वसंताचे आगमन

Vasant-Food
Vasant-Food

वसंताच्या आगमनापूर्वी थोडी तयारी करून ठेवली, वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार शरीरात होणारे बदल ध्यानात घेतले, त्यानुसार आहार-आचरणाचे योग्य नियोजन केले, भारतीय संस्कृतीने आखलेले उत्सव यथासांग साजरे केले तर आरोग्यही उत्तम राहील, वसंताचा आनंदही घेता येईल. 

वसंत ऋतू हा सहाही ऋतूंमधील सर्वांत सुंदर ऋतू. कालिदासासारख्या अभिजात कविश्रेष्ठाने वसंतऋतूला ‘ऋतुराज’ वा ‘मधुमास’ म्हणून संबोधलेले आहे. आयुर्वेदातही वसंताची चाहूल लागल्याचे लक्षण सांगताना, झाडांना पालवी येते, मलय पर्वतावरून सुगंधी वारा वाहू लागतो, वन-उपवन सुशोभित होतात, पळस, बकुळ, आंबा, अशोक, कमळ वगैरेंना फुले येतात आणि दशदिशा निर्मळ व सुंदर भासू लागतात, असे वर्णन केलेले आहे. अशा या निसर्गसौंदर्याने फुललेल्या वसंताचा आनंद घ्यायचा असला तर त्याच्या आगमनापूर्वीच थोडी तयारी करून ठेवणे आवश्‍यक असते. 

आयुर्वेदात ‘ऋतुसंधी’ असा एक पारिभाषिक शब्द आहे. निसर्गातील बदल क्रमाक्रमाने होत असतात. एक महिना संपला व दुसरा सुरू झाला की, कॅलेंडरचे पान बदलता येते, पण ऋतू मात्र तसा एकाएकी बदलत नाही. आधीच्या ऋतूतील हवामान क्रमाक्रमाने बदलते व पुढच्या ऋतूचे वेध लागतात. या बदलाला ‘ऋतुसंधी’ असे म्हणतात. हा संधिकाळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून अवघड असतो, म्हणून सहसा हवामान बदलले की, आजारपण येते असा अनेकांचा अनुभव असतो. ऋतुसंधीची लक्षणे सुरू झाली की, त्यानुसार आहार-आचरणात बदल केला तर मात्र हा त्रास, आजारपण टाळता येऊ शकते. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर थंडी कमी होऊ लागते म्हणजेच वसंताची सुरुवात होते. वातावरणात वसंतागमनाचा उत्साह असला तरी आपणही आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने काही बदल करणे आवश्‍यक असते. 

शिशिर ऋतूतील थंडीमुळे शरीरात कफदोष साठून राहिलेला असतो, जो वसंतात वाढणाऱ्या उष्णतेमुळे वितळणार असतो. वितळलेला अथवा द्रवीभूत झालेला कफदोष हा अग्नीलाही मंद करणारा असतो. या सर्व बदलांमुळे आजारपण येण्याची शक्‍यता मोठी असते. अनेकांना असे वाटते की एवढी थंडी होती तेव्हा सर्दी खोकला वगैरे काही त्रास झाला नाही; मात्र, ऋतू बदलला, उन्हाळ्याची सुरवात झाली आणि आता कशी काय सर्दी झाली? तर याचे उत्तर आयुर्वेदाचा अभ्यास केल्यानंतर कळते.

यामुळे आयुर्वेदात ऋतुचर्या समजावताना सांगितले आहे,

गुरुशीतदिवास्वप्न-स्निग्धाम्लमधुरांस्त्यजेत्‌ ।।
या ऋतूत गुरू (पचायला जड) थंड, स्निग्ध (तेलकट, चरबीयुक्‍त), आंबट, गोड पदार्थ खाणे टाळावेत तसेच दिवसा झोपू नये.

कसे खाल?
वसंताचे वेध लागताच क्रमाक्रमाने आहारात हे बदल करणे चांगले असते. याउलट, हळूहळू कडू, तिखट, तुरट गोष्टींचा आहारात समावेश करणे, उष्ण वीर्याचे पदार्थ सेवन करणे, पचण्यास सोपे, फार स्निग्ध नसलेले अन्न सेवन करणे हितावह असते. उदाहरणार्थ, पदार्थ तळून न घेता भाजून घेणे, दह्याऐवजी फोडणी दिलेले ताक पिणे, साध्या पाण्याऐवजी सुंठ टाकून उकळलेले कोमट पाणी पिणे, जेवणात आले-हळदीचे, आवळ्याचे लोणचे किंवा पुदिना-कोथिंबिरीची ताजी चटणी समाविष्ट करणे, मधल्या वेळेला साळीच्या लाह्यांचा किंवा पोह्यांचा चिवडा खाणे, यासारखे बदल करता येतात. 

शिशिर-वसंताच्या ऋतुसंधीत किंवा वसंताच्या सुरवातीला आपल्या भारतीय परपंरेप्रमाणे होळी आणि रंगपंचमी हे उत्सव साजरे केले जातात. ‘होळी जळाली, थंडी पळाली’, अशी उक्‍ती रूढ आहे, यावरूनही होळी हा ऋतुसंधीच्या काळात येणारा सण आहे हे समजते. होळीचा सण साजरा केला जातो, अग्नीची पूजा करून, अग्नीला नैवेद्य-नारळ वगैरे अर्पण करून. आयुर्वेदिक दृष्टीने विचार केला असता होळी हा स्वेदन उपचाराचा एक प्रकार आहे, असे म्हणता येते. स्वेदन म्हणजे शरीरातील विषद्रव्ये घामावाटे काढून टाकणे. स्वेदन हे बहुतांशी वेळेला अग्नीच्या, उष्णतेच्या साहाय्याने केले जाते. 

स्तंभगौरवं शीतघ्नं स्वेदनं स्वेदकारकम्‌ ।
....चरक सूत्रस्थान
शरीरातील जखडण, जडपणा, थंडपणा ज्यामुळे दूर होतो, त्याला स्वेदन असे म्हणतात. 

स्वेदनाचे उपयोग
योग्य प्रकारे केलेल्या स्वेदनाचे उपयोग पुढीलप्रमाणे असतात.
वातदोष व कफदोषाचे शमन होते. 
शरीरातील अशुद्धी शिथिल होऊन शरीराबाहेर जाण्यास प्रवृत्त होतात. 
शरीरावयव मृदू होतात; त्यांच्यातील कोरडेपणा कमी होतो. 
सांध्यांमध्ये लवचिकता उत्पन्न होते, सांध्यांची हालचाल सहजतेने होण्यास मदत मिळते. 
अग्नी प्रदीप्त होतो. 
त्वचा कोमल व शुद्ध होते. 
जेवणामध्ये रुची वाढते.
स्रोतसे शुद्ध होतात, शरीराला हलकेपणा प्रतीत होतो. 
अतिरिक्‍त मेदधातू कमी होण्यास मदत मिळते. 
अतिनिद्रा, झापड कमी होते, उत्साह अनुभूत होतो. 
पंचकर्माच्या आधी शरीराची जी पूर्वतयारी केली जाते, त्यातही स्वेदनाचे योगदान महत्त्वाचे असते. 

होळी हा उपचारच
शिशिरामध्ये थंडीमुळे वाढलेला वात, साठलेला कफ आणि नंतर येणाऱ्या वसंतामध्ये प्रकुपित होणारा कफ यांचे संतुलन करण्यासाठी बरोबर या काळात होळीची योजना केलेली आढळते. धूलिवंदनाच्या दिवशी होळीची रक्षा (राख) अंगाला लावली जाते. एरंड, नारळ, शेणाच्या गोवऱ्या, नैवेद्यासाठी तयार केलेली पुरणपोळी, तूप वगैरे द्रव्यांचा संस्कार असणारी रक्षा जंतुघ्न असते, त्वचेसाठी संरक्षक असते. आधुनिक संशोधनानुसार राखेच्या मदतीने जखमेतील जंतुसंसर्ग दूर होतो आणि जखम भरून येते, हे सिद्ध झालेले आहे. त्वचेवर रक्षा लावणे, धूळवड खेळणे, हा एक प्रकारचा उद्वर्तन उपचारच असतो. 

उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।
उद्वर्तनामुळे कफदोष दूर होतो, मेद वितळून जाण्यास मदत मिळते. सामान्यतः उद्वर्तनामध्ये वनस्पतींचे सूक्ष्म चूर्ण वापरले जाते, मात्र वनस्पती जाळून शिल्लक राहिलेली राख अजूनच सूक्ष्म असते परिणामतः अधिकच गुणकारी ठरू शकते. गोवरी जाळून तयार झालेली रक्षा झाडांसाठी उत्तम जंतुनाशक असते. रासायनिक कीटकनाशके फवारण्याऐवजी याप्रकारे नैसर्गिक आणि तरीही प्रभावी जंतुनाश वापरणे कधीही चांगले. होळीची उरलेली राख ही जमिनीतील अतिरिक्‍त आम्लता दूर करण्यासाठीसुद्धा उपयुक्‍त असते. अशा प्रकारे धूलिवंदनाच्या निमित्ताने आपण आपल्या आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षणच करत असतो. 

भारतीय संस्कृतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे धूलिवंदनाच्या दिवशी चंदनाच्या गंधात आंब्याचा मोहोर मिसळून तयार केलेले पेय प्राशन करण्यास सांगितलेले आहे. चंदन शीतल असते, हे आपण जाणतोच. उन्हाळ्यातील उष्णतेचे योग्य प्रकारे नियमन होण्यासाठी चंदन उपयोगी असते. आंब्याचा मोहोरही अनेक औषधी गुणांनी उपयुक्‍त असतो. 

आम्रपुष्पमतीसारकफपित्तप्रमेहनुत्‌ ।
असृग्दरहरं शीतं रुचिकृत्‌ ग्राहि वातलम्‌ ।।
....भावप्रकाश
आंब्याचा मोहोर कफ-पित्तदोष कमी करतो, थंड असतो, रुची वाढवतो, वातूळ असतो. जुलाब, प्रमेह, पाळीच्या वेळचा अतिरक्‍तस्राव यांच्यावर उपयोगी असतो. वसंतातील कफप्रकोप आणि वातावरणातील उष्णता यांचा त्रास होऊ नये, यासाठी याप्रकारचे पेय घेणे उपयुक्‍त असते. 
अशा प्रकारे वसंताच्या आगमनापूर्वी थोडी तयारी करून ठेवली, वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार शरीरात होणारे बदल ध्यानात घेतले, त्यानुसार आहार-आचरणाचे योग्य नियोजन केले, भारतीय संस्कृतीने आखलेले उत्सव यथासांग साजरे केले तर आरोग्यही उत्तम राहील, वसंताचा आनंदही घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com