दिवस प्रेमाचा

Love-Day
Love-Day

‘प्रेम’ हा शब्द भारतीय तत्त्वज्ञानात, आयुर्वेदात, वेदवाङ्‌मयात कशासाठी वापरलेला असावा? भक्‍तीची पराकाष्ठा हे प्रेम व भक्‍ती म्हणजे सेवेचा लागलेला ध्यास. तेव्हा प्रेम म्हणजे सेवा. प्रेम शब्दाचे तीन अर्थ आहेत - प्रेम, सेवा व शरण. मनुष्य सेवा प्रेमापोटी करतो, भक्‍ती व प्रेमाची परिसीमा झाल्यावर जो एकरूपतेचा अनुभव येतो ती शरणागती. तेव्हा संपूर्ण सुखी व्हावे असे वाटत असेल किंवा मेंदूचे आरोग्य नीट टिकावे असे वाटत असेल, तर प्रेमाशिवाय पर्याय नाही.

दीर्घायुष्याचा विचार करताना बऱ्याच वेळा लोक वजनाचा विचार करतात. वजन वाढल्यानंतर फुप्फुसांवर व हृदयावर ताण येतो आणि त्यामुळे दीर्घायुष्याचा लाभ होणे अवघड होते असा एक समज प्रचलित आहे. वजन वाढल्याचा दोष आहाराला व खाण्यापिण्याला दिला जातो. तसेच वजन वाढण्यामागे, तसे पाहिले तर कुठलाही त्रास होण्यामागे, काही कारण सापडले नाही तर मानसिक ताण हे कारण दिले जाते. मानसिक ताण ही अशी एक कल्पना आहे की जिच्यावर सर्व दोष लादता येतात. खरे आहे की वात-पित्त-कफ यांच्याच बरोबरीने मानसिक ताण हा चौथा मोठा दोष समजला जातो. पण ऊठ-सूट सर्व अस्वस्थतेचे वा रोगांचे कारण मानसिक ताणावर ढकलणे योग्य नाही. रोगाची उत्पत्ती वा व्याप्ती सांगताना व्यक्‍तीचा मानसिक धारणेमुळे तयार होणारा स्वभाव (सायकोसोमॅटिक) व वागणूक यांचा संबंध असतो हे मान्य झालेले आहे. पण सगळ्याच रोगांचा ठपका मानसिक ताणावर ठेवायचा, परंतु त्याच वेळी मानसिक ताण येण्याचे कारण शोधण्याकडे व मानसिक ताण निवारण करण्याकडे मात्र फारसे लक्ष द्यायचे नाही, हे काही खरे नाही.

मेंदूत मुख्यतः चार प्रकारची द्रव्ये (एंडॉर्फिन, सीरेटोनिन, डोपामिन, ऑक्‍सिटोनिन) स्रवतात असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. ही माणसाच्या सुखासाठी कारणीभूत असतात. मनुष्याच्या वागणुकीचा मेंदूत स्रवणाऱ्या या द्रव्यांच्या प्रमाणावर परिणाम होतो, त्यामुळे रोगोत्पत्ती होते. 

प्रेम हा एक भाव आहे, ज्याच्यामुळे मेंदूत स्रवणाऱ्या मुख्यतः ऑक्‍सिटोनिन नावाच्या स्रावावर परिणाम होतो. बऱ्याच वेळा ‘प्रेम’ या शब्दाची गल्लत शरीरसंबंधातून मिळणाऱ्या सुखाशी केलेली दिसते. कामोत्तेजनेसाठी आणि स्त्रीपुरुष संबंधासाठी लागणारी शक्‍ती किंवा शरीरावस्था ही ज्या द्रव्यावर असते हा विषय वेगळा आहे. परंतु हे शरीरसंबंधातून मिळणारे सुख निरंतर टिकणारे नसतेच, उलट ते परत परत मिळावे अशी इच्छा वाढत राहते, परंतु त्यासाठी लागणारी शक्‍ती मात्र कमी कमी होत राहते. यामुळे यातून शाश्वत व अतिशय समाधान देणारे सुख मिळणे शक्‍य नाही. 

असे असताना ‘प्रेम’ हा शब्द भारतीय तत्त्वज्ञानात, आयुर्वेदात, वेदवाङ्मयात कशासाठी वापरलेला असावा? भक्‍तीची पराकाष्ठा हे प्रेम व भक्‍ती म्हणजे सेवेचा लागलेला ध्यास. तेव्हा प्रेम म्हणजे सेवा. प्रेम शब्दाचे तीन अर्थ आहेत - प्रेम, सेवा व शरण. हे तीनही शब्द गुंफून केलेले एक सुंदर पदही मराठीत लिहिलेले दिसते. या तिन्हींचा अर्थ एकच आहे. मनुष्य सेवा प्रेमापोटी करतो, भक्‍ती व प्रेमाची परिसीमा झाल्यावर जो एकरूपतेचा अनुभव येतो ती शरणागती. तेव्हा संपूर्ण सुखी व्हावे असे वाटत असेल किंवा मेंदूचे आरोग्य नीट टिकावे असे वाटत असेल तर प्रेमाशिवाय पर्याय नाही. या प्रेमाला व्यक्‍त करण्यासाठी सहवेदना, भावना यांचा उपयोग जास्त व्हावा, केवळ भेटवस्तू किंवा फुले देणे ही प्रेम व्यक्‍त करण्याची पद्धत नसावी. प्रत्यक्ष संवेदना किंवा सहवेदना म्हणजे दुसऱ्याच्या सुखदुःखाचा अनुभव होणे. यातून अनुभवाला आलेली एकरूपता प्रकट करण्यासाठी तुझे ते माझे आणि माझे ते तुझे ही भावना व्यक्‍त करण्यासाठी काही वेळा एखाद्या बाह्य वस्तूचा आधार घेतला जातो आणि हा प्रगट भाव हृदयाला कळू शकतो, डोळ्यांना वाचता येऊ शकतो.   

उभयतांतील प्रेम व्यक्‍त करण्याच्या हेतूने व्हॅलेंटाइन डे या दिवसाचे निमित्त साधून चढ्या भावात खरेदी केलेले लाल गुलाब देण्याला काही अर्थ नाही. भेटवस्तूच्या किमतीवर प्रेमाची किंमत केली जाऊ लागली तर त्यातून केवळ विकार समजू शकतो. प्रेमाला आकार नसतो, प्रेमाची किंमत नसते, प्रेमाला संख्या नसते. प्रेम हे जीवनीय आहे. प्रेम आपल्या स्वतःच्या मूळ ठिकाणी एकत्र येण्याचे माध्यम आहे. या प्रेमाशिवाय पर्यायाने सेवेशिवाय मेंदूत ही द्रव्ये स्रवणार नाहीत, मेंदूचे आरोग्य नीट राहणार नाही आणि निरंतर सुखाची प्राप्तीही होणार नाही. 

मेंदूचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे. बाह्य जगताचा पसारा लक्षात घेऊन प्रथम त्याच्या कारणमीमांसेत समाधान करून घेऊन, नंतर हे पूर्ण नव्हे असे समजून अनंताकडे जाण्याचा निर्णय घेण्यानेच निरंतर सुखाची प्राप्ती होऊ शकते. मेंदू नीट विचार करू शकत नसला, आजूबाजूच्या वातावरणाचा, भावनांचा संबंध मेंदू लावू शकत नसला, किंवा मेंदूला इतरांशी असलेल्या संबंधाचे ज्ञान करून घेता येत नसले, तरी अशा मेंदूला प्रेमभाव वाढवता येतो. डोंगराच्या कपारीत ओल असलेल्या ठिकाणी फोडल्यानंतर तेथून आत असलेला झरा वाहू लागतो, तो झरा मनुष्याला उत्पन्न करता येत नाही, प्रगट करता येते. त्याचप्रमाणे मनुष्याने इतर व्याप कमी करून थोड्या प्रयत्नाने सेवाभाव वाढविला, त्यागाची भावना ठेवली तर प्रेमाचा झरा आपसूक वाहू लागतो. 

परमेश्वरावर प्रेम करणे, त्याची सेवा करणे नेहमी सोपे का व्हावे या कोड्याचे उत्तर यात सापडते. परमेश्वर दिसत नाही, तो आहे असे प्रत्यक्ष दिसले नाही तरी त्याच्या अस्तित्वाची अनुभूती मात्र येते. तेव्हा परमेश्वर आहेच असे समजून केलेली सेवा (म्हणजेच त्याचे अस्तित्व ज्या ठिकाणी असते अशा निसर्गाची, फळा-फुलांची, जमिनीची, प्राण्याची, पशुपक्ष्यांची, वातावरणाची, माणसांची घेतलेली काळजी) निःस्वार्थ होणार हे नक्की असते.

परमेश्वराकडून काही मिळवावे अशी अपेक्षा न ठेवल्यामुळे ही सेवा निःस्वार्थ होते. आयुष्यात काही चांगले घडले तर त्याचे श्रेय परमेश्वरालाच द्यावे लागते. परमेश्वराला एखादी भौतिक वस्तू द्यायची असे ठरविले तरी शेवटी त्यानेच बनविलेली वस्तू त्याला दिल्यासारखे होते. तेव्हा परमेश्वर प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे त्याचे प्रतीक असलेल्या वनस्पती, झाडे, प्राणिमात्र व इतर देवतुल्य व्यक्‍ती यांची सेवा करून प्रेमभाव वाढीस लावता येतो. हे सर्व श्रद्धेच्या ओलाव्याने सुरू होते व त्यानंतर प्रेमाचा पाझर फुटतो. 

असा हा ‘प्रेम’ या विषयाशी संबंधित असलेला एक सुंदर दिवस. एका संताने या प्रेमाची अनुभूती घेतली व प्रेमभाव वाढण्यासाठी सर्वांनी सेवेचे व्रत घ्यावे या अपेक्षेने या दिवसाची कल्पना मांडली. ती कल्पना भलतीकडे न नेता आपण आचरणात आणली तर सर्वांनाच प्रेमसागरात न्हाऊन निघाल्याचा आनंद लाभू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com