#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

मी    नेहमी ‘फॅमिली डॉक्‍टर’ वाचते. यातील आपले सल्ले नेहमी उपयुक्‍त ठरतात. माझे वय ६६ वर्षे आहे. गेल्या बावीस वर्षांपासून मला मधुमेह आहे. गेल्या चार वर्षांपर्यंत मला फारसा त्रास जाणवत नव्हता. ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्या की साखर नियंत्रणात राहात असे. हल्ली मात्र औषधे, पथ्य सांभाळूनही, तासभर व्यायाम करूनही साखर वाढलेलीच राहते. तसेच माझे गुडघे दुखतात. त्यामुळे मी जास्त चालू शकत नाही. रात्र झोपही शांत लागत नाही. कृपया योग्य उपाय सुचवावा.
.... जोशी

उत्तर - फक्‍त साखर नियंत्रणात ठेवण्याने मधुमेहावर उपचार होत नाहीत, तर बरोबरीने मधुमेह होण्यामागे शरीरात जे काही बदल झाले, जे काही असंतुलन झाले ते शक्‍य तितके पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. मधुमेहाचे निदान झाल्यावर जितक्‍या लवकर या दृष्टीने उपचार होतील तितके ते अधिक लागू पडतात. या दृष्टीने शास्त्रोक्‍त पंचकर्म करून घेणे सर्वोत्तम, बरोबरीने योग्य औषधे सुरू करता येतील. यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे श्रेयस्कर. बरोबरीने संपूर्ण अंगाला अभ्यंग, रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग, गुडघ्यांना ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. कोणतेही दुष्परिणाम न होता शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी ‘निद्रासॅन’ या गोळ्या (एक किंवा दोन) घेण्याचा, तसेच नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरी तयार केलेल्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकण्याचा उपयोग होईल. मधुमेहाचा कालावधी लक्षात घेता योग्य उपचार तातडीने सुरू करायला हवेत. औषधांच्या बरोबरीने शास्त्रोक्‍त पंचकर्म करून घेणे सर्वोत्तम होय.
********************************************************************

मला व माझ्या पत्नीला आपल्या ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकात दिलेल्या माहितीचा खूप फायदा होतो आहे. याबद्दल आम्ही आपले आभारी आहेत. होणारे बाळ निरोगी असावे यासाठी गर्भसंस्कारातील मार्गदर्शन उपयुक्‍त आहेच, मात्र बाळाचा रंग गोरा असावा यासाठी या व्यतिरिक्‍त काय करता येईल?
.... अमर   

उत्तर - त्वचेचा रंग हा आनुवंशिकता, गर्भधारणेच्या वेळी असणारा ऋतू, दोघांचेही खाणे-पिणे वगैरे अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. या मूळ जडणघडणीमध्ये फरक करता येत नाही. मात्र रंग गोरा असो, निमगोरा असो, गव्हाळ असो किंवा सावळा असो, त्यात सतेजता असली तर तो आकर्षक असतो. व्यवहारात यालाच रंग उजळणे असे म्हणतो. यासाठी प्रयत्न करता येतात. शतावरी कल्प मिसळलेले दूध, ‘संतुलन अमृतशर्करा’ मिसळलेले पंचामृत, ‘अनंत सॅन कल्प’, ‘मंजिष्ठासॅन’ या गोष्टी या दृष्टीने उत्तम होय. सुवर्णसिद्ध पाणी पिणे, सात्त्विक म्हणजेच पचनास हलके पदार्थ सेवन करणे हे सुद्धा चांगले. शरीरात वात वाढू दिला नाही आणि उत्तम पोषक आहार, रसायनांचे सेवन केले की बाळाचा वर्ण तेजस्वी असतो असा आजवरचा अनुभव आहे. 

********************************************************************

माझे वय ३७ वर्षे आहे, वजन ७८ किलो आहे, नेक्रॉसिसमुळे माझे खुब्याच्या सांध्याचे शस्त्रकर्म झालेले आहे. डॉक्‍टरांनी वजन कमी करण्यास सांगितलेले आहे. शस्त्रकर्मानंतरही अजून वेदना होतच आहेत. तरी कृपया यावर आणि वजन कमी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे.
..... सुनील

उत्तर - अतिरिक्‍त वजनाचा भार खुब्याच्या सांध्यांवर येणे स्वाभाविक होय. त्यामुळे वजन कमी करणे, त्या ठिकाणचा रक्‍तपुरवठा सुधारणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाढलेला वात कमी करणे हे गरजेचे होय. या दृष्टीने शास्त्रशुद्ध पंचकर्म, विशेषतः विरेचन, बस्ती व पिंडस्वेदन हे उपचार करून घेणे उत्तम होय. तत्पूर्वी खुब्याच्या सांध्यावर ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावणे, अंगाला अभ्यंग लावणे सुरू करता येईल. तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे, योगराजगुग्गुळ, पंचतिक्‍त घृत घेणे या सर्वांचा उपयोग होईल. मात्र मुळापासून व नेमके उपचार होण्यासाठी  लवकरात लवकर पंचकर्म करून घेणे आवश्‍यक होय. 

********************************************************************
माझ्या भावाचे नाक सतत बंद होते. दुधात सुंठ चूर्ण टाकून घेणे चालू आहे, तरी फरक पडलेला नाही. कृपया आपण उपाय सुचवावा. काय खाऊ नये हेसुद्धा सांगावे.
..... प्राजक्‍ता.

उत्तर - दुधात सुंठ चूर्ण मिसळून घेण्यापेक्षा एक कप दुधात पाव कप पाणी व चेचून घेतलेला अंगठ्याच्या पेराएवढा तुकडा हे सर्व मिश्रण मंद आचेवर पाणी उडून जाईपर्यंत उकळणे व गाळून घेऊन प्यायले त्याचा अजून चांगला फायदा होईल. बरोबरीने रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे तीन-चार थेंब टाकण्याचा किंवा वैद्यांच्या सल्ल्याने ‘गंधर्व नस्य घृता‘चे थेंब टाकण्याचा उपयोग होईल. घरात सकाळ संध्याकाळ धूप करणे, च्यवनप्राश घेणे यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती सुधारली की या तक्रारीवर फायदा होईल. दही, चीज, सिताफळ, श्रीखंड, फणस, थंड पाणी, पचण्यास जड पदार्थ आहारातून टाळणे चांगले.

********************************************************************
‘फॅमिली डॉक्‍टर’मधील सर्व औषधे व सल्ला फार बहुमोलाचा असतो. माझा प्रश्न असा आहे की, रात्रीच्या जेवणात तिखट भाजी, लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी खाल्ली तर दुसऱ्या दिवशी घसा लाल होऊन त्रास होतो. फार मोठ्याने बोललो तरी घशाला त्रास होतो. घसा लाल झाला की मी ‘फोलव्हाईट’ घेतो, पण त्यामुळे अंग गरम होते. कृपया यावर काही उपाय सुचवावा.
.... कामत

उत्तर - फार तिखट खाणे किंवा जोराने बोलणे घशाला सहन होत नाही असे वाटते. त्यामुळे खरे तर या गोष्टी टाळणे हेच सर्वांत चांगले. परंतु, घशाची संवेदनशीलता कमी करण्यासाठी अर्धा-अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण तुपाबरोबर दिवसातून दोनदा घेण्याचा उपयोग होईल. बोटाएवढे ज्येष्ठमध, एक बेहडा आणि पेराएवढे हळकुंड या गोष्टी त्याचा चार कप पाण्यात अर्धा कप शिल्लक राहीपर्यंत काढा करावा. हा काढा साधारण गरम असताना घोट घोट घेतला तर फायदा होईल. चटणीमध्ये शेंगदाणा, लसूण टाकायचा असला तरी बरोबरीने खोबरे टाकले तर उष्णतेचा, तीक्ष्णतेचा घशावर व पचनसंस्थेवर होणारा दुष्परिणाम कमी करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com