प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मी   जेवण व्यवस्थित करतो, मात्र माझे वजन वाढत नाही. सकाळी बदाम खाल्ले, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने टॉनिक घेतले तरी वजनात वाढ होत नाही. माझी प्रकृती फारच खालावलेली दिसते. तरी आपण मार्गदर्शन करावे.
- सुर्वे 

उत्तर - सेवन केलेले अन्न अंगी वागणे हे सुद्धा महत्त्वाचे असते. यासाठी पचन सुधारायला हवे. यादृष्टीने जेवणापूर्वी आल्या-लिंबाचा एक चमचा रस घेता येईल. जेवणानंतर ताकात थोडे लवणभास्कर चूर्ण घेता येईल. रोज सकाळी बदाम खाणे चांगले आहे, मात्र ते रात्रभर पाण्यात भिजविलेले असावेत व बारीक करून किंवा नीट चावून खावेत. वजन वाढण्यासाठी रोज सकाळी पंचामृत घेण्याचाही फायदा होतो असे दिसते. च्यवनप्राशसारखे धातुपोषक व पचण्यास सोपे असे रसायन घेण्याचाही फायदा होईल. हे सर्व उपाय घरच्या घरी सुरू करता येतील, तरीही वजन कमी होण्यामागे इतर काही कारण नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी एकदा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे चांगले.

*********************************

माझ्या पतींना वारंवार कफाचा त्रास होतो. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून त्यांना हा त्रास आहे. पूर्वी कफ सिरप, वाफ वगैरे घेऊन बरे वाटत असे, पण अलीकडे एकदा छातीत कफ झाला की लवकर जात नाही. खूप विचार केला, कशाचे दडपण आले की नक्की कफाचा त्रास होतो असे लक्षात आले आहे. आहारात पथ्य पाळत असतो, तरी यावर काही औषध सांगावे ही विनंती.
-वैजयंती
उत्तर -
साध्या उपायांनी बरे वाटत नाही, तेव्हा प्रकृतीनुरूप योग्य उपचार करणे, त्यासाठी तज्ज्ञ वैद्यांनी भेट घेणे हे सर्वांत श्रेयस्कर. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्राणसॅन योग’, श्वासकुठार ही औषधे घेता येतील. कफ असो वा नसो, आठवड्यातून दोन वेळा छातीला अगोदर तेल लावून वरून रुईच्या पानांचा शेक घेण्याचा फायदा होईल. विचार, मनावर दडपण या गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी ताणाचा शरीर-मनावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आपल्या हातात असते. या दृष्टीने सकाळी थोडा वेळ दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम करण्याचा फायदा होईल. ॐकार म्हणणे, ऐकणे, थोडा वेळ ध्यान करणे, ‘सोम साधना’ करणे याचाही उत्तम फायदा होईल. दही, थंड पदार्थ, चीज वगैरे पदार्थ आहारातून वर्ज्य करणे चांगले.

*************************************************

‘फॅमिली डॉक्‍टर’ (१४ सप्टेंबर १८) पुरवणीत उच्चार व आवाज याबाबत खूपच उद्‌बोधक माहिती दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. मला संगीताची आवड आहे, मी गाणे शिकलेले आहे. मात्र वरचा सा, रे, ग लावता येत नाही. यासाठी काही औषध असेल तर सुचवावे. ज्येष्ठमधाची काडी चघळली तर जीभ फार चरचरीत होते. फार प्रयत्नांनी वरचे सूर लावले तर ठसका लागतो. कृपया उपाय सुचवावा.
- कुटे  
उत्तर -
‘फॅमिली डॉक्‍टर’मधील माहिती आवडल्याचे कळविल्याबद्दल आपले आभार. सुरांची व्याप्ती ही बऱ्याच प्रमाणात मूळ प्रकृतीवर अवलंबून असते, सरावाने यात काही प्रमाणात सुधारणा करता येते. बरोबरीने स्वरयंत्र, घसा यांच्या आरोग्यासाठी मध-तूप याबरोबर अर्धा अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. मनुका, ज्येष्ठमध, पिंपळी वगैरे स्वर्य द्रव्यांपासून बनविलेली द्राक्षादी वटी म्हणून आयुर्वेदात एक गोळी असते, ती चघळण्याचा उपयोग होईल. गंडूष म्हणजे रोज सकाळी अर्धा ते पाऊण चमचा ‘संतुलन सुमुख तेला’सारखे तेल तोंडात धरून ठेवता येईल एवढ्या प्रमाणात घेऊन दहा मिनिटांसाठी धरून ठेवणे, अधून मधून खुळखुळवणे, हा उपचार करण्याचा उपयोग होईल, प्यायचे पाणी गरम असणे, तिखट, तेलकट, आंबट गोष्टी वर्ज्य करणे हे सुद्धा चांगले. 

*************************************************

मी ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’ या आरोग्य पुरवणीची नियमित वाचक आहे. तुमच्या टिप्सचा चांगला उपयोग होतो. मला मोठा कोणताही विकार नाही, मात्र मला पित्ताचा खूप त्रास आहे. घसा लाल होतो, जळजळ होते, अंगाला खाज येते, त्वचा कोरडी पडते, तोंडात फोड येतात. बऱ्याचदा खोकल्यासाठी अँटिबायोटिक्‍स घ्यावी लागतात, त्यानंतर हा त्रास अजूनच वाढतो. तरी आपण मार्गदर्शन करावे ही विनंती.
- सबनीस
उत्तर -
 या प्रकारचे तीव्र दुष्परिणाम असणारी औषधे वारंवार घ्यायची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी मध-तुपाबरोबर सितोपलादी चूर्ण नियमितपणे घेण्याचा उपयोग होईल. रोज सकाळ-संध्याकाळ नियमितपणे एक-एक चमचा ‘ब्राँकोसॅन सिरप’, च्यवनप्राश रसायन, ‘सॅनरोझ अवलेह’ घेण्याचाही उपयोग होईल. तरीही खोकला झालाच तर अडुळशाचे एक पिकलेले पान, अर्धा बेहडा व एक पेर इतक्‍या आकाराची ज्येष्ठमधाची काडी यांचा दोन कप पाण्यात अर्धा कप उरेपर्यंत काढा तयार करून घेता येईल. यामुळे प्रतिकारशक्‍ती कमी करणारी आणि उष्णता वाढविणारी औषधे घेण्याचे प्रमाण कमी होईल, क्रमाक्रमाने थांबेलही. बरोबरीने सध्या जो पित्ताचा त्रास होतो आहे, त्यावर रोज आहारात तीन-चार चमचे घर साजूक तूप घेणे, रात्री झोपताना अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे, दुधातून गुलकंद तसेच शतावरी कल्प किंवा संतुलनचा ‘शतानंत कल्प’ घेणे हे उपाय योजता येतील. साळीच्या लाह्यांचे पाणी, काळ्या मनुका, सुकवलेले अंजीर, पाण्यात भिजवलेले बदाम, खडीसाखर, घरी बनविलेले ताजे लोणी हे आहारात समाविष्ट करणे चांगले.

*************************************************
माझे वय ६२ वर्षे आहे. माझ्या दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू झाला आहे. तसेच रेटिना खराब झाला आहे असे डॉक्‍टरांनी निदान केलेले आहे. यावर मला डॉक्‍टरांनी व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या आहेत. त्यासोबत आपण सुचविलेले त्रिफळा, तूप, मध हेसुद्धा घेतले तर चालेल का? याशिवाय काय औषध घेऊ? कृपया मार्गदर्शन करावे.
- भारती
उत्तर -
सध्या चालू असलेल्या गोळ्यांच्या बरोबरीने त्रिफळा, तूप, मध निश्‍चितपणे घेता येईल. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा, एक चमचा घरचे साजूक तूप व अर्धा चमचा शुद्ध खात्रीची मध असे मिश्रण घेणे उत्तम. या बरोबरीने सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा संतुलनचे ‘सुनयन घृत’ घेता येईल. नियमित, आठवड्यातून किमान दोनदा पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. नाकात घरच्या साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्याचा, डोळ्यात संतुलनच्या ‘सुनयन तेला’चे दोन-तीन थेंब टाकण्याचा उपयोग होईल. तज्ज्ञ वैद्यांच्या नार्गदर्शनाखाली औषधी सिद्ध तुपाच्या नेत्रबस्ती घेता येतील व दही, चीज, विकतचे गोड पदार्थ, सिताफळ, फणस, श्रीखंड वगैरे कफदोष वाढविणाऱ्या गोष्टी आहारातून वर्ज्य करण्याचाही उपयोग होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com