प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 22 March 2019

मला वीस वर्षांपासून तीव्र आम्लपित्ताचा त्रास आहे. काहीही खाल्ले तरी त्याचे पोटात आम्लात रूपांतर होते. छातीत अतिशय जळजळते. ॲसिडिटीची गोळी घेतली की तात्पुरते बरे वाटते. कायमस्वरूपी बरे होण्यासाठी उपाय सुचवावा, ही विनंती.
- जयेंद्र शिंदे

मला वीस वर्षांपासून तीव्र आम्लपित्ताचा त्रास आहे. काहीही खाल्ले तरी त्याचे पोटात आम्लात रूपांतर होते. छातीत अतिशय जळजळते. ॲसिडिटीची गोळी घेतली की तात्पुरते बरे वाटते. कायमस्वरूपी बरे होण्यासाठी उपाय सुचवावा, ही विनंती.
- जयेंद्र शिंदे

ज्या प्रमाणे एखाद्या मातीच्या मडक्‍यात रोज दही लावले जात असेल तर काही दिवसांनी त्यात फक्‍त दूध ओतून ठेवले तरी त्याचे दुसऱ्या दिवशी दही होते. कारण त्या मडक्‍याच्या सूक्ष्म छिद्रांमध्ये दह्याची आम्लता झिरपून राहिलेली असते. त्याप्रमाणे अनेक वर्षांची आम्लपित्ताची प्रवृत्ती असेल तर साधे, पथ्याचे खाणे खाल्ले तरी त्याचे रूपांतर आम्लात होते. यावर रामबाण उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने विरेचन, बस्ती घेणे. कारण यामुळे जी पेशीच्या पातळीवर शुद्धी होते, त्यातून पोट, आतड्याच्या भिंतीत रुतून बसलेली आम्लता निघून जाऊ शकते. बरोबरीने रोज सकाळ-संध्याकाळ साळीच्या लाह्यांचे पाणी पिणे, कामदुधा, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल. आहारात गव्हाच्या ऐवजी ज्वारी, तांदूळ या धान्यांवर भर देणे. भाजी, आमटी वगैरे करताना तेलाऐवजी तुपाची फोडणी देणे, वेलीवर्गीय फळभाज्या, मुगाची डाळ यांचा समावेश करण्याणेही आम्लता कमी होण्यासाठी फायदा होईल.  

*********************************************

मी  एक व्यावसायिक असून माझे वय ३० वर्षे आहे. मला पाच-सहा वर्षांपासून पाठदुखीचा खूप त्रास होतो आहे. अस्थितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तपासण्या केल्या, औषधे घेतली, पण काहीच फरक पडला नाही. आपणच योग्य उपाय सुचवावा.
- नचिकेत

इतक्‍या तरुण वयात खरे तर अशा प्रकारचा त्रास व्हायला नको. व्यावसायिक असल्याने दिवसभर बैठे काम असेल तर सकाळी चालायला जाणे, ताडासन, भुजंगासन, ‘संतुलन समर्पण’ यासारखी साधी योगासने करणे चांगले. दिवसातून दोन वेळा पाठीच्या कण्याला खालून वर या दिशेने ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ हलक्‍या हाताने जिरविण्याचा उपयोग होईल. सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा या प्रमाणात ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ तूप-साखरेबरोबर घेण्याचा, ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेण्याचाही फायदा होईल. कधीतरी वेळ काढून तज्ज्ञ परिचारकाकडून पाठीच्या कण्याचा विशेष मसाज, उदा. ‘संतुलन कुंडलिनी मसाज’ घेण्याचा, विशेष पोटली मसाज, बस्ती हे उपचार करून घेण्याचाही उपयोग होईल. या उपायांचा फायदा होईलच, तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे चांगले. 
*********************************************

‘फॅमिली डॉक्‍टर’ ही माझी आवडती पुरवणी आहे. मला हृदयरोगाचा त्रास आहे. पंधरा दिवसांपूर्वी रक्‍तदाब वाढल्यामुळे ॲडमिट करावे लागले होते. मात्र मला मुख्य त्रास होतो तो म्हणजे रात्री घशात खूप चिकट कफ येतो, दर तासाला घशातील कफ मोकळा करण्यासाठी उठावे लागते, त्यामुळे झोप होत नाही. कृपया यावर मार्गदर्शन करावे.
- पंडित मोतीराम

हृदयरोग आहे. रक्‍तदाब वाढल्यामुळे ॲडमिट करावे लागले होते, तेव्हा वैद्यांना प्रत्यक्ष भेटून व्यवस्थित उपचार करणे चांगले. रक्‍तदाब वाढू नये यासाठी उपाययोजना करायलाच हवी, मात्र बऱ्याचदा झोप पुरेशी न होणे हेसुद्धा रक्‍तदाब वाढण्यामागचे एक कारण असू शकते. शरीरात अतिप्रमाणात कफदोष तयार होऊ नये, तसेच रक्‍ताभिसरण वाढावे यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने ‘कार्डिसॅन प्लस’, श्वासकुठार, ‘संतुलन सुहृदप्राश’, अर्जुनारिष्ट घेण्यास सुरुवात करता येईल. जेवताना तसेच दिवसभरात एरवीसुद्धा उकळलेले गरम पाणी पिण्याचा फायदा होईल. जेवताना चार चमचे भातात अर्धा चमचा भास्करलवण चूर्ण मिसळून घेण्याचा उपयोग होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर अर्धा-पाऊण चमचा ‘संतुलन सुमुख तेल’ तोंडात घरून ठेवण्याने, अधून मधून खुळखुळवण्याने घसा व शिरोभागातील कफ सुटा होऊन बोर पडून जायला मदत मिळेल. काही दिवसांसाठी दोन्ही जेवणांनंतर आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेलला त्रयोदशी विडा खाण्याचाही उपयोग होईल. 

*********************************************
माझे वय ४० वर्षे आहे. माझा घसा वारंवार लाल होतो, दुखतो व नंतर ताप येतो. मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करून उपयोग होत नाही. अँटिबायोटिक्‍स घेतली की जरा बरे वाटते, पण दोन आठवड्यांनी पुन्हा त्रास होतो. असे होतच राहते. माझे लहानपणी टॉन्सिल्सचे शस्त्रकर्म झालेले आहे. तरी कृपया उपाय सुचवावा.
- सिद्धार्थ

टॉन्सिल्स या ग्रंथी शरीराच्या रोगप्रतिकार संस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शस्त्रकर्मामुळे या संस्थेचे जे नुकसान होते ते भरून काढणे सोपे नसते. तरीही योग्य उपचार केले तर वारंवार त्रास होणे थांबू शकते. उदा. रोज सकाळी च्यवनप्राश घेणे, दिवसातून दोन वेळा ‘संतुलन सितोपलादी चूर्ण’ मधात मिसळून घेणे, वैद्यांच्या सल्ल्याने काही दिवस ‘प्राणसॅन योग’, ज्वरांकुश घेणे चांगले. उकळलेले गरम पाणी पिणे, पाणी उकळताना त्यावर शुद्ध सोन्याचा संस्कार करणे, दही, श्रीखंड, फणस, थंड पाणी, सीताफळ, तळलेले पदार्थ आहारातून टाळणे हेसुद्धा चांगले. 

*********************************************

माझे वय २७ वर्षे असून माझ्या डाव्या पायाची टाच गेली अनेक वर्षे दुखते आहे. एकदा शिडीवरून खाली उतरताना डाव्या पायाला ताण बसला. त्यानंतर काही दिवसांनी टाच, डाव्या बाजूची पाठ या सर्वच ठिकाणी शिर दुखल्याप्रामणे दुखते. कृपया उपाय सुचवावा.
- कृष्णा टी

आघात होणे किंवा आपण उल्लेख केला त्याप्रमाणे शरीराच्या कुठल्याही भागावर ताण येणे हे वातप्रकोपाचे एक कारण असते. सध्याचे जे दुखणे आहे तो याचाच परिणाम आहे. वातावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे स्नेहन. त्यामुळे संपूर्ण अंगाला नियमित अभ्यंग करणे, विशेषतः पाठीच्या संपूर्ण कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ जिरवणे, आहारात किमान चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश करणे, पंचतिक्‍त घृत किंवा दशमूळ घृत एक-एक चमचा घेणे, हे उपाय योजण्याचा उपयोग होईल. संतुलनच्या ‘वातबल’ तसेच ‘कॅल्सिसॅन’ गोळ्या घेण्यानेही बरे वाटेल. आठवड्यातून एक दिवस वातशामक तेलाची बस्ती घेण्यानेही वातदोष संतुलित होण्यास मदत मिळेल. टाच दुखते त्यावर अगोदर ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ जिरवून नंतर वाळूच्या गरम पुरचुंडीने शेक करण्याचा गुण येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer