रक्षण पर्यावरणाचे

रक्षण पर्यावरणाचे

पर्यावरण रक्षणाचा विचार करत असताना वनस्पती, वृक्ष यांच्या वाढीवर भर देणे, कचरा व्यवस्थापन, वाईट धुराचे व्यवस्थापन तसेच मनुष्याच्या वागणुकीची शुद्धी, विचारांची शुद्धी व सृजनशक्‍ती म्हणून दान, प्रेम या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक ठरेल. तेव्हा भौतिकी सुधारणांबरोबर मनुष्यमात्राची विचारसरणी म्हणजेच ‘सोच’ बदलण्याची आवश्‍यकता आहे आणि हे पर्यावरणातील दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या अशुद्धी दूर केल्या तरच शक्‍य होऊन मनुष्य सुखी होऊ शकेल.

सध्या पर्यावरणाची काळजी व एकूणच सर्व निसर्ग संरक्षण हा विषय चर्चेत आलेला आहे. पर्यावरण व्यवस्थित सांभाळले नाही, तर पुढच्या पिढीला भविष्य नाही हे समजले आणि त्यामुळे पर्यावरण व वनस्पती संरक्षण हा विषय कायद्याच्या चौकटीतही आणला गेला. प्रत्येक देशाने स्वतःच्या जमिनीपैकी काही भागाचा वापर वनासाठीच करावा, अशा तऱ्हेचे ठराव होऊ लागले. अर्थात ज्या जमिनी वनाच्या म्हणून ठरविण्यात आल्या, तेथे कातळ असल्यामुळे झाड उगवायची शक्‍यताच नाही, असे काही विनोद सोडले, तरी एकूण तेथे मनुष्यवस्ती होऊ नये, शहरे वाढू नयेत एवढा तरी नियम होऊ शकला. नैसर्गिक कचरा हा पाणी, काळ व माती यांच्यामुळे विघटित होतो; पण विघटित होऊ न शकणारा प्लॅस्टिकचा कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न उभा राहिला. अणुशक्‍ती बनविण्यासाठी वापरलेली द्रव्ये व अन्य गोष्टी यापासून तयार झालेला अणुशक्‍तिभारित कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला. ज्या ठिकाणी बोलायला कोणी वाली नाही, असे गरीब देश निवडून असा अणुशक्‍तिभारित कचरा टाकायला सुरवात झाली. याचा परिणाम जमिनीतील पाण्यावर व एकूण वातावरणावर होऊ लागला.

या सगळ्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष पर्यावरण रक्षणाकडे लागले. आयुर्वेदाने ‘जनपदोध्वंस’ म्हणजे पर्यावरणाचे संतुलन बिघडले, पर्यावरणात विषारी द्रव्ये पसरली तर त्याचे दुष्परिणाम मनुष्याला कशा तऱ्हेने भोगावे लागतील हे स्पष्ट सांगितलेले आहे. आज तंतोतंत तशीच लक्षणे दिसू लागली आहेत. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषिमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्‍यकता ओळखून वृक्षवल्ली, नद्या, पर्वत वगैरेंना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोचू देऊ नये, पर्यावरणाचे रक्षण करावे हे कसे व का सुचवले असेल, याचे आश्‍चर्य वाटते. भारतीय संस्कृतीमध्ये पर्जन्याची पूजा, वृक्ष-नद्या यांची पूजा, वसंताचे आगमन झाले की गुढी उभारून त्याचे स्वागत करणे, अशा तऱ्हेने एकूणच वातावरणाचा मान ठेवण्यासाठी परंपरा, उत्सव तयार केले. वातावरणाचे संतुलन बरोबर राहिले नाही, तर कुठल्या गोष्टींना सामोरे जावे लागेल याचाही विचार केला. 

पर्यावरणाचा आपल्यावर परिणाम होतो व आपला परिणाम पर्यावरणावर होतो, तेव्हा मनुष्याला स्वतःचे आरोग्य नीट ठेवायचे असेल व समृद्धी अनुभवायची असेल, तर पर्यावरणाची काळजी घ्यावीच लागेल हे आज सर्वांना कळून चुकले आहे. महत्त्वाचे म्हणजे, संपूर्ण विश्व व त्यातील प्रत्येक घटकच नव्हे, तर प्रत्येक अणू-रेणू एकमेकांशी जोडलेला आहे, पर्यायाने एकात होणारा बदल दुसऱ्यावर परिणाम करतो. प्रत्येक वस्तू तिच्यात असलेल्या गुणांनुसार कार्य करते. जोपर्यंत वस्तूतील जाणीव वा चैतन्य ठरलेल्या मर्यादेच्या चौकटीत चालते, तोपर्यंत त्याचे खूपसे गणित करता येते. सर्व चैतन्यविरहित (हालचाल करू न शकणाऱ्या, स्वतःचे स्थान सोडू न शकणाऱ्या) जड वस्तू आणि त्यानंतर येणारे प्राणिमात्र (जे त्यांना दिलेल्या गुणाप्रमाणेच वर्तन करतात) यांच्याविषयी भविष्य वर्तविणे सोपे असते. भौतिकशास्त्रानुसार न्यूटनचे सिद्धांत जड वस्तूंना लागू पडतात आणि त्या एका विशिष्ट पद्धतीने एका विशिष्ट गणितात कालक्रमण करत असतात, हे शोधून काढणे सोपे असते. भौतिक विज्ञानाने मनुष्यमात्र हा पेशींनी बनलेला असून, त्यात असलेल्या गुणसूत्रांचा आधार घेऊन तो कार्य करतो, तेव्हा संपूर्ण विश्व एक यंत्र आहे व मनुष्यसुद्धा एक यंत्र आहे आणि त्यामुळे त्यांच्या हालचालींविषयींचे आडाखे बांधता येतात, असे समजून त्यानुसार त्यावरील उपाययोजना शोधून काढल्या. मनुष्याचे सर्व जीवन त्याच्या गुणसूत्रांनुसार चालणार असल्याने गुणसूत्रांवर सखोल अभ्यास झाला आणि त्यातून भौतिकशास्त्र अशा निर्णयाप्रत आले, की मनुष्यमात्र हा स्वतंत्र आहे. त्यासाठी परमेश्वर नावाच्या कुठल्याही शक्‍तीची आवश्‍यकता नाही, अशी कुठली शक्‍ती अस्तित्वात नाहीच. 

अज्ञात समजले नाही म्हणून त्याचे अस्तित्व नाकारण्यात आले, तेव्हा जीवनाचे कोडे अधिकच गहन बनले. मनुष्य स्वभावातील बदल आणि नवीन नवीन येणारे रोग यांच्याविषयीही काही समजेनासे झाले तेव्हा उदय झाला क्वांटम फिजिक्‍सचा. म्हणजेच वातावरणातील परिणामाचा डीएन्‌ए, आरएन्‌ए, मनुष्य स्वभाव, त्याचे वागणे यावर परिणाम होतो आणि अज्ञाताचे अस्तित्व स्वीकारावे लागते. क्वांटम फिजिक्‍सचा अभ्यास झाला तसे लक्षात आले, की या विश्वात अतिसूक्ष्म, इंद्रियांना अगोचर असे अस्तित्व आहे आणि या अतिसूक्ष्म अस्तित्वाचा परिणाम सर्व मनुष्यमात्रांवर, प्रणिमात्रांवर होत राहतो. त्यामुळे जसे स्थळ व काळ बदलेल तसे म्हणजेच वेगवेगळ्या स्थळी व वेगवेगळ्या काळात व्यक्‍तीला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात किंवा त्यात वेगवेगळे बदल होऊ शकतात. याचा अर्थ असा, की चांगले-वाईट केवळ वस्तूवर, शरीरावर, त्यात असलेल्या गुणसूत्रांवर अवलंबून नसते, तर त्यावर बाहेरच्या वातावरणाचा प्रभाव पडतो. म्हणजेच आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत व आपला एकमेकांवर प्रभाव पडतो. सूर्य जसा आपल्याला तापवतो तसे आपणही अत्यल्प प्रमाणात का होईना सूर्यावर परिणाम करू शकतो. आपण सूर्यासाठी केलेल्या प्रार्थनेचा परिणाम अतिसूक्ष्म असेल व तो केवळ तर्काने समजता येईल; पण तो होतो हे नक्की. या अशा संकल्पनेमुळे संपूर्ण विज्ञानाला एक वेगळी दिशा मिळाली. मनुष्याच्या वाढलेल्या अहंकाराचा, त्याच्या लोभी वृत्तीचा, क्रोधाचा, हिंसक विचारसरणीचा परिणाम वातावरणावर होणे साहजिक आहे. यामुळे आज अनेक दुष्परिणाम दिसू लागले आहेत. मनुष्याला पळता भुई थोडी व्हायची वेळ आली आहे. उद्या मनुष्याला प्यायचे पाणी मिळेनासे झाले तर काय करणार? आज अचानक त्सुनामी वाढल्या, भूकंप वाढले असल्याचे दिसत असल्यामुळे पर्यावरणाकडे वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज उत्पन्न झालेली आहे.

वातावरणात दूषित वायू न सोडणे एवढ्या एकाच उपायाने हे काम होणार नाही, आयुर्वेदाने व वेदशास्त्राने सुचविलेले यज्ञयाग हेही पर्यावरणासाठी आवश्‍यक ठरतात. यज्ञाच्या धुरात अत्यंत सूक्ष्म रूपात द्रव्य असते, दिसले नाही तरी ते वातावरणात पसरते. तेव्हा यज्ञामागाचे विज्ञान समजून घेऊन यज्ञयागादी करणे, विशिष्ट वनस्पतींना यज्ञीय पद्धतीने शक्‍तीत रूपांतरित केले तरच पर्यावरणाची शुद्धी लवकर व व्यवस्थित होऊ शकेल. पर्यावरणात असलेल्या दूषित वायूंचा नाश करण्यासाठी त्यात चांगले वायू सोडणे आवश्‍यक आहे त्याचप्रमाणे वातावरणात चांगले विचारतरंग सोडण्याचीही आवश्‍यकता आहे. धुराच्या कणाबरोबर चांगले विचारतरंग वातावरणात तर पसरतातच; पण या अणुंचा परिणाम बीजसंस्कार म्हणूनही होतो व इच्छित परिणाम घडवून माणसाचे प्रश्‍न सोडवून त्याला सुखी करता येते, अशी आयुर्वेदाची विचारसरणी आहे.

आपल्या व्यवहारात शौर्य असावे; पण हिंसा नसावी, कारुण्य असावे; पण दीनता नसावी, प्रेम असावे; पण आसक्ती नसावी. एकूण मनुष्यमात्राने ‘घेण्याचे’ सोडून ‘देण्याचे’ धाडस दाखवावे, हेसुद्धा पर्यावरणशुद्धीसाठी आवश्‍यक ठरते. अन्यथा सद्यःस्थितीत दिसणारे अत्याचार, व्यभिचार, हिंसा वाढत जातील व त्यातून मनुष्यमात्र अधिक दुःखी होईल. 

पर्यावरण रक्षणाचा विचार करत असताना वनस्पती, वृक्ष यांच्या वाढीवर भर देणे, कचरा व्यवस्थापन, वाईट धुराचे व्यवस्थापन, तसेच मनुष्याच्या वागणुकीची शुद्धी, विचारांची शुद्धी व सृजनशक्‍ती म्हणून दान, प्रेम या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक ठरेल. तेव्हा भौतिकी सुधारणांबरोबर मनुष्यमात्राची विचारसरणी म्हणजेच ‘सोच’ बदलण्याची आवश्‍यकता आहे आणि हे पर्यावरणातील दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या अशुद्धी दूर केल्या तरच शक्‍य होऊन मनुष्य सुखी होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com