भूल

anesthesia
anesthesia

शस्त्रक्रियेदरम्यान भूल दिली जाते. हे भूलशास्त्र प्रगत झाले आहे. भूलतज्ज्ञांनी केलेले रुग्णाच्या आजाराचे बिनचूक निदान, योग्य अनेस्थेशियाची निवड, शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शारीरिक परिस्थितीचा योग्य प्रकारे घेतला गेलेला आढावा यामुळे रुग्ण संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान सुरक्षित आणि स्थिर राहू शकतो.

मानवी जीवन आणि वैद्यकीय क्षेत्र यांच्यातील नाते हे न संपणारे आहे. बहुतांश लोकांना त्यांच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्याचवेळी त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ‘अनेस्थेशिया’ची (भूल देण्याची) गरज पडते. ‘अनेस्थेशिया’ हा शब्द दोन मूळ ग्रीक शब्दांपासून आला आहे. ‘n` म्हणजे ‘च्या शिवाय‘ आणि ‘aesthesis` म्हणजे ‘संवेदना’. 

शस्त्रक्रियेदरम्यान दिलेल्या भुलीमुळे रुग्णाच्या सर्व वेदना आणि जाणिवा नाहीशा होतात आणि रुग्ण अतिशय स्वस्थ राहतो. आजच्या युगात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे शक्‍य आहे, याचे मुख्य कारण म्हणजे भूलशास्त्र या विषयात झालेली प्रगती. अतिशय प्रशिक्षित भूलतज्ज्ञांची उपलब्धता होय. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी, दरम्यान आणि नंतरही भूलतज्ज्ञ रुग्णासोबत असल्याने त्यांना ‘पेरिऑपरेटीव्ह फिजीशियन’ म्हटले जाते. रुग्णाला इतर आजार, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब इत्यादि असतानाही शस्त्रक्रियेदरम्यान, भूल देण्याव्यतिरिक्त या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम भूलतज्ज्ञ करतात. त्यामुळे शस्त्रक्रियेसारख्या अवघड परिस्थितीतही रुग्ण स्वस्थ्य राहतो.

गेल्या दोन दशकांमध्ये या क्षेत्रात झालेल्या सुधारणांमुळे या सर्व गोष्टी करणे शक्‍य झाले आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर या सुधारणा झाल्या आहेत. त्यातील काही सुधारणांची येथे चर्चा करू. 

रुग्णाचे विश्‍लेषण व चिकित्सा
वैद्यकीय क्षेत्रात निरंतर होणाऱ्या संशोधनामुळे रोगांचे निदान आणि उपचार पद्धतीत सतत प्रगती होत आहे. शस्त्रक्रियेपूर्वी जेव्हा भूलतज्ज्ञ रुग्णाची तपासणी करतात, त्या वेळी रुग्णाची प्रकृती आणि त्याला असणाऱ्या सर्व रोगांची मीमांसा केली जाते. काही गोष्टी जसे रक्तदाब, साखरेचे प्रमाण इत्यादि शस्त्रक्रियेपूर्वी योग्य प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. काही औषधांचे प्रमाणही बदलावे लागण्याची शक्‍यता असते. आज आपण इसीजी, २डी-इको, स्ट्रेस टेस्ट यांसारख्या काही विशेष तपासण्या सहजपणे करू शकतो. यामुळे रुग्णाचे सखोल वैद्यकीय विश्‍लेषण होते. शस्त्रक्रियेदरम्यान व नंतरही रुग्णाला असलेला संभाव्य धोकाही कळू शकतो. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून रुग्णाला त्रास होणार नाही व मानवेल अशा ‘अनेस्थेशिया’ची निवड केली जाते.

भूल देण्याचे तंत्र
 रुग्णाची वैद्यकीय अवस्था आणि शस्त्रक्रियेचे स्वरूप यावर अनेस्थेशिया देण्याचे तंत्र अवलंबून असते.
 ढोबळमानाने अनेस्थेशियाचे दोन प्रकार आहेत. जनरल आणि रिजनल अनेस्थेशिया.
 काही शस्त्रक्रिया करताना ‘लोकल अनेस्थेशिया’ वापरला जातो. म्हणजे ज्या अवयवावर शस्त्रक्रिया करायची आहे, तेवढाच भाग फक्त बधीर केला जातो. उदा. वरवरच्या जखमांवर टाके घालणे. बाकी बहुतांश शस्त्रक्रिया करताना जनरल किंवा रिजनल अनेस्थेशियाच वापर केला जातो. 
 
जनरल अनेस्थेशिया
चेहरा, छाती, उदर किंवा मेंदू यासारख्या शरीराच्या मध्यवर्ती भागांवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी जनरल अनेस्थेशिया वापरला जातो. यामध्ये रुग्णाला संपूर्ण बधिर केले जाते. संपूर्ण बेशुद्ध करण्यासाठी रुग्णाच्या धमन्यांमध्ये ठराविक प्रमाणात औषधे दिली जातात. त्याचसोबत श्वास नलिकेमध्ये एक नळी टाकून त्याद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास दिला जातो.

काही वायुरूपी औषधे नळीवाटे दिली जातात. त्यामुळे बेशुद्धावस्था टिकून राहते. या सर्व गोष्टींचे गणित अत्यंत काळजीपूर्वक मांडले जाते. शस्त्रक्रिया संपत आली की ही औषधे आणि वायू सोडणे बंद केले जाते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर योग्य वेळी रुग्ण जागा होऊ शकतो. पूर्वी रुग्ण शस्त्रक्रियेनंतर तास अन्‌ तास बधीर राहात असत. आता नवीन औषध प्रणालीमुळे भुलीचा परिणाम किती काळ राहू शकतो, हे बिनचूक सांगता येते. रुग्ण गंभीर आजारी असतानाही या अनेस्थेशियाचा वापर करता येतो. याचे दुष्परिणाम अतिशय कमी असतात. त्यामुळे हा बऱ्याच प्रमाणात सुरक्षित मानला जातो  

रिजनल अनेस्थेशिया
रिजनल अनेस्थेशिया म्हणजे शरीराचा एखादा प्रमुख भाग बधीर करणे. याचेही दोन प्रकार आहेत. सेन्ट्रल न्युरेक्‍शियल ब्लॉक  व पेरीफरल नर्व्ह ब्लॉक .

सेन्ट्रल न्युरेक्‍शियल म्हणजे मज्जारज्जू किंवा एपिड्यूरल अनेस्थेशिया. साधारणपणे पायाच्या किंवा उदराच्या खालील भागातील शस्त्रक्रिया करताना याचा वापर केला जातो. याचे इंजेक्‍शन रुग्णाच्या पाठीतून दिले जाते. त्यामुळे उदराच्या खालील भाग बधीर होतो. याचा परिणाम काही तासांपर्यंत टिकतो. याचा वापर केल्यानंतर रुग्णाला बहुतांश वेळा  एक-दोन दिवसांचा आराम करण्यास सांगितले जाते. काही घटनांमध्ये, अवघड शस्त्रक्रियांसाठी रुग्णाच्या पाठीत एक छोटी, केसांसारखी नळी काही दिवसांसाठी बसवली जाते आणि त्यातून वेदनाशामक औषधे शरीरात सोडली जातात.

रिजनल अनेस्थेशियाचा दुसरा प्रकार म्हणजे पेरीफरल नर्व्ह ब्लॉक. यात गेल्या दशकात विलक्षण सुधारणा झाल्या आहेत. या तंत्रामध्ये, मानवी शरीराचा एकच हात किंवा एकच पाय हा गरजेप्रमाणे बधीर करता येतो. यात रुग्ण शस्त्रक्रियेदरम्यान संपूर्णत: शुद्धीवर राहू शकतो. याचा वापर झालेले रुग्ण, त्यांची दैनंदिन कामे उदा. जेवण करणे, स्वच्छतागृहाचा वापर इत्यादी शस्त्रक्रियेनंतर काही तासातच करू शकतात. ज्यांना तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांसाठी याचा वापर केला जातो. हा अनेस्थेशियाचा प्रकार अतिशय सुरक्षित आहे. अतिशय गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठीही हा वापरला जातो. 

अनेस्थेशियाचा आणखी एक प्रकार आहे. ज्यात पेरीफरल नर्व्ह ब्लॉक आणि जनरल अनेस्थेशियाचा एकत्रितपणे वापर केला जातो. यामुळे रुग्णाला वेदनाविरहित आणि आरामदायक शस्त्रक्रियेचा अनुभव मिळतो. 

संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान, भूलतज्ज्ञ नाडी दर, रक्तदाब, श्वासोच्छवास, ऑक्‍सिजनचे प्रमाण, कार्बनडाय ऑक्‍साईड इत्यादि गोष्टींचे निरीक्षण करत असतो. यात आधुनिक देखरेख साधनांचीही भूलतज्ज्ञ मदत घेतो. या साधनांची अनेस्थेशियाच्या औषधांचे आणि वायूचे प्रमाण ठरविण्यासाठीही खूप मदत होते. भूलतज्ञांनी केलेले रुग्णाच्या आजाराचे बिनचूक निदान, योग्य अनेस्थेशियाची निवड,  शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शारीरिक परिस्थितीचा योग्य प्रकारे घेतला गेलेला आढावा यामुळे रुग्ण संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान सुरक्षित आणि स्थिर राहू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com