प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 9 March 2018

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीची नियमित वाचक आहे. माझे वय ३४ वर्षे आहे. आमच्या विवाहाला दोन वर्षे झाली आहेत, पण अजूनही आम्हाला मूल बाळ झाले नाही, मला बद्धकोष्ठतेचाही त्रास असल्याने माझे वजन कमी झाले आहे. पत्नीची तब्येत चांगली आहे. कधीतरी पाळीला उशीर होतो. तरी मी वीर्याची तपासणी करावी का? वीर्यात काही दोष असेल का? कृपया मार्गदर्शन करावे. 
... एम. एम. कांबळे

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीची नियमित वाचक आहे. माझे वय ३४ वर्षे आहे. आमच्या विवाहाला दोन वर्षे झाली आहेत, पण अजूनही आम्हाला मूल बाळ झाले नाही, मला बद्धकोष्ठतेचाही त्रास असल्याने माझे वजन कमी झाले आहे. पत्नीची तब्येत चांगली आहे. कधीतरी पाळीला उशीर होतो. तरी मी वीर्याची तपासणी करावी का? वीर्यात काही दोष असेल का? कृपया मार्गदर्शन करावे. 
... एम. एम. कांबळे

उत्तर - तपासणी केल्याशिवाय वीर्यात दोष आहे की नाही हे सांगता येणार नाही, पण ज्याअर्थी बद्धकोष्ठतेमुळे वजन कमी झाले आहे, त्याअर्थी शुक्रधातूत अशक्‍तता असणे शक्‍य आहे. तेव्हा घाईने तपासणी करण्याऐवजी पचन सुधारेल व शरीराचे पोषण होईल यासाठी योग्य उपचार करणे चांगले. या दृष्टीने आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा कमीत कमी चार-पाच चमचे समावेश करणे, रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’, अविपत्तिकर चूर्ण घेणे, पाणी उकळून व शक्‍य तेव्हा गरम असताना पिणे हे उपाय योजता येतील. पत्नीची पाळी कधीतरी उशिरा येते त्या दृष्टीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, ‘फेमिनाईन बॅलन्स आसव‘, चंद्रप्रभा गोळ्या सुरू करता येतील. या उपायांनी दोघांचाही तब्येत सुधारली की वैद्यांच्या सल्ल्याने गर्भधारणेस मदत करणारी, शुक्रपोषक औषधे सुरू करून मग बाळासाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर होय. 

***************************************************

मला काही दिवसांपासून निद्रानाशाचा त्रास सुरू झाला आहे. रात्री कितीही प्रयत्न केला तरी दोन-तीन तासच झोप येते. झोपेची गोळी घेतली तरी चार-साडेचार तासांपेक्षा जास्ती झोपू शकत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
.... नेने

उत्तर - शांत आणि पुरेशी झोप हा आरोग्याचा एक आधारस्तंभ असतो. झोपेच्या गोळीशिवाय शांत झोप येणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. यासाठी नियमित अभ्यंग करणे, टाळूला ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणे, नाकात घरी बनविलेले साजूक तूप किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकणे, कानात ‘संतुलन श्रुती तेला’चे थेंब टाकणे या उपायांचा फायदा होताना दिसतो. मन, मेंदू तसेच बुद्धीला शांत करून झोप येण्यास मदत करणाऱ्या ब्राह्मी, जटामांसी वगैरे द्रव्यांपासून बनविलेल्या ‘निद्रासॅन गोळ्या’, ‘सॅन रिलॅक्‍स सिरप’ घेण्याचाही फायदा होईल. तसेच झोपताना ‘संतुलन योगनिद्रा’ हे संगीत ऐकत झोपण्याचा प्रयत्न करण्यानेही क्रमाक्रमाने शांत व चांगली झोप लागते हा आजवरचा अनेकांचा अनुभव आहे.

***************************************************

‘सकाळ’ची ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी आम्ही घरचे सर्व जण आवडीने वाचतो आणि त्यात सुचविलेली औषधे वेळोवेळी घेत असतो. माझी समस्या अशी आहे की, सकाळी तोंड धुताना घशातून व नाकपुडीतून चिकट स्राव येतो, त्यामुळे तोंड धुण्यास फार वेळ लागतो, हा स्राव प्रयत्नपूर्वक काढून टाकल्यावर बरे वाटते. रात्री झोपण्यापूर्वी नस्यसॅन घृताचे तीन-चार थेंब टाकल्यास बरे वाटेल का? तसेच, आणखी काही औषध वापरण्याचा उपयोग होईल का? कृपया मार्गदर्शन करावे.
... भगत

उत्तर - नस्यसॅन घृत वापरण्याचा फायदा होईलच. बरोबरीने घसा, नाक, मुखातील चिकटपणा कमी होण्यासाठी ‘संतुलन योगदंती चूर्णा’ने दात घासणे हे गुणकारी असते. यातील कफनाशक आणि मुखशुद्धीकर द्रव्यांनी  या सर्व ठिकाणचा मलरूप, चिकट कफ सुटा होऊन बाहेर निघून जाणे सोपे होते. याशिवाय रोज सकाळी ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष करण्याचाही उपयोग होईल. गंडुष म्हणजे अर्धा चमचा तेल नुसते किंवा दोन-तीन चमचे पाण्यात मिसळून तोंडात घरून ठेवणे, तोंडातल्या तोंडात खुळखुळवणे आणि आठ-दहा मिनिटांनी टाकून देऊन कोमट वा गरम पाण्याने चूळ भरणे, काही दिवस नियमाने हा उपचार केला तर घशातील चिकटपणा कमी होण्यास मदत मिळेल. बरोबरीने मुळात असा मलरूप कफ तयार होऊ नये यासाठी काही दिवस जेवणानंतर अर्धा-अर्धा चमचा  लवणभास्कर चूर्ण आणि दोन-दोन ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या घेणेही चांगले.

***************************************************
मला गेल्या दोन वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास आहे, तरी मला यासाठी साधा, घरच्या घरी करता येईल असा उपाय सुचवावा, ही विनंती. 
... यशवंत सुतार

उत्तर - गुडघेदुखीवर साधा पण प्रभावी उपाय म्हणजे गुडघ्यांना दिवसातून दोन-तीन वेळा, झीज भरून काढणारे, सांध्यांना आतून स्निग्धता देणारे, ‘संतुलन शांती तेला’सारखे संस्कारित तेल जिरवणे, याशिवाय आठवड्यातून दोन-तीन वेळा अगोदर तेल लावून वरून एरंड, निर्गुडी, शेवगा, सागरगोटा यापैकी मिळतील ती पाने वाफवून त्याचा शेक करण्याचाही उपयोग होईल. सुंठ-गूळ-तुपाच्या गोळ्या घेणे, आहारातून आवश्‍यक तेवढी स्निग्धता मिळेल याकडे लक्ष देणे. दूध-खारीक, डिंकाचे लाडू, ‘संतुलन वातबल गोळ्या’, ‘मॅरोसॅन’ रसायन यांचा समावेश करणे हे सुद्धा चांगले.

***************************************************

माझे वय २७ वर्षे आहे. मी कंपनीमध्ये कामाला आहे. पण दिवसभर काम केल्यावर मला फार थकवा येतो. कायम फ्रेश राहण्यासाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे. ... अजय
उत्तर - थकवा कमी होऊन स्फूर्ती जाणवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उत्तमोत्तम उपाय सांगितलेले आहेत. यात पहिले येते अभ्यंग. रात्री झोपण्यापूर्वी अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेला’सारखे तेल लावणे या दृष्टीने उत्तम होय. दुसरा उपाय म्हणजे नियमित रसायन सेवन. सकाळी नाश्‍त्याच्या आधी च्यवनप्राश, आत्मप्राश, धात्री रसायन यापैकी एक-दोन रसायने घेणे, दिवसातून दोन वेळा दुधाबरोबर ‘संतुलन चैतन्य कल्प’ घेणे याचा उपयोग होईल. याशिवाय आहार सकस व प्रकृतीनुरूप असणे, जेवण-झोपणे-उठणे याच्या वेळा नियमित आणि निसर्गचक्राला अनुरूप असणे, सकाळी पंचामृत, बदाम घेणे यामुळेही थकवा दूर होऊन दिवसभर उत्साहाने काम करण्याची शक्‍ती मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor Question Answer