आरोग्य गेले खड्ड्यांत

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 18 August 2017

सर्व विकार ज्या मेरुदंडातून उत्पन्न होतात त्या मेरुदंडाच्या आरोग्यासाठी  उत्तम औषध म्हणजे चांगले रस्ते. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. परंतु या रस्त्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल तेव्हाच एकूण सर्वांचे आरोग्य चांगले राहील असेही म्हणायला हरकत नाही. म्हणून रस्ता, खड्डे व आरोग्य यांचा संबंध लक्षात आला. भारतात तरुणांची संख्या खूप मोठी आहे. पण तारुण्यातच आरोग्याचा कणा व कंबर मोडली तर काय उपयोग? संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्यापूर्वी प्रथम आपले रोजच्या वापरातील साधे मार्ग नीट करावे लागतील. 
 

सर्व विकार ज्या मेरुदंडातून उत्पन्न होतात त्या मेरुदंडाच्या आरोग्यासाठी  उत्तम औषध म्हणजे चांगले रस्ते. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. परंतु या रस्त्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल तेव्हाच एकूण सर्वांचे आरोग्य चांगले राहील असेही म्हणायला हरकत नाही. म्हणून रस्ता, खड्डे व आरोग्य यांचा संबंध लक्षात आला. भारतात तरुणांची संख्या खूप मोठी आहे. पण तारुण्यातच आरोग्याचा कणा व कंबर मोडली तर काय उपयोग? संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्यापूर्वी प्रथम आपले रोजच्या वापरातील साधे मार्ग नीट करावे लागतील. 
 

निसर्ग पावसाळ्यात अधिकच खुलतो. पाणी हे जीवनच आहे. पावसाळ्यात प्रत्येक झाड हिरवेगार होईल यात काही शंका नाही. पावसाळ्यात हवेत असलेले धूलिकण खाली बसल्याने हवा शुद्ध होते. त्यामुळे पावसाळ्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण, शहरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींच्या गल्लीबोळातून छत्री सावरून फिरताना पावसाकडे पाहताही येत नाही आणि पाऊस ही एक कटकट वाटते. पण थोडे शहराच्या बाहेर जाण्याचा, डोंगरदऱ्यांत जाण्याचा, धबधबे पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कामाची गडबड असतानाही शेतात उगवलेल्या भाताकडे पाहून त्याचा आनंद घेण्याचे, त्याचा सुगंध घेण्याचे सुख अवर्णनीय आहे. 

या सगळ्यांचा अनुभव घेण्यासाठी श्रीवर्धनला जाण्याचा कार्यक्रम ठरविला, पण एका नवीनच समस्येला तोंड देण्याची वेळ आली. सध्या सर्व जगात भारताचा बोलबाला आहे. भारत खूप प्रगत होईल व सर्व जगाला मार्गदर्शन करेल असे म्हटले जाते. येथे विकासाची नदी वाहत आहे. एवढेच नव्हे तर, विकासाच्या महासागराला भरती आलेली आहे. सर्व विकासाचा मूलमंत्र म्हणून जर कशाचा विचार करायचा असला तर तो दळणवळणाचा करायला हवा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाणे. संपर्क, संवाद, देवाणघेवाण, दळणवळण ही विकासाची पहिली पायरी समजायला हरकत नाही. जर्मनी हे याबाबतीत उत्तम उदाहरण आहे. हिटलरने अनेक निंदनीय कामे केलेली असली, तरी त्याने जर्मनीसाठी एक चांगले काम करून ठेवले आहे, ते म्हणजे त्याने ऑटोबॉन, म्हणजे ज्यावरून सर्व प्रकारच्या गाड्या, जड वाहने वेगाने जाऊ शकतील असे मोठे रस्ते, बांधायची सुरुवात केली. यामुळे देशाचा कानाकोपरा एकमेकाला जोडला जाऊन सर्व लोक एकत्र येतील अशी योजना होती. त्यामुळे युद्धाच्या काळात कुमक पाठवावी लागल्यास ती वेगाने पोचू शकेल असाही विचार होता. तेथील सहा-सहा, आठ-आठ पदरी रस्ते तयार करण्यासाठी देशाच्या विकासाचा विचार करून लोकांनी व शेतकऱ्यांनी नक्कीच जागा दिली असणार. तेथील विमानतळांचे विस्तार पहिल्यानंतर तेथील रहिवाशांनी देशप्रेमासाठी जागा दिली असणार असे वाटते. तेथे प्रत्येक खेडेगावातील, प्रत्येक शहरातील जाण्यायेण्याचा मार्ग हा अत्यंत काटेकोरपणे व अत्यंत व्यवस्थित बांधलेला आहे. त्यामुळे शहरात गर्दी न करता लोक खेडेगावात आनंदाने राहण्यास जातात. मुळात रस्ता बांधतानाच काळजी घेतल्याने त्यावर खड्डे पडत नाहीत. परंतु कोठेतरी रस्ता फुटला तर एखाद्या माणसाला जखम झाल्यावर ज्या तातडीने मदत केली जाते, त्याच तातडीने रस्ता  दुरुस्त करण्याकडे लक्ष दिले जाते. संपर्क व चलनवलन हा विकासाचा पाया आहे. मनुष्य व्यवसाय करण्यामागील एक कारण ‘पोटाची खळगी’ भरणे हे आहे. पण ज्यांच्या पोटाच्या खळग्याचा आकार रस्त्यावरील खड्ड्यांहून मोठा आहे अशांनी रस्ते बांधूही नयेत व रस्तादुरुस्तीची कामेही करू नयेत.

अध्यात्मशास्त्रानुसार व आयुर्वेदानुसारही वातसंतुलन, रक्‍ताभिसरण, संदेशवहन हाच आरोग्याचा पाया आहे. यात कुठलाही अडथळा उत्पन्न झाला तर त्यावर इलाज करावेच लागतात. सर्वांच्या बरोबर विकास करून भारताची पुढे जायची इच्छा असेल तर आपल्या रस्त्यांचा प्रश्न प्रथम सोडवावा लागणार. 

रस्त्यांवरील खड्ड्यांचे वर्तमानपत्रात फोटो येतात, बातम्या येतात, निदर्शने होतात, रस्ते अडविण्याचे आंदोलन होते. तेव्हा हा विषय ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नाही. परंतु साधे खोपोलीपासून पालीपर्यंत, पालीपासून वडखळ नाक्‍यापर्यंत, तेथून माणगावपर्यंत व पुढे श्रीवर्धनपर्यंत जाताना रस्त्याची जी काही दुर्दशा झालेली आहे ती पाहण्यासारखी आहे. काही ठिकाणी तर ‘पाणी अडवा, पाणी साठवा’ ही योजना रस्त्यावरच करायची ठरविली आहे की काय अशी शंका येते. काही ठिकाणी खड्डे एवढे खोल आहेत की तेथून पाताळदर्शनही होऊ शकेल. खड्डा पाण्याने भरलेला असल्यास तो किती खोल आहे याचा अंदाज येत नाही, पण गाडी खड्ड्यातून गेल्यावर आत बसलेली व्यक्‍ती दाणकन आदळून त्या व्यक्‍तीचा पाठीचा कणा मोडल्यावरच खड्ड्याच्या भयानकतेचा अंदाज येतो. चांगल्या महामार्गावरून जाताना पोटातील पाणीही हालत नाही असे म्हणतात. पण त्याऐवजी आत बसलेली व्यक्‍ती एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे, पुढे मागे कलंडत असेल तर ती व्यक्‍ती घरून निघताना दही-साखर घेऊन निघालेली असली तरी तिचा प्रवास सुखरूप होईलच असे नसते. उदाहरण एका रस्त्याचे घेतले, पण सर्व ठिकाणी रस्त्यांची हीच तऱ्हा आढळते.

रस्त्याने बराच प्रवास करावा लागणाऱ्यांना पाठीची दुखणी नाही झाली तरच नवल. पाठदुखी, कंबरदुखी येऊ नये, हाडांचे आरोग्य, मुख्य म्हणजे मज्जारज्जूचे आरोग्य नीट राहण्यासाठी त्याची काळजी घेणे आवश्‍यक असते. मेंदू हा सर्वसत्ताधीश आहे. मेंदू मज्जारज्जूतून निघालेल्या सर्व नाड्यांच्या माध्यमातून शरीराचा सर्व व्यवहार चालवत असतो. त्यासाठी मज्जारज्जूचे महत्त्व वादातीत आहे. मनुष्याच्या शरीरातील श्रीरामांच्या जाणीवरूपी हातातील कोदंड म्हणजेत मेरुदंड. नेमके रस्त्यांच्या खडबडीतपणामुळे, त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे किंवा रस्ता एका पातळीत नसल्यामुळे सर्वांत मोठे नुकसान होते ते मेरुदंडाचे. रस्त्यात वाहनाला मध्येच ब्रेक लावावा लागल्यामुळे किंवा गाडी खड्ड्यात गेल्यामुळे आत बसलेल्या व्यक्‍तीचे डोके समोरच्या सीटवर किंवा स्टिअरिंग व्हीलवर किंवा वरच्या छतावर आपटते. पण तसे झाले नाही तरी रस्ता चांगला नसला तर आत बसलेल्या व्यक्‍तीच्या मेरुदंडावर वाईट परिणाम होतोच. प्रवासात मेरुदंड पुढे-मागे, डावीकडे-उजवीकडे, आठ आकड्याच्या आकारात फिरत राहिला तर दोन तासाच्या प्रवासात दोन दिवस प्रवास करण्याइतका थकवा येऊ शकतो आणि खड्डे असलेल्या रस्त्यांवरून प्रवास हे एक मोठे दिव्य होय, हे प्रत्येकाच्या लक्षात येते. 

पाठदुखी, कंबरदुखी येऊ नये, पाठीचे आरोग्य नीट राहावे यासाठी सरळ बसावे, शरीराला वेडेवाकडे झोल देऊन बसू नये, शरीराला पौष्टिक असलेले अन्न खावे, व्यायाम योगासने करावी वगैरे सांगितले जाते. पण मेरुदंडाचे, मेंदूचे आरोग्य पर्यायाने मनुष्यमात्राचे एकूण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी एवढेच पुरेसे नाही. म्हणून पाठीचे, एकूणच सांध्यांचे विकार येऊ नयेत व हे सर्व विकार ज्या मेरुदंडातून उत्पन्न होतात त्या मेरुदंडाच्या आरोग्यासाठी  उत्तम औषध म्हणजे चांगले रस्ते. 

भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. परंतु या रस्त्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल तेव्हाच एकूण सर्वांचे आरोग्य चांगले राहील असेही म्हणायला हरकत नाही. म्हणून रस्ता, खड्डे व आरोग्य यांचा संबंध लक्षात आला. भारतात तरुणांची संख्या खूप मोठी आहे. पण तारुण्यातच आरोग्याचा कणा व कंबर मोडली तर काय उपयोग? संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्यापूर्वी प्रथम आपले रोजच्या वापरातील साधे मार्ग नीट करावे लागतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Health went missing