मनुष्य व रोगाच्या उत्पत्तीची कारणे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 9 February 2018

रोगांच्या उत्पत्तीचे कारण उकलण्याचा प्रयत्न नऊ ऋषींनी केला. अखेर पुनर्वसु आत्रेय ऋषींच्या सिद्धांताचा सर्वांनी स्वीकार केला, तरीही काशिराज वामक राजाचे समाधान झाले नाही. 

रोगांच्या उत्पत्तीचे कारण उकलण्याचा प्रयत्न नऊ ऋषींनी केला. अखेर पुनर्वसु आत्रेय ऋषींच्या सिद्धांताचा सर्वांनी स्वीकार केला, तरीही काशिराज वामक राजाचे समाधान झाले नाही. 

मनुष्याची उत्पत्ती कशातून झाली, सृष्टी कधी तयार झाली वगैरे प्रश्न अनादी काळापासून आहेत. प्रत्येक शास्त्राने आपापल्या परीने या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. आयुर्वेदातही ‘यज्जपुरुषीय’ नावाच्या अध्यायात अनेक ऋषीमुनींनी एकत्र येऊन या विषयावर चर्चा केल्याचे वर्णन आलेले आहे. एकूण नऊ ऋषींनी आपापले मत मांडले, यातील प्रत्येक मताचा सांगोपांग विचार करून सरतेशेवटी पुनर्वसु आत्रेय ऋषींनी अंतिम निर्णय दिला. मागच्या वेळी आपण भद्रकाप्य ऋषींनी मांडलेला कर्मवाद पाहिला. आता त्यापुढची चर्चा काय झाली ते पाहू या. 

भद्रकाप्य ऋषींनी जीवमात्राची उत्पत्ती कर्मामुळे होते आणि त्यांना रोगसुद्धा कर्मामुळे होतात असे सांगितले. मात्र, भरद्वाज ऋषींनी त्याच्या या कर्मवादाचे खंडन केले. 
भरद्वाजस्तु नेत्याह कर्ता पूर्व हि कर्मणः ।
दृष्टं न चाकृतं कर्म यस्य स्यात्‌ पुरुषः फलम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान
कर्मातून पुरुष व रोगाची उत्पत्ती होते असे समजणे योग्य नाही. कारण कर्म करण्यासाठी आधी कर्त्याचे अस्तित्व आवश्‍यक असते. असे कोणतेच कर्म दिसत नाही, जे कर्त्याकडून केले गेलेले नसते, आणि तरीही त्या कर्माचे फळ मिळते. थोडक्‍यात कर्म केल्याशिवाय त्याचे फळ मिळत नाही आणि कर्म होण्यासाठी कर्ता असावा लागतो. अशा प्रकारे ‘कर्मवादा’चे खंडन करून त्यांनी ‘स्वभाववाद’ मांडला. 
भावहेतुः स्वभावस्तु व्याधीनां पुरुषस्य च ।
खरद्रवचलोष्णत्वं तेजोन्तानां यथैव हि ।।
....चरक सूत्रस्थान
पुरुष (मनुष्य) आणि व्याधी या दोघांच्या उत्पत्तीचे कारण स्वभाव असते. ज्याप्रमाणे पृथ्वी, जल, वायू, अग्नी या महाभूतांमध्ये क्रमशः खरत्व (खरखरीतपणा), द्रवत्व (पातळपणा), चलत्व (हालचालीची क्षमता) आणि उष्णत्व (गर्मी) स्वभावतः उत्पन्न होतात, त्याप्रमाणे जीवमात्रांची उत्पत्ती स्वभावतः होते. तसेच त्यांच्यात रोगही स्वभावतः निर्माण होतात. हा स्वभाववाद ‘नेचर थिअरी’ या नावानेही प्रसिद्ध आहे. 
भरद्वाज ऋषींच्या या मताचे खंडन कांकायन ऋषींनी केले. ते याप्रमाणे, 
कांकायनस्तु नेत्याह नह्यारम्भफलं भवेत्‌ ।
भवेत्‌ स्वभावात्‌ भावानाम्‌ असिद्धिः सिद्धिरेव वा ।।
....चरक सूत्रस्थान
स्वभावानेच जर शरीर आणि रोगाची उत्पत्ती होते असे समजले, म्हणजेच सगळे आपोआप होते असे समजले, तर विशिष्ट प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या कार्यपद्धतीला, नियोजनपूर्वक केलेल्या कार्याला काही महत्त्वच राहणार नाही. यापुढे त्यांनी ‘प्रजापतिवाद’ मांडला.
स्रष्टा त्वमितसंकल्पो ब्रह्मापत्यं प्रजापतिः ।
चेतनाचेतनस्यास्य जगतः सुखदुःखयोः ।।
....चरक सूत्रस्थान
त्यांच्या मते या सृष्टीच्या उत्पत्तीमागे ब्रह्मदेवांचे पुत्र प्रजापती हेच चेतन-अचेतन जगताचे तसेच सुखदुःखाचे कर्ता आहेत. या प्रजापतीवादाला ‘क्रिएटर थिअरी’ असेही संबोधले जाते. 
आत्रेयभिक्षु ऋषींनी प्रजापतिवादाचे खंडन केले ते याप्रमाणे, 
तन्नेति भिक्षुरात्रेयो नह्यपत्यं प्रजापतिः ।
प्रजाहितैषी सततं दुःखैः युञ्ज्याद्‌ असाधुवत्‌ ।।

....चरक सूत्रस्थान
प्रजापती हे मनुष्य आणि मनुष्याला होणाऱ्या रोगाचे कर्ते आहेत असे म्हणता येणार नाही. कारण ज्याप्रमाणे पिता सदैव पुत्राच्या हिताची कामना करतो, पुत्राला दुःख प्राप्त होईल अशी कोणतीच इच्छा करत नाही, त्याप्रमाणे प्रजापती त्यांना पुत्रवत्‌ असणाऱ्या मनुष्यामध्ये रोगाची उत्पत्ती करूच शकत नाहीत. यानंतर त्यांनी स्वतःचा वाद मांडला. 
कालजस्त्वेव पुरुषः कालजास्तस्य चामयाः ।
जगत्‌ कालवशं सर्वं कालः सर्वत्र कारणम्‌ ।।
....चरक सूत्रस्थान
‘कालवादा’नुसार मनुष्य आणि रोग या दोघांच्या उत्पत्तीच्या मागे ‘काळ’ हे कारण आहे. हे संपूर्ण जगत काळाच्याच वशात आहे आणि सर्व प्रकारच्या कार्याच्या मागे काळ हेच कारण आहे. या वादाला ‘टाइम थिअरी’ असेही म्हटलेले आहे. 

याप्रकारे नऊ ऋषींनी आपापले मत मांडल्यावर पुनर्वसु आत्रेय या ऋषींनी या सर्व वादांचा समन्वय करून आपला निर्णय सांगितला तो असा,
येषामेव ही भावानां संपत्‌ संजनयेत्‌ नरम्‌ ।
तेषामेव विपद्‌ व्याधीनां विविधान्‌ समुदीरयेत्‌ ।।
....चरक सूत्रस्थान
ज्या भावपदार्थांच्या संपत्तीमुळे मनुष्याची उत्पत्ती होते, त्याच भावपदार्थामध्ये विपत्ती तयार झाली, दोष निर्माण झाला की रोगांची उत्पत्ती होते. 
पुनर्वसु आत्रेय ऋषींच्या या सिद्धांताचा सर्वांनी स्वीकार केला, मात्र काशिराज वामक राजाने त्यांना प्रश्न विचारला की, भावपदार्थांच्या संपत्तीमुळे उत्पन्न झालेल्या मनुष्याचे पोषण कशाने होते आणि विकृतीतून उद्भवलेल्या रोगाची वृद्धी काय कारणाने होते? 
या प्रश्नाचे उत्तर आपण पुढच्या वेळी पाहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor man and sickness reason