प्रश्नोत्तरे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 August 2017

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.

सुवर्णसिद्ध जल व सुवर्णप्राशन याविषयी  ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये जे काही वेळोवेळी लिहिले आहे त्यावर काही लोकांना शंका उत्पन्न झाली व त्यात मुख्य शंका अशी, की सध्या शुद्ध सोने मिळते का? 
उत्तर -
 बाजारात ९९.९९ टक्के प्रतीचे किंवा ९९.९९९ टक्के प्रतीचे सुवर्ण विकत मिळू शकते. म्हणजे एका ग्रॅममध्ये एक शतांश किंवा एक हजारांश भाग इतर धातू असू शकतात. सध्या भेसळीचा जमाना असल्यामुळे कुठल्या धातूची भेसळ केलेली असते याची कल्पना नाही. भस्म करताना सुवर्णाची पूर्ण शुद्धी होते. पाण्यात टाकलेले सुवर्ण सोन्यातील इतर धातूंचा वाईट संस्कार दूर करण्यास सक्षम असावे. ज्याअर्थी आयुर्वेदशास्त्राने सुवर्णाच्या भांड्यात गरम पाणी प्यायला द्यावे, असे म्हटलेले आहे, त्याअर्थी जे काही सोने त्या काळी किंवा सध्या उपलब्ध असेल त्यातून पाणी प्यायला दिले तर सुवर्णातील अतिसूक्ष्म प्रमाणात असलेले धातू कुठल्याही प्रकारचे नुकसान करत असावेत असे वाटत नाही व तसा अनुभवही नाही. शरीरातील रक्‍तात जड धातूंचे (हेवी मेटल्सचे) प्रमाण वाढले तर त्यावर सुवर्णाचा उपाय सांगितला आहे. सुवर्णाचे वळे, वेढणे या गोष्टी शुद्ध सोन्याच्या केलेल्या असतात. स्त्रियांच्या हातातील बांगड्या वा इतर दागिने यांना काठिण्य देण्यासाठी त्यात इतर धातू मिसळून हे दागिने २२ कॅरट, १८ कॅरट सोन्यापासून केलेले असतात. सोने हा काही सर्वसामान्य माणसाचा व्यवसाय नव्हे. सोनाराकडून विश्वासाने आणलेले सोने व त्याने दिलेली माहिती हाच आधार घ्यावा लागतो. 

सुवर्णाच्या भांड्यात ठेवलेले गरम पाणी हे आरोग्य टिकविण्यासाठी वापरावे असे सांगितलेले आहे. पण सध्या सुवर्णाची भांडी वापरणे शक्‍य नसल्याने पाण्यावर सुवर्णाचा संस्कार करावा याला वृद्धवैद्याधार किंवा अनुभवजन्य आधार असे समजायला हरकत नसावी. 

सध्या आयुर्वेदात सुवर्णयुक्‍त औषधे असतात व ती महाग असतात. तसेच इतर पॅथीतील काही औषधे पण अतिशय महागडी असू शकतात. एखादे औषध बनविण्यासाठी किती खर्च आला, किती उच्च प्रतीची घटकद्रव्ये वापरली व त्याची गुणवत्ता काय ठेवण्यात आली त्यावर त्या औषधाची किंमत ठरत असते. सर्वच महाग गोष्टींच्या वा वस्तूंच्या बाबतीत फसवणूक केलेली आहे अशा प्रकारे पूर्वग्रहदूषित विचार झाला तर कुठलीच वस्तू कधीच घेता येणार नाही. मुख्य म्हणजे औषधाच्या बाबतीत रोग्याला बरे वाटणे हे अधिक महत्त्वाचे असते.  

सुवर्ण सहाणेवर उगाळून सुवर्णाचे सूक्ष्म कण जन्मतः बालकाला चाटवावे, असे मार्गदर्शन काश्‍यपसंहितेत केलेले आढळते. यावरूनच पुढेही इतर द्रव्यांबरोबर मिसळून सुवर्णाचा वर्ख वापरण्याची योजना आयुर्वेदात केलेली आहे. ग्रंथाधार किंवा वृद्धवैद्याधार याबरोबरच या गोष्टी परंपरेनेही चालत आलेल्या आहेत. सोन्याचे भांडे वापरणे शक्‍य नसल्यास चांदीचे, तांब्याचे किंवा स्फटिकाचे भांडे घ्यावे, असेही मार्गदर्शन आयुर्वेदात केलेले आहे. 

पाण्यावर संस्कार झालेला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रयोग करता येतो. अनेक वैज्ञानिक यावर संशोधन करताना दिसतात. माझा स्वतःचा प्रयोगांती असा अनुभव आहे की पाण्यावर सोन्याचा संस्कार होतो, एवढेच नव्हे तर पाण्यावर आजूबाजूच्या वातावरणाचाही परिणाम होतो. सुवर्णसिद्ध जल प्राशनाचा आरोग्यासाठी उपयोग होतो. 

सुवर्णसिद्ध जल करताना सोन्याची घट होत नसल्यामुळे ‘सुवर्णसिद्ध जल प्राशन’ हा अतिशय कमी खर्चात घरच्या घरी करण्यासारखा उपाय सुचविलेला आहे. पाणी उकळून प्यावे व सुवर्णसिद्ध जल प्यावे किंवा बालकाला सुवर्णप्राशन करवावे, याचा अवलंब करणाऱ्यांचा गैरसमज व अविश्वास उत्पन्न होऊ नये म्हणून या उत्तराद्वारा खुलासा केलेला आहे.

----------------------------------------------------------------

माझ्या आईला २०१० मध्ये चिकुनगुनिया झाला होता. तेव्हा डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले होते व ती बरी झाली होती. पण २०१५ पासून तिचे गुडघे पुन्हा सुजले आहेत. एक्‍स-रेमध्ये गुडघ्याच्या हाडांची झीज झाल्याचे समजले आहे. तरी यावर उपाय सुचवावा. गुडघ्याला तेल लावावे का? 
..... शिवदास पांचाल
उत्तर -
 गुडघ्यांना तेल लावणे उत्तम होय. वातनाशक आणि हाडांना तसेच सांध्यांना पोषक द्रव्यांनी संस्कारित केलेले ‘संतुलन शांती सिद्ध तेला’सारखे तेल गुडघ्यांना लावण्याचा चांगला उपयोग होईल. बरोबरीने तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ व ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेण्याचा, तसेच दशमूलारिष्ट, रास्नादी काढा घेण्याचाही उपयोग होईल. वाताचे संतुलन व्हावे आणि सांधे-हाडांना शक्‍ती मिळावी यासाठी आहारात घरी बनविलेले साजूक तूप, खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, नाचणी सत्त्व वगैरे गोष्टींचा समावेश असणे श्रेयस्कर. चिकन गुनियामुळे बिघडलेल्या वातदोषाचे मुळापासून संतुलन होण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती घेणे, जानुबस्ती घेणे सुद्धा उत्तम होय. 

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer