प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 13 October 2017

माझ्या टाचेचे हाड वाढलेले आहे असे एक्‍स-रेमध्ये दिसून आले आहे. यामुळे चालताना टाच थोडी थोडी दुखत राहते. विशेषतः थोडा वेळ बसून मग चालले तर जास्त वेदना होतात. हा त्रास कायमचा बरा व्हावा यासाठी औषध सुचवावे.... दत्तात्रेय खरे  

माझ्या टाचेचे हाड वाढलेले आहे असे एक्‍स-रेमध्ये दिसून आले आहे. यामुळे चालताना टाच थोडी थोडी दुखत राहते. विशेषतः थोडा वेळ बसून मग चालले तर जास्त वेदना होतात. हा त्रास कायमचा बरा व्हावा यासाठी औषध सुचवावे.... दत्तात्रेय खरे  
उत्तर - टाचेचे हाड वाढणे हा एक प्रकारचा वाताचा रोग समजला जातो, त्यामुळे यावर दिवसातून दोन-तीन वेळा ‘संतुलन शांती सिद्ध तेला’सारखे वातशामक तेल टाचेवर जिरविण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन वेळा अगोदर तेल लावून, वरून वाळूच्या पुरचुंडीचा शेक करण्याचाही उपयोग होईल. वातदोषाला संतुलित करण्यासाठी काही दिवस सिंहनाद गुग्गुळ, ‘संतुलन वातबल‘, ‘कॅल्सिसॅन’ यासारख्या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वांगे, वाटाणा, चवळी, वाल, चणे वगैरे वातूळ पदार्थ आहारातून वर्ज्य करणे सुद्धा श्रेयस्कर होय. 

-------------------------------------------------------------

मला दोन महिन्यांपासून भूक लागते, पण जेवण जात नाही. तोंडाला कोरड पडते आणि तोंडाला चव नाही. यामुळे मला अशक्‍तपणा आला आहे. कृपया यावर उपाय सुचवावा. 
... वैरागकर, सोलापूर
उत्तर -
काही दिवस रोज रिकाम्या पोटी सकाळी चमचाभर ताजा कोरफडीचा गर, तुपावर हलकेच परतून घेऊन चिमूटभर हळद टाकून घेण्याचा उपयोग होईल. तोंडाचा कोरडेपणा कमी होण्यासाठी मुखशुद्धीनंतर तेलाचा गंडुष करणेही चांगले. यासाठी अर्धा-एक चमचा ‘संतुलन सुमुख तेल’ आणि पाच-सहा चमचे पाणी यांचे मिश्रण तोंडात आठ-दहा मिनिटांसाठी धरून ठेवता येते. जेवणाच्या सुरुवातीला आले-लिंबाचा रस-मध यांचे मिश्रण घेण्याचा किंवा आल्याचा छोटा तुकडा सैंधव मीठ लावून चावून खाण्याचाही उपयोग होईल. नुसती भाजी-पोळी किंवा भाजी-भाकरी असे कोरडे अन्न न खाता, पोळी-भाकरी-पातळ भाजी-आमटी यांचा काला, आमटी-भात, कढी-भात, सूप अशा स्वरूपाचे अन्न योजणे आवश्‍यक. काहीही खाण्यापूर्वी त्यावर घरचे साजूक तूप घेणे हे सुद्धा श्रेयस्कर. तोंडाला चव येण्यासाठी आल्याचा चहा म्हणजे कपभर पाण्यात आले-साखर टाकून उकळणे, गाळून घेतल्यावर त्यात दोन-तीन थेंब लिंबाचा रस आणि चिमूटभर काळी मिरी पूड मिसळून घोट घोट घेणे सुद्धा घेता येतो.

-------------------------------------------------------------

माझे वय ४० वर्षे आहे. सहा महिन्यांपासून माझ्या दोन्ही हाताची बोटे काळी-निळी पडतात व खूप दुखू लागतात. बोटे मिटताना उघडताना खूप त्रास होतो. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे चालू आहेत, पण त्यामुळे तात्पुरते बरे वाटते. कृपया आपण मार्गदर्शन करावे.
... रेखा पाटील  
उत्तर -
डॉक्‍टरांनी केलेल्या निदानाचा किंवा तपासण्याचा आपल्या प्रश्नात उल्लेख नाही. परंतु हाताची बोटे काळी-निळी पडणे हे रक्‍ताचे, चेतावह संस्थेचे अभिसरण कमी होत असल्याचे निदर्शक लक्षण आहे. यावर पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ आणि हातांना ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ नियमितपणे लावण्याचा उपयोग होईल. ‘संतुलन वातबल गोळ्या’, तूप-साखरेबरोबर ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ तसेच सॅनरोझ घेण्याचाही उपयोग होईल. मात्र यावर निश्चित निदान करून योग्य औषधे सुरू करणे आवश्‍यक होय. यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर होय.  

-------------------------------------------------------------

मी माझ्या पाच वर्षांच्या मुलाला गेल्या चार महिन्यांपासून सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन’चे च्यवनप्राश देते आहे. च्यवनप्राशमुळे त्याचे पित्त वाढेल अशी मला भीती वाटते. कृपया मार्गदर्शन करावे. तो तब्येतीने अशक्‍त आहे, तसेच जेवतोही फार कमी. यावरही उपाय सुचवावा.  .... देशमुख  
उत्तर -
च्यवनप्राश हे आयुर्वेदातील असे सिद्ध रसायन आहे की, त्यात वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना संतुलित करणारी, तसेच रक्‍त शुद्ध करणारी द्रव्ये आहेत. त्यामुळे च्यवनप्राश सर्व प्रकृतीच्या व्यक्‍तींना, तसेच सर्व ऋतुमानात सेवन करता येतो. लहान मुलांनाही देता येतो. संतुलनचा च्यवनप्राश ताज्या आवळ्यांपासून व पाठाप्रमाणे सर्व संस्कार करून बनविलेला असतो, सर्व द्रव्ये उत्तम प्रतीची खात्री असलेलीच वापरलेली असतात. शिवाय तो अतिशय रुचकर असल्याने लहान मुलांनाही आवडतो. सध्याची व्यस्त जीवनशैली, वाढता मानसिक ताण आणि प्रदूषणामुळे कमी होत चाललेली प्रतिकारशक्‍ती विचारात घेता, असा शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश प्रत्येकासाठीच उत्तम होय. मुलाची तब्येत अशक्‍त आहे, त्यासाठी च्यवनप्राश घेण्याचा उपयोग होईलच, बरोबरीने त्याला नियमित अभ्यंग करणे चांगले होय. अधून मधून जंत पडून जायचे औषध देण्याने, तसेच काही दिवस नियमितपणे विडंगारिष्ट व ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याने भूक लागण्यास, पचन सुधारण्यास आणि अन्न अंगी लागण्यास मदत मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer