प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मी  एक ज्येष्ठ नागरिक असून, मला गेल्या वीस वर्षांपासून ॲसिडिटी व शौचाला साफ न होण्याचा त्रास आहे. सध्या काही दिवसांपासून थोडे चालले की डाव्या बाजूला पाठीत भरून येते. चालायचे थांबले की बरे वाटते आणि पुन्हा कितीही चालले, तरी सहसा दुखत नाही. रिपोर्टमध्ये डॉक्‍टर नस आखडल्याचे सांगतात. कृपया याबाबत आपण मार्गदर्शन करावे. ... विचारे
उत्तर -
 शौचाला साफ न होण्यामागे वातदोष वाढलेला असणे हे कारण असते, तसेच शौचाला न होण्याने वात वाढायला अजून मदत होते. वीस वर्षांपासून पोट साफ न होण्याचा हा जो त्रास आहे, त्यातून वातदोषाचे असंतुलन होऊन अशा प्रकारे नस दाबली जाणे, चालताना मध्येच कळ येणे यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे वाढलेला वात कमी करणे आणि त्यामागचे जे मूळ कारण ते म्हणजे मलावरोध दूर करणे असे दोन्ही बाजूंनी प्रयत्न करायला हवेत. यादृष्टीने दिवसातून दोन-तीन वेळा मानेला व पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ जिरवण्याचा उपयोग होईल. ‘संतुलन वातबल’, योगराज गुग्गुळ घेण्याचा फायदा होईल. ॲसिडिटी व पोट साफ न होणे या तक्रारींवर आठवड्यातून एकदा दोन चमचे एरंडेल घेणे, एरवी रोज रात्री झोपण्यापूर्वी कपभर पाण्यात दोन चमचे तूप मिसळून घेणे, चमचाभर अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे हे उपाय योजता येतील.

माझ्या जावयाचे वय ३४ वर्षे आहे. सतत संगणकावर काम असल्याने तळपायांची फार आग होते. तसेच मुंग्या येतात. कंबरेच्या मणक्‍यांमध्ये स्पाँडिलायटिस असल्याचे निदान झाले आहे. कृपया मार्गदर्शन करावे. ... अशोक कुलकर्णी
उत्तर -
 संगणकावर काम करताना बसण्याची विशिष्ट स्थिती आणि प्रखर स्क्रीनकडे जवळून बघण्याची अपरिहार्यता यातून हातापायांची जळजळ, डोळे कोरडे पडणे, लाल होणे, मान-कंबर दुखणे यांसारखे त्रास आज ना उद्या होतातच, तेव्हा आय्‌. टी. प्रोफेशनमधील सर्वांनीच आठवड्यातून किमान दोनदा पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’, डोळ्यांमध्ये ‘सॅन अंजन -ग्रे किंवा क्‍लिअर’ घालणे, रात्री झोपण्यापूर्वी पायांना पादाभ्यंग व टाळूवर ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणे आवश्‍यक असते. आहारात घरचे साजूक तूप, ताजे लोणी यांचा समावेश असणे हेसुद्धा चांगले.


माझे वय ५४ वर्षे आहे. मला मागील आठ वर्षांपासून पित्ताशयातील खड्यांचा त्रास आहे. यावर अनेक ॲलोपॅथिक व होमिओपॅथिक औषधे घेतली. यामुळे खडे विरघळले, तरी नंतर ते पुन्हा पुन्हा तयार होतात. कृपया यावर मार्गदर्शन करावे.  ... रोहन दाभाडे
उत्तर -
 पित्ताशयात वारंवार खडे होऊ नयेत यासाठी शरीरात पित्त वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. यासाठी वेळेवर जेवणे, भुकेकडे दुर्लक्ष न करणे, जागरण न करणे, पुरेशा प्रमाणात झोपणे, रोज पोट व्यवस्थित साफ होईल याकडे लक्ष देणे आवश्‍यक होय. याशिवाय रोज रात्री झोपण्यापूर्वी पोटावर, विशेषतः नाभीभोवती व उजव्या बाजूच्या बरगड्यांच्या खाली ‘संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल’ लावणे, सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेणे, आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा योग्य प्रमाणात समावेश करणे, या उपायांचा उपयोग होईल. वैद्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाने प्रकृतीनुरूप औषधे सुरू करणे हेसुद्धा श्रेयस्कर.    


मला गेल्या तीन वर्षांपासून जेवण झाले की तासा-दीड तासाने अंगावर गांधी येतात. जेथे गांधी येते तेथे खाज सुटते. लवंग, मिरची, लिंबू, संत्रे, टोमॅटो यांची ॲलर्जी सांगितली होती, त्यामुळे मी या गोष्टी खात नाही. तरीसुद्धा जेवणानंतर गांधी येतातच. असे वाटते की जेवणाचीच ॲलर्जी आहे. कृपया यावर उपचार सुचवावा. ... करंदेकर  उत्तर -  जेवणानंतर त्रास होतो आहे, तेव्हा अन्नातून दोष जाणार नाही आणि पोटातील- आतड्यातील पित्तदोष कमी होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. बऱ्याचदा पित्ताचा जुनाट त्रास असला, तर पित्त पोटा-आतड्याच्या अंतस्वचेत जिरून राहते व साधे खाणे खाल्ले, तरी त्यातून ॲसिडिटी तयार होऊन गांधींच्या रूपाने त्वचेपर्यंत पोहोचू शकते. तेव्हा या त्रासावर शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्मातील विरेचन करून घेणे व पोटात-आतड्यात साठून राहिलेले पित्त शरीराबाहेर काढून टाकणे हा सर्वोत्तम उपाय होय. त्याचबरोबरीने, सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. आहारात काही दिवस फक्‍त मूग, तांदूळ, ज्वारी, दुधी, तोंडली, कोहळा, परवर, भेंडी, पडवळ, कारले, साजूक तूप यापासून बनविलेले पदार्थ समाविष्ट करण्याचाही फायदा होईल.

मला ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला. माझे वय ३८ वर्षे आहे. मला लघवी साफ होत नाही. अडखळत व थांबून थांबून होते. लघवी तपासली असता जंतुसंसर्ग आढळतो. डॉक्‍टरांनी मूत्राशयाचा आकार वाढला असल्याचे सांगितले आहे व लघवी करताना मूत्राशय पूर्ण रिकामे होत नसल्याचे सांगितले आहे. यासाठी त्यांनी कॅथेटरचा पर्याय सुचवला आहे. कृपया आपण मार्गदर्शन करावे.  ... अशोक 
उत्तर -  
मूत्राशयाचा आकार वाढणे म्हणजेच मूत्राशयाची शक्‍ती कमी होणे. आयुर्वेदात यासाठी उत्तम उपचार असतात. त्यामुळे इतक्‍या कमी वयात कॅथेटरवर अवलंबून राहण्याचा पर्याय निवडण्याऐवजी आयुर्वेदिक उपचार घेणे श्रेयस्कर ठरेल. यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे सर्वांत चांगले. तत्पूर्वी गोक्षुरादी गुग्गुळ, तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ सुरू करता येईल. जेवणानंतर पलाशपुष्पासव, पुनर्नवासव घेण्याचाही उपयोग होईल. ओटीपोट, तसेच कटीप्रदेशी तेल लावून विशेष वनस्पतींपासून बनविलेल्या काढ्यात बसून शेक करण्याचाही अशा तक्रारींमध्ये फायदा होताना दिसतो. यासाठी संतुलनचे ‘किडनी बाथ’ हे मिश्रण वैद्यांच्या सल्ल्याने घेता येईल. कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वांगे, दही वगैरे आहारातून वर्ज्य कारणे चांगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com