esakal | आजार तो जाणावा!
sakal

बोलून बातमी शोधा

Kidney

आजार तो जाणावा!

sakal_logo
By
प्रा. डॉ. सुरेश पाटणकर,संतोष शेणई

मूत्रपिंडाच्या आजारांविषयी सामान्यांना फारशी माहिती नसते. पण वेगवेगळ्या मोठ्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर मूत्रपिंडाची काळजी घेणे आवश्‍यक आहे. बहुतेक वेळा मूत्रपिंडाच्या आजारांची लक्षणे सुरवातीला वेगळी ओळखू येत नाहीत. अशक्तपणा, थकवा, थोड्या कामानेही थकून जाणे, झोपेचे चक्र बिघडणे अशी काही लक्षणे दिसू शकतात.

मूत्रपिंड हा शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. मात्र मूत्रपिंडाच्या आजारांविषयी सामान्यांना फारशी माहिती नसते. 

‘हार्ट ॲटॅक‘संबंधी समाजातील जागरूकता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. मग ‘किडनी ॲटॅक‘इतका दुर्लक्षित का? समाजाच्या एका विसंगत वर्तनाकडे लक्ष वेधतो. एकीकडे हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब व स्थूलता याविषयी जागृती वाढत असल्याचे दिसत असतानाच, आपल्या संपूर्ण शरीराविषयी जाणून घेण्याची व शरीराची काळजी घेण्याविषयीची अनास्थाही तेवढीच आहे. ही अनास्थाच यामागे कारणीभूत आहे. पण वेगवेगळ्या मोठ्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर मूत्रपिंडाची काळजी घेणे आवश्‍यक आहे, हे प्रत्येकानेच जाणायला हवे. 

आपल्याला किडनीचे आजार आहेत का, हे एखाद्याने कसे ओळखावे?
एक खऱे की, बहुतेक वेळा मूत्रपिंडाच्या आजारांची लक्षणे सुरुवातीला वेगळी ओळखू येत नाहीत. अशक्तपणा, थकवा, थोडया कामानेही थकून जाणे, झोपेचे चक्र बिघडणे अशी काही लक्षणे दिसू शकतात. पण ही लक्षणे मूत्रपिंडाच्या आजाराचीच असतील असे लक्षात येत नाही. दगदग झाली असेल, अतिकामाचा ताण आला असेल असे वाटून या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. पण रात्री झोपल्यानंतरही उठून लघवीला जावे लागणे, चेहऱ्यावर सूज येणे, सकाळी उठल्यावर पायांवर सूज दिसणे, तरुणपणीही रक्तदाब जास्त आणि हिमोग्लोबिन कमी असणे, अशी लक्षणे किडनीच्या आजारांशी जोडता येऊ शकतात. येथेही एक प्रश्न उद्भवतो की, रात्री झोपल्यानंतर लघवीला जावे लागणे सदासर्वदा चुकीचेच समजावे का? मूत्राचे ‘संचयन‘ करणे हे किडनीचे प्रमुख काम आहे. किडनीच्या आजारात किडनीच्या या मूळ स्वभावावर परिणाम होऊन व्यक्तीला अधिक विरलित (डायल्युटेड) मूत्रप्रवृत्ती होते. आपल्याला तुलनेने अधिक वेळा लघवीला जावे लागले ही बाब दिवसा कामाच्या व्यापात व्यक्तीच्या लक्षात न येणे शक्‍य आहे. पण रात्री झोपल्यानंतर दोन ते चार वेळा लघवीला जावे लागत असेल आणि शरीरस्वभावात हा बदल अचानकच दिसत असेल, तर त्याचा संबंध किडनीच्या आजाराशी असू शकतो. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, रात्री झोपतांना पाणी, कॉफी, चहा असे द्रवपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केलेले असेल तर झोपेतून एखाद्या वेळी लघवीसाठी उठावे लागते आणि ते योग्यच आहे. पण तसे नसतानाही झोपेतून दोन-चार वेळा उठावे लागत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणेच उचित ठरेल. वयस्कर व्यक्तींमध्ये रात्री मूत्रप्रवृत्ती होण्याचे लक्षण प्रोस्टेट ग्रंथीच्या अनावश्‍यक वाढीच्या आजारातही दिसते. मधुमेहाच्या रुग्णांमध्येही हे लक्षण दिसून येते. तेव्हा अशा वेळी या इतर आजारांच्या शक्‍यतेचीही खातरजमा करणे आवश्‍यक आहे. मात्र डायल्युटेड मूत्रप्रवृत्तीचा संबंध किडनीशी असतो हे लक्षात ठेवावे. 

किडनी आजारांची शक्‍यता अधिक कोणाला? जागरूक कसे राहावे?
उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, यकृताचा तीव्र आजार, मूत्रसंसर्ग, मूतखडा, संधिवात अशा आजारांच्या रुग्णांना किडनीचे आजार होण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे या रुग्णांनी त्यांच्या किडनीच्या कार्याबद्दल जागरूक राहणे आवश्‍यक आहे.

तुमची किडनी योग्य रीतीने कार्य करते आहे का हे जाणून घेण्यासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ठराविक काळाने रक्त आणि लघवीच्या तपासण्या करून घेणे इष्ट असते. अनेकदा रुग्णांना वाटते, की किडनीच्या तपासणीसाठी अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफीची तपासणी पुरेल. पण अल्ट्रासाऊंड तपासणीत किडनीची रचना दिसते, तिचे कार्य नव्हे.

अल्ट्रासाऊंडमध्ये किडनी अगदी सुस्थितीत दिसत असूनही तिच्या कार्यात बिघाड झालेला असू शकतो. त्यामुळे किडनीच्या कार्याची माहिती घेण्यासाठी रक्त आणि लघवीच्या तपासण्या हाच सोपा पर्याय आहे. आता चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या वरील व्यक्तींमध्ये ठराविक काळाने रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्टेरॉल तपासून घ्यायची जागरूकता वाढते आहे. याच वेळी रक्तातील ‘युरिया’ आणि ‘क्रिएटिनीन’ या घटकांची पातळीही तपासून घ्यावी. शिवाय ‘युरीन रुटीन’ तपासणीतून लघवीत उतरणाऱ्या प्रथिनांविषयी माहिती मिळते. किडनीचे कार्य योग्य रीतीने चालले आहे की नाही, एवढे समजून घ्यायला ही तपासणी प्राथमिक पातळीवर पुरेशी आहे.
 
सुरक्षा किडनीची
आपल्याला माहित आहे का?शरीरातल्या दोन्ही किडन्यामध्ये प्रत्येक मिनिटाला बाराशे मिलीलिटर रक्त शुद्ध होण्यासाठी येते. हे रक्त हृद्याद्वारे शरीरात पोहोचणाऱ्या संपूर्ण रक्ताच्या वीस टक्‍क्‍याएवढे असते.या प्रकारे चौवीस तासात साधारण सतराशे लिटर रक्ताचे शुद्धीकरण केले जाते.

रक्त शुद्ध करून मूत्र तयार करणाऱ्या किडणीच्या सर्वात छोट्या आणि बारीक भागाला ’नेफ्रॉन’ म्हणतात. ही छोटी स्वयंपूर्ण गाळणी असते. प्रत्येक किडणीत सुमारे दहा लाख नेफ्रॉन असतात. प्रत्येक नेफ्रॉनचे दोन भाग असतात. पहिला ग्लोमेरुल्स आणि दुसरा ट्युबुल्स.

ग्लोमेरुल्स या गाळणीतून प्रत्येक मिनिटाला १२५ मिलिलिटर रक्त गाळले जाते. या भागात चौवीस तासात  १८० लिटर द्रव वेगळे केले जाते. या  १८० लिटर द्रवात अनावश्‍यक पदार्थ, युरिया, क्षार आणि विषारी पदार्थ असतात. त्याचबरोबर शरीराला आवश्‍यक ग्लुकोज, प्रथिने आणि अन्य पदार्थही असतात. 

ग्लोमेरुल्समध्ये गाळून आलेले द्रव नंतर ट्युब्युल्समध्ये जाते. तेथे शरीराला आवश्‍यक असे ग्लुकोज, प्रथिने यासारखे पदार्थ शोषले जातात. जवळपास  ९९ टक्के द्रवपदार्थ येथे पुन्हा शोषले जातात. ट्युबुल्समध्ये हे जाणीवपूरस्सर शोषण केले जाते. जाणिवपूरस्सर शोषण असे का म्हणायचे? कारण, गाळून वेगळ्या केलेल्या १८० लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणातील द्रवातून आवश्‍यक पदार्थ आणि पाणी पुन्हा शरीरात शोषले जाते.त्यानंतर केवळ एक ते दीड लिटर मूत्र तयार होते आणि त्यातून पूर्ण कचरा, अनावश्‍यक क्षार बाहेर फेकले जातात. 

अशा प्रकारे किडनीत अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेद्वारे झालेल्या सफाईनंतर निर्माण झालेले मूत्र मूत्रवाहिनीद्वारे मूत्राशयात जाते. येथे मूत्रसंचय होतो. मूत्राशयात साधारण २०० ते ३०० मिलिलिटर मूत्र साठल्यानंतर लघवीची भावना होते आणि मूत्रनलिकेद्वारे शरीरातून मूत्र बाहेर टाकले जाते. 

लघवीचे प्रमाण कमी-जास्त
निरोगी किडनी असणाऱ्या व्यक्तींमध्ये मूत्राचे प्रमाण कमी किंवा जास्त असू शकते. मूत्र संचयाचे प्रमाण हे काही अन्य गोष्टींवरही अवलंबून असते. 
 मूत्राचे प्रमाण हे प्यायलेल्या पाण्याचे, द्रव पदार्थांचे प्रमाण आणि वातावरणातील तापमान यावर अवलंबून असते. साधारणतः दिवसभरात एक ते दीड लिटर मूत्र बाहेर फेकले जाते. अर्धा लिटर पाणी त्वचेच्या छिद्रातून बाहेर पडते. मात्र याहून अधिक द्रव पदार्थ सेवन केलेले असल्यास मूत्राचे प्रमाण त्या दिवशी वाढेल. किंवा द्रव पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात झाले असल्यास त्या दिवशी लघवीचे प्रमाण घटेल.  

जर कोणी पाणी कमी पीत असेल तरीही चयापचय क्रियेमुळे अर्धा लिटर लघवी होईलच. मात्र हे मूत्र घट्ट तयार होते.गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायले  गेले असेल तर जास्तवेळा आणि पातळ लघवी होते. उन्हाळ्यात घाम जास्त आल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते आणि पावसाळ्यात व थंडीत घाम येत नसल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. 

निरोगी किडनीद्वारे तयार होणाऱ्या मूत्राचे प्रमाण लक्षात घेतले तर, सर्वसाधारण प्रमाणात पाणी पिणाऱ्या व्यक्तीला अर्ध्या लिटरहून कमी किंवा तीन लिटरहून अधिक लघवी होत असेल, तर हे किडनीच्या तंदुरुस्तीला बाधा पोहोचल्याचे लक्षण असू शकते, हे जाणून वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल. 

किडनीची काळजी - दहा टिप्स
मानवी शरीरातून टाकाऊ घटक बाहेर टाकण्याचे मुख्य काम मूत्रसंस्था (किडनी) करते, हे आपण पाहिले.मूत्रपिंडात असलेल्या असंख्य सूक्ष्म गाळण्यांमधून पाणी व टाकाऊ घटक गाळल्यानंतर शरीरात मूत्राची निर्मिती होते. वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालू राहत असल्याने अंदाजे वयाच्या तिशी-चाळीशीनंतर नैसर्गिकरित्या किडनीचे कार्य मंदावते. तिशीनंतर दर दहा वर्षांनी किडनीचे कार्य दहा टक्‍क्‍यांनी मंदावतजाते, असे दिसते. मात्र त्या आधीच्या टप्प्यातच किडनीवर अतिरिक्त ताण दिला जात असेल, तर किडनीविकार लवकर बळावण्याची दाट शक्‍यता असते. म्हणूनच शाळांमध्ये अधिक प्रमाणात व स्वच्छ अशी स्वच्छतागृहे असावीत आणि मुलांना मधल्या सुटीत लघवीला आवर्जून पाठवावे, असा आग्रह असतो.

अभ्यासाच्या किंवा कामाच्या ताणाखाली, चित्रपट-नाटक पाहताना, पुस्तक वाचताना लघवीचा आवेग रोखला जातो. असे वारंवार घडत असेल तरी त्याचा किडनीवर ताण येतो. किडनीची काळजी घेण्यासाठी दहा उपाय नक्की करून पाहा.
१) रोज भरपूर पाणी प्या - नियमित भरपूर पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहते व विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासही मदत होते. पाण्यामुळे शरीरात रक्त योग्य प्रकारे प्रवाहित राहते. तसेच पचनक्रिया व शरीराचे तापमान योग्य राखण्यास पाणी सहायकारी ठरते. म्हणूनच नियमित दीड ते दोन लिटर पाणी दिवसभरात पिणे आवश्‍यक आहे. अधिक काटेकोर सांगायचे तर साधारणतः तुम्हाला जेवढी लघवी होते, त्याहून अर्धा लिटर पाणी अधिक प्या.

२) योग्य आहार घ्या - तुम्ही काय आहार घेता, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. जर फ़ास्टफूड, जंकफूड यासारखे अपायकारी अन्नपदार्थ अधिक प्रमाणात व वारंवारखाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम किडनीवर निश्‍चितच दिसून येतो.म्हणूनच योग्य व सकस आहार निवडा. आहारात कलिंगड, संत्रे, लिंबू यासारखी फळे आणि शतावरी, लसूण, मासे यांचा समावेश असावा. रोजचा दिवस लिंबाचा रस घातलेले कोमट पाणी पिऊन सुरू झाला तर तुमच्या किडनीचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत होईल.

३) मूत्राचा आवेग रोखू नका - रक्त गाळून त्यातील टाकाऊ घटक शरीराबाहेर टाकण्याचे काम किडनी करीत असते. हे शरीरातील टाकाऊ घटक व अतिरिक्त पाणी मूत्राशयात साठून राहतात. अंदाजे दीडशे-दोनशे मिलिलिटर मूत्र मूत्राशयात साचल्यानंतर लघवीची इच्छा निर्माण होते. अशा वेळेस लघवी अडवून ठेवू नका. लघवीचा आवेग वारंवार रोखल्याचा ताण मूत्राशयावर येऊन रक्त गाळण्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊ शकतो.

४) मीठ अतिप्रमाणात खाऊ नका - मिठाच्या सेवनाने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. सोडियम वाढल्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढतेच, पण त्या सोबतच मुतखडा होण्याचाही संभव अधिक असतो.  

५) आरोग्यदायी पेय घ्या - फळांचा ताजा रस घेणे हे किडनीचे आरोग्य सुधारण्याचा व शरीरात अधिकाधिक द्रवाचा समावेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामुळे पचनसंस्थेला अधिकाधिक पाणी मिळेल व त्यामुळे टाकाऊ घटक शरीराबाहेर टाकण्यास मदत होईल. ‘चहा’ व ‘कॉफी’ घेणे टाळा. यातील ‘कॅफिन’च्या घटकामुळे शरीरातील द्रवाचे प्रमाण कमी होते. जर तुम्हाला किडनीविकार असेल तर बीट व पालक या भाज्यांचा रस घेणे टाळा. या भाज्यांमुळे ‘ऑझॅलिक’ या आम्लाची (ॲसिडची) निर्मिती वाढते व त्यामुळे मुतखडा होण्याची शक्‍यता वाढते. आणि हो, तुम्ही शहाळ्याचे पाणी अवश्‍य पिऊ शकता.

६) योग्य व नियमित व्यायाम करा - लठ्ठपणाचा थेट परिणाम किडनीवर होत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. वजन नियंत्रणात नसल्यास किडनीविकार होण्याची शक्‍यता दुप्पटीने वाढते. योग्य व्यायाम, आहार व नियंत्रणात असलेले वजन यांमुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच नियमित व्यायाम केल्याने तुम्ही प्रसन्न राहता.

७) मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग काबूत ठेवा - मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग यासारख्या आजारांतून ‘किडनीविकार’ बळावण्याची शक्‍यता अधिक असते. म्हणूनच योग्य आहार, व्यायाम व योगसाधनेने तुम्ही रक्तातील साखर,कोलेस्टेरॉल व रक्तदाब नियंत्रणातठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपोआपच किडनीविकार दूर राहण्यास मदत होईल.

८) डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा - तुम्ही घेतलेले कोणतेही औषध हे किडनीतून गाळले जाते. जर तुम्ही स्वतःच औषधांची मात्रा वाढवली किंवा डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय अन्य औषधे घेतली तर  त्यातील विषारी घटकांचा भार किडनीवर पडतो. म्हणूनचडॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसारऔषधांची मात्रा घ्या वस्वतःच स्वतःची औषधे ठरवणे टाळा.

९) पूरक (सप्लिमेंटस्‌)व हर्बल औषधे घेण्यापूर्वी विचार करा - जर तुम्ही पूरक (सप्लिमेंटस्‌ ) व्हिटामिन किंवाहर्बल औषधेंघेतअसाल तर त्याच्या मात्रांचा जरूर विचार करा. अतिरिक्त प्रमाणात घेतलेल्याव्हिटामिन व काही वनस्पतींच्या अर्कांचा किडनीवर विपरित परिणाम होतो. म्हणूनच अशी औषधें घेण्यापूर्वीडॉक्‍टरांशी त्यातून किडनीविकार उद्भवण्याच्या शक्‍यतेबाबत जरूर सल्ला घ्या.

१०) धूम्रपान व मद्यपान टाळा - अतिरिक्त प्रमाणात मद्यपान केल्यास शरीरात किडनीचे कार्य सुरळीत करणाऱ्या संप्रेरकांवर (हार्मोन्सवर) दुष्परिणाम होतो. धूम्रपानामुळे थेट किडनीवर परिणाम होत नसला तरीही त्यामुळे हृदयरोग बळावण्याची शक्‍यता अधिक असते व त्याचा अप्रत्यक्ष परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.

loading image
go to top