प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

 रक्‍तदाब तपासला असता तो कमी म्हणजे ९०-६० असा असतो. डॉक्‍टरांनी मला जास्त मीठ खायला सांगितले आहे. पण, यामुळे मूतखडा किंवा इतर आरोग्यावर दुष्परिणाम होतील का? माझे वजनही खूप कमी आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
.... आनंद करंदीकर 
उत्तर -
वजन खूप कमी असणे, बरोबरीने अशक्‍तपणा असला, तर त्यामुळे रक्‍तदाब कमी असू शकतो. मात्र, रक्‍तदाब कमी असला आणि त्यामुळे त्रास होत नसला उदा. चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे वगैरे, तर त्याची चिंता करायची आवश्‍यकता नसते. मीठ हे अन्नाला चव येण्यासाठी आवश्‍यक असते; पण जास्त प्रमाणात मीठ खाणे सोपे नाही. शिवाय, मिठाच्या अतियोगाने इतर अनेक शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मिठाचे प्रमाण वाढविण्याऐवजी रोज सकाळ- संध्याकाळ आल्याचा रस व मध हे चाटण घेण्याचा, दिवसातून एकदा गरम पाणी, आले आणि साखर यांचा चहा घेण्याचा उपयोग होईल. वजन कमी कशामुळे आहे हे शोधून काढले तर नेमके उपचार करणे सोपे होईल. तत्पूर्वी रोज रात्री संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे, नियमित चालायला जाणे, पचन व्यवस्थित होते आहे याकडे लक्ष ठेवणे व रोज सकाळी पंचामृत, बदाम, डिंकाचा लाडू घेणे याचा उपयोग होईल. या सर्व उपायांनी वजन कमी असल्यास ते आवश्‍यक तेवढे वाढण्यास मदत मिळते; परंतु वजन सर्वसाधारण किंवा  जास्त असले, तर ते वाढत नाही. 

------------------------------------------------------------------

च्यवनप्राश नेहमी घेतला तर चालतो का, असा प्रश्न मी तीन वर्षांपूर्वी आपल्याला विचारला होता. आपण त्याचे उत्तर ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून दिले होते. तेव्हापासून मी रोज संतुलनचा च्यवनप्राश घेतो, मला त्याचा फायदा झाला आहे. या च्यवनप्राशची चवही छान आहे. च्यवनप्राश दुधाबरोबर घेतला तर चालतो का? मी ‘फॅमिली डॉक्‍टर’चे अनेक अंक जपून ठेवले आहेत. ज्या खेडेगावांत चांगले मार्गदर्शन मिळत नाही, अशा बऱ्याच ठिकाणी मी हे अंक पाठवत असतो. नस्यसॅन घृताचे थेंब नाकात टाकले की झोप चांगली लागते हासुद्धा माझा अनुभव आहे. आपल्या कार्यासाठी शुभेच्छा.
.... नारेकर  

उत्तर - आपल्या शुभेच्छांबद्दल आणि आरोग्यज्ञानाचा प्रसार केल्याबद्दल धन्यवाद. च्यवनप्राश हा आवळा व इतर अनेक द्रव्यांपासून बनविलेला असतो, त्यामुळे तो चवीला थोडा आंबट असतो. शिवाय, च्यवनप्राश हे रसायन असल्याने ते सकाळी रिकाम्या पोटी घेणे चांगले असते. तेव्हा उठल्यावर ताजेतवाने झाल्यावर चमचाभर च्यवनप्राश घेणे, नंतर थोडा वेळ चालणे; प्राणायाम, योगासने यांना वेळ देणे व नंतर म्हणजे साधारण अर्धा- पाऊण तासानंतर दूध पिणे चांगले होय. च्यवनप्राश, नस्य, नियमित अभ्यंग वगैरे नियमित करण्याने आरोग्य रक्षण होण्यास उत्तम मदत मिळते. 

------------------------------------------------------------------

माझे वय ३६ वर्षे आहे. गेल्या पाच वर्षांपासून मला पित्ताची गोळी आणि पोट साफ होण्याचे चूर्ण घ्यावेच लागते. एकही दिवस चुकला तर ॲसिडिटी आणि मलावरोधाचा त्रास होतो. माझी परिस्थिती फार सामान्य आहे. सकाळ- संध्याकाळ खानावळीचा डबा आणि इतर वेळेला चहा- बिस्कीट घेत असतो. ही औषधे घ्यायला लागू नयेत यासाठी काही साधा उपाय सुचवा.
.... दिनेश 
उत्तर -
चहा कडक असला तर त्यामुळे, तसेच बिस्किटांमुळे पोटात उष्णता, कोरडेपणा उत्पन्न होऊ शकतो. त्याऐवजी साळीच्या लाह्या घेण्याचा उपयोग होईल. अधेमधेसुद्धा साळीच्या लाह्या किंवा राजगिऱ्याच्या लाह्या- चिक्की खाण्याने पित्ताचा त्रास कमी होईल व क्रमाक्रमाने गोळीची गरज कमी होईल. रात्री झोपण्यापूर्वी काही दिवस कोमट पाण्याबरोबर अर्धा चमचा इसबगोल घेण्याने पोट साफ होण्यास मदत मिळेल. बाहेरचा डबा घेण्यास पर्याय नसला, तरी रात्रीच्या जेवणात भातावर भर देण्याने पोटाला मऊपणा येऊन पोट साफ होण्यास व उष्णता कमी होण्यास मदत मिळेल. 
------------------------------------------------------------------

माझी नात सात वर्षांची आहे. तिचे पोट सारखे दुखत असते. मी तिला सध्या वावडिंग भिजवलेले पाणी प्यायला देते आहे. वावडिंगाचे प्रमाण काय असावे? तिचे पोट साफ होते; पण दुखत राहते. साळीच्या लाह्या नुसत्या खाल्ल्या तर चालतील का?
.... उषा बहिरट
उत्तर -
लहान मुलांच्या बाबतीत पोट दुखण्याचे कारण हे सहसा पोटात जंत असणे हे असते. नात सात वर्षांची आहे, तेव्हा तिला वावडिंग भिजवलेले पाणी पुरेसे पडणार नाही. त्याऐवजी तिला पंधरा दिवसांसाठी रोज सकाळी पाव चमचा वावडिंगाचे चूर्ण आणि अर्धा चमचा मध हे मिश्रण देण्याचा उपयोग होईल. जेवणानंतर थोडेसे तीळ- ओव्याचे मिश्रण खाण्याचाही उपयोग होईल. पोट दुखेल तेव्हा, शिवाय स्नानानंतर रोजच पोटावर ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ हलक्‍या हाताने जिरवण्यानेही बरे वाटेल. साळीच्या लाह्या कोरड्या व नुसत्या खाल्ल्या तरी चालतात. या उपायांनी बरे वाटेलच, अन्यथा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com