आरोग्य कुटुंबाचे 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 21 April 2017

कौटुंबिक आरोग्याचा विचार करताना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. त्यादृष्टीने, कुटुंबाच्या आरोग्याची, कुटुंबात स्नेहभाव कायम ठेवण्याची कल्पना केलेली "ॐ सह नाववतु'सारखी प्रार्थना घरातल्या सगळ्यांनी रोज किमान एकदा जेवणाच्या अगोदर म्हणणे उत्तम होय. कुटुंबातील सर्वांनी आपल्या जाण्या-येण्याच्या वेळा घरातल्यांना सांगणे; कुठे जातो आहोत, काय कामासाठी जात आहोत हे सांगणे; महत्त्वाच्या कामाला जाताना घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणे यांसारख्या कृतींमुळे घरात कौटुंबिक वातावरण तयार होते. शिवाय, अशा वागण्यामुळे घरातल्या वयस्कर व्यक्‍तींना मिळणारे मानसिक समाधान त्यांच्या आरोग्याला हितकारक ठरते. 

एखाद्या व्यक्‍तीशी असणारी आपुलकी किंवा जवळीक व्यक्‍त करायची असली, तर आपण चटकन "हे जणू आमच्या कुटुंबातीलच एक आहेत' असे म्हणतो. अर्थातच कुटुंबाचे धागे-दोरे सर्वांत घट्ट असतात. आपल्यावर कुटुंबाचा आणि कुटुंबावर आपला मोठा प्रभाव असतो. या भरभक्कम नात्याचा आपण उत्तम आरोग्यासाठीसुद्धा उपयोग करून घेऊ शकतो. काही आरोग्यसवयी कुटुंबातील सर्वांनीच जडवून घेतल्या किंवा आरोग्याला पूरक असणाऱ्या काही गोष्टींची कुटुंबातील सदस्यांनी आपापसांत वाटणी करून घेतली, तर त्यातून सर्वांचेच आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळेल. उदा. रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्वांसाठी बदाम भिजवण्याची जबाबदारी एकावर असली, तर दुसरा सकाळी घ्यायच्या पंचामृताचे नियोजन करू शकतो. व्यायामासाठी मुळातच आवड असणारी व्यक्‍ती इतरांना व्यायामासाठी उद्युक्‍त करू शकते वगैरे. 

कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करताना सर्वप्रथम लक्षात घ्याव्या लागतील त्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती व सवयी. कुटुंब म्हटले की एकमेकांसाठी थांबणे, एकमेकांच्या आवडीनिवडीचा विचार करणे आले. कौटुंबिक प्रेमाखातर, कुटुंबाच्या मानसिक आरोग्याखातर हे करणे आवश्‍यक असले, तरी त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत नाही ना, याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे. उदा. एखाद्या दिवशी यजमानांना रात्री घरी यायला उशीर होणार असला आणि पत्नी जेवण्यासाठी थांबली तर दोघांना बरे वाटेल, पण यजमानांना रोजच कामानिमित्त उशीर होणार असला, तर पत्नीने रोज रात्री न जेवता उशिरापर्यंत जागत बसणे बरोबर नाही. शक्‍य असल्यास यजमानांनाही वेळेवारी डबा पाठवून तिने स्वतः घरी वेळच्या वेळी जेवून घ्यावे हेच चांगले. अन्यथा रोजच्या जागरणाने व रोज रोज भुकेले राहिल्याने दोघांचे पचन बिघडून बाकीच्या त्रासांना आमंत्रण मिळाल्याशिवाय राहणार नाही. 

कुटुंबातल्या सर्वांनी किती वेळ व केव्हा झोपायचे हेसुद्धा नुसती सोय पाहून ठरविण्यापेक्षा प्रकृतीचा विचार करून ठरवायला हवे. लहान मुलांना जास्त झोपेची आवश्‍यकता असते. तसेच, बहुतेक वेळेला शाळेनिमित्त लवकर उठावे लागणार असते. तेव्हा त्यांनी रात्री लवकर झोपणे अतिशय गरजेचे असते. मुलांची झोपायची वेळ झाली, की घरातल्या इतरांनीही आपापली कामे कमी करून म्हणजे टीव्ही वगैरे बंद करून, गप्पागोष्टी थांबवून मुलांना झोपी जाण्यास प्रवृत्त करणे चांगले. मुलांची झोपेची आवश्‍यकता प्रकृतीनुरूप कमी- अधिक असू शकते. उदा. वात-पित्त प्रकृतीच्या मुलांना जास्त झोपेची गरज असते, पण त्यांना जाग पटकन येते; तर कफ प्रकृतीच्या मुलाला थोडे कमी झोपले तरी चालते, पण त्यांना झोपेतून उठायला वेळ लागतो. मुलांना झोपवताना, उठवताना या गोष्टी लक्षात घेतल्या तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. 

आहाराची योजना करतानाही घरातल्या सगळ्यांच्या प्रकृतीचा विचार करायला हवा. बहुतेक वेळेला आपण फक्‍त आवडी-निवडी सांभाळत राहतो; पण आरोग्य सांभाळण्यासाठी प्रकृतीनुरूप आहार योजना करणे अधिक गरजेचे असते. जसे इडली, डोसा, ढोकळा वगैरे आंबवून तयार केलेले पदार्थ कफ प्रकृतीच्या व्यक्‍तीला सहज मानवतात, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्‍तीचे पित्त वाढवू शकतात किंवा वात प्रकृतीला पचायला जड ठरू शकतात. अशा वेळेला वात-पित्त प्रकृतीसाठी इडली-सांबाराबरोबर भात-सांबार किंवा वरण-भातही बनवता येतो. दूध-लोण्यासारखी कफ वाढविणारी गोष्ट वात, पित्ताच्या प्रकृतीला थोडी जास्त दिली तरी चालते; पण कफ प्रकृतीला मात्र अतिप्रमाणात न देणेच चांगले. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य नीट राहावे यासाठी तांदूळ भाजून घेणे, कणीक भाजून घेणे यासारख्या गोष्टी उपयुक्‍त असतात. 

व्यायामाचा विचार करायचा तर योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे गोष्टी संतुलन साधणाऱ्या असल्याने घरातल्या सर्वांसाठी अनुकूल असतात; मात्र त्यांचे प्रमाण प्रत्येकाच्या प्रकृतीला सोसवेल असे असावे. दमछाक करणारे, घामाघूम करणारे व्यायाम कुटुंबातील सर्वांनाच अनुकूल व उपयुक्‍त असतील असे नाही. 

कुटुंबाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी खेळ खेळण्याचा, सर्वांनी मिळून सहलीला जाण्याचा, काहीतरी वेगळे करण्याचा उपयोग होत असतो. सहलीला जायचे ठरवले तर असे ठिकाण निवडावे की जेथे घरातल्या सगळ्यांनाच आनंद घेता येईल. कुटुंबात आजी-आजोबा असतील तर अशा ठिकाणी जाता येते, जिथे चढ-उतार करायची आवश्‍यकता भासणार नाही, दगदग होणार नाही, वाटलेच तर एखाद्या ठिकाणी मुक्काम करून बाकीच्या मंडळींना आसपासच्या ठिकाणी ट्रेकिंग करता येईल अशी जागा निवडता येते. कुटुंबाचे आरोग्य व सुख सांभाळण्यासाठी अशा अनेक गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. यालाच काही आरोग्य-नियमांचीही जोड देता येते. 

  •  सर्वांनी रोज सकाळी पंचामृत, च्यवनप्राश, चैतन्य वा शतानंत कल्प, भिजविलेले बदाम यासारखे रसायन सेवन करणे. 
  •  रोजच्या आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे. विशेषतः लहान मुले, तरुणांनी शक्‍य तेव्हा घरचे ताजे लोणी सेवन करणे 
  •  पंधरा दिवसांतून एकदा पोट साफ होण्यासाठी दोन-तीन जुलाब होतील एवढ्या प्रमाणात गंधर्वहरितकी, एरंडेल तेल किंवा योगसारक चूर्णासारखे औषध घेणे. 
  •  लहान मुलांना शारीरिक खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे, सातत्याने संगणकावर बसण्याची सवय लागणार नाही याकडे लक्ष देणे. 
  •  घरामध्ये वयाने मोठ्या व्यक्‍ती असतील तर त्यांच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे, पचनाला सोसवतील तरीही ताकद देतील अशा विशेष गोष्टींचा त्यांच्या आहारात समावेश असू देणे. 
  •  कुटुंबातल्या सर्वांनीच रात्री जड गोष्टी खाणे टाळणे, विशेषतः मांसाहार, तळलेले पदार्थ रात्री टाळणे. 
  •  बाहेरचे खाणे झाले किंवा घरातही नेहमीपेक्षा वेगळे किंवा जड जेवण झाले तर "अन्नयोग गोळ्यां'सारख्या पचनशक्‍ती वाढविणाऱ्या गोळ्या घरात असणे चांगले होय. 
  •  प्रकृतीसंबंधातल्या साध्यासुध्या तक्रारींवर उदा. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, अपचन, हात-पाय मुरगाळणे वगैरेंसाठी सीतोपलादी, "सॅनकूल'सारख्या साध्या-सोप्या व प्रभावी औषधांचा एखादा संच हाताशी असला तर त्रास झाला की लगेच उपचार सुरू होतील व इतर कोणत्याही दुष्परिणामांना सामोरे जायला न लागता आरोग्य टिकविता येईल. 
  •  ऋतूनुसार हवामानात होणाऱ्या बदलांप्रमाणे संपूर्ण कुटुंबाच्या आहार-आचरणात योग्य ते बदल करणे. उदा. पावसाळ्यात प्यायचे पाणी उकळून घेणे, उन्हाळ्यात पित्त वाढविणाऱ्या गोष्टी टाळणे, हिवाळ्यात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे. 
  •  अंगाला तेल लावणे, पाठीला तेल लावणे, पादाभ्यंग करणे यांसारख्या गोष्टी कुटुंबातील सर्वांसाठीच हितकर असतात. रात्री झोपण्यापूर्वी एक-दुसऱ्यासाठी पाच-दहा मिनिटे वेळ काढला व एखाद्या दिवशी बहिणीने भावाला पादाभ्यंग करून दिले, एखाद्या दिवशी मुलाने वडिलांच्या पाठीला तेल लावून दिले तर आरोग्य तर टिकेलच, पण स्नेहबंध टिकायलाही हातभार लागेल. 

कौटुंबिक आरोग्याचा विचार करताना शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. त्यादृष्टीने घरातल्या सगळ्यांनी रोज किमान एकदा, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण एकत्र बसून करणे, जेवणाच्या अगोदर "ॐ सह नाववतु'सारखी प्रार्थना म्हणणे उत्तम होय. या प्रार्थनेत कुटुंबाच्या आरोग्याची, कुटुंबात स्नेहभाव कायम ठेवण्याची कल्पना केलेली आहे. कुटुंबातील सर्वांनी आपल्या जाण्या-येण्याच्या वेळा घरातल्यांना सांगणे; कुठे जातो आहोत, काय कामासाठी जात आहोत हे सांगणे; महत्त्वाच्या कामाला जाताना घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणे यासारख्या कृतींमुळे घरात कौटुंबिक वातावरण तयार होते. शिवाय अशा वागण्यामुळे घरातल्या वयस्कर व्यक्‍तींना मिळणारे मानसिक समाधान त्यांच्या आरोग्याला कारणीभूत ठरते. 

घरातील लोक हे जसे कुटुंबातले असतात तसेच इमारतीतील किंवा कॉलनीतील, आजूबाजूला राहणारे लोक मिळूनही एक मोठे कुटुंबच असते. आपल्या घरात काही समारंभ असला, लग्नकार्य असले तर मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा किंवा वेळी-अवेळी फटाके वाजविण्याचा या आसपासच्या लोकांना त्रास होणार नाही व त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही याचे भान ठेवणे इष्ट. कौटुंबिक आरोग्यासाठी घरातील सर्व मंडळी एकत्र येणे जसे आवश्‍यक असते, तसेच कॉलनीतील सर्व मंडळीही अधूनमधून एकत्र येतील अशा योजना आखण्याने एकमेकांबद्दल प्रेम, आदर उत्पन्न होऊन मानसिक समाधान मिळायला मदत होते. अडीअडचणीच्या वेळेला, आजारपणात वगैरे एकमेकांना मदत करण्याची तयारी ठेवली, तर अडचणीत असलेल्याला किंवा आजारी व्यक्‍तीला मिळणाऱ्या मानसिक समाधानामुळे, आधारामुळे आरोग्य सुधारायला हातभार लागू शकतो. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family health