प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 5 July 2019

फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीमधील लेखांमधून खूप मार्गदर्शन होते. ‘प्रश्नोत्तर’ सदरातील उत्तरांनी अनेक शंकांचे निरसन होते व आरोग्य चांगले राहते.

मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून, स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी कोणती संतुलन उत्पादने घ्यावीत, याची माहिती मला हवी आहे. ती कशी व किती घ्यावीत हेसुद्धा सांगावे. पंचामृत कसे करावे, त्यातील घटकद्रव्ये किती प्रमाणात मिसळावीत याचीही माहिती द्यावी.
....ऋषिकेश

उत्तर - स्मरणशक्‍ती, आकलनशक्‍ती, एकाग्रता या सर्व मेंदूच्या आरोग्यावर अवलंबून असतात. मेंदूला पोषण मिळावे यासाठी आहार, आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर करता येतो, बरोबरीने मनापासून व विषय समजून घेऊन अभ्यास करणे, यथायोग्य सराव करणे, नवीन गोष्टी शिकणे यातून मेंदूला चालना देणेही आवश्‍यक असते. मेंदूला प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी ॐकार म्हणणे, अनुलोम-विलोम करणे, ज्योतिध्यान करणे हे उत्तम होय. तसेच ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ किंवा ‘संतुलन ब्रह्मलीन सिरप’ घेणे, शतावरी कल्प घालून दूध घेणे, ‘संतुलन अमृतशर्करा’युक्‍त पंचामृत घेणे हे उत्तम होय. पंचामृत बनवताना तूप, मध, दही व साखर किंवा ‘संतुलन अमृतशर्करा’ हे प्रत्येकी एक-एक चमचा आणि दूध चार-पाच चमचे हे सर्व एकत्र करायचे असते, रोज सकाळी असे पंचामृत घेणे उत्तम होय. रात्रभर पाण्यात भिजवलेले चार-पाच बदाम सकाळी सोलून घेऊन खाणे हेसुद्धा श्रेयस्कर.   

------------------------------------------------------------
आमची नात चार वर्षांची आहे. तिला पावसाळ्यात सकाळी उठल्यावर शिंका येतात, नाकातून कधी कधी पाणी येते, डोळे खाजतात. अधून मधून खोकलासुद्धा येतो. नात कधी कधी फार रडते. रात्री तिच्या अंगाला खूप खाज येते. बरेच डॉक्‍टर, बरेच उपचार करून पाहिले. कृपया आपण उपाय सुचवावा.
.... विद्या

उत्तर - या प्रकारच्या त्रासावर रोगप्रतिकारशक्‍ती सुधारण्यासाठी व श्वसनसंस्थेची शक्‍ती वाढण्यासही प्रयत्न करावे लागतात. फक्‍त लक्षणे कमी करण्यासाठी, रोग दबवण्यासाठी औषधे दिली तर त्यामुळे दोष आत दाबले जाऊन मग त्वचेवर रॅश, खाज वगैरे लक्षणे उद्भवू शकतात. नातीला त्रास होत असला किंवा नसला तरी नियमितपणे पाव-पाव चमचा सितोपलादी चूर्ण पाण्यातून किंवा शुद्ध मधात मिसळून देता येईल. सकाळी अर्धा चमचा ‘सॅनरोझ’ देता येईल, दिवसातून दोन वेळा ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचाही उपयोग होईल. खोकला होणार आहे असे दिसू लागले तर छाती-पाठीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेक करण्याचा उपयोग होईल. एरवीसुद्धा रोज नातीला अभ्यंग करणे चांगले. या उपायांनी तिला होणारे त्रास कमी होतील, पण कधी लक्षणे उद्‌भवली तर वैद्यांच्या सल्ल्याने ज्वरांकुश, ‘सॅन अमृत’, गुडूची घन वटी वगैरे गोळ्या घेण्याचा उपयोग होईल.   

------------------------------------------------------------

शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीतून आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती मिळते व अनेक रोगांविषयीही सखोल माहिती मिळते. मला हवेत गारवा आला की कंबरदुखी किंवा सायटिकाचा त्रास सुरू होतो, त्यानंतर भूक लागणे बंद होते, पोट साफ होत नाही, डोके दुखते. डॉक्‍टरांकडे गेले तर ते पोटात इन्फेक्‍शन झाले आहे असे सांगतात. मात्र त्यांच्या औषधांनी बरे वाटत नाही, उलट अशक्‍तपणा वाढत जातो. तपासण्या करूनही काही निष्पन्न होत नाही. कृपया आपण काही उपाय सुचवावा.... थिटे 
उत्तर -
दरवर्षी या त्रासातून जाण्याऐवजी तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे, शास्त्रशुद्ध पंचकर्म करून घेणे हे सर्वांत चांगले. पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी व त्रिदोषांचे संतुलन झाले की वाताचे त्रास, पचनाचे त्रास हे आटोक्‍यात येतील. बरोबरीने हवेत गारवा असो किंवा नसो, नियमितपणे पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. प्यायचे पाणी अगोदर उकळलेले आणि गरम असताना पिण्याचाही उपयोग होईल. आहारात नेहमी किमान चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश करण्याने वातदोष वाढण्यास प्रतिबंध होईल, तसेच पोट साफ होण्यास मदत मिळेल. शिवाय यामुळे अग्नी प्रदीप्त राहिला की पचनाचे त्रासही होणार नाहीत. याव्यतिरिक्‍त झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण घेण्याचा, दोन्ही जेवणांनंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. नियमित चालणे, वज्रासनात बसून दीर्घश्वसन करणे, अनुलोम-विलोम करणे हेसुद्धा उत्तम.

------------------------------------------------------------

माझे वय ४० वर्षे आहे. माझा घसा वारंवार लाल होऊन दुखतो, त्यानंतर ताप येतो. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करूनही उपयोग होत नाही. अँटिबायोटिक घेतले की दोन-तीन आठवडे बरे वाटते, पुन्हा त्रास सुरू होतो. कृपया यावर कायमचा उपाय सुचवावा.
.... सिद्धार्थ
उत्तर -
दोन-तीन महिन्यांसाठी रोज सकाळ-संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण पाण्यासह घेण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी च्यवनप्राश, ‘सॅनरोझ’ यांसारखे एखादे रसायन घेण्याचा फायदा होईल. प्यायचे पाणी गरम असणे, रात्री झोपताना कान व गळ्याभोवती स्कार्फ बांधणे, पंखा किंवा एसीचा सरळ झोत डोक्‍यावर येणार नाही याकडे लक्ष ठेवणे चांगले. आइस्क्रीम, शीतपेये, श्रीखंड, दही, आंबट फळे आहारातून टाळणेसुद्धा श्रेयस्कर. 

------------------------------------------------------------
‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये वेळोवेळी केलेल्या सूचना व औषधांचा आजवर मला खूप फायदा झाला आहे. गेल्या वर्षापासून मला भरभर चालताना, खोकताना, हसताना, उतारावरून जाताना लघवी होते. मला याचा खूप त्रास होतो. बाहेर जाण्याची भीती वाटते. कृपया यावर काही उपाय असल्यास सुचवावा.
- कुलकर्णी
उत्तर -
यावर नियमितपणे ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरण्याचा उत्तम गुण येताना दिसतो. याशिवाय दिवसातून दोन-तीन वेळा अगोदर ओटीपोट व खालचा भाग रिलॅक्‍स करून जणू लघवी थांबवल्याप्रमाणे त्या ठिकाणचे स्नायू आकुंचित करण्याचा व्यायाम करण्याचाही फायदा होईल. ‘अशोक-ॲलो सॅन’ या गोळ्या, तांदळाच्या धुवणासह पुष्यानुग चूर्ण, तसेच शतावरी कल्प घालून दूध घेण्यानेही त्या ठिकाणचे स्नायू दृढ होण्यास मदत मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer