प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मला आणि माझ्या कुटुंबीयांना ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाचा खूपच फायदा झालेला आहे. मी घराला रंग देण्याचे काम करतो. काम करताना नाकातोंडावर रुमाल बांधतो; परंतु तरीही भिंती घासताना नाकातोंडात खूप धूळ जाते. याचा दुष्परिणाम होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यायला हवी? कृपया मार्गदर्शन करावे.
.... गणेश भिलारे
उत्तर -
भिंती घासताना उडणारी धूळ खूपच सूक्ष्म असते, त्यामुळे फक्‍त रुमाल बांधणे पुरेसे ठरणार नाही. यासाठी विशेष मास्क उपलब्ध असतात, औषधे मिळतात त्या दुकानात विचारपूस केली तर असा मास्क मिळू शकेल. याखेरीज रात्री झोपण्यापूर्वी नाकात पातळ केलेल्या साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृत’ या औषधी तुपाचे दोन-तीन थेंब टाकण्याची सवय ठेवली तर नाकाच्या आतील श्‍लेष्मल त्वचेला संरक्षण मिळून सूक्ष्म कण आतपर्यंत जाण्यास प्रतिबंध करता येईल. फुफ्फुसांवर दुष्परिणाम होऊ नये यासाठी सकाळ-संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण मध किंवा पाण्याबरोबर घेण्याचाही उपयोग होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्वासावाटे आत जाणाऱ्या विषद्रव्यांचा निचरा व्हावा, यासाठी रोज सकाळी दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम प्राणायाम, ॐकार गुंजन करणे उपयोगी ठरेल.  

माझे वय ५८ वर्षे आहे. गेल्या दोन वर्षांपासून मला वरचेवर ‘सायनस’चा त्रास होतो. सर्दी वाहून जात नाही त्यामुळे डोके जड राहते, दुखते, कानात दडे बसतात. छातीमध्ये कफ जाणवत नाही; तसेच हल्ली वासही नीट येत नाही. वाफारा, लेप घेण्याने तात्पुरते बरे वाटते; पण पुन्हा पुन्हा त्रास होत पाहतो. कृपया मार्गदर्शन करावे.
- कोटस्थाने
उत्तर -
या प्रकारच्या चिवट ‘सायनस’ सुजण्याच्या त्रासावर नस्य या उपचाराचा उत्तम उपयोग होताना दिसतो. तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे नाकात ‘नस्यसॅन घृता’चे तीन-चार थेंब टाकण्याचा फायदा होईल. त्रास असताना, तसेच नसतानाही आठवड्यातून दोन वेळा गरम पाण्यात गवती चहा, ओवा, तुळशीची पाने टाकून त्याचा पाच मिनिटांसाठी वाफारा घेणे चांगले. तसेच निर्गुडीची पाने वाफवून त्याचा कपाळ, कान, डोळ्यांच्या खाली, गालावर सोसवेल इतका गरम लेप करण्याचाही चांगला उपयोग होईल. हा उपचार आठवड्यातून एकदा केला तरी चालेल. काही दिवस सितोपलादी चूर्ण, ‘ब्राँकोसॅन सिरप’, ‘सॅनरोझ’ अवलेह घेऊन प्रतिकारशक्‍ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे उत्तम. थंड पाणी, शीतपेये, दही, आंबट फळे, सीताफळ, फणस वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर.  

माझे वय सोळा वर्षे असून, त्यामानाने वजन फारच कमी म्हणजे फक्‍त ४१ किलो आहे. मात्र, उंची व्यवस्थित आहे. यामुळे माझ्यामध्ये कमतरतेची भावना निर्माण होतो, लवकर वजन वाढण्यासाठी एखादा खात्रिदायक उपाय सुचवावा ही विनंती. ...कुमार
उत्तर :
शरीराच्या बाबतीत घाई करू चालत नाही. ते ते काम निसर्गाच्या नियमानुसार होण्यासाठी अमुक वेळ द्यावाच लागतो. मात्र, योग्य प्रयत्नांना चांगले फळ येते हे नक्की. या वयात वजन वाढण्यासाठी, विशेषतः मांसाला मजबुती मिळण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे असते. यादृष्टीने नियमित पळायला जाणे, शक्‍तीनुसार शक्‍य तितके (किमान दहा-बारा) सूर्यनमस्कार घालणे चांगले. अंगाला नियमित अभ्यंग करण्याने कमी वजन वाढण्यास; तसेच वाढलेले वजन कमी होण्यास मदत मिळत असते. यादृष्टीने रात्री झोपण्यापूर्वी अंगाला ‘संतुलन अभ्यंग तीळ तेल’ लावण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी पंचामृत, रात्री भिजविलेले चार-पाच बदाम, ‘संतुलन चैतन्य कल्प’ टाकलेले दूध घेणे चांगले. तूप-साखरेसह ‘संतुलन यू. सी. चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल. रात्री जागरणे होणार नाहीत, वेळेवर व घरचे सकस, पौष्टिक जेवण पोटात जाईल याकडे लक्ष ठेवणेही आवश्‍यक. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली क्षीरबस्ती किंवा धातूपोषक द्रव्यांनी संस्कारित तेलाची बस्ती घेण्यानेही वजन वाढण्यास मदत मिळते असा अनुभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com