दचकणे विनाकारणे

डाॅ. ह. वि. सरदेसाई
Friday, 8 September 2017

अचानक दचकायला होते. त्यासाठी आजारीच असायला हवे असेही नाही, अगदी तब्येत ठणठणीत असतानाही अचानक मनीध्यानी नसताना दचकायला होते. काहीसे अर्धवट झोपेत असताना हे विनाकारण दचकणे घडते. 
 

अचानक दचकायला होते. त्यासाठी आजारीच असायला हवे असेही नाही, अगदी तब्येत ठणठणीत असतानाही अचानक मनीध्यानी नसताना दचकायला होते. काहीसे अर्धवट झोपेत असताना हे विनाकारण दचकणे घडते. 
 

आपोआप दचकल्यासारख्या हालचालीला ‘मायोक्‍लोनस’ म्हणतात. ही हालचाल पूर्णपणे अनैच्छिक असते. एखादा विजेचा शॉक बसावा अशी अकस्मात हालचाल होते. कधी एकाच स्नायूत, तर कधी बऱ्याच स्नायूंमध्ये मिळून एकाच वेळी मायोक्‍लोनस ही हालचाल होते. अगदी चांगल्या प्रकृतीच्या व्यक्तीत होऊ शकते आणि विविध आजारांत होते. चांगल्या प्रकृतीतील माणसाला अर्धवट झोपेत, झोप लागता लागता अथवा अर्धवट जाग येता येता बिछान्यात आपण एकदम दचकलो आहोत अशी भावना येऊ शकते.

बिछान्याच्या मध्यभागी झोपलेलो असलो तरी ही आपण बिछान्याच्या कडेवरून खाली पडत आहोत किंवा पडणार आहोत असे क्षणमात्र जाणवते. याला नॉकटर्नल मायोक्‍लोनस असे म्हटले जात असे. यातही झोप लागता - लागता दचकण्याला हिप्नोगॉगिक मायोक्‍लोनस, तर जाग येता येता जाणवणाऱ्या दचकण्याला हिप्नो-पाँपिक मायोक्‍लोनस म्हटले जाई. सध्या नॉकटर्नल मायोक्‍लोनसमध्ये व्यक्तीच्या पायाचे आंगठे हालतात, या स्थितीला हे नाव देतात. दचकणे किंवा आंगठे हलले जाणे या हालचाली अनैच्छिक असतात. त्या मेंदूत किंवा शरीरात कोणताही विकार असण्याचे लक्षण नसतात. तथापि मूत्रपिंडे अकार्यक्षम झालेल्या व्यक्तींना जेव्हा हिमो-डायलेसिसचा उपचार केला जातो, तेव्हा त्यांच्या शरीरात नॉकटर्नल मायोक्‍लोनस होताना आढळते. मायोक्‍लोनसमध्ये स्नायूंचे आकुंचन होते. ते मज्जासंस्थेच्या विविध भागांतून येऊ शकते. सामान्यपणे मज्जारज्जूतील गॅमा न्यूटॉन्सतर्फे उद्दिप्त झालेल्या अल्फा न्यूरॉन्समुळे मायोक्‍लोनस होतो.

मायोक्‍लोनस ही एपिलेप्स्टिक फिट येण्याची सुरवात असू शकते. रुग्णाच्या अनुभवावरून ते ओळखता येते. इतरही विविध विकारांमध्ये मायोक्‍लोनस होऊ शकतो. शरीराचा एखादा भाग हलतो. नंतर अर्धा ते पाच सेकंदांत तो भाग शांत होतो व पुन्हा हलतो, अशा परिक्रमा काही काळ चालू राहतात. एकाच ठिकाणी होत राहणाऱ्या या हालचालींना सेगमेंटल मायोक्‍लोनस, तर शरीरभर होणाऱ्या हालचालींना पॉली मायोक्‍लोनस म्हटले जाते. आपल्या मुखाच्या पोकळीत मागच्या बाजूला पडजीभ (पॅलेट आणि युव्हुला) असते.

मेंदूतील काही दोषांमुळे ही पडजीभ आपोआप उचलली जाते व पुन्हा पहिल्या जागी येते. अशी हालचाल दर मिनिटाला साठ ते शंभर वेळा होते. याला पॅलेटल मायोक्‍लोनस म्हणतात. या आजारात घशाचे, चेहऱ्यावरचे किंवा डोळ्यांच्या बाजूचे स्नायूदेखील भाग घेताना आढळतात. क्वचित छाती आणि पोट यांतील विभाजक पटल (डायाफ्रॅम) आणि स्वरयंत्रणेतील स्नायूदेखील भाग घेतात. न्यूक्‍लिअस ॲम्बिग्यअस नावाच्या ब्रेनस्टेममधील भागात झालेल्या दोषामुले पॅलेटल मायोक्‍लोनस होतो.

ॲल्झायमर्स डिसीजमध्ये स्मृतिभ्रंश आणि बुद्धिभ्रंश होतो हे सर्वविद्‌ आहेच. जसा आजार वाढत जातो तसा शरीरात विविध प्रकारच्या अनैच्छिक हालचाली (कोरिया ॲथेटॉइड) होऊ लागतात. काही विषाणूंच्या मेंदूला झालेल्या संसर्गात मायोक्‍लोनस होऊ लागतो. यकृताचे कार्य खालावले तर त्याचा मेंदूच्या पेशींच्या कार्यावर परिणाम होऊ लागतो. या स्थितीला हीपॅटिक एनकॅलोपथी म्हणतात. या स्थितीत सर्व शरीराला मायोक्‍लोनस अथवा फिट्‌स येऊ शकतात. त्याचप्रमाणे मूत्रपिंडाचे कार्य होईनासे झाले की मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ लागतो. याला युरिमिक एन्‌केफेलॉपथी म्हणतात. अशा रुग्णाला मायोक्‍लॉनिक धक्के किंवा फिटस्‌ येऊ शकतात.

मूत्रपिंडे अकार्यक्षम झालेल्या रुग्णाला थकवा, चिडचिड येणे, डोकेदुखी, मानसिक गोंधळ आणि हळूहळू भान हरपत जाऊन बेशुद्धावस्था येणे असे त्रासही होतात. फिटस्‌ (एपिलेप्सी) येणाऱ्या काही रुग्णात फिट येण्यापूर्वीच्या काळात मायोक्‍लॉनिक धक्के बसू लागतात. (प्रोड्रॉयल पीरियडमध्ये) एकदा हातापायाचे झटके येऊ लागले व फिट्‌ येण्याची क्रिया सुरू झाली की हे मायोक्‍लॉनिक झटके हळूहळू बंद होतात. मायोक्‍लॉनिक एपिलेप्सीमध्ये मायोक्‍लॉनिक धक्के बसण्याने ॲटकची सुरवात होते.

सुरवातीला हे धक्के एकाच बाजूला एकाच भागात (फक्त उजव्या हातात किंवा पायात, एकाच बाजूला) बसू लागतात. मग ते शरीरभर पसरतात. अशा मायोक्‍लॉनिक एपिलेप्सीने ग्रस्त झालेल्या व्यक्तीला पुढे पुढे बुद्धिभ्रंश होण्याची शक्‍यता (डिमेंशिया) मोठी असते. मद्यमान नियमाने करणाऱ्या व्यक्तीचे मद्यपान अकस्मात थांबले तर त्या व्यक्तीला डिलिरियम ट्रेमन्स नावाची घातक गुंतागुंत होते. त्याचप्रमाणे अफूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतही होते. रोज नियमाने झोपेची औषधे घेणाऱ्या व्यक्तींनाही हा धोका असतो. अकस्मात कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांच्या वेळी असा प्रकार अनेकदा घडतो. या सर्वांना मायोक्‍लॉनिक झटके येऊ शकतात.

रात्री झोप लागताना पायांत अस्वस्थ करणाऱ्या संवेदना येऊन पायाला झटके द्यावेसे वाटून पाय झाडल्यासारखी हालचाल करणे या आजाराला रेस्ट-लेस्‌ लेग सिंड्रोम असे नाव आहे. रुग्णाला दिवसा चालताना कोणताही त्रास जाणवत नाही. झोपायला गेल्यावर काही वेळात थोड्या-फार वेळासाठी पावलांत व पिंडऱ्यांत नकोश्‍या वाटणाऱ्या संवेदना येऊ लागतात. या संवेदनांना डिस्‌ॲस्थिझीया म्हणतात. तळपायांची आग होणे, तेथे कापल्यासारखे दुखणे, टोचल्यासारखे जाणवणे अशा विशिष्ट; परंतु अप्रिय संवेदना येऊ लागतात. सहसा या पायांत येतात, परंतु काही रुग्णांना हातांतदेखील येऊ शकतात. त्रास होणारा अवयव हलवण्याची अनिवार्य ऊर्मी येते. हा आजार पडून राहणाऱ्या व्यक्तींमध्ये वाढतो. त्रास होताना चालण्याने तात्पुरते बरे वाटते. पायाच्या ज्ञानतंतूच्या शिरांच्या विकारामुळे होणारी पायांची आग चालण्याने कमी होत नाही, उलटपक्षी वाढू शकते. या त्रासात निसर्गतः भरती-ओहटी येत राहते. पुरेशी झोप न मिळण्याने, चहा-कॉफी यांच्या सेवनाने त्रास वाढतो. गर्भधारणेने स्त्रियांना अधिक त्रास होतो.

शरीरात लोहाची कमतरता झाल्यासही त्रास वाढतो. वाढत्या वयात आजार वाढतो. काही सर्वेक्षणात वयाच्या साठीनंतर वीस टक्के व्यक्तींना हा त्रास होताना आढळलेला आहे. या विकृतीवर डोपामिनर्जिक औषधांचा चांगला फायदा होतो (लिव्होडोपा). त्याचप्रमाणे बेंझोडायाझेपिनस आणि ग्रॅबापेंटीन याही औषधांचा चांगला उपयोग होतो. रेस्टलेस लेग सिंड्रोमचा मायोक्‍लोनझ्‌शी संबंध नाही, परंतु हाता-पायांना अनैच्छिक झटके येणे दोन्ही विकारांत होते. रेस्टलेस लेग सिंड्रोम असणाऱ्या अनेक रुग्णांना नॉकटर्नल मायोक्‍लोनसचाही त्रास होतो. मायोक्‍लोनसमुळे स्नायू अगर स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा हालचाल होते तेव्हा त्याला ‘घन मायोक्‍लोनस’ म्हणतात. कधी कधी उलटा प्रकार घडतो म्हणजे विशिष्ट स्नायू अगर स्नायूंच्या समूहाची आकुंचनाची क्षमता एकाएकी नाहीशी होते, याला ‘ऋण मायोक्‍लोनस’ किंवा ‘एस्टेरिक्‍सिस’ म्हणतात.

मायोक्‍लोनसचा उपाय म्हणजे मायोक्‍लोनसच्या कारणाचा उपाय होय. शरीरात व मेंदूत घडणाऱ्या विकृतीचा शोध घेऊन हे ठरविता येते. यकृत किंवा मूत्रपिंडांचे विकार प्राणवायूच्या पुरवठ्यातील व्यत्यय, मेंदूला झालेला विषाणूंचा संसर्ग, मज्जासंस्थेतील डी-मायलिनेशन, मेंदूला झालेले आघात इत्यादी कारणे शोधून काढली पाहिजेत. रुग्णाला कोणती औषधे चालू आहेत आणि व्यसने जडली आहेत याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. मेंदूच्या आवरणातील दोषामुळे झालेल्या मायोक्‍लोनस वर क्‍लोनॅझिपाम हे औषध गुणकारी ठरते. या औषधाचा इतर प्रकारांवरदेखील चांगलाच उपयोग होतो. सोडियम व्हॅलपोटेट, प्रामिडॉन, लिव्हेटिरॉसिटॅम आणि पिरॅसिटॅम यांचाही वापर केलाजातो. फिटस्‌ ताब्यात येण्याकरता वापरलेल्या औषधांनी मायोक्‍लोनस वाढतो. ॲस्टेटेक्‍सिस करता इथोसुस्किमाईड उपयोगी पडते.

क्‍लोनॅझिपाम हे सर्व प्रकारच्या मायोक्‍लोनसवर गुणकारी असते. या आजारावर अनुभवी आणि तज्ज्ञ न्यूरॉलॉजिस्ट यांच्या नजरेखाली उपचार घ्यावेत. काही रुग्णांत, विशेषतः पॅलेटल निस्टॅग्यसमध्ये बोटुलिनम्‌ टॉक्‍स्मिनचा चांगला फायदा होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Unthinking