प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 3 May 2019

‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीमधील लेखांमधून खूप मार्गदर्शन होते. ‘प्रश्नोत्तर’ सदरातील उत्तरांनी अनेक शंकांचे निरसन होते व आरोग्य चांगले राहते.

उच्च रक्‍तदाबासाठी मी रोज एक गोळी घेतो. त्यामुळे तो नियंत्रणात राहतो. सध्या मला मुख्य त्रास होतो आहे तो म्हणजे डाव्या हाताच्या पंजाला मुंग्या येतात. डॉक्‍टरांचे, वैद्यांचे इलाज केले. पण, फारसा फरक पडला नाही. कृपया आपण मार्गदर्शन करावे.  .... यशवंत 
उत्तर -
रोज सकाळी स्नानापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण पाठीच्या कण्याला, कमीत कमी मानेला, तसेच संपूर्ण डाव्या हाताला हलक्‍या हाताने ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ जिरविण्याचा उपयोग होईल. ‘संतुलन वातबल’ गोळ्या, योगराज गुग्गुळ घेण्याचा तसेच ‘संतुलन संदेश’ आसव घेण्याचाही फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकणे, तसेच आहारात घरी बनविलेले साजूक तूप पुरेशा प्रमाणात म्हणजे किमान चार-पाच चमचे या प्रमाणात घेणेही श्रेयस्कर ठरेल. रक्‍तदाब नियंत्रणात आहे तेही चांगले; मात्र गोळीची मात्रा वाढू नये. इतर कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी नियमित अभ्यंग करणे, पादाभ्यंग करणे उत्तम. बरोबरीने वैद्यांच्या मार्गदर्शनाने प्रकृतीनुरूप औषध सुरू करणेही चांगले.

****************************************

माझी त्वचा फार कोरडी आहे. उन्हाळ्यात व हिवाळ्यात माझ्या टाचांना भेगा पडतात. सर्दीमुळे कान गच्च झाले होते, ऐकायला येणे अगदी कमी झाले होते. पण, ‘संतुलन’चे श्रुती तेल वापरण्याने चार दिवसांत बरे वाटले. मात्र, आत्ताही कोरडा खोकला आहे. कृपया या सर्वांवर उपाय सुचवावा.... सायली
उत्तर -
एकंदर सर्व माहितीवरून शरीरात कोरडेपणा अधिक असावा, असे दिसते. कोरडा खोकला कमी व्हावा, यासाठी तुपात मिसळून सितोपलादी चूर्ण (सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा) घेता येईल. रात्री झोपण्यापूर्वी छातीला अभ्यंग करून वरून रुईच्या पानांनी शेक करण्याचा उपयोग होईल. काही दिवस सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेण्याचाही फायदा होईल. ‘संतुलन श्रुती तेल’ अजूनही वापरणे चांगले. कान किंवा श्रवणेंद्रिय हे वाताचे एक मुख्य स्थान असल्याने कानात तेल टाकण्याने शरीरातील एकंदर वातदोष म्हणजेच कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळत असते. पायाच्या टाचांना भेगा पडू नयेत किंवा पडलेल्या भेगा भरून याव्यात, यासाठी नियमित अभ्यंग करण्याचा उपयोग होतो. दूध, घरचे साजूक तूप, ताक, भिजवलेले बदाम, अंजीर, खारीक वगैरे द्रव्यांचा आहारात समावेश असू देणे चांगले.

****************************************

माझे वय ५० वर्षे असून, मी बाराही महिने थंड पाण्याने स्नान करते, हे योग्य आहे का? माझी दोन बाळंतपणे शस्त्रकर्माने झाली आहेत. त्या वेळी शेक, तेल काही मिळाले नसल्याने माझे वजन, विशेषतः पोट वाढलेले आहे. माझे जेवण कमी आहे. पण, भरभर खाण्याची सवय आहे. कृपया उपाय सुचवावा.  ... खरे
उत्तर -
आयुर्वेदातील दिनचर्या या विषयांतर्गत स्नानाची माहिती दिली आहे. तेथे स्नानाचे पाणी कोमट म्हणजे फार गारही नाही व फार गरमही नाही, असे असावे, असे सांगितले आहे. तेव्हा उन्हाळ्यात नळाच्या पाण्याने स्नान करायला हरकत नाही. मात्र, हिवाळा व पावसाळा या ऋतूंमध्ये कोमट पाणी वापरणेच चांगले. शिवाय, गार पाण्याने स्नान करणे हे शरीरातील वातदोष वाढण्यामागचे एक कारण असू शकते. दोन वेळा शस्त्रकर्माने बाळंतपणे, बाळंतपणानंतर काळजी न घेतल्याने वाढलेले वजन हे लक्षात घेता वर्षभर गार पाण्याने स्नान करणे टाळलेले चांगले. बाळंतपणानंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित अभ्यंग करणे, पोटाला किंवा जेथे चरबी जास्त आहे तेथे ‘सॅन मसाज पावडर’सारखे उटणे चोळून लावणे, रात्रीच्या जेवणात फक्‍त सूप म्हणजे द्रवाहार घेणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे हे श्रेयस्कर होय. भरभर जेवण्याची सवयही आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही. यात प्रयत्नपूर्वक बदल करता येतो.

****************************************

मी ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’ या लोकप्रिय पुरवणीचा नियमित वाचक आहे. यातील माहिती सर्व जनतेसाठी फारच उपयुक्‍त असते. मी एक सेवानिवृत्त शिक्षक आहे. सध्या माझे जेवण अगदी फिके असते. तरीसुद्धा डाव्या बाजूचे पोट जेवणाआधी व जेवणानंतरही दुखत असते. तरी, कृपया उपाय सुचवावा.  ...भगत
उत्तर -
पोट दुखण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे नेमके निदान होण्यासाठी वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे श्रेयस्कर. तत्पूर्वी, जेवताना अगोदर उकळलेले गरम पाणी पिणे, काही दिवस जेवणात गहू व तेल वर्ज्य करून तांदूळ, ज्वारी, नाचणी, मुगाची डाळ, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, ताजे गोड ताक यांचा समावेश असू देणे चांगले. दोन चमचे लिंबाचा रस, दोन चमचे मध व एक चमचा आल्याचा रस असे मिश्रण करून त्यातून दोन चमचे मिश्रण जेवणानंतर घ्यावे. दिवसातून दोन-तीन वेळा तसेच रात्री झोपण्यापूर्वी पोटावर ‘संतुलन रोझ ब्युटी तेल’ लावणे, पोटात गॅसेस वाटत असले, तर गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकणे हेसुद्धा चांगले. 

****************************************

कफदोष व पचन यांचा काही संबंध असतो का? रोज शौचास होते. पण, पोट हलके झाले, असे वाटत नाही. याचे कारण काय? व यावर काय उपाय करावा?  ..... करमळकर
उत्तर -
वात, पित्त, कफ ही तिन्ही शरीरातील कार्यकारी तत्त्वे असल्याने ती संपूर्ण शरीराला व्यापून असतात, तसेच शरीरातील प्रत्येक क्रियेशी संबंधित असतात. पोटाच्या अंतस्त्वचेचे रक्षण करणे, आतड्याला योग्य स्निग्धता देणे,  तोंड कोरडे पडू न देणे वगैरे अनेक गोष्टी कफमुळे घडत असतात. मात्र, जर तो प्रमाणापेक्षा वाढला किंवा चुकीच्या गुणांनी पचनसंस्थेत राहू लागला, तर त्यामुळे अग्नीच्या अन्नपचनाच्या कामात अडथळा येऊ शकतो. भूक न लागणे, पोटात जडपणा वाटणे, शौचाला होऊनही पोटात हलकेपणा न वाटणे, यासारखी लक्षणे त्यातून उत्पन्न होऊ शकतात. यावर उपाय म्हणजे काही दिवसांसाठी संध्याकाळनंतर पूर्ण लंघन करणे, दुपारच्या जेवणात अगोदर उकळलेले गरम पाणी पिणे, जेवणाच्या सुरवातीला आल्याचा छोटा तुकडा सैंधव मीठ लावून खाणे, जेवणानंतर वाटीभर घरी बनविलेले गोड ताक पिणे, जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ या गोळ्या घेणे, सकाळ-संध्याकाळ पोट गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे, दही, पनीर, चीज, फणस, सिताफळ, केळे वगैरे कफवर्धक गोष्टी आहारातून टाळणे, हेसुद्धा चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer