प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 15 June 2018

मी फॅमिली डॉक्‍टर ही पुरवणी नियमित वाचते. मला स्वतःला आपल्या औषधांचा चांगला गुण आलेला आहे. माझी मुलगी १४ वर्षांची आहे. तिला २-३ महिन्यांपूर्वी मलेरिया झाला होता. दवाखान्यातून औषधे घेतल्यावर बरे वाटले, पण पुन्हा पुन्हा थंडी वाजून ताप येतो, डोके खूप दुखते. यासाठी पुन्हा औषधे घ्यावी लागतात. पूर्ण बरे वाटण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे. 
... सौ. शुभांगी, सातारा

मी फॅमिली डॉक्‍टर ही पुरवणी नियमित वाचते. मला स्वतःला आपल्या औषधांचा चांगला गुण आलेला आहे. माझी मुलगी १४ वर्षांची आहे. तिला २-३ महिन्यांपूर्वी मलेरिया झाला होता. दवाखान्यातून औषधे घेतल्यावर बरे वाटले, पण पुन्हा पुन्हा थंडी वाजून ताप येतो, डोके खूप दुखते. यासाठी पुन्हा औषधे घ्यावी लागतात. पूर्ण बरे वाटण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे. 
... सौ. शुभांगी, सातारा

उत्तर - केवळ ताप उतरण्यासाठी उपाय योजणे पुरेसे नसते, तर ताप बरा होण्यासाठी उपचार करणे अधिक गरजेचे असते. यादृष्टीने मुलीला गुडूची घनवटी देण्याचा उपयोग होईल. चांगल्या प्रतीचे शुद्ध गुळवेल सत्त्व मिळाले तर ते घेण्याचाही उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने सॅन अमृत, ज्वरांकुश या गोळ्या घेण्यानेही तापाच्या मुळावर काम करता येईल. प्यायचे पाणी उकळून घेणे व उकळताना त्यात अर्धा चमचा ‘जलसंतुलन’ मिश्रण टाकणे हे सुद्धा तापावर फायद्याचे ठरते. काही दिवस नियमित पादाभ्यंग करणे, जड गोष्टी आहारातून टाळणे हे सुद्धा चांगले. एकंदर तापाची प्रवृत्ती नष्ट व्हावी व डोकेदुखी, उष्णता यावर उपयोग व्हावा यासाठी ‘संतुलन पित्तशांती’, ‘समसॅन गोळ्या’ घेण्याचा, घरात सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन प्युरिफायर’ हा खास वातावरण शुद्ध होण्यासाठी आणि ताप येऊ नये यासाठी बनविलेला धूप करणे हे सुद्धा श्रेयस्कर होय.  

दिवाळीमध्ये मी नेहमीपेक्षा वेगळा साबण वापरला होता. त्या वेळी महिन्यानंतर माझ्या अंगाला खाज येऊ लागली. त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घेतली, त्यामुळे काही दिवस फरक पडला, पण सध्या पुन्हा त्रास होतो आहे. सहसा थंडीत त्रास जास्त होतो. कृपया यावर उपाय सुचवावा. 
... श्री. सतीश

उत्तर - त्वचा संवेदनशील असली आणि रक्‍तामध्ये दोष असला तर या प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर पंचतिक्‍त घृत घेण्याचा तसेच ‘मंजिष्ठासॅन’ गोळ्या, ‘संतुलन मंजिसार’ आसव घेण्याचा उपयोग होईल. साबणाऐवजी रक्‍तशुद्धीकर व त्वचेला हितकर द्रव्यांनी बनविलेले उटणे उदा. ‘सॅन मसाज पावडर’ वापरणे चांगले. विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये दूध वा सायीमध्ये उटणे मिसळून लावणे तसेच आहारात दूध, तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश केला तर त्वचा रुक्ष पडणार नाही व खाजही सुटणार नाही. गवार, वांगे, ढोबळी मिरची, दही, टोमॅटो, चिंच, मांसाहार, अंडी वगैरे गोष्टी आहारातून टाळणे हे सुद्धा चांगले. 

फॅमिली डॉक्‍टर ही पूर्ण पुस्तिका फार वाचनीय तसेच उपयोगी असते. माझ्या मुलीचे वय ३० वर्षे आहे. दोन वर्षांपूर्वी तिला मल्टिपल स्क्‍लेरॉसिस असल्याचे समजले. सध्या तिची तब्येत व्यवस्थित आहे, मात्र औषधे सुरू आहेत. यातून पूर्ण बरे होण्यासाठी मार्गदर्शन करावे.
...सौ. छाया

उत्तर - हा एक वातदोषाशी संबंधित विकार असल्याने यावर व्यक्‍तीची प्रकृती, ताकद, जीवनशैली वगैरे बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन नेमके उपचार करावे लागतात. तसेच औषधांच्या बरोबरीने शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म, त्यातही विशेष बस्ती, पिंडस्वेदन, शिरोबस्ती, नस्य यासारखे उपचार घेणे आवश्‍यक असते. यादृष्टीने एकदा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे सर्वांत चांगले. तत्पूर्वी नियमित अभ्यंग करणे, विशेषतः मान-पाठीला ‘संतुलन कुंडलिनी तेल’ खालून वर या दिशेने जिरवणे, ‘संतुलन वातबल’ या गोळ्या घेणे, आहारात ५-६ चमचे या प्रमाणात घरी बनविलेले साजूक तूप समाविष्ट करणे, मज्जाधातू व नसांचे पोषण करणारे ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेणे हे उपाय सुरू करता येतील. परंतु भविष्यात त्रासाची तीव्रता वाढू नये यासाठी आत्ताच आवश्‍यक ते सर्व उपचार नीट करून घेणे श्रेयस्कर होय.  

मला वारंवार सर्दी-खोकला होतो. डाव्या नाकपुडीत सतत आग होते. तसेच माझ्या जिभेची चव गेलेली आहे. मिठाची चव कळत नाही. यावर उपाय सांगावा.
...श्रीमती शीला

उत्तर - वारंवार सर्दी-खोकला होण्याने वास व चव या दोन्ही संवेदना बोथट होऊ शकतात. तसेच या दोन्ही संवेदना एकमेकांना पूरक असतात. वारंवार सर्दी-खोकला होऊ नये यासाठी प्यायचे पाणी उकळून घेणे, शक्‍य तेव्हा गरम असतानाच पिणे चांगले. घरात सकाळ-संध्याकाळ विशेष औषधी द्रव्यांचा धूप करण्याने हवा शुद्ध होऊन फुप्फुसांची शक्‍ती, शरीराची रोगप्रतिकार शक्‍ती सुधारण्यासही मदत मिळते. यादृष्टीने ‘संतुलन प्युरिफायर धूप’ वापरता येईल. सितोपलादी चूर्ण, ‘ब्राँकोसॅन सिरप’, वैद्यांच्या सल्ल्याने ‘प्राणसॅन योग चूर्ण’, श्वासकुठार घेण्याचा उपयोग होईल. छातीत कफ दाटून राहिला असेल तर रुईच्या पानांनी शेक करण्यानेही लगेच बरे वाटेल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे २-३ थेंब टाकण्याने नाकपुडीत आग होणे तसेच नाक बंद पडणे, वास न समजणे या तक्रारी कमी होत जातील. रोज सकाळी ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष म्हणजे अर्धा चमचा तेल नुसते किंवा दोन घोट पाण्यात मिसळून तोंडात ८-१० मिनिटांसाठी धरून ठेवून खुळखुळविणे याने चव सुधारण्यास मदत मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer