प्रश्नोत्तरे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 January 2018

माझ्या मुलीची मुलगी सहा वर्षांची आहे. वयाच्या मानाने तिचा आहार खूप कमी आहे, तसेच तिचे पोटही साफ होत नाही. पाणी कमी प्यायल्याने लघवीलाही कमी वेळा जाते. तिची भूक वाढण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी काय द्यावे? कृपया मार्गदर्शन करावे.  
- योगिराज

माझ्या मुलीची मुलगी सहा वर्षांची आहे. वयाच्या मानाने तिचा आहार खूप कमी आहे, तसेच तिचे पोटही साफ होत नाही. पाणी कमी प्यायल्याने लघवीलाही कमी वेळा जाते. तिची भूक वाढण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी काय द्यावे? कृपया मार्गदर्शन करावे.  
- योगिराज

उत्तर - लहान मुलांमध्ये भूक न लागणे, पोट साफ न होणे, वजन न वाढणे यासारख्या तक्रारी सहसा जंतांशी संबंधित असतात. असेही लहान मुलांना अधून मधून जंतांचे औषध देत राहणे चांगले असते. नातीला रोज सकाळी पाव चमचा वावडिंगाचे चूर्ण मधाबरोबर देण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून एकदा चमचाभर एरंडेल देऊन पोट साफ करण्याचाही उपयोग होईल. तसेच सकाळ-संध्याकाळ एक एक चमचा ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचा उपयोग होईल. खेळण्याच्या नादात लहान मुलांचे तहान-भुकेकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक असते. तेव्हा वेळेवर खायला देणे, पाणी प्यायची आठवण करणे, नुसते पाणी प्यायला आवडत नसेल तर कधी नारळ पाणी, कधी लिंबू सरबत, कधी कोकम सरबत प्यायची आवड तयार करणे आवश्‍यक होय. आहारात फक्‍त भाजी-पोळी न ठेवता आमटी, वरण-भात, पातळ भाजी, कढी, खिचडी अशा गोष्टींचा समावेश करणे, साजूक तूप पुरेशा प्रमाणात पोटात जाईल याकडे लक्ष देणे हे सुद्धा महत्त्वाचे होय. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे योग्य ठरेल.

******************************************************

आम्ही दोन वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करतो आहोत. पत्नीची मासिक पाळी दोन-तीन महिन्यांतून एकदा येत होती, मात्र सध्या नियमित आहे. डॉक्‍टरांकडून तपासण्या करून घेतल्या, त्यात काहीच दोष सापडलेला नाही. ‘संतुलन’मधून कोणती औषधे घ्यावीत याविषयी मार्गदर्शन करावे.
- संकेत
उत्तर - 
 तपासण्यांमध्ये काही दोष आढळला नाही, तसेच सध्या पत्नीची मासिक पाळी नियमित येते आहे हे उत्तमच आहे. गर्भाशयादी अवयवांची कार्यक्षमता सुधारावी, शुक्रधातूची ताकद वाढावी यासाठी प्रयत्न नक्कीच करता येतील. यादृष्टीने उभयतांनी ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ दूध-साखर किंवा तूप-साखरेसह घेणे चांगले. दुधासह ‘संतुलन चैतन्य कल्प’, ‘मॅरोसॅन’, ‘संतुलन आत्मप्राश’ ही रसायने घेणे तुमच्यासाठी उत्तम, तर पत्नीने शतावरी कल्प, ‘सॅनरोझ’, ‘संतुलन अशोकादी घृत’ घेण्याचा तसेच फेमिसॅन तेलाचा पिचू, शक्ती धुपाची धुरी घेण्याचा उपयोग होईल. शरीरात अधिक उष्णता असली किंवा जंतुसंसर्ग दडून राहिलेला असला तरी बऱ्याचदा गर्भधारणेमध्ये अडचण उत्पन्न होऊ शकते. यासाठी तज्ज्ञ वैद्यांकडून प्रकृती परीक्षण, निदान करून घेणे, प्रकृतिनुरूप योग्य औषधे घेणे उत्तम असते. शास्त्रशुद्ध पंचकर्म व उत्तरबस्ती हे सुद्धा गर्भधारणा होण्यास व पुढचा सर्व प्रवास सुखरूप पार पडण्यास उत्तम सहायक ठरताना दिसतो.

******************************************************

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. माझे वय ५२ वर्षे आहे. माझे पाय खूप दुखतात आणि खूप थकल्यासारखे वाटते. तसेच मला अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास आहे. कृपया यावर उपाय सुचवावा. 
- फिरके

उत्तर - अंगावरून पांढरे जाण्याने पाय दुखणे, तसेच थकवा जाणवणे हे दोन्ही त्रास होऊ शकतात. त्यामुळे सर्वप्रथम यावर योग्य उपचार झाले पाहिजेत. यादृष्टीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू नियमित वापरणे, आठवड्यातून दोन वेळा खालून ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे, काही दिवस दिवसातून दोन वेळा ‘अशोक-ॲलो सॅन’ या गोळ्या घेणे हे उपाय सुरू करता येतील, एक चमचा पुष्यानुग चूर्ण मधात मिसळून घेण्याचा आणि त्यावर अर्धा कप तांदळाचे धुवण घेण्याचाही उपयोग होईल. या उपायांनी तसेच पुनर्नवासव घेण्याने खाज येणेसुद्धा कमी होईल. पाय दुखतात त्यावर रात्री झोपण्यापूर्वी ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावण्याचा, ‘कॅल्सिसॅन गोळ्या’ घेण्याचा तसेच नियमितपणे ‘सॅनरोझ’ किंवा च्यवनप्राशसारखे रसायन घेण्याचाही उपयोग होईल. दूध, खारीक, बदाम, पंचामृत, साजूक तूप, नाचणी सत्त्व वगैरेंचा आहारात अंतर्भाव करणेसुद्धा उत्तम होय. 

******************************************************

मी  अधून मधून पंचामृत घेते. त्याने मला बरे वाटते. पंचामृत घरातील सर्वांनी घेतले तर चालते का? तसेच फेमिसॅन तेलाचा पिचू संध्याकाळी किंवा दिवसा वापरता येतो का? कृपया मार्गदर्शन करावे. 
 जया
उत्तर -
 पंचामृत नियमित घेणे उत्तम होय. तसेच घरातील सर्वांना पंचामृत घेता येते, त्याला वयाचे किंवा कोणत्याही रोगाचे बंधन नाही. पाच वर्षांपेक्षा लहान बाळाला मोठ्यांच्या निम्म्या प्रमाणात पाचही गोष्टी एकत्र करून पंचामृत बनविता येते. साध्या साखरेऐवजी ‘संतुलन अमृतशतकरा’ मिसळून पंचामृत बनविले तर ते अधिक गुणकारी तर होतेच, पण मधुमेही रुग्णांनाही घेता येते. ‘फेमिसॅन तेला’चा पिचू रात्री वापरण्याने तो निसटून जात नाही, तसेच शांत झोप लागण्यासही मदत मिळते. दिवसा वारंवार मूत्रविसर्जनासाठी जावे लागत नसले व पिचू व्यवस्थित आत ठेवला तर दिवसाही पिचू वापरायला हरकत नाही. पाळीचे तीन-चार दिवस वगळता एरवी नियमितपणे हा पिचू वापरला तर स्त्रीआरोग्य व्यवस्थित राहते हा आजवरचा अनुभव आहे.  

******************************************************

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीतही आरोग्याचे रक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून खूप चांगल्या प्रकारे मिळते. माझी समस्या अशी आहे, की मला जेवणानंतर खूप आळस जाणवतो, डोळ्यांवर झापड येते. गर्मीच्या दिवसांत बाहेरून घरात आल्यावरही असेच होते. कृपया मार्गदर्शन करावे.
- अमित 

उत्तर - बऱ्याचदा, आळस, डोळ्यांवर झापड या तक्रारी अवेळी झोप, अवेळी खाणे-पिणे यांच्याशी संबंधित असतात. तेव्हा सर्वप्रथम झोप, जेवण यांचे नियोजन करण्याकडे लक्ष देणे चांगले. रोज सकाळी दीर्घश्वसन, अनुलोम विलोम करणे, नियमित चालायला जाणे हे सुद्धा यादृष्टीने सहायक ठरेल. सकाळी पंचामृत, च्यवनप्राशसारखे रसायन घेणे, दुपारच्या जेवणानंतर पचनास मदत मिळण्यासाठी वाटीभर ताजे ताक पिणे तसेच ’संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या स्वतःला अभ्यंग करण्यानेही शरीरशक्‍ती वाढण्यास, एकंदर स्फूर्ती अनुभूत होण्यासही मदत मिळते. गर्मीच्या दिवसात शरीरशक्‍ती कमी होऊ नये यासाठी मोरावळा, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेत राहण्याचा, शहाळ्याचे पाणी, लिंबू-पाणीसारखे काही ना काही पेय घेत राहण्याचाही उपयोग होईल.  

******************************************************

माझे वय २४ वर्षे आहे. माझ्या तळपायांची खूप आग होते. कधी कधी छातीतून गरम वाफा आल्यासारखे वाटते. घामही खूप येतो. यामुळे थकवा जाणवतो. उन्हाळ्यात या त्रासांची तीव्रता वाढते. कृपया मार्गदर्शन करावे. 
- सावंत 
उत्तर -
 तरुण वयात पित्ताचा जोम अधिक असणे अपेक्षित असले, तरी त्यामुळे इतका त्रास होणे चांगले नव्हे. तेव्हा पित्त संतुलनासाठी पादाभ्यंग करणे, सकाळी गुलकंद किंवा मोरावळा घेणे चांगले. काही दिवस कामदुधा, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेण्यानेही शरीरात वाढलेले पित्त कमी होण्यास मदत मिळेल. आठ-दहा दिवसांतून एकदा दोन चमचे एरंडेल घेऊन पोट साफ ठेवण्याने तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्यानेही पित्त शांत राहण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. पित्त कमी झाले की घाम येणेही कमी होईल. बरोबरीने स्नानाच्या वेळी साबणाऐवजी एक चमचा ‘सॅन मसाज पावडर ’हे उटणे आणि एक चमचा कुळथाचे पीठ हे मिश्रण एकत्र करून अंगाला लावण्याचाही उपयोग होईल. टोमॅटो, चिंच, आंबवलेले पदार्थ, तिखट-मसालेदार पदार्थ आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer