उच्च रक्तदाबाचे व्यवस्थापन

Blood-Pressure
Blood-Pressure

वयाच्या तीस ते चाळीस वर्षांच्या व्यक्तींचा रक्तदाब जास्त सापडल्यास तत्काळ औषधे सुरू करण्याची गरज नसते. अशा व्यक्तीची जीवनशैली सुधारावी, वजन उंचीच्या मानाने असावे तेवढे ठेवावे, मिठाचे सेवन मर्यादित ठेवावे, नियमाने व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी, धूम्रपान आणि मद्यपान बंद करावे. 

उच्च रक्तदाब (१४०/९० किंवा जास्त) असणाऱ्या बहुतेक व्यक्तींना कोणताही शारीरिक त्रास जाणवत नाही. वयाच्या तीस ते चाळीस वर्षांच्या व्यक्तींचा रक्तदाब जास्त सापडल्यास तत्काळ औषधे सुरू करण्याची गरज नसते. अशा व्यक्तीची जीवनशैली सुधारावी, वजन उंचीच्या मानाने असावे तेवढे ठेवावे, मिठाचे सेवन मर्यादित ठेवावे, नियमाने व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी, धूम्रपान आणि मद्यपान बंद करावे. वजन किती असावे हे ठरविण्याकरिता पुढील पद्धत वापरली जाते.

बहुतेक उच्च रक्तदाबाच्या व्यक्‍तींचे वजन असावे त्यापेक्षा जास्त असते. बॉडीमास इंडेक्‍स पंचवीसपेक्षा जास्त असला, तर त्या व्यक्तीचे वजन जास्त आहे असे मानावे. पुरुषांमध्ये पोट (वरचा भाग), खांदे आणि मान येथे मेद अधिक साचतो. तर स्त्रियामध्ये पृष्ठभाग, मांड्या, उरोज आणि त्वचेखाली मदे साचतो. मध्यम वयाच्या पुरुषांत पोट मोठे झालेले असणे (ढेरी मोठी असणे) हे हृदयविकार होण्याची/असण्याची शक्‍यता दर्शविते. 

वजन कमी करण्याकरिता आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. आहारात उष्मांक (कॅलरीज) कमी करणे आवश्‍यक आहे. व्यायामाचा फायदा व्यायाम नियमाने करण्यानेच होतो. आहारातील उष्मांक कमी करण्याच्या दृष्टीने साखर, मद्यपान, साबुदाणा वर्ज्य करावेत. भात, बटाटा, गोड फळे (आंबा, द्राक्षे, केळे, चिकू) तळलेले पदार्थ, तूप, लोणी, साय, चीज असले पदार्थ मर्यादित सेवावेत. (कधी तरी थोड्या प्रमाणात घ्यावेत) नेहमीच्या आहारात पालेभाज्या, कोशिंबिरी नियमाने व विपुल प्रमाणात घ्याव्यात. तृणधान्ये (गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ) व डाळी (मूग, मसूर, मटकी, चवळी) मर्यादितच सेवावेत. फळांमध्ये कलिंगड, काकडी, टोमॅटो, पपई आवश्‍य घ्यावीत. फळांचे रस घेण्यापेक्षा फळ खाणे चांगले. (संत्री, मोसंबी, अननस) दर आठवड्याला एकाच काट्यावर (शक्‍यतो विवस्त्र) वजन नोंदावे. अपेक्षित वजनाकडे वाटचाल चालू असेल तर आपले प्रयत्न योग्य आहेत. अन्यथा, तृणधान्यात दहा टक्के कपात करावी. एका वेळेला थोडे खाणे, वारंवार खावे. एकभुक्त राहण्यापेक्षा दिवसातून चार-पाच वेळा थोडे थोडे खाणे अधिक इष्ट असते. कोणतीही शंका मनात आल्यास आहार तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.

पायी चालणे हा वजन ताब्यात ठेवण्याकरिता (किंवा कमी करण्याकरिता) चांगला व्यायाम आहे. एक तास संथगतीने चालल्यास शंभर उष्मांक वापरले जातात. पस्तीसशे उष्मांक वापरले जाण्याने एक पौंड मेद कमी होतो व सात हजार उष्मांक वापरले, तर एक किलोग्रॅम मेद घटेल. केवळ पथ्य पाळण्यापेक्षा, व्यायामची जोड दिली, तर अधिक परिणामकारक रीतीने वजन कमी होते. व्यायामाचे साधारणपणे चार प्रकार मानले जातात. १) पहिल्या प्रकाराला स्थिर पद्धतीचे व्यायाम (static) म्हणतात. या प्रकारात शरीराची हालचाल फारशी होत नाही. उदाहरणार्थ, वेट लिफ्टिंग, स्प्रिंगचा वापर, दंड बैठका, इत्यादी. अशा व्यायामांनी स्नायू आकाराने मोठे होतात. शरीर बलदंड होते. शक्ती येते आणि हाडे मजबूत होतात. २) दुसरा प्रकार म्हणजे चल पद्धतीचे व्यायाम. यात शरीरातील मोठे स्नायू आलटून पालटून आकुंचित पावतात व सैल होतात. परिणामी, नाडीची गती वाढते. नाडीची गती सहज मोजता येते. चल पद्धतीचा व्यायाम योग्य प्रमाणात झाला किंवा कसे हे ठरविण्याचे एक सूत्र आहे. २२० उणे संबंधित व्यक्तीचे वय, येणाऱ्या आकड्याच्या दोन तृतीयांश इतकी नाडीती गती होणे. (आणि व्यायाम करताना तितकी टिकून राहणे) म्हणजे चल पद्धतीचा व्यायाम योग्य झाला.

प्रौढ व्यक्तीची श्रांत स्थितीत नाडीची गती मिनीटाला ७२ ठोके इतकी असते हे सर्वविद्‌ आहे. ७० वर्षांचे वय असणाऱ्याने चल पद्धतीचा व्यायाम करताना २२० उणे ७० - १५०, याच्या दोन तृतीयांश म्हणजे नाडीची गती मिनिटाला शंभर ठोके इतकी ठेवावी असा व्यायाम किमान वीस मिनिटे आठवड्यातून तीन वेळा करावा. पाच वेळा केला तर अधिक फायदा आणि सातही दिवस केला तर उत्तमच. अशा व्यायामाने हिृदयाची व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. शरीरातील मेदाम्लांचे चयापचय सक्षम होते. एण्डॉर्फिनस्‌च्या निर्मितीमुळे सांधे लवचिक राहतात, झोप आणि भूक सुधारते आणि मन प्रसन्न होते. 

धूम्रपान - तंबाखूचे सेवन कोणत्याही प्रकारे केले तरी ते अपायकारक असते. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा रेणू असतो. त्याची सवय लागते व सवयीचे रूपांतर व्यवसान होते. सिगारेट ओढणाऱ्या माणसाचे आयुष्य प्रत्येक सिगारेट ओढण्याने साडेपाच मिनिटांनी कमी होते. धूम्रपानामुळे (सिगारेट ओढणे, पाइप ओढणे, सिगार पिणे (चिरूट)) हृदयविकाराचा झटका (हार्ट ॲटॅक), एप्मिसीमा, श्‍वासनलिका अरुंद होणे, श्‍वासनलिकांचा (फुफ्फुसाचा) कॅन्सर होणे, स्वरयंत्रणेचा, मुखाचा आतल्या अवयवांचा, अन्ननलिकेचा, मूत्राशयाचा, स्वादुपिंडाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. तंबाखू खाण्याने मुखात, हिरड्यांचा कॅन्सर होतो. दात पडतात आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासातील माणसांना देखील फुफ्फुसाचा कॅन्सर, हृदयविकाराचा झटका येणे आणि पक्षाघात होण्याचा धोका वाढतो. कोणत्याही परिस्थितीत धूम्रपान करू नये व धूम्रपान करणाऱ्यांची संगत सोडावी. रक्तदाब कमी करण्यासाठी वजन कमी करण्याच्या औषधांचा उपयोग तत्कालिकच असतो.

औषधांपेक्षा आहार आणि व्यायाम अधिक महत्त्वाचे असतात. वजन कमी करण्याकरिता केलेले आहार व व्यायाम यांचे जीवनशैलीचे कायमचे स्थान असावे लागते. अन्यथा, हे प्रयत्न सोडले तर वजन पूर्वीच्या (किंवा जास्त) पातळीवर लगेच येते. फेनाफ्लूरामाईन या औषधाचा वापर करून तात्पुरते वजन कमी होते. परंतु फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांच्या आतील रक्तदाब वाढू शकतो. 

केवळ वरचे (सिस्टॉलिक) ब्लडप्रेशर जास्त (१६० किंवा जास्त) असले आणि खालचे (डायास्टॉलिक) ९६ पेक्षा कमी असले तरी अशा व्यक्तींना पॅरॅलिटिक स्ट्रोक येण्याचा धोका वाढलेला असतो. प्रयोगांनी ९० ते ११० डायस्टॉलिक प्रेशर असणाऱ्या व्यक्तींवर उपचार केले असताना पॅरॅलिटिक स्ट्रोकचे प्रमाण कमी झाल्याचे आढळते. दुर्दैवाने हृदयविकार (करोनरी हार्ट डिसिज) आणि एकंदर मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत मात्र फारसा फरक पडला नाही. वाढलेले रक्तदाब आणि त्याच्या जोडीला पुढील व्याधी असल्या तर हे धोके वाढतात. करोनरी हार्ट डिसिज, पुरुष असणे, सिगारेट ओढणे, लो डेन्सिटी लावसोप्रोटीन्स (ldc) जास्त असणे आणि वजन जास्त असणे, लेफ्ट व्हेंट्रिक्‍युलर हायपट्रॉफी, रक्तातील मेद घटकांचे प्रमाण जास्त असणे आणि इन्सुलिनचा परिणाम कमी होणे (इन्सुलिन रेझिस्टन्स) वयाच्या ६५ ते ८० वर्षांच्या वयाच्या माणसांना लघवी जास्त होण्याची डाययुरोटिक प्रकारची औषधे दिल्याने पॅरॅलिटिक स्ट्रोक, हृदयविकार आणि इतर रक्तवाहिन्यांच्या आजारात दखलपात्र घट झालेली आढळली. 

रक्तदाबावर सतत लक्ष ठेवणे जरुरीचे आहे. रक्तदाब का वाढतो हे बहुतेकांच्या बाबतीत कळत नाही. शिवाय हळूहळू वाढत जाणाऱ्या रक्तदाबामुळे व्यक्तीला त्रास जाणवतही नाही. महिन्यातून एक वेळा तरी वयाच्या चाळिशीनंतर आपला रक्तदाब मोजून नोंदवून ठेवणे इष्ट आहे. सातत्याने १४०/९० पेक्षा जास्त आढळल्यास तो दखलपात्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com