प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. यातील बरेचसे लेख मी कात्रण करून ठेवलेले आहेत. मी ३६ वर्षांची आहे. मला ॲसिडिटीचा खूप त्रास होतो, म्हणजे जराही जेवणाला उशीर झाला किंवा झोप नीट झाली नाही, तर पोटात आग पडते. अलीकडे माझ्या अंगावर छोट्या लाल गांधीसुद्धा उठत आहेत, खूप खाजही सुटते. आमच्या घरी खाणे साधेच, तसेच शाकाहारी असते. कृपया मार्गदर्शन करावे.... सोनाली

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. यातील बरेचसे लेख मी कात्रण करून ठेवलेले आहेत. मी ३६ वर्षांची आहे. मला ॲसिडिटीचा खूप त्रास होतो, म्हणजे जराही जेवणाला उशीर झाला किंवा झोप नीट झाली नाही, तर पोटात आग पडते. अलीकडे माझ्या अंगावर छोट्या लाल गांधीसुद्धा उठत आहेत, खूप खाजही सुटते. आमच्या घरी खाणे साधेच, तसेच शाकाहारी असते. कृपया मार्गदर्शन करावे.... सोनाली
उत्तर - पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींना किंवा पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्‍तींना खाणे- पिणे- झोपणे यात नियमितता राखणे आवश्‍यक असते. निदान खाण्या-पिण्याच्या बाबतीत अशा व्यक्‍तींनी आपल्या जवळ कायम मुगाचा लाडू, साळीच्या लाह्या, राजगिऱ्याची चिक्की यापैकी काहीतरी ठेवावे. जेवणाची वेळ टळते आहे असे लक्षात आले, की लगेच खाऊन घेणे चांगले होय. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे, आठवडा- दहा दिवसांतून एकदा एरंडेल किंवा अविपत्तिकर चूर्ण घेऊन पोट साफ होऊ देणे हेसुद्धा चांगले. आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा अंतर्भाव करणे, आहारात गव्हापेक्षा तांदूळ, ज्वारी, नाचणी या शीत गुणाच्या धान्यांचा समावेश करणे, वरण किंवा आमटीसाठी मुगाच्या डाळीचा वापर करणे हेसुद्धा चांगले. पित्तदोषाला संतुलित करण्यासाठी सर्वश्रेष्ठ उपचार म्हणजे विरेचन. त्रासाची तीव्रता लक्षात घेता एकदा वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध विरेचन करून घेणे हे उत्तम. बरोबरीने ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा, प्रवाळपंचामृत, गुलकंद, ‘संतुलन धात्री रसायन’ हे पित्तशामक कल्प घेणेसुद्धा श्रेयस्कर. 

माझे वय २५ वर्षे आहे. गेल्या दोन वर्षांपासून माझे केस खूप गळतात, आता तर केस पांढरेही होऊ लागले आहेत. तरी केस गळणे, पांढरे होणे, तसेच चांगल्या वाढीसाठी योग्य मार्गदर्शन करावे. ... सरिता  
उत्तर -
केसांचे आरोग्य हाडांच्या मजबुतीवर अवलंबून असते. केस गळणे, अकाली पांढरे होणे यामागे शरीरात उष्णता वाढलेली असणे हे एक कारण असते, त्यामुळे हाडांना ताकद मिळेल आणि शरीरातील उष्णता कमी होईल अशा द्रव्यांपासून बनविलेल्या ‘हेअरसॅन’, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’, प्रवाळपंचामृत घेण्याचा उपयोग होईल. केसांना हितकर द्रव्यांनी संस्कारित केलेले ‘संतुलन व्हिलेज हेअर तेल’ केसांच्या मुळापाशी जिरविण्याचा, तसेच केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून बनविलेली उत्पादने न वापरता शिकेकाई, रिठा, आवळकाठी वगैरे द्रव्यांपासून बनविलेले ‘संतुलन सुकेशा’ हा हेअर वॉश वापरणे हेसुद्धा चांगले. हाडांच्या मजबुतीसाठी दूध, खारीक, खसखस, डिंकाचे लाडू वगैरे गोष्टींचा आहारात समावेश करणे हेसुद्धा आवश्‍यक. शरीरात उष्णता वाढू नये यासाठी तिखट, चमचमीत, आंबवलेले व कच्चे मीठ टाकून बनविलेले पदार्थ खाणे टाळणे हेसुद्धा चांगले.

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीचा नियमित वाचक आहे. माझे जावई ५२ वर्षांचे आहेत. त्यांना दोन्ही तळपायांवर तीन- चार कुरुपे झाली आहेत. पुष्कळ उपचार झाले, शस्त्रकर्मसुद्धा करून पाहिले; पण फायदा झाला नाही. पायात कायम चपला घालाव्या लागतात. या त्रासातून बरे होण्यासाठी उपाय सुचवावा. ... शरदचंद्र बालटे
उत्तर -
नियमित पादाभ्यंग हा कुरुपाचा त्रास कमी होण्यासाठी उत्तम उपाय होय. यासाठी तळपायाला पादाभ्यंग घृत लावून शुद्ध काशाच्या वाटीने तळपाय प्रत्येकी दहा- दहा मिनिटांसाठी घासायचे असतात. यासाठी ‘संतुलन पादाभ्यंग किट’ वापरता येते. आठवड्यातून दोन वेळा तळपाय मीठ मिसळलेल्या कोमट पाण्यात थोड्या वेळासाठी बुडवून ठेवण्यानेही बरे वाटेल. याशिवाय आणखीही काही उपाय करून पाहता येईल. गव्हाचे पीठ, थोडे मीठ, हळद आणि तेल एकत्र करून कणीक मळावी व लंबगोलाकृती आकार द्यावा. याचे एक टोक गरम तव्यावर ठेवून गरम करावे व ते कुरूप असलेल्या ठिकाणी सहन होईपर्यंत चटका लागेल अशा रीतीने टेकवावे, हा प्रयोग आठवड्यातून एक- दोन वेळा करता येईल. बरोबरीने काही दिवस पंचतिक्‍त घृत घेण्याचाही उपयोग होईल.  

माझे नाक चोंदते, त्यासाठी मी डॉक्‍टरच्या सल्ल्याने तपासण्या केल्या असता त्यात मला सायनसचा त्रास असल्याचे निदान झाले. सध्या मी स्प्रे घेतो आहे. परंतु त्याने काही वेळासाठीच बरे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे.   ... नागनाथ कनकधर  
उत्तर -
या दोन्ही तक्रारींवर रोज रात्री झोपण्यापूर्वी नस्य करण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. यासाठी नस्यसॅन घृत, अणु तैल किंवा वैद्यांच्या सल्ल्याने ‘संतुलन गंधर्व नस्य’ वापरता येईल. आठवड्यातून दोन वेळा गवती चहा, ओवा, आले, तुळशी पाने पाण्यात टाकून त्याचा वाफारा घेण्यानेही बरे वाटेल. निर्गुडी म्हणून वनस्पती सहसा सगळ्यांच्या परिचयाची असते. निर्गुडीची पाने वाफवून त्याचा कपाळावर, नाक- गालावर शेक करण्यानेही नाक चोंदण्याची प्रवृत्ती हळू हळू बरी होईल. बरोबरीने मधाबरोबर सीतोपलादी चूर्ण, ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेण्याने, वैद्यांच्या सल्ल्याने ‘प्राणसॅन योग चूर्ण’ घेण्यानेही बरे वाटेल.

माझा मुलगा बारा वर्षांचा आहे. तो बोलताना अडखळतो. त्याचे शब्दोच्चार काही वेळा समजत नाहीत. आम्ही स्पीच थेरपी घेऊन पाहिली, पण फारसा उपयोग झाला नाही. अक्कलकऱ्याचे चूर्ण मधातून घेऊनही फायदा झाला नाही. कृपया मार्गदर्शन करावे. .... करपे
उत्तर -
स्पष्ट शब्दोच्चारांस जीभ, गाल, टाळू हे जसे जबाबदार असतात, तसेच मेंदूचे योगदानही महत्त्वाचे असते. स्पीच थेरपी, तसेच अक्कलकरा यांचा फारसा उपयोग झाला नाही, याचा अर्थ हा फक्‍त ‘मेकॅनिकल’ दोष नसून मेंदूला शक्‍ती देण्याची अधिक गरज आहे, असे वाटते. यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम आहेच, बरोबरीने मुलाला ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’, ‘सॅन ब्राह्मी गोळ्या’ देण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी पंचामृत देण्याचाही उपयोग होईल. जिभेवर चोळण्यासाठी विशेष चूर्ण मिळते, तेही वैद्यांच्या सल्ल्याने वापरता येईल. जमत असल्यास रोज सूर्यनमस्कार करणे, ॐकार म्हणणे, रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणे हेसुद्धा चांगले. बरोबरीने स्पीच थेरपी चालू ठेवणेही श्रेयस्कर.

Web Title: family doctor question answer