प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 5 January 2018

माझ्या मुलाचे वय सात वर्षे आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर उष्णतेमुळे मोठे फोड येतात. पिकले की फुटतात. उन्हाळ्यात हा त्रास अजूनच वाढतो. कृपया मार्गदर्शन करावे.
- दिलीप गायकवाड

माझ्या मुलाचे वय सात वर्षे आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर उष्णतेमुळे मोठे फोड येतात. पिकले की फुटतात. उन्हाळ्यात हा त्रास अजूनच वाढतो. कृपया मार्गदर्शन करावे.
- दिलीप गायकवाड

उत्तर - इतक्‍या लहान वयात फार उष्णता शरीरात असली तर त्यावर वेळीच योग्य उपचार घेणे महत्त्वाचे असते, अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे उत्तम होय. मात्र, बरोबरीने मुलाला सकाळ- संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती’, तसेच कामदुधा गोळ्या देण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी चमचाभर गुलकंद व चमचाभर मोरावळा घेण्याचा उपयोग होईल. आहारात किमान तीन- चार चमचे घरी बनविलेले साजूक तूप, साळीच्या लाह्या घेणे चांगले. आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करणे, दहा- पंधरा दिवसांतून एकदा एरंडेल तेल घेऊन पोट साफ करणे याचाही फायदा होईल. या उपायांनी क्रमाक्रमाने फोड येणे बंद होईल. तत्पूर्वी फोड येऊन गेलेल्या ठिकाणी डाग पडू नयेत यासाठी संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल लावण्याचा उपयोग होईल.   

माझी मुलगी पाच वर्षांची आहे, तिला सतत सर्दी होते. कफ साठून दम लागल्यासारखा होतो. कृपया औषधे सुचवावीत.
- विनिता 
उत्तर -
सतत सर्दी, छातीत कफ साठणे यावर नियमितपणे सीतोपलादी चूर्ण घेण्याचा उपयोग होतो. वयाचा विचार करता पाव चमचा सीतोपलादी चूर्ण मधाबरोबर देणे चांगले. सकाळ, संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा ‘ब्राँकोसॅन सिरप’ आणि च्यवनप्राश, किंवा ‘सॅनरोझ’सारखे रसायन घेण्याचाही उपयोग होईल. छातीत कफ साठू नये यासाठी छातीला अगोदर तेल लावून नंतर रुईच्या पानांनी किंवा ओव्याच्या पुरचुंडीने शेक करण्याचाही फायदा होईल. सर्दी-खोकला होतो आहे असे वाटले की लगेच अर्धा बेहडा, एक अडुळशाचे पिकलेले पान आणि ज्येष्ठमधाचा दोन पेर लांबीचा तुकडा हे सर्व चार कप पाण्यात टाकून मंद आचेवर अर्धा कप शिल्लक राहीपर्यंत उकळून काढा तयार करावा, त्यात थोडी साखर टाकावी व सोसवेल इतका गरम असताना पिण्यानेही बरे वाटते असा अनुभव आहे. या उपायांनी बरे वाटेलच, बरोबरीने तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने प्रतिकारशक्‍ती सुधारण्यासाठी औषधे सुरू करणे उत्तम.

माझी अक्कलदाढ तिरपी उगवून किडली आहे, यामुळे मला खूप त्रास होतो. किडलेल्या अक्कलदाढेमुळे बाकीच्या दाढाही किडत आहेत. कृपया मार्गदर्शन करावे. माझे वय २५ वर्षे आहे.
-माधुरी
उत्तर -
अक्कलदाढ चुकीची आली असली तर त्यावर दंततज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेच लागतात; मात्र इतर दातांना कीड लागू नये आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी उपचार नक्की घेता येतील. यासाठी सकाळी उठल्यानंतर ‘सुमुख तेला’चा गंडुष करणे म्हणजे अर्धा-पाऊण चमचा तेल किंवा तेल व पाण्याचे मिश्रण तोंडात चूळ धरल्याप्रमाणे आठ-दहा मिनिटांसाठी धरून ठेवणे चांगले. तसेच, मुखशुद्धी करण्यासाठी ‘संतुलन योगदंती चूर्ण’ वापरणे हेसुद्धा चांगले. कीड आलेल्या ठिकाणीसुद्धा ‘योगदंती चूर्ण’ आणि ‘संतुलन सुमुख तेल’ एकत्र करून केलेला लेप नुसता लावून ठेवण्यानेही बरे वाटते असा अनुभव आहे. दातांच्या आरोग्यासाठी हाडांची ताकद चांगली राहणे हेसुद्धा महत्त्वाचे असते. यासाठी खारीक चूर्णासह उकळलेले दूध, ‘कॅल्सिसॅन गोळ्या’ घेण्याचाही उपयोग होईल.

मी  २९ वर्षांची आहे. कॉपर टी बसवून सात महिने झाले. इतर त्रास काही नाही, मात्र वरचेवर कॅंडिडा, यीस्ट इन्फेक्‍शन होते. अँटिबायोटिक घेतले की तात्पुरते बरे वाटते. कृपया उपाय सांगा. ... माधुरी
उत्तर -
कॉपर टी किंवा तत्सम कोणतेही साधन वापरणे हे सोयीचे असले तरी शरीरासाठी ती कायम एक बाहेरची (फॉरिन) वस्तू राहते व ती शरीराबाहेर काढून टाकण्याची शरीराची कायम धडपड सुरू राहू शकते. याचाच परिणाम म्हणून वारंवार जंतुसंसर्गाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मूळ कारण दूर करण्याबरोबरीने ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे, ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे हे चांगले. पुनर्नवासव, ‘संतुलन यू. सी. चूर्ण’, पुनर्नवाघनवटी घेण्याचाही उपयोग होईल. कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वांगे, दही या गोष्टी आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर. या उपायांनी मुळापासून जंतुसंसर्ग बरा झाला की वारंवार औषध घेण्याची गरज पडणार नाही. 

‘संतुलन’चे प्रशांत चूर्ण कुणीही घेतले तर चालते का? ते कशावर उपयोगी पडते? 
-आनंद करंदीकर
उत्तर -
‘संतुलन’चे प्रशांत चूर्ण हे बहुउपयोगी चूर्ण असून ते कोणीही घेतले तरी चालते. तूप- साखरेबरोबर ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याने हाडांची, सांध्यांची झीज भरून येण्यास मदत मिळते. पाठदुखी, कंबरदुखी यावरही संतुलनचे प्रशांत चूर्ण तूप- साखरेबरोबर घेण्याने बरे वाटते. धातुपुष्टी, तसेच एकंदर शरीरशक्‍ती वाढविण्याच्या दृष्टीने हे चूर्ण दूध- साखरेबरोबर घेता येते. गर्भाशय, मूत्राशयाच्या ठिकाणी जंतुसंसर्ग, सदाह मूत्रप्रवृत्ती वगैरे तक्रारींवरही प्रशांत चूर्ण दूध- साखरेबरोबर किंवा पाणी- साखरेबरोबर घेता येते. गर्भधारणेपूर्वी बीजशुद्धी आणि बीजसंपन्नतेसाठी दोघांनीही प्रशांत चूर्ण घेणे उत्तम असते. 

माझे वय ३० वर्षे असून, मला तीन वर्षांपासून पित्ताचा त्रास आहे. पोटात आग होते आणि पोट नीट साफ होत नाही. माझ्या आहारात तूप व मध असते. खारट, तिखट, आंबट वगैरे खात नाही. कृपया यावर उपाय सुचवावा. ... पाटील
उत्तर -
खारट, तिखट, आंबट या चवींचा अतिरेक चांगला नसतो; पण म्हणून त्या पूर्ण वर्ज्य करणेही चांगले नाही. पचन चांगले व्हावे यासाठी, सेवन केलेले अन्न नीट जिरावे यासाठी हेच रस मदत करणारे असतात. सैंधव मीठ, पादेलोण, आले, हिंग, मिरी, कोकम, लिंबू या गोष्टी रोजच्या आहारात असायला हव्यात. पोटात आग  होऊ नये आणि पोट साफ व्हावे यासाठी ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. चार- पाच भिजविलेल्या मनुका, अंजिराची चकती रोज खाण्याने या दोन्ही तक्रारींवर उपयोग होईल. तूप व मध रोज घेणे चांगलेच होय. फक्‍त तूप साजूक, घरी बनविलेले असल्याची आणि मध शुद्ध असल्याची खात्री केलेली असावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer