गणतंत्र दिवस

अगदी गर्भावस्थेत शरीर तयार होते ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांतील परस्परक्रियेने.
अगदी गर्भावस्थेत शरीर तयार होते ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांतील परस्परक्रियेने.

आपल्या तन-मन-मेंदूकडून ज्या क्रिया केल्या जातात, त्यांचा स्थूूल अशा पंचमहाभूतांवर परिणाम होतो. निर्णय योग्य असले तर क्रिया बरोबर होतात, अर्थातच पंचमहाभूतात्मक शरीर निरोगी, सुखी व संतुलित राहते. पण जर यातील एकही तत्त्व भ्रष्ट झाले तर त्याचा दुष्परिणाम इतर सर्वांवर होऊ शकतो, परिणामी अनारोग्य, दुःख, वेदना यांना सामोरे जावे लागते.

भारताचा २६ जानेवारी हा गणतंत्र दिवस. भारत देश स्वतंत्र झाल्यावर सर्व लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारा म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य चालविण्यासाठी आवश्‍यक असणारी घटना ज्या दिवशी प्रत्यक्ष अमलात आली तो दिवस म्हणजे गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस. लोकशाहीमध्ये सर्वांनी एकमेकांच्या सहयोगाने काम करायचे असते आणि देशाची अंतर्गत व्यवस्था, परराष्ट्रांबरोबरचे संबंध सुधारत नेत देशाला, देशातील लोकांना प्रगत करायचे असते. आपले शरीरही याच तत्त्वावर चालत असते. म्हणून आयुर्वेदाने शरीराची व्याख्या केली ती अशी, 
तत्र शरीरं नाम चेतनाधिष्ठानभूतं पञ्चमहाभूतविकारसमुदायात्मकं समयोग वाहि च ।

चैतन्यतत्त्व अर्थात आत्मा, त्याच्या आधाराने असणारे मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिये ही सूक्ष्म तत्त्वे आणि पंचमहाभूतांपासून तयार झालेले स्थूल शरीर यांच्या समुदायाला, यांच्यातील समयोगाला, यांच्यातील सुसंवादाला ‘शरीर’ असे म्हणतात. कोणत्याही कारणामुळे यांच्यातील सुसंवाद बिघडला, तुटला तर शरीराचे तंत्र बिघडते, शरीराच्या अस्तित्वावरही गदा येऊ शकते. 

पंचमहाभूते शरीर घडविण्यात, आकाराला आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अगदी गर्भावस्थेत शरीर तयार होते ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यातील परस्परक्रियेने. प्रत्येक महाभूताची आपापली अशी मुख्य जबाबदारी असते, जी शरीर तयार होण्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत निभावणे अपेक्षित असते. 

पृथ्वी महाभूताचे महत्त्वाचे कार्य म्हणजे घनता. शरीर घटकांना स्थिरता देणे, शरीराचे स्वरूप व आकार टिकवून ठेवण्याचे काम पृथ्वी महाभूत करते. 
जल महाभूताचे कार्य आहे द्रवता. शरीराला आवश्‍यक तो ओलसरपणा देणे, शरीर घटकांचे पोषण करणे व दोन गोष्टी जोडून ठेवून संधानाचे कार्य जल महाभूत करत असते.

तेज महाभूत उष्णतेशी संबंधित आहे. शरीरातील विविध प्रकारचे पचन, रूपांतरणाचे कार्य हे महाभूत करत असते.

वायू महाभूत शरीरातील सर्व हलनचलनाशी संबंधित असून सर्व दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या किंवा न जाणवणाऱ्या क्रिया या महाभूतामुळे होत असतात.

आकाश महाभूत आपल्या नावाप्रमाणेच अवकाश देते. शरीरातील विविध क्रिया होण्यासाठी, रक्‍त हृदयापासून ते पायाच्या बोटांपर्यंत पोचवण्यासाठी, श्वास नाकातून फुप्फुसांपर्यंत पोचवण्यासाठी व अशा इतर सर्वच वहनासाठी जी पोकळी लागते ती आकाश महाभूतापासून मिळत असते. 

या पंचमहाभूतांच्या गुणांचा विचार केला तर ते एकमेकांपेक्षा कितीतरी वेगळे आहेत हे समजते. उदा. अग्नी आणि जल हे एकमेकांना नष्ट करू शकतात. पृथ्वी आणि आकाश परस्परविरुद्ध गुणाचे असतात. वायुमुळे अग्नी विझूही शकतो किंवा झपाट्याने पसरूही शकतो. अर्थात प्रत्येक महाभूत इतरांपेक्षा वेगळे असले तरी ती सर्व एकमेकांच्या सहकार्याने राहतात, एकमेकांना सांभाळून आपापले योगदान देत शरीराचे धारण-पोषण करतात. हे सहकार्य बिघडले तर बघता बघता आरोग्य धोक्‍यात येईल हे नक्की. उदा. शरीरातील पृथ्वी महाभूत बिघडले तर हाडांमध्ये दोष उत्पन्न होऊ शकतो, उंची नीट वाढत नाही, शरीरातील प्रमाणबद्धता, बांधेसूदपणा बिघडतो. शरीरातील जल महाभूत बिघडले तर अंगावर सूज येऊ शकते, फार तहान लागणे, अंग कोरडे पडणे असेही त्रास होऊ शकतात. शरीरातील अग्नी महाभूत बिघडले तर संपूर्ण पचनसंस्था बिघडते, संप्रेरक व्यवस्थेत बिघाड होतात, त्वचेत दोष उत्पन्न होतो. वायू महाभूत बिघडले तर चेतावहसंस्थेत दोष तयार होतात, रक्‍ताभिसरण बिघडते, हालचाली कष्टप्रद होतात. शरीरातील आकाश महाभूत बिघडले स्रोतसांमध्ये अडथळे निर्माण होणे, जो भाग रिकामा असायला हवा तेथे गाठ येणे, पाणी साठणे वगैरे त्रास होऊ शकतात. एकाच वेळी दोन-तीन महाभूते बिघडली तर त्यातून अजूनच मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

आत्मा, मन, बुद्धी, पंचज्ञानेंद्रिये व अहंकार ही तत्त्वे सूक्ष्म असली तरी त्यांची कार्यक्षमता मोठी असते. यातील आत्मा फक्‍त अनुभव घेणारा असतो, सर्व गोष्टी करवून घेणारा असतो. म्हणूनच त्याला ‘कर्ता’ असे म्हणतात. तो ज्यांच्याकरवी काम करून घेतो त्यांना ‘करण’ म्हणजेच ‘साधन’ असे म्हटले जाते. ‘करण’ चे ‘अंतःकरण’ व ‘बाह्यकरण‘ असे दोन भाग पडतात. मन, बुद्धी, व अहंकार हे अंतःकरण तर दहा इंद्रिय हे बाह्यकरण होय. संपूर्ण शरीराचा सर्व व्यवहार संतुलित चालवायचा असेल तर अंतःकरण, बाह्यकरण व आत्मा यांच्यात सुसूत्रता हवी. आत्मा हा सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा असल्याने त्याला डावलून मनाने किंवा अहंकाराने चुकीचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम शारीरिक,मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवर चुकीचा होणार हे नक्की असते. जेव्हा जेव्हा आपल्याला आतून काहीतरी वेगळे वाटत असते, पण प्रत्यक्षात मात्र आपण तसे न करता वेगळेच काहीतरी करतो, त्यावेळी ही सुसूत्रता बिघडलेली असते आणि त्याचा आज ना उद्या दुष्परिणाम सहन करावाच लागतो. 

इंद्रिये दोन प्रकारची असतात. पाच ज्ञानेंद्रिये कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा या अवयवांच्यामार्फत ऐकणे, वास घेणे, बघणे, चव घेणे, स्पर्शाचा अनुभव घेणे ही कार्ये करत असतात. तर पाच कर्मेंद्रिये, हात, पाय, वाणी, मल-मूत्र विसर्जन करणारे अवयव व जननेंद्रियांच्या मार्फत देणे-घेणे वगैरे हातांकरवी होणाऱ्या क्रिया, चालणे, पळणे वगैरे पायांकरवी होणाऱ्या क्रिया, बोलणे, मल-मूत्रविसर्जन, मैथुनकर्म ही कार्ये करत असतात. सभोवतालच्या गोष्टींचे ज्ञान करून देणारी ती ज्ञानेंद्रिये आणि विविध क्रिया करणारी ती कर्मेंद्रिये. ही सर्व इंद्रिये स्वतःची कामे करतात, तसेच मनाला, आत्म्याला रिझवण्याचे, सुखावण्याचे कामही इंद्रियांकडूनच होते. पण याची मर्यादा सांभाळली नाही तर मात्र इंद्रिये फक्‍त सुखाच्या मागे लागतात; स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय, योग्य काय, अयोग्य काय याचे भान राहिले नाही तर पुन्हा एकदा आत्मा-अंतःकरण-बाह्यकरणे-पंचमहाभूते या साखळीतील सुसूत्रता नष्ट होतो आणि अनारोग्याला आमंत्रण मिळते. उदा., अन्न नीट पचावे अशी इच्छा असेल तर ते प्रकृतीला अनुरूप असायला हवे तसेच चविष्टही असायला हवे. ही चव मनामार्फत आत्म्यापर्यंत पोचविण्याचे काम करते ते रसनेंद्रिय, पण जर रसनेंद्रियाने फक्‍त चवीचा विचार केला, अन्नातील पोषणमूल्यांना दुर्लक्षित केले तर आरोग्य बिघडू शकते. बोलणे ही क्रिया सुसंवादासाठी अपरिहार्य असली तरी बोलण्याचा अतिरेक वातदोषाला वाढवून अनेक रोगांना कारण ठरू शकतो. डोळ्यांवर अति ताण आला तर त्यामुळेही संपूर्ण आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. अशी किती तरी उदाहरणे सांगता येतील. 

मन हे तर सर्वांत महत्त्वाचे. इंद्रियांना आज्ञा देणारे आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारे मन खूप महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर असते. मनाने सर्वांचा विचार केला तर कामही व्यवस्थित होते आणि आरोग्यही नीट राहते. मात्र मनाने फक्‍त सुखाचा व स्वतःच्या फायद्याचा विचार केला तर त्यातून सरतेशेवटी मोठे नुकसान झालेले दिसते. संयम शक्‍ती, धीर धरण्याची वृत्ती, सतत सतर्क, सावध राहण्याची क्षमता, अष्टावधानीपणा वगैरे अनेक गोष्टी मनाच्या आधीन असतात आणि म्हणून मनाची शुद्धता, संपन्नता, सात्त्विकता ही सुद्धा एकंदर आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते.

मनाला योग्य दिशा देणारी असते ती बुद्धी. मनाचा निश्‍चित निर्णय बुद्धीकडून मिळतो म्हणून बुद्धीला ‘निश्‍चयात्मिका’ म्हटले जाते. बुद्धी न्यायाधिशाप्रमाणे काम करत असते, सारासार विचार करून एका निर्णयाप्रत आणते. मनाची दोलायमानता संपुष्टात आणून अचूक निर्णय घेणे शुद्ध बुद्धीमुळेच शक्‍य असते. उदा. खोकला झालेला असताना आईस्क्रीम खाणे अयोग्य आहे हे बुद्धी जाणून असते. उन्हामुळे उकडत असताना, मित्रमंडळींच्या संगतीत असताना समोर आईस्क्रीम आले तर जिभेला ते खायचा मोह होईल. मनही ‘आईस्क्रीम खाऊ का नको खाऊ‘ या संभ्रमात सापडेल, मात्र बुद्धी ’सध्या खोकला झाल्याने आईस्क्रीम खाणे अयोग्य आहे‘ असा निर्णय देईल. शेवटी या निर्णयाचा स्वीकार करायचा का नाही हे मन व इंद्रियांच्या आधीन असते पण योग्य दिशा दाखवण्याचे काम बुद्धी करत असते.

हे माझे, हे मला हवे, हे मला आवडते ही भावना अहंकारामुळे असते आणि बुद्धी निर्णय घेताना आणि मन इंद्रियांना आज्ञा देताना त्यावर अहंकाराचा मोठा प्रभाव असतो. मनाची सात्त्विकता किंवा राजसिक-तामसिक प्रवृत्ती अहंकाराच्यायोगे ठरत असते. एकंदर ही सर्व सूक्ष्मतत्त्वे एकमेकांना सहायक असतात, एकमेकांवर मोठा प्रभाव टाकणारी असतात. यातील एखादे तत्त्व जरी बिघडले तर त्याचा इतर सर्वांवर दुष्परिणाम होतो. 

इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या सर्वांच्या पलीकडे अनुभव घेणाऱ्या आत्म्याकडून जे निर्णय घेतले जातात, ज्या क्रिया केल्या जातात, त्यांचा स्थूूल अशा पंचमहाभूतांवर परिणाम होतो. निर्णय योग्य असले तर क्रिया बरोबर होतात, अर्थातच पंचमहाभूतात्मक शरीर निरोगी, सुखी व संतुलित राहते. पण जर यातील एकही तत्त्व भ्रष्ट झाले तर त्याचा दुष्परिणाम इतर सर्वांवर होऊ शकतो, परिणामी अनारोग्य, दुःख, वेदना यांना सामोरे जावे लागते.

अशा प्रकारे प्रजासत्ताक राष्ट्र असणाऱ्या आपल्या भारतदेशाचा एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपली देशाप्रती असणारी जबाबदारी पार पाडू या आणि त्यासाठी आवश्‍यक असणारे आरोग्य राखण्यासाठीही तत्पर राहू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com