esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

काही प्रकृतीच्या व्यक्‍तींना चिंच-कैरी खाण्याने त्रास होतो. परंतु त्यांनी लिंबू खाल्ले तर चालते का? का चिंच-कैरीप्रमाणे लिंबूसुद्धा वर्ज्य करायला हवे?
... सुलोचना       

उत्तर - चिंच, कैरी किंवा इतर आंबट पदार्थ आणि लिंबू यांच्यात मोठा फरक असा, की लिंबू पोटात गेले की त्याचा विपाक मधुर होत असतो. म्हणजे लिंबू चवीला आंबट लागले तरी पोटात गेल्यावर, पचन झाल्यावर ते मधुर होते. तेव्हा चिंच किंवा कैरीप्रमाणे लिंबू वर्ज्य करायची गरज नाही. उलट भूक नीट लागावी, पचन व्यवस्थित व्हावे, गॅसेस वगैरे होऊ नयेत यासाठी जेवणात लिंबाचा समावेश असणे, स्वयंपाक करताना लिंबू वापरणे चांगले असते. लिंबाप्रमाणे आमसूल किंवा कोकम हेसुद्धा  चवीला आंबट असले तरी पोटात गेल्यावर आंबट राहत नाही, उलट पित्त कमी करण्यास मदत करते व वाताला संतुलित करते. 
 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या अंकाचे नियमित वाचन करते. माझ्या ओटीपोटाचा घेर खूप वाढला आहे, माझे वय ६२ वर्षे असून, मधुमेह व रक्‍तदाबाची औषधे चालू आहेत व त्यामुळे दोन्ही आजार आटोक्‍यात आहेत. मात्र ओटीपोट कमी करण्यासाठी उपाय सुचवावा. माझी त्वचासुद्धा कोरडी आहे.
... कोंडे

उत्तर - पोटावरचे वजन कमी करण्यासाठी नियमित चालणे आणि पोटावर-कंबरेवर ताण येईल अशा प्रकारची योगासने करणे उपयोगी पडते असा अनुभव आहे. यासाठी सूर्यनमस्कार उत्तम होय. वज्रासनात बसून डोके जमिनीला टेकवणे, संतुलन समर्पण क्रिया करणे हे सुद्धा चांगले. रोज रात्री झोपण्यापूर्वी ओटीपोटाला, खरे तर संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे, त्यासाठी मेदनाशक द्रव्यांनी संस्कारित असे ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ वापरणे, स्नानाच्या वेळी वजन वाढलेल्या ठिकाणी मेदपाचक द्रव्यांनी बनविलेले उटणे चोळणे हे सुद्धा उपयोगी पडेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मधुमेह व रक्‍तदाब या विकारांवर ते फक्‍त आटोक्‍यात राहतील यासाठी औषधे न घेता, ते शक्‍य तितके बरे होतील यासाठी योग्य उपचार सुरू करणे, शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून घेणे, रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या आसपास आणि पचायला हलके, शक्‍यतो भाज्यांचे सूप, कुळथाचे किंवा मुगाचे कढण या स्वरूपाचे असणे हे सुद्धा चांगले.

आहारात कांदा-लसूण पूर्णतः वर्ज्य करणे हितावह आहे का? 
... तांबे

उत्तर - कांदा लसूण तामसिक असल्याने त्यांच्या वापरावर बंधन असते, विशेषतः मन विचलित असताना कांदा लसूण वर्ज्य करण्यास सुचविलेले असते. मात्र आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर आहारात कांदा, लसूण योग्य स्वरूपात आणि योग्य प्रमाणात समाविष्ट करायला हरकत नसते. कच्चा कांदा किंवा कच्चा लसूण प्रत्येक प्रकृतीसाठी हितावह असतोच असे नाही. त्यामुळे भाजी- आमटीला फोडणी देताना त्यात कांदा-लसूण परतून घेऊन वापरणे चांगले असते. कच्च्या कांद्याची दह्याबरोबर केलेली कोशिंबीर रात्रीच्या जेवणात टाळणे चांगले. कांदा-लसूण हे दोन्ही कंद जेवणात रुची आणतात, अन्न पचण्यास मदत करतात, लसूण तर वात कमी करण्यासाठी, रक्‍ताभिसरणाला मदत करण्यासाठी उत्तम असतो.

माझे वय ३१ वर्षे आहे. मला सहा महिन्यांपासून अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास आहे. कृपया यावर उपाय सुचवावा.
... रागिणी 

उत्तर - अंगावरून पांढरे जाणे हे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. त्यामुळे यावर लागलीच आणि प्रभावी  उपचार करायला हवेत. यासाठी उत्तम उपाय म्हणजे ‘फेमिसॅन तेला’चा पिचू नियमित वापरणे आणि आठवड्यातून दोन वेळा खालून ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे, ‘अशोक ॲलो सॅन गोळ्या’ घेणे, शतावरी कल्प घालून दूध घेणे, अर्धा चमचा पुष्यानुग चूर्ण मधात मिसळून घेऊन वर तांदळाचे धुवण घेणे या उपायांचा फायदा होईल. सहा महिन्यांपासून त्रास आहे, त्यामुळे हे उपाय लागलीच सुरू करणे चांगले, बरोबरीने तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे हे सुद्धा श्रेयस्कर.

आपण ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये सुचविलेले अनेक उपाय छोट्या मोठ्या आजारांसाठी उपयोगी ठरलेले आहेत. धन्यावाद. मी एक ज्येष्ठ नागरिक असून मला आजार असा काहीही नाही, मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून मला रात्री झोप येत नाही. झोपेची गोळी घेऊनही झोप येत नाही. त्यामुळे सकाळी अस्वस्थ वाटते. रात्री एकदा लघवीसाठी उठावे लागते. कृपया यावर उपाय सुचवावा.
... ठोंबरे

उत्तर - रात्री पुरेशी व शांत झोप लागणे हे पुढच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. यासाठी आयुर्वेदात सुचवलेले पुढील उपाय करून पाहता येतील, रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे, डोक्‍याला म्हणजे टाळूला दोन-तीन थेंब ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणे, नाकात घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकणे, कानात ‘संतुलन श्रुती तेला’चे दोन-तीन थेंब टाकणे, याशिवाय दुपारी मोकळा वेळ असताना पादाभ्यंग करून घेण्याचाही उपयोग होईल. काही दिवस सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा ‘संतुलन यू.सी. चूर्ण’ घेण्याने रात्री लघवीला उठावे लागण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. ‘सॅन रिलॅक्‍स सिरप’ तसेच ‘निद्रासॅन गोळ्या’ घेण्याने आणि रात्री झोपण्यापूर्वी ‘संतुलन योगनिद्रा’ ही ध्वनिमुद्रिका ऐकण्यानेही शांत झोप लागते असा आजपर्यंत अनेकांचा अनुभव आहे.

मी आपल्या ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक आहे. माझे पाय चालताना बधिर होतात, खुबा अधून मधून दुखतो. तपासण्या केल्या तर त्यात कंबरेचे दोन मणके सरकल्यामुळे नस दाबली आहे असे निदान केले आहे. डॉक्‍टरांनी शस्त्रकर्म करण्याचा सल्ला दिला आहे. आयुर्वेदात यावर काही उपाय आहे का? तसेच मला बद्धकोष्ठतेचाही त्रास आहे. यावरही काही उपाय सुचवावा.  ... क्षितिजा
उत्तर -
 या प्रकारच्या त्रासावर आयुर्वेदिक उपचार घेण्याचा चांगला फायदा होताना दिसतो. त्यामुळे सरळ शस्त्रकर्माचा निर्णय न घेता औषधोपचार, आहारनियोजन याचा उपयोग होतो आहे का, हे पाहणे चांगले. बद्धकोष्ठतेची प्रवृत्ती बरी होणे हे सुद्धा या दृष्टीने महत्त्वाचे होय. त्यादृष्टीने रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे, कपभर गरम पाण्यात दोन चमचे घरी बनविलेले साजूक तूप घेणे, आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेणे चांगले. पाठीला सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावणे, तूप-साखरेबरोबर ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे, सिंहनादगुग्गुळ, ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेणे हे सुद्धा उपयोगी पडेल, कंबरेच्या ठिकाणी बिघडलेल्या वातदोषाला संतुलित करण्यासाठी त्या ठिकाणी विशेष औषधांचा लेप लावणे, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती करून घेणे, पोटली मसाज करून घेणे हे सुद्धा चांगले. आहारात खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, दूध साजूक तूप वगैरे गोष्टींचा समावेश करणे उत्तम होय.