esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

‘संतुलन’ची आत्तापर्यंत मी वापरलेली सर्वच औषधे गुणकारी आहेत. सर्व प्रकारचे तेल आणि पचनावरची औषधे यांचा मला खूपच फायदा झालेला आहे. माझा आहार मोजकाच असतो; पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मला दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने पुन्हा एकदा शौचाला होते. सकाळी शौचाला बांधून व नीट होते; पण जेवणानंतर भसरट व पातळ होते. तरी आपण यावर उपाय सुचवावा.
... एस. पवार

उत्तर - ‘संतुलन’ उत्पादनांचा उपयोग झाल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद. शौचाचा या प्रकारचा त्रास हा पचनशक्‍ती मंदावल्याचे निदर्शक लक्षण आहे. आहार मोजका घेणे चांगलेच आहे, बरोबरीने काही दिवस आहारात गव्हाऐवजी ज्वारी, तांदूळ, नाचणी या धान्यांचा समावेश करावा. तेलाऐवजी तुपामध्ये केलेला स्वयंपाक सेवन करण्याचा उपयोग होईल. जेवणानंतर ‘बिल्वसॅन’, कुटजघनवटी घेण्याचा उपयोग होईल. पाव चमचा लवणभास्कर चूर्ण मिसळून वाटीभर ताजे, गोड ताक दुपारच्या जेवणानंतर घेण्याचा उपयोग होईल. मटार, चणे, वाल, चवळी, चीज, मांसाहार, वांगे, कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणेसुद्धा चांगले. 

मला मूळव्याध नाही; परंतु शौचाला जाऊन आल्यावर गुदभागी दुखत असते. तरी यावर उपाय सुचवावा.
... सुरेश भोसले.
उत्तर -
 बऱ्याचदा मूळव्याधीचे मोड आतमध्ये असू शकतात व ते हाताला जाणवत नसल्याने मूळव्याध नाही असा समज होऊ शकतो. मूळव्याध नसला तरी कधी कधी गुदभागी चिरा असू शकतात. यामुळेसुद्धा गुदभागी वेदना होऊ शकतात. त्यामुळे नेमका त्रास काय आहे, याचे निदान करण्यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे चांगले. तत्पूर्वी जेवणानंतर चमचाभर अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेता येईल. स्नानानंतर, तसेच रात्री झोपण्यापूर्वी एक-दोन थेंब एरंडेल तेल किंवा जात्यादी तेल गुदभागी लावण्याचाही उपयोग होईल. मलावष्टंभ होणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक, त्यादृष्टीने बेकरीची उत्पादने, मैद्यापासून बनविलेले पदार्थ टाळणे, त्याऐवजी ताजी फळे, साजूक तूप यांचा आहारात समावेश करणे हेसुद्धा चांगले.

मधुमेह आनुवंशिक आहे का? घरात या विकाराची आनुवंशिकता असली तर तो टाळता येतो का? अधून मधून रक्‍त तपासणी करून घ्यावी का? कृपया मार्गदर्शन करावे.
... उषा रोडे
उत्तर -
 मधुमेह आनुवंशिक असला तरी तो पुढच्या पिढीत जाऊ नये, यासाठी प्रयत्न नक्की करता येतात. यासाठी सर्वांत सोपा व प्रभावी उपाय म्हणजे घरात आनुवंशिकता असेल तर, गर्भधारणा होण्यापूर्वी दांपत्याने बीजशुद्धी करून घेणे आणि गर्भारपणात गर्भवतीने आहार-औषधांचे विशेष नियोजन करणे. काही कारणाने हे जमले नाही तर वयाच्या पस्तिशीच्या आसपास शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करून घेणे, आहार प्रकृतीला अनुरूप आणि योग्य वेळी व योग्य प्रमाणात घेणे, दुधापासून तसेच चण्याच्या पिठापासून बनविलेल्या मिठायांचे पथ्य पाळले तरी रोज दोन-तीन चमचे कच्ची साखर पोटात जाण्याकडे लक्ष देणे, नियमित चालणे, सूर्यनमस्कारासारखे व्यायाम नियमित करणे यासारखे उपाय योजले असता मधुमेहाची आनुवंशिकता टाळता येते, असा अनुभव आहे.

माझे वय ३७ वर्षे असून, माझे दर महिन्याला पाळीच्या वेळी किंवा पाळी येण्याअगोदर डोके खूप दुखते व कणकण वाटते. वेदनाशामक गोळी घेतल्याशिवाय बरे वाटत नाही. एरवीसुद्धा बऱ्याचदा डोके दुखत राहते. कृपया मार्गदर्शन करावे.
... वैशाली पाटील 
उत्तर -
 या प्रकारच्या त्रासावर एका बाजूने डोकेदुखीसाठी तर, दुसऱ्या बाजूने स्त्रीसंतुलनासाठी उपाय योजावे लागतात. या दृष्टीने सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेण्याचा, रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा, तसेच आहारात कमीत कमी चार-पाच चमचे घरच्या साजूक तुपाचा समावेश करण्याचा उपयोग होईल. बरोबरीने स्त्री संतुलनासाठी ‘फेमिसॅन तेला’चा योनीपिचू, शतावरी कल्प टाकून दूध, ‘अशोक ॲलो सॅन गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन वेळा, विशेषतः पाळी येण्याच्या अगोदर पादाभ्यंग करून घेण्यानेही बरे वाटेल. पाळीमध्ये रक्‍तस्राव चांगला होण्यासाठी आठ दिवस आधीपासून एक चमचा कोरफडीचा ताजा गर घेण्याचा फायदा होईल.