#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

माझ्या दोन्ही हातांवर व पोटावर लहान मोठ्या अशा नऊ-दहा गाठी आहेत. डॉक्‍टरांना दाखवले असता या चरबीच्या गाठी आहेत असे सांगितले. शस्त्रक्रिया करून काढल्या तर त्याचे डाग शरीरावर राहू शकतात, असेही सांगितले. कृपया मार्गदर्शन करावे.  ... अनंत नाईक
उत्तर -
सहसा चरबीच्या गाठींचा त्रास होत नाही. गाठीचा आकार वाढू नये यासाठी किंवा नवीन गाठी येऊ नयेत, यासाठी नियमित अभ्यंग करण्याचा फायदा होतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावण्याने काही केसेसमध्ये हलके हलके गाठींचा आकार कमी होतो असे दिसते. स्नानाच्या वेळी उटणे चोळून लावणे, ‘सॅन मसाज पावडर’ व कुळीथ पीठ याचे समभाग मिश्रण लावणे हे सुद्धा चरबीच्या गाठींवर उपयुक्‍त पडते असे दिसते. शेवग्याच्या शेंगांच्या चूर्णाचा लेप गाठींवर केल्यानेही गाठींच्या आकारात फरक पडू शकतो. त्रिफळा गुग्गुळ गोळ्या, मेदपाचक वटी घेण्याचा उपयोग होईल. 


माझे केस अकाली पांढरे झाले आहेत आणि गळतही आहेत, सतत कामाचा ताण आणि मनात येणारे विचार यामुळे असे होत असेल असे वाटते, यावर काही उपाय आहे का? केसांचा हाडांशी कसा संबंध असतो?   ... अरुण जोशी
उत्तर -
आपण जे काही अन्न, रसायन सेवन करतो त्यापासून शरीरातील सातही धातूंचे पोषण होत असते. अन्न जर पोषणमूल्यांनी परिपूर्ण असेल तर हे काम व्यवस्थित होते. केस हे हाडांचा उपधातू असल्यामुळे जेव्हा हाडांचे पोषण होत असते तेव्हाच केसांनाही शक्‍ती मिळत असते. काही कारणाने जर हाडांपर्यंत आवश्‍यक ती पोषकतत्त्वे पोचू शकली नाहीत किंवा मुळात जे अन्न सेवन केले त्या अन्नातच ती पोषकतत्त्वे नसतील तर त्याचा परिणाम हाडांवर आणि केसांवरही होतो. अतिरिक्‍त ताण, मनात सतत विचार यांचा पचनसंस्थेवरही परिणाम होत असतो, त्यामुळे जरी अन्न चांगले असले, सकस असले तरी त्याचे पचन व्यवस्थित न झाल्याने धातूपोषणात व्यत्यय येऊ शकतो. सप्तधातूंतील पहिला धातू म्हणजे रसधातू, हा जर कमी पडला किंवा पोषणमूल्यांना वंचित राहिला तर केस अकाली पांढरे होणे शक्‍य असते. त्यामुळे मुळात कामावरचा ताण कमी करणे, ताण सहन करण्याची क्षमता वाढवणे यासाठी योग, श्वसनक्रिया, ध्यान, ॐकार म्हणणे वगैरे उपायांची योजना करता येईल. ‘हेअरसॅन गोळ्या’ व ‘संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल’ लावण्याने केसांचे पोषण होऊ शकेल. 

सकाळी नाश्‍ता व दुपारी जेवण किती प्रमाणात घ्यावे? तसेच सकाळच्या नाश्‍त्यामध्ये कोणते अन्न प्रामुख्याने घ्यावे? याबद्दल मार्गदर्शन करावे. ...
राहुल कदम
उत्तर -
अन्नाचे प्रमाण हे अग्नीच्या पचनक्षमतेवर ठरवायचे असते आणि यामुळे त्याचा हिशोब करता येत नाही. सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान नाश्‍ता करणे चांगले. त्याचे प्रमाण इतके असावे की जेणेकरून दुपारी बारा-साडेबारापर्यंत व्यवस्थित भूक लागेल. जेवणानंतर पोट जड होणार नाही, सुस्ती येणार नाही अशा प्रमाणात जेवणाची योजना करणे चांगले. सकाळच्या नाश्‍त्यासाठी काही तरी गरम, ताजे अन्न घेणे चांगले. यामध्ये पंचामृत, भिजविलेले चार-पाच बदाम, च्यवनप्राश, ‘सॅनरोझ’ सारखे एखादे रसायन, कपभर दूध, गरम उपमा, सांजा, घावन, पोहे असे काहीतरी असणे चांगले. 


माझे वय ४३ वर्षे आहे. मला प्रचंड थकवा येतो. सकाळी उठल्यावर टाचा व पायांची बोटे दुखतात. एक-दोन तास काहीच काम करवत नाही. मी दूध पिते, शुद्ध शाकाहारी आहार घेते, तरीसुद्धा असे का होते? कृपया उपाय सुचवावा.
.... खाडिलकर
उत्तर -
अन्नातून शक्‍ती तयार होण्यासाठी अन्न सकस असणे, प्रकृतीला अनुकूल असणे आणि अन्नाचे व्यवस्थित पचन होणे या दोन्ही गोष्टी आवश्‍यक असतात. सध्या अन्नातील कस दिवसेंदिवस कमी होतो आहे. दूध पोषणासाठी उत्तम समजले जात असले तरी त्यावर चुकीच्या प्रक्रिया केलेल्या नाहीत ना हे बघणे आवश्‍यक असते. दूध भारतीय वंशाच्या म्हणजे गावरान गाईचे असावे व त्यावर टिकवण्याच्या दृष्टीने फार तर फार पाश्‍चरायझेशन एवढीच प्रक्रिया केलेली असावी. चांगल्या प्रतीचा शतावरी कल्प घालून असे दूध घेण्याचा नक्की उपयोग होईल. बरोबरीने सकाळ-संध्याकाळ धात्री रसायन व ‘सॅन रोझ’ ही रसायने घेण्याने थकवा कमी होईल. रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण शरीराला अभ्यंग करण्याने सकाळी उठल्यावर टाचा दुखणे, पाय दुखणे वगैरे तक्रारी कमी होतात, थकवाही कमी होतो असा अनुभव आहे. स्त्रियांच्या बाबतीत थकव्याचा संबंध स्त्री-असंतुलनाशी असू शकतो. या दृष्टीने ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू वापरण्याचा उपयोग होईल. एकदा रक्‍त तपासणी करून हिमोग्लोबिन, कॅल्शियमची पातळी तपासून घेणे चांगले. 

माझे बाळ नऊ महिन्यांचे झाले आहे. सहाव्या महिन्यापासून तो वरचे अन्न व्यवस्थित खात होता, मात्र गेल्या दहा दिवसांपासून तो अजिबात काही खात नाही, फक्‍त अंगावरचे दूध पितो. खेळतो व्यवस्थित, किरकिरही करत नाही. त्याला दात येत आहेत. मी त्याला नियमित बालामृत देते. त्याचा त्याला खूप फायदा झाला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
..... यशश्री
उत्तर -
दात येताना बालकाच्या शरीरात अशा प्रकारचे बदल होत असतात व याचा परिणाम म्हणून वरचे अन्न नकोसे होणे हे शक्‍य आहे. यावर दात येणे सोपे होण्यासाठी उपचार करायला हवेत. यादृष्टीने बाळाला रोज ‘संतुलन बाळगुटी’ देण्याचा उपयोग होईल. दात येणे सोपे व्हावे, यादृष्टीने संतुलनच्या बाळगुटीत अनेक द्रव्यांची योजना केलेली असते. ही बाळगुटी खारीक व बदाम उगाळून तयार केलेल्या मिश्रणाबरोबर देणे दातांसाठी अधिक प्रभावी ठरते. आवळकाठी व धायटीची फुले यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून ते समभागात एकत्र करून ठेवता येईल. यातील थोडे चूर्ण मधात मिसळून हिरड्यांवर चोळल्याने दात येणे सोपे होते असा अनुभव आहे. दातांचा संबंध हाडांशी असतो, त्यामुळे आईने ‘कॅल्सिसॅन’, ‘सॅनरोझ’ ही रसायने घेणे, बाळाला सकाळ-संध्याकाळ अर्धी-अर्धी ‘संतुलन पित्तशांती’ गोळी देणे हेसुद्धा चांगले. ‘संतुलन बालामृत’ देणे उत्तम आहे, बाळ अडीच वर्षांचे होईपर्यंत त्याला बालामृत देता येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com