esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाने आमच्या कुटुंबातील सर्वांना खूप फायदा झालेला आहे. माझ्या मुलाचे वय ३५ वर्षे आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी त्याला विषमज्वर झाला होता. त्या वेळी ॲलोपॅथिक औषधांनी ताप आटोक्‍यात आला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी कावीळ झाली होती, त्यानंतर सहा महिन्यांनी गोवर झाला होता. यावर ॲलोपॅथिक तसेच आयुर्वेदिक औषधे घेतली होती, पथ्यही सांभाळले होते. सध्या त्याला आजार असा नाही, पण या दरम्यान त्याचे केस फार गळाले, पुढच्या बाजूने जवळजवळ टक्कल पडले. बाकी त्याला व्यसन वगैरे काही नाही. कृपया केसांसाठी काही उपाय सुचवावा.
- गणेश नातू

उत्तर - प्रथम विषमज्वर, त्यानंतर कावीळ व गोवर असे शरीरात उष्णता वाढवणारे त्रास एका मागोमाग एक झाल्याने त्याचा परिणाम केसांवर झालेला आहे. आत्ताही फक्‍त केसांसाठी म्हणून नव्हे, तर एकंदर शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी काळजी घ्यायला हवी, जेणेकरून भविष्यात या प्रकारचा किंवा उष्णतेशी संबंधित इतर कोणताही आजार होणार नाही. बऱ्याच वर्षांपासून शरीरात साठून राहिलेली उष्णता कमी करण्यासाठी शास्त्रशुद्ध विरेचन करून घेणे सर्वोत्तम होय. तत्पूर्वी सकाळ- संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती’ तसेच ‘समसॅन’ गोळ्या घेणे चांगले. आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करणे चांगले. दुधातून अनंत कल्प घेणे, प्यायचे पाणी ‘जलसंतुलन’ या मिश्रणासह उकळून घेणे हेसुद्धा चांगले. केसांसाठी ‘हेअरसॅन’ गोळ्या घेण्याचा, तसेच ‘संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल’ लावण्याचाही फायदा होईल.


पंचामृत फक्‍त सकाळी नाश्‍त्याच्या आधीच घ्यायचे असते, की दिवसा कधीही घेतले तरी चालते? मी नुकतीच रक्‍ताची तपासणी करून घेतली; पण त्यात हिमोग्लोबिन थोडे कमी निघाले. तसेच, व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता असल्याचे समजले. तरी यावर काय उपाय करावा, आहार कसा घ्यावा, हे सांगावे.  
- आनंद करंदीकर


उत्तर - पंचामृत सकाळी नाश्‍त्याच्या आधी घेणे सर्वांत चांगले असते; मात्र एखाद्या दिवशी सकाळी पंचामृत घेता आले नाही, तर ते संध्याकाळी घ्यायला हरकत नसते. हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आहारात काळ्या मनुका, अंजीर, डाळिंबाचे दाणे, केशर, पालक वगैरे द्रव्यांचा अंतर्भाव करता येईल. पंचामृत तयार करताना त्यात साध्या साखरेऐवजी केशर व सुवर्णयुक्‍त ‘संतुलन अमृतशतकरा’ मिसळल्यानेही हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. मात्र, ‘डी’ व्हिटॅमिन आहार किंवा औषधातून मिळण्याचे प्रमाण फार कमी असते, कारण ‘डी’ व्हिटॅमिन सूर्यप्रकाशाच्या मदतीने शरीरात तयार होणे आवश्‍यक असते. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात सकाळच्या कोवळ्या उन्हात पाच- दहा मिनिटे बसणे पुरेसे ठरते. अगोदर तेल लावून उन्हात बसता आले तर ते अधिकच श्रेयस्कर असते. रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात दहा- बारा सूर्यनमस्कार करणे, दूध, घरी बनविलेले साजूक तूप यांचा आहारात समावेश असणे, तसेच ‘सॅनरोझ’, च्यवनप्राशसारखे रसायन नियमित घेणे हेसुद्धा शरीरातील जीवनसत्त्वे, लोहतत्त्व, हिमोग्लोबिन व एकंदर ताकद, स्फूर्ती कायम ठेवण्यास मदत करणारे असते.

माझे वय ४८ असून मला मोठा असा कोणताही आजार नाही. फक्‍त गर्भाशय खाली आल्याचे समजल्याने चार वर्षांपूर्वी छोटेसे ऑपरेशन करून पिशवी वर ओढून घेतलेली आहे. खाण्यात वातूळ पदार्थ आले तर मला ओटीपोटात दुखते. तरी कृपया गर्भाशयाची, ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद वाढण्यासाठी औषधे आणि व्यायाम सांगावेत.   
- उज्ज्वला दीक्षित


उत्तर -  गर्भाशयाची, तसेच गर्भाशय सुस्थितीत ठेवणाऱ्या स्नायूंची ताकद टिकविण्यासाठी, तसेच सुधारण्यासाठी ‘संतुलन फेमिसॅन तेला’चा पिचू नियमित वापरणे हा उत्तम उपाय होय. बरोबरीने अशोकारिष्ट, ‘अशोक- ॲलो सॅन’ गोळ्या घेण्याचा, तसेच आठवड्यातून एकदा बसायच्या टबमध्ये धायटीच्या फुलांचा काढा घेऊन त्यात ओटीपोटाचा भाग बुडेल अशा पद्धतीने पंधरा-वीस मिनिटे बसण्याचा उपयोग होईल. नियमित सूर्यनमस्कार, पश्‍चिमोत्तानासन, तसेच फुलपाखरू ही योगासने करणे, दिवसातून दोन- तीन वेळा पेलव्हिक फ्लोअरचे स्नायू आकुंचित करून पुन्हा शिथिल करणे हा व्यायाम करण्याचाही फायदा होईल.

माझे वय ३७ वर्षे असून माझा चेहरा नितळ आणि गौरवर्णीय आहे. मी कुठल्याही प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरत नाही, तरीही अलीकडे माझ्या गालावर व नाकावर वांगाचे छोटे डाग उठू लागले आहेत. गोऱ्या रंगामुळे ते अधिक उठून दिसतात. हे डाग जाण्यासाठी काय उपाय करावेत, हे कृपया सांगावे.  
- गौरी

उत्तर - चेहऱ्यावर वांगाचे डाग येणे, हे सहसा स्त्री असंतुलनाशी संबंधित लक्षण असते. यादृष्टीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी, शतावरी कल्प घालून दूध घेणे यासारखे उपचार करण्याचा उपयोग होईल. बरोबरीने नियमित नस्य करणे, पित्त- वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाचा गंडुष करणे, चेहऱ्याला रक्‍तशुद्धीकर द्रव्यांनी संस्कारित तेलाचा अभ्यंग करणे हेसुद्धा उपाय करता येतील. नस्यासाठी घरी बनविलेले साजूक तूप किंवा ‘नस्यसॅन घृत’ वापरता येईल, ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष करता येईल. चेहऱ्याला रात्री झोपण्यापूर्वी ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेला’सारखे तेल हलक्‍या हाताने लावून जिरविण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला चंदन, रक्‍तचंदन, हळकुंड, डाळिंबाची वाळलेली साल, दालचिनी यापैकी उपलब्ध होतील ती द्रव्ये उगाळून तयार केलेला लेप आठ- दहा मिनिटांसाठी लावून नंतर धुऊन टाकण्याचाही उपयोग होईल. प्रखर उन्हात जाणे टाळणेसुद्धा श्रेयस्कर.

loading image
go to top