प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 8 September 2017

मला दहा-बारा वर्षांपासून मधुमेह आहे, तसेच तपासणी केली असता किडनीची कार्यक्षमता घटल्याचेही निदान झाले आहे. मी सध्या गोमूत्र अर्क घेतो आहे. इतर औषधोपचार व आहारासंबंधी मार्गदर्शन करावे.
... माईणकर, कोल्हापूर

मला दहा-बारा वर्षांपासून मधुमेह आहे, तसेच तपासणी केली असता किडनीची कार्यक्षमता घटल्याचेही निदान झाले आहे. मी सध्या गोमूत्र अर्क घेतो आहे. इतर औषधोपचार व आहारासंबंधी मार्गदर्शन करावे.
... माईणकर, कोल्हापूर

उत्तर - मधुमेहामध्ये कालांतराने मूत्रपिंडावर दुष्परिणाम होणे हे सहसा घडतेच. म्हणून मधुमेहामुळे इतर समस्या उद्भवू नयेत, याकरिता सुरवातीपासूनच उपचार करायचे असतात. यात प्रकृतीनुरूप औषधांच्या बरोबरीने पंचकर्म करणे उत्तम गुणकारी असते. अजूनही वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहन-स्वेदन करून विरेचन, बस्ती, कटीबस्ती घेणे चांगले. बरोबरीने पुनर्नवासव, ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, गोक्षुरादी गुग्गुळ घेण्याचा उपयोग होईल. गोमूत्र अर्क घेण्यापेक्षा ताजे गोमूत्र उपलब्ध झाल्यास ते सात वेळा सुती कापडातून गाळून घेऊन, त्यात समभाग पाणी मिसळून सकाळ-संध्याकाळ घेण्याचा अधिक फायदा होईल. ताजे गोमूत्र न मिळाल्यास एखाद्या दिवशी अर्क घ्यायला हरकत नाही. पथ्यामध्ये २० मिनिटे उकळून घेतलेले पाणी, साळीच्या लाह्या, तांदूळ, मूग, ज्वारी, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, ताजे गोड ताक यांचा समावेश होतो. स्वयंपाक करण्यासाठी तेलाऐवजी तूप वापरणे, साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरणे चांगले.

माझे वय २४ वर्षे आहे. माझी अंगकाठी बारीक आहे, मला पित्ताचाही त्रास होतो. मुख्य म्हणजे थोडेही जास्ती काम केले की लगेच थकवा जाणवतो, चक्कर येते. मला जास्त चहा पिण्याची सवय आहे. कृपया मार्गदर्शन करावे

.... रचना 
 उत्तर -
पित्ताचा त्रास असला किंवा शरीरात कडकी, उष्णता अधिक असली तर वजन न वाढणे, थोड्याही श्रमाने थकवा जाणवणे, चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे सर्वप्रथम उष्णता कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी रोज सकाळी चमचाभर गुलकंद किंवा ‘संतुलन धात्री रसायन’ खाणे, दुधाबरोबर शतावरी कल्प घेणे, सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेणे, आहारात रोज किमान चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश करणे, आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणे यासारखे उपाय योजण्याचा फायदा होईल. दिवसातून दोन वेळा चहा प्यायला हरकत नाही, फक्‍त तो कडक नसावा, तर आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेला असावा. यासाठी कपभर पाण्यात थोडा गवती चहा, किसलेले आले, चवीप्रमाणे साखर टाकून गॅसवर ठेवावे. उकळी फुटली की त्यात अर्धा चमचा चहा पत्ती टाकून पातेल्यावर झाकण ठेवून गॅस बंद करावा. साधारण एक मिनिटाने गाळून घेऊन त्यात दूध टाकून प्यावा. असा चहा पिण्याने सहसा पित्त वाढत नाही, मात्र तरतरी येते. 

मला एक महिन्यापासून कानातून पाणी येते आहे. कान गच्च झाल्यासारखा वाटतो. कानाच्या पडद्याला छिद्र पडले आहे असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या तर सहन होत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे.
.... लता 

उत्तर - यावर कर्णधूपन म्हणजे कानाला धुरी देण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो. शेणाची गवरी किंवा कोळसा पेटवून निर्धूम निखारा तयार झाला की त्यावर वाडडिंग, गुग्गुळ, कडुनिंबाची पाने किंवा तयार ‘संतुलन प्युरिफायर धूप’ किंवा ‘संतुलन सुरक्षा धूप’ टाकून आलेला धूर कानावर घेण्याने क्रमाक्रमाने कानातून पाणी येणे, कान गच्च होणे कमी होईल. बरोबरीने सितोपलादी चूर्ण घेणे, वैद्यांच्या सल्ल्याने ज्वरांकुश, श्वासकुठार गोळ्या घेण्याचाही फायदा होईल. डोक्‍याला गार वारे लागणार नाही, तसेच पंखा, एसीची झोत सरळ अंगावर येणार नाही यासाठी काळजी घेणेही आवश्‍यक होय.  

माझी अक्कलदाढ तिरकी आली आहे आणि किडली आहे, त्यामुळे बाकीच्याही दाढा किडत आहेत. मला याचा खूप त्रास होतो. कृपया मार्गदर्शन करावे.
...धनश्री कुलकर्णी

उत्तर - या प्रकारच्या त्रासावर दंतवैद्याकडून आवश्‍यक ते उपचार करून घेणेच श्रेयस्कर असते. इतर दाढा किडू नयेत यासाठीही हे उपचार लवकरात लवकर करणेही आवश्‍यक होय. बरोबरीने कीड पसरू नये, इतर दातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ‘संतुलन योगदंती चूर्ण’ आणि ‘संतुलन सुमुख तेल’ नियमित वापरण्याचा उपयोग होईल. सदर चूर्ण दात घासण्यासाठी वापरता येते किंवा नेहमीप्रमाणे ब्रश केल्यावर हिरड्या-दातांवर थोड्या वेळासाठी लावून ठेवले तरी चालते. अर्धा-पाऊण चमचा ‘संतुलन सुमुख तेल’ तोंडात आठ-दहा मिनिटांसाठी धरून ठेवण्याने दातांचे, एकंदर मुखाचे आरोग्य चांगले राहायला मदत मिळते. दात मुळात अशक्‍त असले तर ते किडण्याची प्रवृत्ती असते. तेव्हा आहारात दूध, खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, मॅरोसॅन, प्रवाळपंचामृत गोळ्या, ‘कॅल्सिसॅन गोळ्या’ घेणेही चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer