प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 27 October 2017

माझे वय २८ वर्षे आहे. माझे पोट व्यवस्थित साफ होत नाही. शौचाला होण्यासाठी फार वेळ लागतो आणि चिकटपणाही असतो. बस्ती घेऊन पाहिली, औषधे घेऊन झाली; पण फरक पडत नाही. कृपया उपाय सुचवावा?
- सत्यजित  

माझे वय २८ वर्षे आहे. माझे पोट व्यवस्थित साफ होत नाही. शौचाला होण्यासाठी फार वेळ लागतो आणि चिकटपणाही असतो. बस्ती घेऊन पाहिली, औषधे घेऊन झाली; पण फरक पडत नाही. कृपया उपाय सुचवावा?
- सत्यजित  
उत्तर -
पोट साफ होण्यास वेळ लागणे, चिकटपणा असणे ही शरीरात आमदोष असल्याची लक्षणे आहेत. यासाठी एक तर आहार पचायला हलका आणि प्रकृतीला अनुरूप असा योजणे, तसेच जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे हेसुद्धा महत्त्वाचे होय. भाजून घेतलेल्या तांदळाचा भात किंवा भाकरी, मुगाची मऊ खिचडी, ज्वारी किंवा नाचणीची भाकरी, तुपाची फोडणी दिलेल्या वेलवर्गीय भाज्या, ताजे व गोड ताक असा आहार घेता येईल. मात्र भूक असेल तेवढेच खाणे चांगले. जेवणाच्या सुरवातीला आल्या-लिंबाच्या रसात हिंग्वाष्टक चूर्ण घेता येईल. जेवणाच्या शेवटी ताकामध्ये लवणभास्कर चूर्ण मिसळून घेता येईल. जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेणे, आठवड्यातून एकदा योगसारक चूर्ण घेणे, वैद्यांच्या सल्ल्याने संतुलन अग्निपाचन सिरप घेणे, प्यायचे पाणी गरम व अगोदर उकळून घेतलेले असणे, रोज अर्धा तास काही ना काही व्यायाम, योगासने करणे, चालायला जाणे हेसुद्धा पचन सुधारण्यासाठी, शौचाचा आवेग नीट येऊन नीट पोट साफ होण्यासाठी महत्त्वाचे होय. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी चाळिशीनंतर व्हावा असा त्रास होतो आहे त्यादृष्टीने शास्त्रशुद्ध पंचकर्म, विशेषतः विरेचन, बस्ती हे उपचार करून घेणे चांगले होय.

मी २१ वर्षांची आहे. माझी पाळी व्यवस्थित आहे; पण वरचेवर जंतुसंसर्ग होतो. अँटिबायोटिक्‍स घेतली की काही दिवस चांगले जातात, पण नंतर पुन्हा त्रास होतो. कृपया उपाय सुचवावा.
- माधुरी
उत्तर -
असा वारंवार जंतुसंसर्ग होणे हे गायनिक सिस्टिममध्ये अशक्‍तता असल्याचे एक लक्षण आहे, त्यामुळे यावर फक्‍त जंतुसंसर्ग नष्ट करणारी नाही, तर गर्भाशयादी अवयवांची प्रतिकारशक्‍ती वाढविणारी औषधयोजना करायला हवी. यासाठी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे, ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, पुनर्नवाघन वटी, पुनर्नवासव घेणे चांगले. कोबी, फ्लॉवर, गवार, वांगे, ढोबळी मिरची, आंबट दही, अंडी, मांसाहार वगैरे आहारातून वर्ज्य करण्याचा उपयोग होईल. आवश्‍यकता वाटली तर वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे, उत्तरबस्ती, योनीधूपन यांसारखे उपचार करून घेणे चांगले, कारण हा त्रास अंगावर काढल्याने पुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. माझी मुलगी चार वर्षांची आहे. तिला रात्री झोपेत लघवी करण्याची सवय आहे. झोपायच्या आधी लघवी करून घेतली, तरी रात्री दोन-तीन वेळा अंथरूण ओले होतेच. तरी, यावर उपाय सुचवावा
- अस्मिता कुलकर्णी
उत्तर -
लहान मुलांची अंथरूण ओले करण्याची समस्या सहसा पोटात जंत असण्याशी, कधी कधी असुरक्षित मानसिकतेशी संबंधित असते. जंतांची प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी मुलीला सकाळ- संध्याकाळ एक- एक चमचा ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी पाव चमचा वावडिंगचूर्ण मधात मिसळून चाटविण्याचाही उपयोग होईल. दही, चीज, पनीर, मांसाहार, अंडी, आंबवलेले पदार्थ आहारातून वर्ज्य करणे चांगले. लहान मुले अतिशय संवेदनशील असतात, त्यामुळे घरात ताणाचे वातावरण, वादविवाद होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेणे चांगले. झोपण्यापूर्वी रामरक्षा लावणे, क्रिएटिव्हिटी किंवा एनर्जीसारखी शुद्ध अगरबत्ती लावणे, घरात लहान मुलांच्या एकंदर आरोग्यासाठी उत्तम असणारा ‘संतुलन टेंडरनेस धूप’ किंवा ‘संतुलन सुरक्षा धूप’ करणे, मुलीला सतत हे करू नको, ते करू नको असे न सांगता तिला समजून घेण्याकडे कल ठेवणे हेसुद्धा उपयुक्‍त ठरेल.

मी चार वर्षांपूर्वी सायकलवरून पडलो होतो. तेव्हा डॉक्‍टरांनी मला वेदना कमी करणाऱ्या गोळ्या दिल्या होत्या. तेव्हापासून मला नाभीच्या वर पोटात दुखण्याची सुरवात झाली. साधा आहार घेऊन पाहिला, अनेक औषधे घेऊन पाहिली; मात्र कशाचाही उपयोग होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे
- निकेश गुरव
उत्तर -
वेदनाशामक गोळ्यांचा किंवा कोणत्याही रासायनिक द्रव्याचा शरीरावर झालेला दुष्परिणाम नाहीसा करण्याचा रामबाण उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध पंचकर्म. त्यामुळे वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विरेचन व बस्ती करून घेण्याचा उपयोग होईल. तत्पूर्वी कामदुधा, प्रवाळ पंचामृत, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेणे, रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅन कूल’ चूर्ण घेणे, पोटावर ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेला’सारखे तेल लावणे, आहारात काही दिवसांसाठी गहू आणि तेल पूर्ण वर्ज्य करणे या उपायांचा उपयोग होईल. पोटात दुखू लागले की साळीच्या लाह्या चावून खाण्याचा उपयोग होतो का हेसुद्धा पाहता येईल. मात्र, सर्वांत महत्त्वाचे पंचकर्म होय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer