प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 23 August 2019

"फॅमिली डॉक्‍टर’ मधील लेखांमधून खूप मार्गदर्शन होते. ‘प्रश्नोत्तर’ सदरातील उत्तरांनी अनेक शंकांचे निरसन होते व आरोग्य चांगले राहते.

माझा मुलगा २३ वर्षांचा आहे. त्याला प्रवासात उलटी होण्याची समस्या आहे. कार असो वा बस, त्याला उलटी होतेच आणि तो मधुमेहाचा रुग्ण असल्याने इतका अशक्‍त होतो की बसूही शकत नाही, डोळे उघडू शकत नाही. या त्रासामुळे त्याचा प्रवास जवळजवळ बंद आहे. यावर काही उपाय असल्यास कृपया सुचवावा.
...भाग्यश्री

उत्तर - अशा प्रकारे गाडी लागण्याची प्रवृत्ती नियंत्रणात आणता येऊ शकते. यासाठी प्रवासात शक्‍यतो पोट रिकामे न ठेवणे आणि प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी चहा, कॉफीसारखे कोणतेही पेय न घेणे ही काळजी घेता येते. प्रवासात अधूनमधून कोरड्या साळीच्या लाह्या चावून खाण्यानेही उलटी किंवा मळमळ वगैरे त्रास टाळता येऊ शकतात. काही दिवस रोज सकाळी कामदुधा, ''संतुलन पित्तशांती'' या गोळ्या घेण्याने पित्त आटोक्‍यात ठेवता आले तर हा त्रास कमी होऊ शकतो. मनगटाच्या खाली दोन बोटे सोडून मध्यभागी असणाऱ्या बिंदूवर हलकासा दाब दिल्यासही गाडी लागण्याचा त्रास होत नाही, असा अनुभव आहे. यासाठी बाजारात रेडीमेड ब्रेसलेटही मिळते, ते मनगटावर बांधून ठेवता येते. प्रवासात उलटी व्हायला नकोच, पण एखाद्या उलटीनंतर इतका अशक्‍तपणा येऊ नये यासाठी मूळ मधुमेहावर योग्य उपचार घ्यायला हवेत यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे चांगले.

--------------------------------------------------------

सुवर्णसिद्ध जल प्यावे, तसेच गरम पाणी प्यावे, असे आपण नेहमी सांगता. दिवसभर गरम पाणी प्यायचे असेल तर सुवर्णसिद्ध जल मायक्रोवेव्हमध्ये गरम करून प्यायल्यास चालेल का? त्याची उपयुक्‍तता कमी होणार नाही ना? कृपया मार्गदर्शन करावे.
...कुलकर्णी 

उत्तर - दिवसभर प्यायचे पाणी सुवर्णसिद्ध असणे आणि गरम असणे हे उत्तम असते, मात्र यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करणे जितके टाळता येईल तितके चांगले. आधुनिक संशोधन व विविध परीक्षणांमधूनही मायक्रोवेव्ह वापरणे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असते हे दिसून आलेले आहे. सकाळी सुवर्णसिद्ध तयार झाले की त्यातील निम्मे साध्या जगात तर निम्मे चांगल्या प्रतीच्या थर्मासमध्ये भरून ठेवता येते. जेव्हा गरम पाणी प्यायचे असेल तेव्हा या दोन्ही पाण्याचे मिश्रण करून योग्य तापमानाचे पाणी पिता येते. सध्या २४ तास पाणी चांगले गरम राहील असे थर्मास सहज उपलब्ध असतात.

--------------------------------------------------------

मी  ''फॅमिली डॉक्‍टर''चे बरेचसे अंक संग्रही ठेवले आहेत. मला यातील औषधांचा खूप फायदा होतो. माझा प्रश्न असा आहे की, माझा कान फार खाजतो. डॉक्‍टरांनी दिलेले ड्रॉप्स घातले की दोन दिवस बरे वाटते. पण नंतर पुन्हा खाज सुटते. यावर काही उपाय सुचवावा.
...बहिरट

उत्तर - कानात खाज येत असता किंवा कानातून पाणी, पू वगैरे येत असता धूप घेण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. यासाठी गोवरी किंवा कोळशाचा निखारा तयार करून त्यावर वावडिंग, ओवा, हळद वैगेरेचे एक-दोन चिमूट चूर्ण किंवा तयार ''संतुलन टेंडरनेस धूप'' टाकून आलेला धूप कागदाच्या पुंगळीच्या साहाय्याने कानापर्यंत पोचवून कान धुपवता येतो.

--------------------------------------------------------

माझे बाळ सात महिन्यांचे आहे. मी त्याला अजून गाईचे दूध दिलेले नाही. ते द्यायला हवे का? आणि हे दूध पाश्चराईझ केलेले असले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे.
...नाखरे

उत्तर - सहाव्या महिन्यांत अन्न प्राशन संस्कार झाल्यानंतर बाळाला गाईचे शुद्ध दूध देण्यास सुरुवात करायची असते. बाळाच्या परिपूर्ण पोषणासाठी ते आवश्‍यक असते. दूध पाश्चराईझ केलेले असले तर ते चालते, मात्र मुळातील दूध संकरित गाईचे नाही ना याची खात्री असावी. भारतीय वंशाच्या गाईचे दूध (सध्या ए 2 या नावाने बऱ्याच ठिकाणी उपलब्ध) त्यात वावडिंग, सुंठ टाकून उकळून व गाळून घेतले, नंतर त्यात ''संतुलन चैतन्य कल्प'' मिसळून बाळाला दिले तर पचायला सोपे जाते, शिवाय विकासालाही हातभार लावणारे ठरते. 

--------------------------------------------------------

मी ''फॅमिली डॉक्‍टर'' पुरवणी नेहमी वाचते. मला दम्याचा त्रास होता. सध्या ''संतुलन''चे सितोपलादी चूर्ण व ब्रॉंकोसॅन सिरप घेते आहे, त्यामुळे खोकला येत नाही. चालताना थोडा दम लागतो. ही दोन्ही औषधे कायम घेतली तर चालेल का? याशिवाय अजून काही उपाय असल्यास सुचवावा.
.... उषा

उत्तर - ''संतुलन''चे ''सितोपलादी चूर्ण'' सर्व उत्तम प्रतीच्या आणि शुद्ध घटकद्रव्यांपासून बनविलेले असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण नियमितपणे घेऊ शकतात. ''ब्रॉंकोसॅन सिरप'' ही नियमित घेण्यास योग्य असते. याच्या बरोबरीने रात्री झोपण्यापूर्वी छाती-पोटाला ''संतुलन अभ्यंग सिद्ध तेल'' लावणे, पावसाळ्यात किंवा ज्या ऋतूत त्रासाची प्रवृत्ती आहे त्या दिवसात छातीला अगोदर तेल लावून नंतर वरून रुईच्या पानांनी शेक करणे याचाही उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने काही दिवस श्वासकुठार, ''प्राणसॅन योग'' ही औषधे घेण्याचाही उपयोग होईल. तहान लागल्यावर गरम पाणी पिणे हेसुद्धा उत्तम.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer