#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 September 2018

माझी मुलगी चौदा वर्षांची आहे. तिचे केस पांढरे होण्यास सुरुवात झाली आहे. कृपया काही उपाय सुचवावा. ... प्रकाश

माझी मुलगी चौदा वर्षांची आहे. तिचे केस पांढरे होण्यास सुरुवात झाली आहे. कृपया काही उपाय सुचवावा. ... प्रकाश
उत्तर - इतक्‍या कमी वयात केस पांढरे होणे, हे शरीरात उष्णता अधिक असल्याचे आणि रसधातू अशक्‍त असल्याचे लक्षण असू शकते. यादृष्टीने मुलीला ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा देण्याचा उपयोग होईल. रसपाचक, तसेच शरीरधातूंना आतून पोषण मिळण्यासाठी संतुलनची ‘हेअरसॅन गोळी’ घेण्याचा उपयोग होईल. आहारात दूध, लोणी, साजूक तूप यांचा पुरेशा प्रमाणात समावेश असणे; लाह्या भिजवलेले पाणी, नारळाचे पाणी, गुलकंद, धात्री रसायन घेणे; केसांना आठवड्यातून किमान तीन वेळा ‘संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल’ लावणे हेसुद्धा चांगले. केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांनीयुक्‍त साबण, शांपू वगैरे न वापरता वनस्पतींपासून बनविलेले ‘संतुलन सुकेशा’ हेअर वॉश वापरणे किंवा घरच्या घरी शिकेकाई, रिठा, आवळा, नागरमोथा वगैरे द्रव्यांचे मिश्रण तयार करून वापरणे हेसुद्धा उत्तम. हे बदल करण्याचा उपयोग होईलच, तरीही -प्रकृतीनुरूप औषधांसाठी तज्ज्ञ वैद्यांना भेटणे श्रेयस्कर.  
---------------------------------------------------------------------
‘फॅमिली डॉक्‍टर’ने मला व माझ्या कुटुंबीयांना दवाखान्यापासून बऱ्याचदा दूर ठेवले आहे. याबद्दल धन्यवाद. मला सुमारे २५ वर्षांपासून मधुमेह आहे. मधुमेह आटोक्‍यात ठेवण्यासाठी डॉक्‍टरांनी मला दूध व दुधापासून बनविलेले सर्व पदार्थ बंद करायला सांगितले आहेत, अगदी साजूक तूपसुद्धा. कृपया आपण मार्गदर्शन करावे.
.... मुकुंद

उत्तर - ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाचा उपयोग झाल्याचे कळविल्याबद्दल आपले आभार. मधुमेह हा असा रोग आहे की तो फक्‍त आटोक्‍यात ठेवणे पुरेसे नसते, तर शक्‍य तितका बरा करण्यासाठी मधुमेहाच्या मुळावर योग्य उपचार घेणे गरजेचे असते. हे उपचार पंचकर्माच्या मदतीने, तसेच वैद्यांकडून प्रकृतीपरीक्षण करून औषधे व पथ्य यांच्या मदतीने करायचे असतात. मधुमेहात कफदोष वाढविणारे पदार्थ टाळायचे असतात. त्यामुळे दही, चीज, पनीर, खवा किंवा खव्यापासून बनविलेल्या मिठाया खाणे किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे या गोष्टी  मधुमेहात करून चालत नाही. मात्र, रोज सकाळी एक कपभर दूध घेणे, ताक, साजूक तूप यांचा आहारात समावेश करणे, हे थांबविण्याची आवश्‍यकता नाही. दूध सुंठीबरोबर उकळून घेतले आणि त्यात साध्या साखरेऐवजी खडीसाखर किंवा केशरयुक्‍त ‘संतुलन अमृतशर्करा’ टाकून घेतले, तर त्यामुळे कफदोष वाढणार नाही, उलट मधुमेहामुळे शरीरधातूंना येऊ शकणारी अशक्‍तता दूर राहू शकेल. 

---------------------------------------------------------------------
‘संतुलन’ची अनेक प्रकारची औषधे वापरून मी रोगमुक्‍त होतो आहे. माझे एक नातेवाईक आहेत, त्यांना ३० वर्षांपूर्वी गुप्तरोग झाला होता. सध्या त्यांना मूत्रवहसंस्थेत जंतुसंसर्गाचा त्रास होतो आहे. नाभीच्या खाली फार दुखते. जंतुसंसर्गामुळे लघवीला वारंवार जावे लागते व त्या ठिकाणी सूजही येते. कृपया उपाय सुचवावा. 
- लवटे
उत्तर -
गुप्तरोगाचे शरीरावर दूरगामी दुष्परिणाम राहू शकतात. यावर आयुर्वेदातील चोपचीनी, कवच बी, ज्येष्ठमध वगैरे वनस्पती घेणे हितावह असते. यादृष्टीने संतुलनचे ‘यू. सी. चूर्ण’ पाण्याबरोबर घेता येईल. लघवीला त्रास होतो आहे त्यावर पुनर्नवासव, पुनर्नवाघनवटी, वैद्यांच्या सल्ल्याने ‘युरिसॅन गोळ्या’, गोक्षुरादी गुग्गुळ घेण्याचा उपयोग होईल. पुनर्नवा, गोक्षुर, अनंतमूळ यांच्यापासून बनविलेल्या काढ्यात कटिस्नान (हिपबाथ) घेण्याचाही फायदा होईल. रोज स्नानानंतर सुंतलनचे ‘पुरुषम्‌ तेल’ वापरण्याचाही उपयोग होईल. 
---------------------------------------------------------------------

माझ्या मुलाचे वय तीन वर्षे आहे. तरी तो अजून बोलत नाही. दोन-तीन शब्द बोलतो. पण, आपण काही बोलायला सांगितले, तर ते बोलत नाही. त्याला सर्व समजते, नीट ऐकू येते. सांगितलेली सगळी कामे तो करतो, पण बोलत नाही. डॉक्‍टर म्हणाले, की तो उशिरा बोलेल किंवा स्पीच थेरपी चालू करू. कृपया मार्गदर्शन करावे. 
- आरती जाधव

उत्तर - मुलगा दोन-तीन शब्द उच्चारत असला, तर चिंता करण्याची गरज वाटत नाही. काही मुलांमध्ये बोलण्याची क्रिया थोडी उशिराने होऊ शकते. तरीही एकंदर विकास चांगला व्हावा, यासाठी सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा संतुलनचे ‘ब्रह्मलीन सिरप’ देण्याचा फायदा होईल. रात्रभर पाण्यात भिजविलेले दोन-तीन बदाम सकाळी उगाळून घेण्याचा फायदा होईल. जिभेला अक्कलकरा, वेखंड, जटामांसी वगैरे वनस्पतींचे मिश्रण चोळून लावण्यानेही अशा केसेसमध्ये चांगला उपयोग होताना दिसतो. ‘संतुलन’च्या कोणत्याही केंद्रात वैद्यांना भेटून असे चूर्ण मिळू शकेल. सहा महिने हे उपचार करूनही फरक पडत नाही असे वाटले, तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे श्रेयस्कर.  
---------------------------------------------------------------------

माझे वय ६५ वर्षे आहे. जेवणानंतर अन्नपचन होत नाही, पोट गच्च होते व थोडे दुखते. यावर काय औषध घ्यावे? पोटासाठी काय खावे अथवा काय खाऊ नये हेसुद्धा सांगावे. 
- भगवान गोरे
उत्तर -
अन्नपचन होत नसताना पथ्यकर आणि पचायला हलका आहार घेणे आवश्‍यक असते. यादृष्टीने काही दिवस रात्री फक्‍त द्रवाहार म्हणजे मूग, पथ्यकर भाज्या, कुळथाचे पीठ वगैरेंपासून बनविलेले सूप घेणे, दुपारी तुपाची साधी फोडणी देऊन केलेली फळभाजी, आमटी-भात, ताक, असा साधा आहार घेणे चांगले. प्यायचे पाणी किमान वीस मिनिटे उकळून घेण्याचा आणि निदान जेवताना गरम पाणी पिण्याचाही फायदा होईल. जेवणाच्या सुरुवातीला चमचाभर आल्या-लिंबाचा रस घेता येईल. दुपारच्या जेवणाच्या शेवटी पातळ पण ताज्या ताकात अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण टाकून घेण्याचा उपयोग होईल. दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ तसेच दोन चमचे पुनर्नवासव घेण्यानेही बरे वाटेल. सर्व धान्ये, विशेषतः तांदूळ, ज्वारी, मूग, कुळीथ हे अगोदर भाजून घेतलेली असावीत. पचनसंस्था कार्यक्षम असणे ही आरोग्याची पहिली पायरी असते, हे समजून भूक लागेल, अन्नपचन नीट होईल, याकडे लक्ष देणे नेहमीच चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer