#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील लेखांचा मला व माझ्या घरातील सगळ्यांना खूप उपयोग होतो. मला माझ्या आईच्या बाबतीत प्रश्न विचारायचा आहे, की अडीच वर्षांपूर्वी तिची अँजिओप्लास्टी करावी लागली. सहा महिन्यांपूर्वी अचानक तिच्या एका नाकपुडीतून रक्‍त येऊ लागले. बर्फ लावल्यावर थांबले. डॉक्‍टरांना सांगितल्यावर त्यांनी गोळ्यांची पॉवर कमी केली, पण तरीही अधूनमधून तिच्या नाकपुडीतून रक्‍त येते. कृपया आपण काही उपाय सुचवावा...  भट

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील लेखांचा मला व माझ्या घरातील सगळ्यांना खूप उपयोग होतो. मला माझ्या आईच्या बाबतीत प्रश्न विचारायचा आहे, की अडीच वर्षांपूर्वी तिची अँजिओप्लास्टी करावी लागली. सहा महिन्यांपूर्वी अचानक तिच्या एका नाकपुडीतून रक्‍त येऊ लागले. बर्फ लावल्यावर थांबले. डॉक्‍टरांना सांगितल्यावर त्यांनी गोळ्यांची पॉवर कमी केली, पण तरीही अधूनमधून तिच्या नाकपुडीतून रक्‍त येते. कृपया आपण काही उपाय सुचवावा...  भट
उत्तर - रक्‍त पातळ करणाऱ्या गोळीचा हा दुष्परिणाम असतो. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने या गोळ्यांचे प्रमाण कमीत कमी ठेवणे हे चांगले. बरोबरीने रक्‍ताभिसरणाला मदत करणारे उपचार घेणे श्रेयस्कर ठरेल. या दृष्टीने नियमित अभ्यंग, सकाळी उठल्यावर ‘संतुलन सुहृदप्राश’ हे रसायन तसेच वैद्यांच्या सल्ल्याने ‘कार्डिसॅन प्लस’ हे चूर्ण मधाबरोबर सुरू करण्याचा उपयोग होईल. रक्‍तशुद्धीसाठी अनंतमूळ, मंजिष्ठा, पुनर्नवा, ज्येष्ठमध वगैरे वनस्पतींचे मिश्रण किंवा महामंजिष्ठादी काढा, ‘संतुलन मंजिसार’ यासारखी औषधे घेता येतील. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणे, रात्री झोपण्यापूर्वी नाकात साजूक तूप किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकणे, शरीरात थंडावा उत्पन्न होण्यासाठी शतावरी कल्प, संतुलन पित्तशांती घेणे याचाही उपयोग होईल. 

माझा मित्र २९ वर्षांचा आहे. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्याला सोरायसिसच हा त्वचाविकार आहे. आतापर्यंत खूप औषधे व उपचार झाले पण काही फरक नाही. सोरायसिस बरा होतो का? आहार काय असावा? हा विकार संसर्गजन्य आहे का?... मयूर 
उत्तर - सोरायसिस हा विकार संसर्गजन्य नसतो. तसेच योग्य उपचारांच्या मदतीने तो काही व्यक्‍तींमध्ये पूर्ण बरा होऊ शकतो, काही वेळा आटोक्‍यात आणता येऊ शकतो. घरात आनुवंशिकता असली किंवा जीवनशैली फारच अनियमित असली तर उपचार दीर्घकाळपर्यंत घ्यावे लागतात. मुळात हा रक्‍तातील दोषाशी संबंधित विकार असल्याने यावर औषधे, पथ्याहार व पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी या प्रकारे सर्व बाजूंनी उपचार करणे गरजेचे असते. विशेषतः विरेचन घेऊन शरीर शुद्ध झाले की रक्‍तशुद्धीकर बस्ती व औषधे घेण्याचा चांगला फायदा होतो. यादृष्टीने वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे चांगले. बरोबरीने महामंजिष्ठादी काढा, ‘अनंतसॅन’, ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. आहारात काही दिवस फक्‍त तांदूळ, ज्वारी, नाचणी, मूग व वेलीवर वाढण्याऱ्या फळभाज्या यांचाच अंतर्भाव करणे, तेलाऐवजी फोडणीसाठी तूप वापरणे, ताजे-गोड ताक पिणे असे सांभाळले तर लवकर व चांगला गुण येईल. 

मी ४८ वर्षांची असून गेल्या आठ-दहा महिन्यांपासून माझे वजन कमी होते आहे. जेवण जाते, पण खूप गॅसेस होतात, खूप ढेकरा येतात. खूप तपासण्या केल्या, खूप औषधे केली, पण बरे वाटत नाही. फार अशक्‍तपणा जाणवतो, सर्वांगाला मुंग्या येतात. कृपया मार्गदर्शन करावे....विद्या
उत्तर - पचनशक्‍ती खालावली असल्याने गॅसेस वगैरे त्रास होऊ शकतात, तसेच अन्न अंगी न लागल्याने अशक्‍तपणा, वजन कमी होणे हे त्रासही होऊ शकतात. यावर उत्तम उपाय म्हणजे अग्नीची ताकद वाढविणे. यासाठी अगोदर उकळलेले गरम पाणी पिणे, जेवताना सुरवातीला आले-लिंबाचा रस, काळे मीठ व जिरे पूड मिसळून घेणे, रात्रीच्या जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल’ चूर्ण घेणे, दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताज्या गोड ताकात अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण टाकून घेणे, यासारखे उपाय योजता येतील. रोज नियमित अभ्यंग करण्याने मुंग्या येणे कमी होईल. या उपायांनी पचन सुधारले की वजन कमी होणे थांबले. बऱ्याच दिवसांपासून त्रास आहे त्यादृष्टीने एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे उत्तम होय. 

माझे वय ६५ वर्षे आहे. मला संधिवाताचा त्रास आहे. चालताना गुडघे फारच दुखतात. तसेच जेवणानंतर पोट गच्च झाल्यासारखे वाटते. तरी कृपया आयुर्वेदिक सल्ला द्यावा.     ...भगवान गोरे
उत्तर - गुडघ्यांवर दिवसातून दोन-तीन वेळा ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. तूप-साखरेबरोबर अश्वगंधा चूर्ण किंवा ‘संतुलन प्रशांत’ चूर्ण घेण्याचाही फायदा होईल. फारच दुखत असेल तेव्हा गुडघ्यांना अगोदर ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावून वरून एरंड, निर्गुडी, शेवगा, सागरगोटा यापैकी उपलब्ध असतील ती पाने वाफवून शेक करण्याचा उपयोग होईल. जेवताना उकळलेले गरम पाणी पिण्याने पोट गच्च होणे कमी होईल. जेवणानंतर दोन चमचे पुनर्नवासव घेणे, ‘सॅन उदर आसव’ घेणे याचा उपयोग होईल. तांदूळ, गहू वगैरे धान्ये अगोदर भाजून घेणे, भात प्रेशर कुकरच्या ऐवजी भांड्यात शिजवणे, गव्हाचा फुलका करून गरम-गरम घेणे या सगळ्यांचीही पोट हलके राहण्यास मदत मिळते.  

माझे वय ६० वर्षे आहे. उजव्या डोळ्याने चार वर्षांपासून हळूहळू कमी दिसू लागले आहे. यासाठी मी नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन तपासण्या करून घेतल्या, पण सर्व नॉर्मल आहे. ...हुकूमचंद्र बोस 
उत्तर - या केसमध्ये डोळ्यांची शक्‍ती वाढविणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित तुपाची किंवा तेलाची नेत्रबस्ती घेणे सर्वांत चांगले. बरोबरीने रोज सकाळ-संध्याकाळ एक चमचाभर ‘संतुलन सुनयन घृत’ घेणे, रात्री झोपताना नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकणे, आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणे हे उपाय करता येतील. एका चमचा त्रिफळा चूर्ण एक चमचा तूप व अर्धा चमचा मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घेण्यानेही बरे वाटेल. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदात अनेक उत्तम उपाय असतात. यासाठी एकदा वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer