पथ्यापथ्य क्षयरोग

पथ्यापथ्य क्षयरोग

क्षयरोगात धातूंचा क्षय होत असल्याने धातुपोषक आणि पचण्यास सोपा आहार घेणे आवश्‍यक असते. या दृष्टीने क्षयरोगात ताकाबरोबर डाळी शिजवून बनविलेले सूप सुचविलेले आहे. धान्य एक वर्ष जुनी असावीत. पचायला हलके, वीर्यसंपन्न, उत्तम चवीचे आणि सुगंधित अन्न सेवन करावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे अन्न खाण्याने शरीर व मनात आनंद उत्पन्न होत असेल असेच अन्न क्षयरोग्याने सेवन करावे. 
 

क्षयरोगात औषधोपचारांच्या बरोबरीने आहारनियोजन कसे करावे याची माहिती आपण घेतो आहोत. क्षयरोगात धातूंचा क्षय होत असल्याने धातुपोषक आणि पचण्यास सोपा आहार घेणे आवश्‍यक असते. यादृष्टीने क्षयरोगात ताकाबरोबर डाळी शिजवून बनविलेले सूप सुचविलेले आहे. विशेषतः क्षयरोगात जुलाब होत असले तर त्यासाठी पुढील पद्धतीने सूप तयार करायला सांगितलेले आहे, 

ससूप्यधान्यान्सस्नेहान्‌ साम्लान्‌ संग्रहणान्‌ परम्‌ ।
....चरकसंहिता चिकित्सास्थान
मूग, तूर, मसूर वगैरे डाळी आणि ताक एकत्र शिजवून सूप तयार करावे आणि नंतर त्यात तूप, डाळिंबाचा रस किंवा लिंबाचा रस टाकून प्यायला द्यावे. 

सूप कसे कराल?
सूप करताना डाळींच्या चारपट पाणी घ्यायचे असते आणि ते एकत्र शिजवायला ठेवून डाळी नीट शिजल्या, ताकाबरोबर एकजीव झाल्या की त्यात मीठ, सुंठ, मिरी वगैरे गोष्टी मिसळायच्या असतात. 
या प्रकारचे सूप बनविताना ताक आणि डाळीच्या बरोबरीने काही विशिष्ट वनस्पतींची पाने सुद्धा वापरायला सांगितलेली आहेत, 
वेतसार्जुनजम्बुनां मृणालीकृपणगन्धयोः ।
श्रीपर्ण्या मदयन्त्याश्‍च यूथिकायाश्‍च पल्लवान्‌ ।।

मातुलुंगस्य धातक्‍या दाडिमस्य च कारयेत्‌ ।
स्नेहाम्ललवणोपेतान्‌ खडान्‌ सांग्रहिकान्‌ परम्‌ ।।
....चरकसंहिता चिकित्सास्थान
वेतस, अर्जुन आणि जांभळाच्या पानांचा रस किंवा काढा
वाळ्याच्या पानांचा रस किंवा काढा
गंभारीच्या पानांचा रस किंवा काढा
मेंदीच्या पानांचा रस किंवा काढा
जुईच्या पानांचा रस किंवा काढा
महाळुंगाच्या पानांचा रस किंवा काढा
डाळिंबाच्या पानांचा रस किंवा काढा
या प्रकारे उपलब्धतेनुसार वनस्पतींचा समावेश केला तर ते सूप अधिक उपयुक्‍त बनते. 
चांगेर्याश्‍चुक्रिकायाश्‍च दुग्धिकायाश्‍च कारयेत्‌ ।
खडान्‌ दधिसरोपेतान्‌ ससर्पिष्कान्सदाडिमान्‌ ।।
....चरकसंहिता चिकित्सास्थान
चांगेरी, चिंच या वनस्पतींच्या पानांचा रस काढून त्याबरोबर धान्य किंवा कडधान्य शिजवून सूप बनवावे व तयार सुपात दह्यावरची साय व तूप तसेच डाळिंबाचा रस मिसळून घेण्याने मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत मिळते. 
क्षयरोगात धातुक्षय आणि त्यापाठोपाठ शरीरशक्‍ती क्षीण होत असते. अशा वेळी जुलाब होणे किंवा अधिक वेळेला मलप्रवृत्ती होणे रुग्णाच्या प्रकृतीसाठी चांगले नसते. म्हणून क्षयरोगात आहाराच्या मदतीने मलप्रवृत्ती अधिक किंवा द्रवस्वरूपात होणार नाही याकडे लक्ष ठेवायचे असते. 

चवीने जेवावे
क्षयरोगात धातूंचे पोषण होण्यासाठी जेवण चवीने जेवणे हे सुद्धा गरजेचे असते. यासाठी स्वयंपाक घरातील अनेक द्रव्यांपासून ‘यवानीषाडव’ नावाचे चूर्ण चरकसंहितेते सुचवले आहे. हे चूर्ण दिवसातून अनेकदा चघळून चघळून खायला उत्तम असते. यामध्ये पुढील द्रव्ये असतात, ओवा, आमसूल, सुंठ, अम्लवेतस, डाळिंब, बोर प्रत्येकी दहा ग्रॅम; धणे, काळे मीठ, जिरे, दालचिनी प्रत्येकी पाच ग्रॅम; पिंपळी संख्येने १००; मिरी संख्येने २००; साखर १६० ग्रॅम ही सर्व द्रव्ये एकत्र करून त्याचे चूर्ण केले आणि दिवसातून तार-पाच वेळा चिमूट चिमूट प्रमाणात चघळले तर त्यामुळे जीभ शुद्ध होते, जेवणात रुची उत्पन्न होते, मलावष्टंभ होत नाही, पोटात वायू धरून राहात नाही, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत होते. मूळव्याधीमध्येही हे चूर्ण हितकर असते. 

क्षयरोगात अन्न कसे असावे याचे काही सामान्य निकष चरकसंहितेमध्ये सांगितलेले आहेत, 
समातीतानि  धान्यानि कल्पनीयानि शुष्यताम्‌ ।
लघून्यहीनवीर्याणि स्वादूनि गन्धवन्ति च ।।
यानि प्रहर्षकारिणी तानि पथ्यतमानि हि ।
....चरकसंहिता चिकित्सास्थान
धान्य एक वर्ष जुनी असावीत. पचायला हलके, वीर्यसंपन्न, उत्तम चवीचे आणि सुगंधित अन्न सेवन करावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे अन्न खाण्याने शरीर व मनात आनंद उत्पन्न होत असेल असेच अन्न क्षयरोग्याने सेवन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com