#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी सर्वार्थाने फॅमिली डॉक्‍टर आहे. यातील ‘प्रश्नोत्तरां’च्या माध्यमातून मी दोन वेळा प्रश्न विचारला होता आणि दोन्ही वेळेला आपल्या सल्ल्याचा खूपच चांगला उपयोग झाला. मी ज्येष्ठ नागरिक आहे. उच्च रक्‍तदाबाशिवाय मला दुसरा कोणताही त्रास नाही. मध्यंतरी घशाला कोरड, थकवा या त्रासासाठी डॉक्‍टरांकडे गेलो, तेव्हा केलेल्या तपासण्यांमध्ये रक्‍तात साखरेचे प्रमाण वाढलेले आढळले. तेव्हापासून डायबेटिक डाएट व औषधोपचार सुरू केलेले आहेत. कृपया आपणही मार्गदर्शन करावे.
... सुरेश गोरे

उत्तर - मधुमेहाचे निदान झाल्यावर जितक्‍या लवकर मधुमेहाची संप्राप्ती मोडणारे उपचार मिळतील तितका चांगला गुण येतो, असा आजवरचा अनुभव आहे. डाएट सांभाळणे चांगले आहेच, मात्र साखर, तांदूळ पूर्ण बंद होणार नाही याकडे लक्ष ठेवणे, साखर फक्‍त नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे न घेता, मधुमेहाच्या मुळावर काम करणारे उपचार सुरू करणे, यात प्रकृतीनुरूप औषधे आणि पंचकर्माचा समावेश होतो व त्याचे उत्तम परिणाम मिळालेले दिसतात. नियमित चालायला जाणे, रोज सकाळी दहा-पंधरा मिनिटांसाठी अनुलोम-विलोम करणे, आहार पचण्यास हलका व साधा असा योजणे हे सुद्धा चांगले. विशेषतः रात्रीच्या जेवणात फक्‍त सूप घेणे चांगले. कोबी-फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगे, चण्याच्या पिठापासून किंवा दुधापासून बनविलेल्या मिठाया, केळी, सीताफळ वगैरे गोष्टी आहारातून टाळणे चांगले. 

------------------------------------------------------------
माझे वय बावीस वर्षे आहे. पाळी नियमित येते. मी बाहेरचे खाणे टाळते. धुळीशी संबंधही खूप कमी येतो. मात्र चेहऱ्यावर पिंपल्स आहेत. दिवसातून दोनदा चेहरा धुऊनही फरक पडत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
... प्रियांका

उत्तर - पाळी नियमित येते आहे हे चांगले आहे. मात्र स्त्री-संतुलनाला मदत मिळण्यासाठी ‘फेमिसॅन तेल’ वापरणे, ‘अशोक-ॲलो सॅन’ व ‘अनंतसॅन’ या गोळ्या घेणे, दुधाबरोबर शतावरी कल्प किंवा ‘स्त्री संतुलन’ हा स्त्रियांसाठी खास बनविलेला कल्प घेणे याचा उपयोग होईल. रोज पोट साफ होण्याकडे लक्ष देणे, आठवड्यातून दोन वेळा ‘सॅनकुल चूर्ण’ घेऊन पोटातील उष्णता काढून टाकणे हेसुद्धा चांगले. चेहरा दोनदा धुवायला हरकत नाही, पण त्यासाठी साबण न वापरता ‘सॅन मसाज पावडर’ हे उटणे वापरणे चांगले. दही, टोमॅटो, चिंच, रासायनिक खत टाकून उगवलेल्या भाज्या, तळलेले पदार्थ आहारातून टाळणे आवश्‍यक.

------------------------------------------------------------
मी   दर आठवड्याला केसांना तेल लावते, आयुर्वेदिक शांपू वापरते, तरी माझे केस गळतात. केसांना मजबुती येण्यासाठी व केस गळणे थांबण्यासाठी काय करावे? 
... कुलकर्णी

उत्तर - केसांची मजबुती व आरोग्य हे हाडांशी निगडित असते. केसांच्या मुळाचे पोषण व्हावे म्हणून आठवड्यातून दोन-तीन वेळा तेल लावणे चांगले असते. यासाठी तेलावर केश्‍य द्रव्यांचा संस्कार करून बनविलेले व केस तेलकट न होता केसांचे पोषण करणारे ‘संतुलन व्हिलेज हेअर तेला’सारखे तेल वापरणे चांगले. केस धुण्यासाठी मात्र रासायनिक द्रव्यांपासून बनविलेल्या शांपूचा वापर न करता शिकेकाई, रिठा, आवळा वगैरे वनस्पतींचे मिश्रण वापरणे किंवा तयार ‘संतुलन सुकेशा’ हे मिश्रण वापरणे चांगले. केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळाशी नारळाचे दूध अर्ध्या तासासाठी लावून ठेवण्याचाही उपयोग होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हाडांच्या पोषणासाठी संतुलनच्या ‘हेअरसॅन’, ‘कॅल्सिसॅन’ गोळ्या घेणे, खारीक पूड टाकून उकळलेले दूध घेणे यामुळे आतून केसांचे पोषण झाले की केस गळणे नक्की थांबेल.

------------------------------------------------------------

माझे गर्भाशय काढण्याचे शस्त्रकर्म केल्यानंतर वजन वाढले, मणक्‍यांचा त्रास सुरू झाला. मी रोज एक रक्‍तदाबाची गोळी घेते. मी कुंडलिनी तेल वापरते. सकाळी लवकर चालायला गेले तर वात वाढतो का, की त्याऐवजी संध्याकाळी चालणे अधिक चांगले? सूर्यनमस्कार केले तर चालतील का? कृपया मार्गदर्शन करावे.
 .... शास्त्री

उत्तर - गर्भाशय काढल्यानंतर वाताचे त्रास सुरू होतात हा बहुतेक स्त्रियांचा अनुभव असतो. वातदोष शक्‍य तितका नियंत्रणात ठेवण्यासाठी संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे, ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे हे चांगले. मणक्‍याच्या त्रासासाठी ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ वापरणे उत्तम आहेच, बरोबरीने तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. सकाळी चालायला जाण्याने वात वाढणार नाही, मात्र थंडीच्या दिवसांत उबदार कपडे, मोजे, स्कार्फ वगैरे वापरणे आवश्‍यक. पाठीची काही दुखणी अशी असतात की ज्यात सूर्यनमस्कार करता येत नाहीत. तेव्हा यासाठी तज्ज्ञ योगशिक्षकाचा सल्ला घेणे श्रेयस्कर. एकंदर तब्येतीचा विचार करता वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन प्रकृतिनुरूप औषधे सुरू करणे, विरेचन, बस्ती वगैरे उपचारांनी शरीरशुद्धी करून घेणे हे सर्वांत उत्तम.

------------------------------------------------------------
मला सात-आठ वर्षांपासून मधुमेह आहे. खूप तहान लागते. परंतु पाणी अधिक पिण्यामुळे रात्री तीन-चार वेळा उठावे लागते. तसेच तळपाय फार संवेदनशील झालेले आहेत. लहान खडे किंवा रेतीचे कणही तळपायाला असह्य वाटतात. कृपया यावर उपाय सुचवावा.
.... लव्हाळे 

उत्तर -  तहान लागेल तेवढ्या प्रमाणात पाणी पिणे चांगले असले तरी तहान शमण्यासाठी बऱ्याचदा एक-दोन घोट पाणी पिणे पुरेसे असू शकते. त्याऐवजी प्रत्येक वेळी ग्लासभर पाणी पिणे टाळता येईल. शिवाय, मधुमेह आहे या दृष्टीने प्यायचे पाणी अगोदर उकळून घेतलेले असावे, रोज सकाळी दिवसभर लागणार असेल तेवढे पाणी उकळायला ठेवले व उकळी फुटल्यावर वीस मिनिटांसाठी उकळत ठेवले, यातच थोडे ‘जलसंतुलन’ हे मिश्रण टाकले तर पाणी पचायला सोपे होते, सुगंधी होते व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोन घोट पिण्यानेही तहान शमवण्यास सक्षम बनते. संध्याकाळच्या जेवणात व जेवणानंतर फार पाणी पिणे टाळण्यानेही रात्री उठावे लागण्याचे प्रमाण कमी होईल. रात्री झोपताना तीळ, ओवा व हळद यांचे समभाग मिश्रण (पाव ते अर्धा चमचा) घेण्याने रात्री लघवीला उठावे लागण्याचे प्रमाण कमी होते असा अनुभव आहे. तळपायांची संवेदनशीलता मधुमेहाशी संबंधित असू शकते. तेव्हा मधुमेहाची संप्राप्ती नष्ट करणारे म्हणजेच मधुमेहाला कारण असणारा शरीरातील बिघाड दुरुस्त करणारे उपचार सुरू करणे आवश्‍यक. यासाठी प्रकृतीनुरूप औषधे, पथ्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून घेणे उत्तम. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याचाही फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com