#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

आपली आरोग्यविषयक सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि त्यानुसार आहार- आचरणाचा आम्हा सर्वांना भरपूर फायदा झालेला आहे. रात्री झोपताना नाभी व त्याजवळील भागाला तेल लावावे असे मी वाचले आहे, कुठले तेल लावावे व ते किती प्रमाणात लावावे, कसे लावावे याविषयी माहिती द्यावी.
- सीमा

उत्तर - योगशास्त्र व आयुर्वेदशास्त्रानुसार नाभीचा अनेक महत्त्वाच्या सिरा, स्रोतसांशी संबंध असतो आणि म्हणून नाभी व आसमंतात तेल लावणे आरोग्याच्या दृष्टीने, प्राणसंचरणाच्या दृष्टीने उपयुक्‍त असते. शरीरस्थ अग्नीला चेतना देण्यासाठीही साहायक असते. पित्ताची प्रकृती असल्यास किंवा पित्ताशी संबंधित त्रास असल्यास नाभीस्थानी तूप किंवा खोबरेल तेल, सर्वांत चांगले म्हणजे ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावणे चांगले असते. इतरांसाठी किंवा गॅसेसचा त्रास असल्यास, पोटावर वजन जास्ती वाढलेले असल्यास तिळाचे तेल, विशेषतः ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावणे चांगले असते. तेल लावताना सुरवातीला नाभीमध्ये थोडे तेल टाकता येते आणि दोन-तीन मिनिटांनी ते आजूबाजूच्या भागावर गोलाकार दिशेने जिरवता येते. मलावष्टंभाचा त्रास असणाऱ्यांना एरंडेलाचा वापर करता येतो.  

----------------------------------------------------------------------

माझ्या यजमानांनी ‘संतुलन’चे पंचकर्म केले, त्याचा त्यांना खूप फायदा आहे. संतुलनचा च्यवनप्राश, चैतन्यकल्प आम्ही सर्व जण रोज घेतो. विड्याचे पान व चुना यांचा रोजच्या आहारात समावेश करता येतो का? कृपया माहिती द्यावी.
- देशपांडे

उत्तर - विड्याचे पान अग्नी प्रदीप्त करण्यासाठी, पचन व्यवस्थित होण्यासाठी, तसेच शरीरातील वात- पित्त- कफदोषांचे शमन होण्यासाठी उत्तम असते. चुना हासुद्धा नैसर्गिक कॅल्शिअमचा स्रोत असतो. मात्र नुसता चुना खाण्याने जीभ चरचरू शकते. म्हणून विड्याच्या पानावर किंचित चुना, काथ व पचनास मदत करणारी, मुखशुद्धी करणारी बडीशेप, धण्याची डाळ, ओवा, तीळ, ज्येष्ठमध, कंकोळ, जायपत्री, वेलची, लवंग वगैरेंचे मिश्रण, गुलकंद व खोबरे किंवा बदाम हे सर्व घालून तयार केलेला विडा जेवणानंतर खाता येतो. विड्यामध्ये सुपारी, तंबाखूसारखी द्रव्ये टाकणे टाळावे. तसेच, विड्याच्या पानाचे देठ व टोक काढून टाकलेले असावे, शिरासुद्धा काढून टाकलेल्या असाव्यात. 

----------------------------------------------------------------------
माझ्या आईचे वय ४९ वर्षे असून, तिला दम्याचा त्रास आहे, यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच तिला कंबरदुखी, पाठदुखीचाही त्रास आहे, त्यामुळे ती शांत झोपू शकत नाही. कृपया उपाय सुचवावा.
- अमोल

उत्तर - दमा या आजारात श्वास, पर्यायाने प्राणशक्‍ती कमी प्रमाणात मिळत असल्याने त्यावर तातडीने व योग्य उपचार होणे आवश्‍यक असते. यादृष्टीने आईची तज्ज्ञ वैद्यांकडून तपासणी करून योग्य ते औषध सुरू करणे चांगले. बरोबरीने छाती-पोटाला व पाठीला अगोदर तेल लावून वरून रुईच्या पानांचा शेक करण्याचा उपयोग होईल. दिवसभर प्यायचे पाणी अगोदर उकळून घेतलेले व गरम असताना पिण्याचाही फायदा होईल. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्राणसॅन योग’, श्वासकुठार, कनकासव यासारखी औषधे सुरू करता येतील. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेले ‘ब्राँकोसॅन’ हे सिरप नियमितपणे घेण्याचाही फायदा होईल. पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास आहे, त्यावर ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा, काही दिवस ‘संतुलन वातबल’ या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. दही, श्रीखंड, केळे, सीताफळ, पनीर, चीज, शीतपेये वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणेही आवश्‍यक. 

----------------------------------------------------------------------

गेल्या दोन-तीन वर्षांपासून मला गॅसेसचा त्रास आहे. आहार- आचरणात मी योग्य काळजी घेतो. ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक असल्याने गरम पाणी, आले-लिंबाचा रस यांचा वापर करतो; पण योग्य तो फरक जाणवत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
- अविनाश देशपांडे

उत्तर - बैठी जीवनशैली हे कित्येकदा गॅसेस, अपचनामागचे मोठे कारण असलेले आढळते. निमितपणे चालणे, सूर्यनमस्कार, इतर साधी पण प्रभावी योगासने करणे चांगले. काही दिवस गहू व गव्हापासून बनविलेला रवा, मैदा या गोष्टी बंद करून गॅसेस कमी होतात का हे पाहता येईल. विशेषतः रात्रीच्या जेवणात फक्‍त तांदूळ किंवा ज्वारी ही धान्ये वापरणे, शक्‍यतो द्रवाहार घेणे चांगले. जेवणानंतर पाव-पाव चमचा लवणभास्कर चूर्ण घेणे, तसेच संतुलनच्या ‘अन्नयोग’ या पचनशक्‍ती सुधारणाऱ्या गोळ्या घेणे हेसुद्धा उपयोगी ठरेल.

----------------------------------------------------------------------
माझे वय ५० वर्षे आहे. माझी पाळी अनियमित झाली असून, एखाद्या महिन्यात खूप रक्‍तस्राव होतो. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी केली, ज्यात गर्भाशयात गाठी असल्याचे निदान झाले व शस्त्रकर्म सुचवले.  कृपया आपण मार्गदर्शन करावे.
- शिंदे 

उत्तर - वयानुसार स्त्री-संतुलनात बदल होणे अपरिहार्य असते आणि याचा परिणाम म्हणून असे त्रास होऊ शकतात. मात्र, यावर पुन्हा संतुलन प्रस्थापित होण्यासाठी उपचार करणे आवश्‍यक होय. शस्त्रकर्म करून गर्भाशय काढून टाकणे हा अगदी अखेरचा पर्याय असावा व तो निवडण्याची वेळ येऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करावेत. यादृष्टीने ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू, अशोकारिष्ट, त्रिफळा गुग्गुळ, ‘संतुलन फेमिफिट सिरप’ घेण्यास सुरवात करता येईल. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म व उत्तरबस्ती घेण्याचाही फायदा होईल. आयुर्वेदिक उपचार घेण्याने या प्रकारच्या गाठी पूर्णपणे नाहीशा होतात, कित्येकदा आकार कमी होतो, क्वचित प्रसंगी आकारात बदल झाला नाही तरी त्यामुळे इतर त्रास किंवा समस्या उद्भवत नाहीत, असा अनुभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com