पथ्यापथ्य-अंगावर सूज

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 27 October 2017

पायांवर सूज येणे, चेहरा सुजणे, संपूर्ण अंगावर सूज येणे हे शरीरातील असंतुलनाचे लक्षण असते. याचे योग्य निदान करून घेणे, तसेच वैद्यांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घेणे हे गरजेचे असते.

पायांवर सूज येणे, चेहरा सुजणे, संपूर्ण अंगावर सूज येणे हे शरीरातील असंतुलनाचे लक्षण असते. याचे योग्य निदान करून घेणे, तसेच वैद्यांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घेणे हे गरजेचे असते.

अंगावर सूज अनेक कारणांनी येऊ शकते. मुका मार लागल्याने किंवा काही किडा-कीटक चावल्याने जी सूज येते ती सहसा स्थानिक (एका ठिकाणी मर्यादित) असते. ती थोड्या उपचारांनी, लेप वगैरे लावला की पूर्णतः नाहीशी होणारी असते; मात्र पायांवर सूज येणे, चेहरा सुजणे, संपूर्ण अंगावर सूज येणे हे शरीरातील असंतुलनाचे लक्षण असते. याचे योग्य निदान करून घेणे, तसेच वैद्यांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घेणे हे गरजेचे असते.

बरोबरीने आहार कसा योजावा याची माहिती आपण करून घेणार आहोत.
वातामुळे अंग सुजते तेव्हा त्यात वेदना असतात, त्वचेचा स्पर्श रुक्ष, खरखरीत होतो आणि सूज आलेल्या जागेवर दाब दिला, तर सूज सहजतेने दबली जाते; पण दाब काढला की ते ठिकाण लगेच पूर्ववत होते. या प्रकारच्या सुजेत अन्न शिजविण्यासाठी म्हणजे पेज, सूप, खिचडी वगैरे बनविण्यासाठी जे पाणी लागते ते पुढील औषधांनी संस्कारित करून घ्यायचे असते,

शुण्ठीपुनर्नवैरण्ड-पञ्चमूलश्रृतं जलम्‌ ।
वातिके श्वयथौ शस्तं पानाहारपरिग्रहे ।।
....भैषज्य रत्नाकर 
सुंठ, पुनर्नवा, एरंड या वनस्पतींचे मिश्रण किंवा बृहत्‌ पंचमूळ म्हणजे बेल, गंभारी, पाटला, श्‍योनाक, अग्निमंथ या वनस्पतींच्या मुळांचे मिश्रण यांनी षडंगोदक विधीने जल संस्कारित करावे व याच पाण्याचा स्वयंपाकात वापर करावा. तहान लागली असताना पाणी प्यायचे तेसुद्धा या वनस्पतींनी संस्कारित केलेले असावे. षडंगोदक विधी म्हणजे वनस्पतींच्या मिश्रणात ६४ पट पाणी घालून ते मंद आचेवर निम्मे शिल्लक राहीपर्यंत आटवायचे व गाळून घेऊन वापरायचे असते. 

सुजेमध्ये गोमूत्र हे पथ्यकर आणि औषधाप्रमाणे हितकर सांगितलेले आहे. 
गोमूत्रस्य प्रयोगो वा शीघ्रं श्वयथुनाशनम्‌ यवागुः ।।
....भैषज्य रत्नाकर 
रोज गोमूत्र पिण्याने आणि शोथघ्न (सूज कमी करणाऱ्या) द्रव्यांनी सिद्ध यवागू सेवन करण्याने सूज बरी होते. गोमूत्र प्यायचे असेल तेव्हा ते भारतीय वंशाच्या निरोगी गाईचे असावे. गोमूत्र जाडसर सुती कापडातून सात वेळा गाळून घेऊन, त्यात समभाग पाणी मिसळून प्यायचे असते. साधारणतः सकाळी सात-आठ चमचे, संध्याकाळी सात-आठ चमचे या प्रमाणात गोमूत्र-पाण्याचे मिश्रण घेता येते; मात्र वैद्यांच्या मार्गदर्शनाने हे प्रमाण कमी-जास्ती करता येते. शोथघ्न द्रव्यांनी संस्कारित यवागू बनविण्यासाठी प्रथम पुनर्नवा, दशमूळ, गुळवेल, गोक्षुर वगैरे द्रव्यांनी षडंगोदक पद्धतीने औषधी जल बनवून घ्यायचे असते. मग तांदळाच्या सहा पट हे औषधी जल घेऊन तांदूळ शिजेपर्यंत उष्णता द्यायची असते व तयार झालेली यवागू रुग्णाला प्यायला द्यायची असते. या प्रकारे रोज गोमूत्र आणि यवागू देण्याने सूज कमी होते.

आल्याचा रस आणि गुळाचे मिश्रण, तसेच बकरीचे दूध हे सुजेमध्ये पथ्यकर असते. 
आर्द्रकस्य रसः पीतः पुराणगुडमिश्रितः ।
अजाक्षीराशिनां शीघ्रं सर्वशोथहरो भवेत्‌ ।।
....भैषज्य रत्नाकर 
आले किसून त्याचा रस काढावा, त्यात जुना गूळ मिसळावा व तयार झालेले चाटण थोडे थोडे घेत राहावे. साधारणतः आल्याचा रस आठ ग्रॅम आणि तेवढाच गूळ घेऊन हे चाटण बनवता येते; मात्र प्रकृतीनुसार वैद्यांच्या सल्ल्याने यात बदल करावा लागू शकतो. तसेच बकरीचे दूध हेसुद्धा सर्व प्रकारच्या सुजेवर पथ्यकर असते,  
पुराणयवशाल्यन्नं दशमूलोपसाधितम्‌ ।
अल्पमल्पं कटुस्नेहं भोजनं शोफिनां हितम्‌ ।।
....भैषज्य रत्नाकर 
एक वर्ष जुने जव आणि साठेसाळीचे तांदूळ यांना दशमुळांनी सिद्ध केलेल्या पाण्यात शिजवून तयार केलेल्या सूप, पेज वगैरे गोष्टी, थोडे तूप व थोडी तिखट द्रव्ये (सुंठ, मिरी, पिंपळी, लवंग वगैरे) यांचा समावेश असलेले भोजन सुजेमध्ये हितकर असते. 
चरकसंहितेमध्ये सुजेसाठी पुढील पदार्थ पथ्यकर सांगितलेले आहेत, 
 पिंपळीयुक्‍त कुळथाचे सूप
 सुंठ, मिरी, पिंपळी व यवक्षार मिसळलेले मुगाचे सूप
 एक वर्ष जुने यव व तांदूळ
 परवर, गाजर, मुळा, कडुनिंबाची कोवळी पाने यांची भाजी

सुजेवर पथ्य - 
कुळीथ, यव, तांदूळ, मूग, जुने तूप, ताक, मध, आसव, कारले, शेवगा, गाजर, परवर, मुळा, गोमूत्र, हळद, पुनर्नवा, पडवळ, गरम पाणी वगैरे

सुजेवर अपथ्य -
विरुद्ध अन्न, मीठ, सुकवलेल्या भाज्या, गुळाचे पदार्थ, दही, आंबट गोष्टी, पचण्यास जड पदार्थ, उडीद, गहू, थंड पाणी, मका, पावटा, वाल, चवळी, सोयाबीन, श्रीखंड, चीज, रताळी, साबुदाणा वगैरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Regimen