esakal | #FamilyDoctor प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

फॅमिली डॉक्‍टरमधील मार्गदर्शनाचा आम्हाला खूप फायदा होत असतो. माझा प्रश्न असा आहे, की माझे पोट सकाळी उठल्या उठल्या साफ होत नाही, त्यामुळे पूजा करण्यास उशीर होतो. पोट साफ होण्यासाठी औषध घेण्याची भीती वाटते, कारण त्यामुळे आतडे नाजूक होते असे ऐकिवात आहे. हे खरे आहे का? व यावर काय उपाय करावा? ....जयकुमार 
उत्तर -
पोट रोज सकाळी व्यवस्थित साफ होणे हे आरोग्यासाठी आवश्‍यक असते. हे सहजासहजी घडत नसले तर त्यासाठी पाचक औषधांची मदत घेण्यास हरकत नाही; मात्र पचनावर काम न करता फक्‍त मळ शरीराबाहेर काढून टाकणारी औषधे घेणे चांगले नाही. कारण यामुळे या औषधांची सवय लागते व क्रमाक्रमाने आतड्यावरही परिणाम होऊ शकतो. याऐवजी पचन सुधारून मलप्रवृत्ती सहज होण्यासाठी आतड्यांना मदत करणारी, पचनसंस्थेला आवश्‍यक ती स्निग्धता देणारी औषधे किंवा उपचार करणे चांगले असते. यासाठी जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या घेणे, रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल’ घेणे, कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप व चिमूटभर सैंधव मिसळून घेणे, सकाळी उठल्यावर एक कप गरम पाणी पिणे हे उपचार करता येतात. काही दिवस हे उपचार नियमपूर्वक घेतल्यानंतर सकाळी उठल्यावर आपोआप मलप्रवृत्ती होऊ लागते, असा अनेकांचा अनुभव असतो. या औषधांची सवय वगैरे लागत नाही आणि कोणतेही दुष्परिणाम न होता पचन सुधारले, की वेळेवर पोटही साफ होऊ लागते.  

माझी बहीण ३६ वर्षांची असून तिचे आठ वर्षांपूर्वी सिझेरियनच्या मदतीने बाळंतपण झाले होते. त्यामुळे पोटावर पट्टा किंवा तेल-धुरी वगैरे काही घेता आले नाही. आता तिचे पोट मोठे झाले आहे. हा पोटाचा वात कमी करता येईल का? यासाठी आयुर्वेदात उपाय असतात का? ....नीलिमा
उत्तर -
पोटाचा वात असो किंवा शरीरात कुठेही बिघडलेला असो, तो कमी करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात आणि त्यासाठी आयुर्वेदाचे उपचारच कामाला येतात. दुर्लक्षित राहिला तर वातदोष वादळ ज्याप्रमाणे संपूर्ण शहर उद्‌ध्वस्त करू शकते, त्याप्रमाणे संपूर्ण शरीराचा नाश करू शकतो. सिझेरियननंतर बाळंतिणीला शेक, अभ्यंग-धुरी देऊ नये हा मोठा गैरसमज आहे. नैसर्गिक प्रसवानंतरसुद्धा हे जर सगळे आवर्जून करायचे असते, तर शस्त्रकर्माची भर पडलेली असताना तर या गोष्टी न चुकता, एकाही दिवसाचा खंड न पाडता नियमितपणे करायलाच हव्या. अजूनही बहिणीला पोटावर ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ जिरविण्याचा आणि स्नानापूर्वी ‘सॅन मसाज पावडर’ हे उटणे चोळून लावण्याचा फायदा होईल. ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू वापरणे, आठवड्यातून दोनदा ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे, दिवसभर प्यायचे पाणी उकळलेले व गरम घेणे हे उपाय सुरू करता येतील. नियमित २० मिनिटे चालणे, सूर्यनमस्कार करणे, चंद्रप्रभा, त्रिफळा गुग्गुळ घेणे हेसुद्धा उपयुक्‍त ठरेल. 

माझ्या पोटात नाभीच्या उजव्या बाजूला मधूनमधून आगीचे चटके बसल्यासारखे होते. असे का होते? यावर उपाय काय करावा? ....सुरेखा 
उत्तर -
नाभीच्या वर उजव्या बाजूला यकृताचे स्थान असते व यकृत हे पित्ताचे स्थान असते. तेव्हा पित्त वाढलेले असले तर याप्रकारचा त्रास होऊ शकतो. नेमके निदान होण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे श्रेयस्कर. बरोबरीने जेवणानंतर १-१ चमचा मोरावळा, २-२ ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्यास सुरवात करता येईल. ज्या ठिकाणी चटके जाणवतात तेथे दिवसातून २-३ वेळा ‘संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. काही दिवस झोपण्यापूर्वी अतिपत्तिकर चूर्ण घेण्यानेही शरीरातील अतिरिक्‍त पित्त शौचावाटे निघून जायला मदत मिळेल. रात्री जागरण करणे, उन्हात किंवा अग्नीजवळ वा संगणक, मोबाईलवर फार वेळ काम करणे शक्‍यतो टाळणे श्रेयस्कर. 

माझा नातू सात महिन्यांचा असून त्याचे दात निघत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्याला अधूनमधून ताप, उलट्या वगैरे त्रास जाणवत आहे, तो होऊ नये आणि दात सहजतेने यावेत यासाठी उपाय सुचवावा. ...चौधरी 
उत्तर -
बालकाला सुरवातीपासून बाळगुटी दिलेली असली तर सहसा दात येणे सोपे जाते असा अनुभव आहे. मुस्ता, काकाडशिगी, अतिविषा अशी विविध द्रव्ये समाविष्ट करून बनविलेली ‘संतुलन बाळगुटी’ बालकांना देणे सोपे असते व त्यामुळे खंड न पडता नियमितपणे देता येते. आताही नातवाला रोज बाळगुटी देता येईल. बरोबरीने ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचा उपयोग होईल. आवळा व धायटी यांचे समभाग चूर्ण हलक्‍या हाताने हिरड्यांवर चोळल्यानेही दात येणे सोपे जाते. नातवाला रोज सकाळ- संध्याकाळ प्रवाळपंचामृत व ‘कॅल्सिसॅन’ ही १-१ गोळी दुधात बारीक करून देण्याचाही चांगला उपयोग होईल. 

वर्षापूर्वी रक्‍ताची तपासणी केली तेव्हा यकृताच्या कार्यक्षमतेमध्ये बिघाड झाल्याचे आढळले, तेव्हापासून मी आपण सुचविलेल्या उपायांनुसार कोरफडीच्या गरामध्ये चिमूटभर हळद व किंचित साखर व तूप टाकून घेत असतो. यामुळे मला खूप चांगला गुण आला. तपासण्यांमध्येसुद्धा सुधारणा झाली. मला विचारायचे आहे, की यापुढे किती दिवस हा उपाय सुरू ठेवावा? कृपया मार्गदर्शन करावे. ....पाटील 
उत्तर -
चमचाभर कोरफडीचा गर रोज घेता येतो. याची पद्धत याप्रमाणे, छोट्या कढल्यात २-३ थेंब तूप घ्यावे, त्यात चमचाभर कोरफडीचा गर परतावा, यावर चिमूटभर हळद, हवी असल्यास थोडी खडीसाखर घालून सेवन करावे. या पद्धतीने कोरफड दीर्घकाळ घेता येते. तपासण्यांमध्ये सुधारणा झाली आहे ते चांगलेच आहे. बरोबरीने जेवणानंतर ‘बिल्वसॅन’, पुनर्नवासव घेण्याचाही फायदा होईल.