प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

माझी मुलगी साडेपाच वर्षांची आहे. वयाच्या व उंचीच्या मानाने तिचे वजन कमी आहे. तिला फार वेळ स्थिर बसणे अवघड जाते. तिचा स्वभावसुद्धा खूप चंचल आहे. एकंदर सर्व विकास व्यवस्थित व्हावा, यासाठी मार्गदर्शन करावे.  ..... अंजली
उत्तर - वजनाचे मोजमाप फक्‍त वयावर किंवा उंचीवर अवलंबून नसते, तर त्यामध्ये प्रकृतीचाही मोठा सहभाग असतो. प्रश्नातील इतर माहितीवरून मुलीचा वातदोष नियंत्रणात आणण्यासाठी उपचार करायला हवेत असे वाटते. यादृष्टीने तिला रोज अभ्यंग करण्याचा उपयोग होईल. यासाठी ‘संतुलन बेबी मसाज तेल’ वापरणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी नाकात दोन- तीन थेंब साजूक तूप टाकण्याचा, तसेच टाळूवर ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावण्याचा उपयोग होईल. एकंदर विकास चांगला व्हावा यासाठी तिला सुवर्णसिद्ध जल देण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी पंचामृत, पाण्यात भिजवलेले तीन- चार बदाम देण्याचाही फायदा होईल. मुलीला रोज रामरक्षा, अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेशस्तोत्र, प्रज्ञाविर्वधनस्तोत्र यापैकी जमेल ते ऐकवणे, सकाळ- संध्याकाळ दिवा लावून ‘शुभं करोति’सारखी प्रार्थना ऐकणे- म्हणून घेणे, याचाही मन शांत व एकाग्र होण्यासाठी फायदा होईल. रोज सकाळी चमचाभर ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेणे, दुधाबरोबर शतावरी कल्प घेणे हेसुद्धा चांगले.

**********************************************************
माझी मुलगी दीड वर्षाची आहे. तिला उन्हाळ्याच्या सुरवातीला चेहऱ्यावर तीन-चार फोड आले होते. नंतर दोन गळवेसुद्धा आली होती. पुन्हा असे होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी? सध्या ती घरातील इतरांप्रमाणे खाते, पिते. कृपया उपाय सुचवावा. .... इस्माईल
उत्तर - शरीरात उष्णता वाढली तर अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. यासाठी मुलीला दिवसातून दोनवेळा कामदुधा ही गोळी व ‘संतुलन पित्तशांती’ ही गोळी देण्याचा उपयोग होईल. मुलीचे पोट रोज व्यवस्थित साफ होते आहे याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक. अंगाला ‘संतुलन अभ्यंग (खोबरेल) तेला’सारखे तेल लावण्यानेही शरीरातील अतिरिक्‍त उष्णता कमी होण्यास मदत मिळेल. मुलगी सर्व खात-पीत असली तरी ढोबळी मिरची, वांगे, मांसाहारी पदार्थ, अंडी, चीज, टोमॅटो, दही, अननस, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ वगैरे उष्णता वाढविणाऱ्या गोष्टी टाळणे आवश्‍यक. 

**********************************************************
माझ्या पतीचे वय ७२ वर्षे आहे. त्यांना गेल्या वर्षापासून चक्कर येणे, बसल्या बसल्या झोप किंवा ग्लानी येणे, विस्मरण होणे, बसून उठताना मागे तोल जाणे असे त्रास होत आहेत. डॉक्‍टरांनी एमआरआय केला, त्यानुसार मेंदू आकुंचन होत असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या औषधांचा उपयोग झाला नाही. कृपया आपण काही उपाय सुचवावा.
.... पुष्पा जाधव

उत्तर - वयानुसार किंवा अन्य कोणत्याही कारणांनी मेंदूवर दुष्परिणाम होऊ नये यासाठी वयाच्या पन्नाशी- साठीनंतर विशेष काळजी घेणे चांगले असते. यजमानांना जो त्रास होतो आहे, त्यासाठी वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे सर्वांत चांगले. बरोबरीने सकाळ- संध्याकाळ ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेणे, रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृत’, कानात ‘संतुलन श्रुती तेला’चे थेंब टाकणे हे उपाय योजता येतील. रोज सकाळी ‘अमृतशर्करा’युक्‍त पंचामृत घेण्याचाही फायदा होईल. नियमित अभ्यंग करणे, पाठीला तसेच मानेला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावणे याचाही चांगला उपयोग होईल. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बस्ती, शिरोधारा, शिरोबस्ती घेण्याचाही अशा अवस्थेमध्ये चांगला फायदा होताना दिसतो. 

**********************************************************
लहान मुलांना देण्यात येणारी बाळगुटी कोणत्या वेळी द्यावी? तसेच, बाळाच्या वयोगटानुसार त्याची मात्रा काय असावी? ... राजेश तायडे
उत्तर - बाळगुटी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही देता येते. शक्‍य झाल्यास एक वेळ ठरवून रोज त्या वेळेस बाळगुटी देणे अधिक चांगले असते. त्यामुळे मुलांनाही ठराविक वेळेला बाळगुटी घेण्याची सवय लागते. ‘संतुलन बाळगुटी’ ही त्या त्या द्रव्यावर आवश्‍यक ते संस्कार करून चूर्ण रूपात बनविलेली असल्यामुळे पटकन देता येते, तसेच अधिक गुणकारी ठरते. अगदी तान्ह्या बाळाला म्हणजे तीन- चार महिन्यांपर्यंत एक चिमूट, त्यानंतर बाळ वर्षाचे होईपर्यंत दोन चिमूट आणि बाळ दीड वर्षाचे होईपर्यंत एक अष्टमांश चमचा या प्रमाणात गुटी देता येते. गुटी दुधातून किंवा मधातून देता येते, परंतु शक्‍य असेल तेव्हा बदाम- खारीक उगाळून तयार केलेल्या मिश्रणात मिसळून दिल्यास लहान मुलांना अधिक आवडते व अधिक उपयोगी पडते.   

********************************************************** 
तुमच्या उत्तम मार्गदर्शनाबद्दल अनेक धन्यवाद. माझे वय ४३ वर्षे असून, मला गेल्या एक- दोन वर्षांपासून हिरड्यांमधून रक्‍त येण्याचा व दुर्गंधीचा त्रास होतो आहे. डॉक्‍टरांनी पायोरिया असे निदान केले आहे. कृपया यावर आयुर्वेदिक औषध सुचवावे.
.... पाटील 

उत्तर - दात- हिरड्या तसेच एकंदर मुखाशी संबंधित तक्रारींवर आयुर्वेदात अनेक उत्तम उपाय सुचवलेले आहेत. हिरड्यांमधून रक्‍त किंवा पू येत असेल, तर दिवसातून दोन वेळा ‘संतुलन योगदंती’सारखे बकुळ साल, बदाम साल, वड साल वगैरे दात व हिरड्यांना मजबूत करणाऱ्या अनेक द्रव्यांपासून बनविलेले दंतमंजन वापरून दात घासणे किंवा योगदंती पाण्यात मिसळून तयार केलेल्या मिश्रणाचा लेप हिरड्यांवर पाच-सात मिनिटांसाठी ठेवणे उत्तम होय. रोज सकाळी इरिमेदादी तेल किंवा ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष धरून ठेवण्याने म्हणजे अर्धा ते एक चमचा तेल तोंडात धरून गालात खुळखुळवणे याचाही उपयोग होईल. त्रयोदशगुणी विडा जेवणानंतर चावून खाण्यानेही दात- हिरड्या व एकंदर मुखाचे, घशाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. फक्‍त विड्यामधील सर्व द्रव्ये उत्तम प्रतीची असावीत, त्यात तंबाखू वगैरे द्रव्ये नसावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com