शिक्षक दिनाच्या निमित्ताने...

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 8 September 2017

आदर्श शिक्षक आणि शिकण्यासाठी तत्पर असणारा शिष्य जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ‘एवं विद्या प्रकाशते मित्रयशोधर्मार्थकामांश्‍च प्राप्नोति’ म्हणजे विद्येचे तेज वाढते, मित्र जोडले जातात, यश मिळते आणि धर्म, अर्थ, काम या तिन्ही पुरुषार्थांची प्राप्ती होते असे शास्त्रवचन आहे.
 

आदर्श शिक्षक आणि शिकण्यासाठी तत्पर असणारा शिष्य जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ‘एवं विद्या प्रकाशते मित्रयशोधर्मार्थकामांश्‍च प्राप्नोति’ म्हणजे विद्येचे तेज वाढते, मित्र जोडले जातात, यश मिळते आणि धर्म, अर्थ, काम या तिन्ही पुरुषार्थांची प्राप्ती होते असे शास्त्रवचन आहे.
 

शिक्षक दिन आपण नुकताच साजरा केला. शिक्षक दिनाची विशेषता अशी, की ही संकल्पना जवळ जवळ सर्व देशांमध्ये रुजलेली असली तरी हा दिन साजरा करण्याचा दिवस आणि पद्धत देशानुरूप बदलत जाते. उदा. कॅनडामध्ये पाच ऑक्‍टोबरला, चीनमध्ये दहा सप्टेंबरला, मलेशियामध्ये सोळा मे रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या देशात पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांचा जन्मदिवस म्हणजेच पाच सप्टेंबर हा दिवस आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून समजला जातो. भारतामध्ये १९६२ पासून शिक्षक दिन साजरा केला जातो. 

आदर्श शिक्षकाचा प्रभाव हा आईवडिलांपेक्षाही जास्ती असतो हे आपण सर्वजण जाणतो. खरे शिक्षक विद्यार्थ्याला फक्‍त पुस्तकी ज्ञान न शिकवता खऱ्या अर्थाने घडवत असतात, जीवनाला सामोरे कसे जायचे हेही कळत नकळत शिकवत असतात म्हणूनच शिक्षण संपले तरी मनात शिक्षकांबद्दलचा आदर, आपुलकी कायम राहते हा अनुभव आपल्या सगळ्यांचा असेल. हाडाचे शिक्षक फक्‍त परीक्षेपुरते शिकवत नाहीत, तर त्यांना विद्यार्थ्यांला त्या त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि संपूर्ण कुशलतेने काम करणाऱ्या व्यक्‍तीत परिवर्तित करायचे असते. यासाठी त्यांना कुशल वक्‍तृत्वाची देणगी असावी लागते. लहान मुलांना शिकविणाऱ्या शिक्षकांना तर अखंड बोलत राहावे लागू शकते, यासाठी शिक्षकांनी घसा कोरडा होईपर्यंत न बोलणे, अधून मधून पाण्याचा एखादा घोट घेणे चांगले असते. तास सुरू होण्याआधी किंवा संपल्यावर चांगल्या प्रतीची खडीसाखर किंवा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळणे उपयोगी पडणारे असतो. काळ्या मनुकासुद्धा स्वराला, कंठाला हितकर असतात. त्यामुळे मधल्या वेळेत मनुका, खडीसाखर, अंजीर यांचे मिश्रण खाणे, अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण तूप-मधाबरोबर मिसळून थोडे थोडे घेत राहण्याने बोलण्याचे श्रम दूर होण्यास उत्तम मदत मिळते. 

पूर्वी आपल्या देशात गुरूकुल पद्धतीने शिक्षण होत असे. यात विद्यार्थी गुरूंच्या किंवा आचार्यांच्या आश्रमात जाऊन राहत असे आणि आचार्यांच्या घरातलाच एक सदस्य म्हणून राहत असे. यात ज्ञानार्जनाच्या बरोबरीने त्याच्यावर आचार्यांच्या संगतीचा, आश्रमातील नैसर्गिक व साध्या वातावरणाचा संस्कारही होत असे. सध्याच्या काळात गुरूकुलाची जागा विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठांनी घेतलेली असली, तरी आदर्श शिक्षक - विद्यार्थ्याचे नाते आजही कायम राहण्याची गरज आहे.

विद्यार्थ्याने शिक्षकाला द्यायचा आदर आणि शिक्षकांनी कोणताही आडपडदा न ठेवता, स्वार्थबुद्धी न ठेवता विद्यार्थ्याला शिकवण्याची मनोवृत्ती यात बदल होऊन चालणार नाही. यासाठी विद्यार्थ्याने अनुशासनाला महत्त्व देणे, आचार विचारात संयम ठेवणे आणि शिक्षकांनी आपली कर्तव्यपरायणता कायम ठेवणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आयुर्वेदात या दृष्टीने आदर्श शिक्षक आणि आदर्श विद्यार्थी कसे असतात याचे वर्णन दिलेले आहे. काळानुसार यातील परिभाषेत फरक होणे अपरिहार्य असले तरी त्यामागचे तत्त्व नीट समजून घेतले तर त्यातली यथार्थता लक्षात येऊ शकते.

आदर्श शिक्षक हे शास्त्रातील मर्मांना उत्तम प्रकारे जाणणारे व विषयाचे सखोल ज्ञान असणारे असतात. त्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरीने प्रात्यक्षिकाचा अनेकदा अनुभव घेतलेला असतो व त्यात ते कुशल असतात. शिकवतांना सर्व बारीक सारीक गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते, त्यांचे आचरण शुद्ध, पवित्र असते, त्यांच्या हाताला यश असते, विषय समजावण्यासाठी लागणारी सर्व साधने, सर्व उपकरणे त्यांच्याजवळ असतात, ते कार्यतत्पर असतात, विषयातला मूळ गाभा समजून घेण्याचे आणि तो विद्यार्थ्याला नीट समजावण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. त्यांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव असते, त्यांच्या ज्ञानात कोणताही दोष नसतो, ते अकारण रागावणारे किंवा हेवा-दावा करणारे नसतात. अचानक कठिण प्रसंग उद्भवला तर ते सहजासहजी डगमगत नाहीत. त्यांचे आपल्या शिष्यांवर प्रेम असते. 

अर्थात शिक्षकांनी अपली जवाबदारी पूर्ण केली तरी विद्यार्थ्यानेही पालथ्या घड्यावर पाणी अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी स्वतःच्या अंगी काही गुण बाणवणे गरजेचे असते. आयुर्वेदात याबद्दल सांगितले आहे, 
विद्यार्थ्याने आपला स्वभाव शांत ठेवावा, दुसऱ्याला त्रास होईल, मनस्ताप होईल असे वागू नये. क्षुल्लक, क्षुद्र कामात वेळ घालवू नये. नजर स्थिर ठेवावी, अकारण डोळे फिरवणे, तोंडाची वेडीवाकडी हालचाल करणे टाळावे, बोलताना नेहेमी स्पष्ट उच्चार करावेत, तोंडातल्या तोंडात बोलू नये, धीर धरण्याची, मनाला लगाम घालण्याची वृत्ती असावी. स्वतःबद्दल खोट्या कल्पना, मलाच सर्व समजते असा समज करून घेऊ नये. शिकताना नीट लक्ष द्यावे, फक्त पाठांतराच्या मागे न लागता विषयामागचा तर्क समजून घेण्याची सवय असावी, दुसऱ्याला मदत करण्याची प्रवृत्ती असावी, शिक्षकांचे मत स्वतःबद्दल कलुषित होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थी स्वभावाने रागीट नसावा, तसेच त्याला कसलेही व्यसन नसावे.

उत्तम शीलसंपन्न, स्वच्छताप्रिय, चांगले आचरण असणारा असावा. त्याला शिकण्यामध्ये रस असावा, तसेच प्रत्यक्ष क्रिया करण्यासाठी तत्परता असावी. तो स्वभावाने लोभी किंवा आळशी नसावा. 

अशा प्रकारे आदर्श शिक्षक आणि शिकण्यासाठी तत्पर असणारा शिष्य जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ‘एवं विद्या प्रकाशते मित्रयशोधर्मार्थकामांश्‍च प्राप्नोति’ म्हणजे विद्येचे तेज वाढते, मित्र जोडले जातात, यश मिळते आणि धर्म, अर्थ, काम या तिन्ही पुरुषार्थांची प्राप्ती होते असे शास्त्रवचन आहे व ते खरेच आहे. 

शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘आदर्श’ असतात. त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे, त्यांचा स्वभाव या सगळ्यांचा विद्यार्थ्यांवर दूरगामी परिणाम होत असतो. एकाच वेळी शिस्त तरीही आपुलकी, कडकपणा तरीही समंजसवृत्ती, अनुशासन तरीही त्यामागे संस्कार करण्याचा उद्देश अशी दुहेरी कसरत शिक्षकांना करावी लागते आणि याचीच परिणती म्हणून आपल्या सर्वांच्या मनात आपल्या शिक्षकांबद्दलचा आदरभाव आयुष्यभर राहत असतो. आपल्या देशात शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना भेटवस्तू, फुले देऊन त्यांचा आदरसत्कार केला जातो. बऱ्याच शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये या दिवशी शिक्षकांऐवजी मोठ्या वर्गांतील विद्यार्थी लहान वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवितात. थोडक्‍यात, शिक्षकांना आराम मिळावा आणि त्यांच्या अथक परिश्रमांची कदर व्हावी, शिक्षकांना योग्य तो सन्मान मिळावा या दृष्टीने शिक्षक दिनाची योजना केलेली असते.

शिक्षकांनी दिलेले ज्ञान, त्यांच्याकडून झालेले संस्कार, त्यांनी रुजवलेली जीवनमूल्ये यांची परतफेड करणे तर शक्‍य नसते, पण शिक्षकदिनाच्या निमित्ताने त्यांची आठवण करून त्यांना धन्यवाद तरी नक्की देऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor teacher day