केला. बहुतेक सर्वांनी त्याची व्यवस्थित नोंद घेऊन त्याप्रमाणे वागायला आता तरी सुरवात केली असेल, परीक्षा जवळ आलेल्या आहेत व या संधीचा उत्तम प्रकारे उपयोग करून घ्यायचा असे अनेकांनी ठरविले असेल. परीक्षा अपरिहार्य असतात. या काळात बहुतेक विद्यार्थी आपल्या  पालकांजवळ राहत असतात. त्यामुळे या काळात विद्यार्थी कसा अभ्यास करतात, त्यांना शाळेत जायची किती आवड आहे याची त्यांना कल्पना असते. या सर्व गोष्टी इतरांना समजू शकत नाहीत. वर्षाच्या शेवटी परीक्षा घेतली जाते व विद्यार्थ्याला सर्टिफिकेट मिळते. विद्यार्थ्याला सर्टिफिकेट मिळाले तरी त्याला तो विषय संपूर्णपणे समजलेला असेल किंवा त्याला नंतर त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेता येईलच याची खात्री नसते. काही विषयांच्या अभ्यासक्रमात त्यांची प्रात्यक्षिके असतात. वेगवेगळे प्रकल्प घेऊन व्यवहारात तो प्रकल्प कशा तऱ्हेने उपयोगी पडेल हे शिक्षणक्रमात अंतर्भूत केलेले असते. परंतु तरीही विषयाचा अभ्यास केलेला असणे, तो विषय कळलेला असणे, व्यवहारात वापरायची इच्छा असणे, व तसा प्रयत्न करणे हे व्हावे लागते.  

परीक्षा चालू असताना दुसरा-तिसरा पेपर झाल्यावर आजारी पडणारी मुले असतात. जेमतेम गुण मिळवलेलेही विद्यार्थी असतात. पुढील आयुष्यात स्वतःचे जीवनमान व्यवस्थित ठेवून त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या पालकांचा व समाजाचाही विचार करावा लागतो. हे सर्व झाल्यानंतरच त्याला समाधान, शांती, आनंद मिळतो, व जीवन जगण्यासाठी अधिक उमेद येते. 

हे सर्व साध्य होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अभ्यासाबरोबर इतर वेळी शाळेत, शाळेबाहेर, समाजात, विशिष्ट व्यक्तींकडे, विशिष्ट संस्थांमध्ये जाऊन संस्कार मार्गदर्शन घेतलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. 

कर्मकुशलता हवी
समाजाचे घटक असणाऱ्या व्यक्तींनी कर्माचे कौशल्य आत्मसात केलेले असणे आवश्‍यक असते. म्हणजे ज्ञान तर हवेच, बरोबरीने काम कसे-कोणी-कुठे करायचे, त्याचे नियम काय आहेत हेही सर्व नीट लक्षात घेणे आवश्‍यक असते, मग हे काम शेती करण्याचे असो, औषधे देण्याचे असो वा इतर कोणतेही असो. ज्ञान मिळविण्याबरोबरच ते ज्ञान कसे वापरायचे याचे कौशल्यही विकसित केलेले असणे आवश्‍यक असते. याबरोबरच संबंधित काम करण्याचा अधिकार मिळविणेही तेवढेच महत्त्वाचे असते. हे सर्व करणाऱ्या व्यक्ती नियमांचे पालन काटेकोरपणे करणाऱ्या, आपण ज्याच्यासाठी काम करतो आहोत त्याच्याशी झालेल्या कराराशी प्रतारणा न करता आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या असतात. त्यांची निसर्ग, परमेश्वर यांच्यावर पूर्ण श्रद्धा असते व त्या नैतिकतेने वागणाऱ्या असतात. मुख्य म्हणजे कुठल्याही  प्रकारे, कोणाचीही फसवणूक न करता, इतरांची अडचण समजावून घेऊन, वेळप्रसंगी करारापलीकडे जाऊन मदत करणाऱ्या असाव्यात. अशा स्वभावाच्या व्यक्ती समाजात अधिक प्रमाणात असणे अपेक्षित आहे. 

सध्या समाजात हा भाव कमी होतो आहे. याचा प्रत्यक्षात अनुभव येतो. माणसांचे अकारण पडणे, अपमृत्यू होणे, कामात मोठ्या चुका झाल्यामुळे अपघात घडणे, निसर्गाशी व परमेश्वराशी प्रतारणा केल्यामुळे वातावरणाची हानी होणे याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या सगळ्याला आवर घालण्यासाठी संस्कारांची आवश्‍यकता आहे. 

संस्कार सेवाभावाचा
संस्कार हे व्यायाम व योग, योग्य औषधे व रसायन या माध्यमाने किंवा पंचकर्मासारख्या प्रक्रियेने शरीरावर करता येतात. मनाला सज्जन बनविण्यासाठी सेवाभाव (भक्तीची परिसीमा) असणे आवश्‍यक असते असे समर्थ श्री रामदास स्वामींनी ‘मनाच्या श्‍लोका’त सांगितलेले आहे. मनावर संस्कार करता येतो आणि सेवाभावातून पुढे गेल्यावर प्रेम उत्पन्न होते. एकूण मानवतेवर, प्राणीमात्रांवर प्रेम  करणे म्हणजे त्यांना हवी ती मदत करणे, त्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणे,उपजीविकेसाठी दिलेल्या वेळाबरोबर काही वेळ समाजसेवेसाठी देणे, विश्वास व श्रद्धा वाढीला लावणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. दुसऱ्याच्या चुकीच्या वागण्याने झालेले भौतिक नुकसान फार मोठे नसते, परंतु असे वागण्याने समोरच्याचा विश्वास गमावला जाणे, श्रद्धा तुटणे ही हानी मोठी असते. म्हणून काया-वाचा-मनाच्या म्हणजेच शरीर-मन-आत्मा यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या उत्क्रांतीसाठी अभ्यासक्रमातील विषयांच्या बरोबरीनेच संस्काराची आवश्‍यकता असते. चार श्‍लोक पाठ करणे किंवा सुटीमध्ये पोहायला जाणे, घोड्यावर बसणे, एखाद्या संस्कारवर्गाला जाणे एवढी संस्कार या शब्दाची व्याख्या मर्यादित नाही. या सगळ्या गोष्टींबरोबरच कुठेतरी आतमध्ये जिवाला व आत्म्याला असा आकार मिळवा की, संपूर्ण जीवन नैतिकता व आत्मविश्वास यांच्यावर आधारित असावे. भारतीय परंपरेने व ऋषीमुनींनी सांगितलेल्या कथा व आध्यात्मिक ज्ञानावर चिंता व चर्चा व्हावी, यातील फाफटपसाऱ्याला कात्री लावून त्यामागचे विज्ञान समजून घ्यावे, आणि यात मानवतेच्या कल्याणाचा किती सखोल विचार मांडलेला आहे याकडे लक्ष द्यावे. लोखंडाची सळई वाकवायची असेल तर ती एकदा तापवून एकदा घण मारून काम होत नाही. सळई सावकाश तापवणे, घण मारणे, परत तापवणे, परत घण मारणे ही क्रिया अनेकदा सावकाशपणे करावी लागते. हाच संस्कार. 

माणसाचेही तसेच आहे. थोडा थोडा वेळ देऊन थोडा अभ्यास करून, शरीराची शुद्धी करून, संस्कार इमानदारीने निरंतर करावा लागतो. संस्कृत हा संस्कृतीचा पाया आहे असे म्हटले जाते. खरोखरच, या भाषेतील शब्दांच्या स्पंदनांनी कुठेतरी मेंदूत वेगळ्या प्रकारचे संबंध जोडले जातात, हे लक्षात घेऊन संस्कार करणे आवश्‍यक आहे. संस्काराच्या या प्रयोगात साधे खाणे-पिणे, राहणी नैसर्गिक असणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हेही अपेक्षित आहे. निसर्गाएवढा नियमात राहणारा, दुसऱ्यासाठी गैरसोय सोसणारा असा कोणीही नाही. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करण्यानेच अनेक संस्कार होतात. तसेच ज्या ठिकाणी संस्काराची, शक्तीची, नैतिकतेची सकारात्मता आहे त्या ठिकाणी उत्तम संस्कार होतात. आजारपण दूर ठेवण्यासाठी जसे आरोग्यसंस्कार करावे लागतात तसेच व्यक्तीचे, जिवाचे, आत्म्याचे आरोग्य अनुभवण्यासाठी, आत्म्याला प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट संस्कार आवश्‍यक असतात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor health Preparation After Examination