प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 16 February 2018

माझी मुलगी दोन महिन्यांची आहे, मी तिला बालामृत देण्यास सुरवात केलेली आहे. जन्मतः तिची त्वचा खूप छान आणि तेजस्वी होती, मात्र कावीळ झाल्यानंतर तिची त्वचा निस्तेज झाल्यासारखी वाटते. कृपया यासाठी काही उपाय सुचवावा.
..... माने

माझी मुलगी दोन महिन्यांची आहे, मी तिला बालामृत देण्यास सुरवात केलेली आहे. जन्मतः तिची त्वचा खूप छान आणि तेजस्वी होती, मात्र कावीळ झाल्यानंतर तिची त्वचा निस्तेज झाल्यासारखी वाटते. कृपया यासाठी काही उपाय सुचवावा.
..... माने

उत्तर - बालामृतामध्ये असलेल्या सुवर्णवर्ख, केशर आणि इतर द्रव्यांमुळे त्वचा सतेज व्हायला मदत मिळेलच. बरोबरीने काविळीनंतर त्वचेत फरक झालेला असल्यास पचन सुधारण्याच्या दृष्टीने आणि यकृत कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचा उपयोग होईल. यामुळे तिची एकंदर वाढ होण्यासही मदत मिळेल. नियमित अभ्यंग करण्याने आणि स्नानाच्या वेळी साबणाऐवजी वर्ण्य द्रव्यांपासून तयार केलेले उटणे लावण्याने सुद्धा त्वचा पूर्ववत व तेजस्वी होण्यास हातभार लागेल. यादृष्टीने ‘संतुलन बेबी मसाज तेल’ आणि ‘संतुलन बेबी मसाज पावडर’ वापरणे उत्तम. थंडीचे दिवस आहेत तेव्हा उटण्यामध्ये साध्या पाण्याऐवजी दूध किंवा साय मिसळून लावण्याने अजून चांगला गुण येईल. बाळाला स्तन्यपान चालू असेलच, तेव्हा आईने ‘बिल्वसॅन’, ‘सॅनरोझ’, ‘संतुलन अनंत कल्प’ घेण्याचाही उपयोग होईल.

माझा मुलगा आठ महिन्यांचा आहे. मला त्याला ब्रह्मलीन घृत चालू करायचे आहे. तरी ते किती प्रमाणात व कसे द्यायला हवे याविषयी मार्गदर्शन करावे. याचे काही साइड इफेक्‍ट्‌स तर होत नाहीत ना?
..... चंद्रशेखर 

उत्तर - बाळाचा बौद्धिक विकास, मेंदूची जडणघडण व्यवस्थित व्हावी यासाठी मदत करणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ हे बालकांसाठी उत्तम रसायन असते. याचे कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होण्याची शक्‍यता नाही. मुलगा आठ महिन्यांचा आहे, तेव्हा त्याला रोज दिवसातून एकदा चार-पाच थेंब या प्रमाणात ब्रह्मलीन घृत देता येईल. एक वर्षानंतर हे प्रमाण थोडे वाढवून पाव चमचा इतके करता येईल आणि तीन वर्षांनंतर अर्धा अर्धा चमचा देता येईल. सहसा या वयातील मुलांना बाळगुटी दिली जाते, त्यामुळे त्यातच ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ मिसळणे सोयीचे असते. बाळगुटी थांबविल्यानंतर दुधाबरोबर मिसळून देता येते.

पंचामृत कसे बनवावे आणि त्याचे सेवन कधी करावे, तसेच किती प्रमाणात घ्यावे?
... मानस 

उत्तर - पंचामृतात नावाप्रमाणे पाच गोष्टी असतात. यातील तूप, मध, दही व साखर हे प्रत्येकी एक-एक चमचा आणि दूध चार-पाच चमचे या प्रमाणात एकत्र केले की पंचामृत तयार होते. पंचामृत सकाळी नाश्‍त्यापूर्वी घेणे सर्वांत चांगले असते. मोठ्या व्यक्‍तींना या प्रमाणात तयार केलेले पंचामृत देता येते, तर लहान मुलांना याच्या निम्म्या प्रमाणात देता येते. घरात चार व्यक्‍ती असतील तर चार वाट्यांमध्ये पंचामृत तयार करावे लागते, तसेच पंचामृत तयार केले की लगेच, निदान अर्ध्या तासाच्या आत, घेणे हितावह असते. साध्या साखरेऐवजी पंचामृतात सुवर्ण, केशरयुक्‍त ‘संतुलन अमृतशर्करा’ हे रसायन मिसळले तर त्याचा गुण अनेक पटींनी वृद्धिंगत होतो असा अनुभव आहे. घरातील सर्वांनी दिवसाची सुरवात पंचामृताने करणे उत्तम होय.

माझी मुलगी तेरा वर्षांची आहे. तिला टॉन्सिल सुजण्याचा वारंवार त्रास होता म्हणून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने शस्त्रकर्म करून घेतले. पण अजूनही तिचे नाक सतत बंद पडते व कानांनीही नीट ऐकू येत नाही असे वाटते, कारण कधी कधी तिला काही शब्दांचे उच्चार नीट समजत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे.  
उत्तर - एकदा कर्णतज्ज्ञांकडून कानाची व्यवस्थित तपासणी करून घेणे चांगले. कारण वेळेवर निदान झाले तर योग्य उपाय सुरू करता येतील. आतल्या आत सर्दी साठून राहिली तरी कानाला दडा बसून बऱ्याचदा असा त्रास होऊ शकतो. यासाठी कानाला धुरी देण्याचा उपयोग होईल. गोवरी किंवा कोळसा पेटवून निखारा तयार करून त्यावर ‘संतुलन प्युरिफायर’ आणि ‘संतुलन टेंडरनेस धुपा’चे मिश्रण टाकून आलेली धुरी कानाला देता येईल. ही धुरी डोळे मिटून घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे थेंब टाकण्याचा उपयोग होईल. काही दिवस कोमट पाण्याबरोबर ‘संतुलन सितोपलादी चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल.  

माझे वय ३० वर्षे आहे. मला रोज सकाळी उठल्यावर कफ पडतो. दिवसभर थोडा थोडा येतच राहतो. पंख्याखाली झोपल्यावर कफ जास्ती होतो. यावर काही उपाय सुचवावा.
... रेणुका भट

उत्तर - सर्वप्रथम पंख्याचा झोत सरळ अंगावर येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. झोपण्याची जागा बदलता येणे शक्‍य नसेल तर टेबलफॅनचा वापर करता येईल. या प्रकारचा घशात, तोंडात जाणवणारा कफ कमी होण्यासाठी औषधी तेलाचा गंडुष करण्यासाठी म्हणजेच तेल तोंडात आठ-दहा मिनिटांसाठी धरून ठेवण्याचा उपयोग होतो. यासाठी इरिमेदादी तेल किंवा अनेक द्रव्यांनी संस्कारित केलेले ‘संतुलन सुमुुख सिद्ध तेल’ वापरता येईल. बरोबरीने काही दिवस अर्धा अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण मधाबरोबर घेण्याचा, ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेण्याचा उपयोग होईल. सकाळी उठल्यावर दात घासण्यासाठी ‘संतुलन योगदंती चूर्ण’ वापरण्यानेही मुखातील, घशातील कफ सुटा होऊन पडून जातो आणि क्रमाक्रमाने कफाची प्रवृत्ती कमी होते असा अनुभव आहे.

माझ्या हाताला मागच्या बाजूने अचानक हिसका बसल्याने मानेची शीर शिरेवर चढली होती. शीर मोकळी होण्यासाठी लाटण्याचा वापर केला, तेल लावून शेक घेतला, परंतु अजूनही हातांवर जोर आला तर मानेचे, पाठीचे स्नायू सुजतात, त्यामुळे मी योगसुद्धा करू शकत नाही. शीर पूर्ववत होण्यासाठी कृपया उपाय सुचवावा.
... वैशाली

उत्तर - मानेला, तसेच पाठीच्या मणक्‍याला रोज रात्री नियमितपणे खालून वर या दिशेने हलक्‍या हाताने ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावणे चांगले. बरोबरीने तूूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, ‘संतुलन वातबल गोळ्या’ किंवा सिंहनाद गुग्गुळ घेण्याचा उपयोग होईल. मानेत ज्या ठिकाणी शिरेवर शीर चढली होती त्याठिकाणी आठवड्यातून दोन वेळा ‘सॅन वात लेप’ गरम पाण्यात मिसळून तीस-चाळीस मिनिटांसाठी लावून ठेवण्याचा उपयोग होईल. लाटण्याने शीर मोकळी करण्यासाठी अनुभव असावा लागतो, नकळतेपणाने असे प्रयोग करण्याचे पुढे दुष्परिणामही सोसावे लागू शकतात. तेव्हा सांभाळून किंवा डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer