प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Sunday, 27 January 2019

माझी मुलगी सोळा वर्षांची आहे. तिची अंथरूण ओले करण्याची सवय अजूनही गेली नाही. डॉक्‍टरांच्या उपचारांचादेखील काही फायदा झाला नाही. तिची ही सवय जाण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.
... सुवर्णा 

माझी मुलगी सोळा वर्षांची आहे. तिची अंथरूण ओले करण्याची सवय अजूनही गेली नाही. डॉक्‍टरांच्या उपचारांचादेखील काही फायदा झाला नाही. तिची ही सवय जाण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.
... सुवर्णा 
उत्तर -
इतक्‍या मोठ्या वयातही असा त्रास होतो आहे, त्यावर वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे सर्वांत चांगले. तत्पूर्वी  मुलीला जंत पडून जाण्यासाठी दर महिन्याला औषध देणे चांगले. काही दिवस रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंग चूर्ण मधात मिसळून घेण्याचाही उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी पाव चमचा भाजलेला ओवा, पाव चमचा तीळ आणि एक अष्टमांश चमचा हळद असे मिश्रण चावून खाण्याचा उपयोग होऊ शकेल. या त्रासाचा बऱ्याचदा मानसिकतेशी संबंध असू शकतो. तेव्हा घरातील वातावरण आनंदी राहील, मुलीच्या मनावर दडपण राहणार नाही, उलट तिला सुरक्षित वाटेल याकडे लक्ष देणे चांगले. रोज ‘फेमिसॅन तेला’चा पिचू आणि आठवड्यातून दोन वेळा ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेण्यानेही असा त्रास नियंत्रणात येतो असा अनुभव आहे.

माझे वय ५८ वर्षे आहे. वाचताना चष्मा लागतो. माझी समस्या अशी आहे की, माझ्या डोळ्यांना प्रचंड खाज सुटते, डोळे कोरडे पडतात, लाल होत नाहीत. डॉक्‍टरांनी दिलेले ड्रॉप्स टाकले की तात्पुरते बरे वाटते. कृपया यावर काहीतरी उपाय सुचवावा. 
... दीपक चोभास्कर
उत्तर -
डोळ्यांचा संबंध शरीरातील मज्जाधातूशी असतो. विशेषतः डोळ्यांमधील स्निग्धता ही मज्जा धातूकडून मिळत असते. त्यामुळे डोळे कोरडे पडत असले तर फक्‍त ड्रॉप्स टाकणे पुरेसे नसते, तर मज्जाधातूला पोषण मिळण्याकडे लक्ष द्यावे लागते. यादृष्टीने रोज सकाळी पंचामृत, भिजविलेले बदाम घेण्याचा उपयोग होईल. डोळ्यांना हितावह आणि मज्जापोषक द्रव्यांनी सिद्ध केलेले ‘संतुलन सुनयन घृत’ सकाळ, संध्याकाळ एक-एक चमचा या प्रमाणात घेण्याचा फायदा होईल. दिवसातून दोन-तीन वेळा डोळ्यांमध्ये ‘संतुलन अंजन (रंगविरहित)’ घालण्याचा उपयोग होईल. कपभर पाण्यात पाव चमचा त्रिफळा चूर्ण रात्रभर भिजत घालून सकाळी चौपदरी सुती कापडातून गाळून घेऊन त्या पाण्याने स्नानाच्या वेळी दोन्ही डोळे धुतले, तर त्यामुळेही डोळ्यांना खाज सुटणे कमी होण्यास मदत मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे व डोळ्यांमध्ये ‘संतुलन सुनयन तेला’चे थेंब टाकण्याचाही फायदा होईल. जर्दाळू, अक्रोड, साजूक तूप, खारीक पूड टाकून उकळलेले दूध, मनुका वगैरे शरीरपोषक गोष्टींचा आहारात समावेश करणेही उत्तम. 

माझे वय ६४ वर्षे आहे. माझ्या पित्ताशयात खडे झालेले आहेत. डॉक्‍टरांनी यावर शस्त्रकर्म करणे हा एकच उपाय आहे असे सांगितलेले आहे. आयुर्वेदात यावर काही औषध आहे का? हे खडे पूर्णपणे विरघळू शकतात का?   
... प्रभाकर 
उत्तर -
पित्ताशयातील खड्यांवर उपचार करण्यासाठी शस्त्रकर्म हा एकमेव उपाय नाही. आयुर्वेदात यावर अनेक उपाय असतात, ज्यामुळे काही केसेसमध्ये खडे पूर्ण नाहीसे होतात, इतर केसेसमध्ये खडे पूर्णतः विरघळले नाहीत तरी त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे एकदम शस्त्रकर्माचा निर्णय न घेता आयुर्वेदाची औषधे सुरू करणे सर्वांत चांगले. दिवसातून दोन वेळा कामदुधा तसेच ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेता येतील. रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर अविपत्तिकर  चूर्ण घेता येईल. तसेच नाभीभोवती, एकंदर पोटावर ‘संतुलन रोझ ब्युटी तेल’ लावण्याचा उपयोग होईल. अंडी, ढोबळी मिरची, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, खाणे आहारातून टाळणे श्रेयस्कर.

‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी माझ्या फार आवडीची आहे. मला हृदयविकार आहे. पाच वर्षांपूर्वी अँजिओग्राफी केली होती. सध्या त्रास असा आहे की, रात्री घशात एकदम चिकट कफ येतो. घशातील कफ मोकळा करण्यासाठी तासातासाला उठावे लागते. दिवसा त्यामानाने कमी त्रास होतो. आपण मार्गदर्शन करावे, त्याचा मला फायदा होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे.   ... बोरसे 
उत्तर -
हृदय आणि फुप्फुसे यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. विशेषतः हृदयविकारामुळे रक्‍ताभिसरण मंदावले असेल तर अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे यावर फक्‍त कफ कमी करण्यासाठी नाही, तर रक्‍ताभिसरण सुधारण्यासाठी उपचार करायला हवेत. यादृष्टीने नियमित अभ्यंग करण्याचा तसेच ‘सुहृदप्राश’ हे खास हृदयाच्या सशक्‍ततेसाठी बनविलेले रसायन घेण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने ‘कार्डिसॅन प्लस’ हे चूर्ण मधाबरोबर घेण्याचाही फायदा होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा छातीला अगोदर अभ्यंग तेल लावून वरून रुईच्या कोमट पानांनी शेक करण्याचा फायदा होईल.

मी ज्येष्ठ नागरिक आहे. मला सकाळी शौचाला घट्ट होते, त्यामुळे खूप त्रास होतो. महिन्यातून चार-पाच वेळा तिखट म्हणजे माशाची आमटी जेवणात घेतली तर, जेवणानंतर पोटात मुरडा येतो आणि दोन-तीन वेळा शौचाला जावे लागते. कृपया सौम्य उपचार सुचवावा. मला याव्यतिरिक्‍त कोणताही त्रास नाही, मात्र चालताना वॉकर घेऊन चालावे लागते.
... कुसुम
उत्तर -
वयाचा विचार करता, तसेच वॉकर घेऊन चालण्याची गरज आहे त्यावरून आहार पचायला सोपा व पुरेशा प्रमाणात स्निग्ध असणे गरजेचे होय. यादृष्टीने मासे, अंडी व इतर मांसाहार न खाणे श्रेयस्कर. याव्यतिरिक्‍त रोज सकाळी शौचाला व्यवस्थित व्हावी यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे, गरम पाण्यात दोन चमचे घरी बनविलेले साजूक तूप व चिमूटभर मीठ घेणे हे उपाय करता येतील. यामुळे आतड्यातील उष्णता कमी झाली की एखाद्या वेळी तिखट खाल्लेले चालू शकेल, मात्र मांसाहार टाळणेच श्रेयस्कर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer