प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 8 March 2019

गेल्या पाच-सहा वर्षांपासून मला झोप येण्यासाठी गोळी घ्यावी लागते. याचे दुष्परिणाम होतील हे माहिती असूनही माझ्याकडे झोपेची गोळी घेण्यावाचून पर्याय नाही. कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती. निद्रासॅन गोळी घेतो आहे.   
 ... देशपांडे   

गेल्या पाच-सहा वर्षांपासून मला झोप येण्यासाठी गोळी घ्यावी लागते. याचे दुष्परिणाम होतील हे माहिती असूनही माझ्याकडे झोपेची गोळी घेण्यावाचून पर्याय नाही. कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती. निद्रासॅन गोळी घेतो आहे.   
 ... देशपांडे   

उत्तर -  शांत झोप ही आरोग्यासाठीची प्राथमिक गरज असते. झोपेच्या गोळीच्या प्रभावाने झोप आली असे वाटले तरी त्यामुळे खऱ्या शांत झोपेचे सर्व फायदे होतात असे नाही, शिवाय याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात ते वेगळेच. त्यामुळे झोपेच्या गोळीची सवय लावून न घेता ‘निद्रासॅन’, ‘सॅन रिलॅक्‍स सिरप’सारखे मनाला, मेंदूला शांत होण्यास मदत करणारे साधे औषध घेणे चांगले. बरोबरीने रात्री झोपण्यापूर्वी अंगाला अभ्यंग, तळपायांना पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. घरी बनविलेल्या साजूक तुपाचे नस्य करणे, टाळूवर ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणे, कानात ‘संतुलन श्रुती तेल’ टाकणे याही उपायांनी शांत झोप लागण्यास मदत मिळते. योगनिद्रा हे संगीत ऐकत ऐकत झोपण्याची प्रयत्न करण्यानेही काही दिवसात झोपेची गोळी न घेता शांत झोप लागते असा अनेकांचा अनुभव आहे. 

*******************************************

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक आहे. यातील मार्गदर्शनाचा मला खूप फायदा झाला. माझे वय ४५ वर्षे असून, दहा वर्षांपूर्वीच्या अपघातात डाव्या गुडघ्याचे लिंगामेंट फाटले होते. अपघात झाला तेव्हा काही त्रास झाला नव्हता, परंतु आता गुडघा दुखू लागला म्हणून तपासणी केली त्यात हे निदान झाले. यासाठी काही आयुर्वेदिक उपचार सुचवावेत. ... सुनील पवार

उत्तर - लिंगामेंटला झालेली इजा पूर्ववत होऊ शकते, मात्र यावर काही दिवस नियमित उपचार करणे आवश्‍यक असते. यादृष्टीने अजूनही दिवसातून दोनदा गुडघ्यांना ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावणे, आठवड्यातून दोनदा इजा झालेल्या गुडघ्याला ‘सॅन वात’ लेप लावणे, ‘संतुलन वातबल गोळ्या’ व प्रवाळपंचामृत, ‘कॅल्सिसॅन’ या गोळ्या घेणे हे उपचार सुरू करता येतील. फणसाच्या गराभोवती जे चपटे संधिबंधनासाररखे चिवट तंतू असतात, ते काढून त्याची चटणी करून गुडघ्यांवर तीस-पस्तीस मिनिटांसाठी लेपाप्रमाणे लावून ठेवण्याचाही अशा केसेसमध्ये चांगला फायदा होताना दिसतो. फार वेळ उभे राहायचे असेल किंवा चालायचे असेल तेव्हा गुडघ्याला इलॅस्टिक बॅंडेजचा आधार देणे चांगले.

*******************************************

मला बऱ्याच वर्षांपासून तंबाखू चघळून थुंकून टाकण्याची सवय आहे. सकाळी पोट साफ होण्यासाठी मला ही सवय लागली. आता कितीही प्रयत्न केला तरी ही सवय सुटत नाही. सकाळी शौचाला व्यवस्थित व्हावे आणि तंबाखू खाण्याची इच्छा होऊ नये यासाठी काही उपाय असतो का? ... भैयाजी
उत्तर -  तंबाखू नुसता चघळला आणि खाल्ला नाही, तरी त्याचे दुष्परिणाम होतातच. तेव्हा ही सवय वाईट आहे हे समजून, मनाचा निर्धार करून सवय सोडून देणे हेच उत्तम. तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा बडीशेप खाता येईल. 

पोट साफ होण्यासाठी तंबाखूवर अवलंबून राहण्याची गरज नाही. यासाठी जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या, रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. तंबाखूमुळे आलेला शरीरातील, आतड्यातील कोरडेपणा व उष्णता कमी होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप मिसळून घेण्याचाही उपयोग होईल. गरज पडल्यास वैद्यांच्या सल्ल्याने काही दिवस कपिला चूर्ण घेण्याचा, गंधर्वहरीतकी घेण्याचाही फायदा होईल.

*******************************************
 ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही माझी आवडती पुरवणी आहे. यातून खूप मौलिक मार्गदर्शन मिळते. माझ्या नाकातील हाड वाढले असल्याचे निदान झाले आहे व त्यासाठी शस्त्रकर्म गरजेचे असल्याचे सांगितले आहे; परंतु मला शस्त्रकर्म करायचे नाही. कृपया यावर काही उपाय सुचवावा.   
.... संजय जाधव 

उत्तर -  कोणतेही शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी औषधोपचारांनी बरे होऊ शकते का याचा शहानिशा केलेला चांगला होय. या प्रकारच्या त्रासावर नियमित नस्य करण्याचा उत्तम गुण येताना दिसतो. यादृष्टीने रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृत’ किंवा वैद्यांच्या सल्ल्याने ‘संतुलन गंधर्व नस्य’ वा अणुतेलाचे तीन-चार थेंब टाकण्यास सुरवात करता येईल. दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम प्राणायाम आणि मीठ मिसळलेल्या पाण्याने जलनेती हे उपायसुद्धा उपयोगी पडतील. बरोबरीने वारंवार सर्दी, शिंका, सायनसचा त्रास होत असल्यास ‘ब्राँकोसॅन कफ सिरप’, च्यवनप्राश घेण्याचाही फायदा होईल.

*******************************************

आम्हाला आजवर अनेकदा ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीचा फायदा झाला आहे. मी व माझे पती, आम्ही दोघे हिवाळ्यात नियमित च्यवनप्राश घेतो, उन्हाळ्यात मात्र बंद करतो. पावसाळ्यात च्यवनप्राश घेतलेला चालतो का? .... जोशी
उत्तर -  पावसाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही च्यवनप्राश घेतलेला चालतो. च्यवनप्राश हे असे रसायन आहे की ज्यात वातशामक, उष्णता कमी करणाऱ्या, कफदोष कमी करणाऱ्या, रक्‍ताची शुद्धी करणाऱ्या, शक्‍ती वाढविणाऱ्या अशा प्रकारे सर्व वनस्पतीज द्रव्यांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे नीट काळजी घेऊन, सर्व संस्कार व्यवस्थित करून बनविलेला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणंजे सर्व घटकद्रव्ये शुद्ध, नैसर्गिक व उत्तम प्रतीची घेऊन बनविलेला ‘संतुलन च्यवनप्राश’सारखा च्यवनप्राश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सर्व ऋतूत म्हणजे वर्षभर घेता येतो. तेव्हा हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये उभयतांनी च्यवनप्राश घेणे उत्तम होय.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer