मानसिक वाटणारा शारीरिक आजार 

डॉ जयदेव पंचवाघ
Friday, 27 September 2019

पाठीचे दुखणे अनेक वेळेला मानसिक असते हे खरे आहे. पण प्रत्येकवेळी तसे नसतेही. रुग्णाशी बोलून, अन्य शक्यता अजमावत ते दुखणे मानसिक की शारीरिक हे ठरवायला हवे. ते दुखणे मानसिकच आहे हे निदान करण्याआधी न्यूरोसर्जनने त्या रुग्णाला पूर्णतः तपासायला पाहिजे. 

पाठीचे दुखणे अनेक वेळेला मानसिक असते हे खरे आहे. पण प्रत्येकवेळी तसे नसतेही. रुग्णाशी बोलून, अन्य शक्यता अजमावत ते दुखणे मानसिक की शारीरिक हे ठरवायला हवे. ते दुखणे मानसिकच आहे हे निदान करण्याआधी न्यूरोसर्जनने त्या रुग्णाला पूर्णतः तपासायला पाहिजे. 

‘‘डॉक्‍टर, तुम्ही मला त्या दिवशी तपासले नसते, तर मी आत्तापर्यंत वेड्यांच्या इस्पितळात भरती झाले असते,’’ क्‍लिनिकमध्ये इला मला सांगत होती आणि तिचे म्हणणे तंतोतंत खरे होते. दोन महिन्यांपूर्वी इला तिच्या नवऱ्याबरोबर मला भेटायला आली होती, ती घटना मला आठवली. ही घटना माझ्या लक्षात राहण्यालाही कारण होते. त्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये मी राऊंड घेत होतो आणि राऊंड घेताना माझी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा चालली होती. ‘शारीरिक’ वाटणाऱ्या पाठदुखीचे कारण प्रत्यक्षात मानसिक कसे असते, जॉन सारनो याने लिहिलेला ‘टीएमएस’ नेमका काय आहे, या विषयी आमचे बोलणे चालले होते. 
‘‘परंतु, आपण एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे व्यक्तीची संपूर्ण तपासणी केल्याशिवाय आपण एखाद्याच्या पाठदुखीचा उगम मानसिक द्वंद्वात आहे, असा निष्कर्ष कदापि काढता कामा नये. किंबहुना असा एक मणक्‍याचा आजार आहे, ज्याची लक्षणे वाटतात मानसिक; पण तो शंभर टक्के शारीरिक आजार असतो व शस्त्रक्रियेने पूर्ण बरा होऊ शकतो,'' हे मी विद्यार्थ्यांना सांगायला व इला अगदी योगायोगाने त्याच दिवशी माझ्या क्‍लिनिकमध्ये यायला गाठ पडावी याचा अचंबा आजही मला वाटतो. इलाचा नवरा प्रवीण तिला घेऊन आला होता व तिच्या दुखण्याबद्दल त्याची काही ठाम मते होती. प्रवीणनेच इलाबद्दल सांगायला सुरवात केली, ‘‘डॉक्‍टर, गेल्या चार वर्षांपासून हिला मानदुखीचा त्रास होतो आहे. डोक्‍याच्या मागच्या भागापासून ते खांदे व पाठीच्या मध्यापर्यंत दुखणे पसरते. दुखायला लागले की अगदी कासावीस होऊन वेड्यासारखी वागते.’’ 

त्याच्या या बोलण्याचा इलाला राग आलेला स्पष्ट दिसला. मी इलाकडे नीट बघितले. साधारण तीसएक वर्षांच्या या स्त्रीच्या चेहऱ्यावर मला कुठेही चिंता करणारा किंवा कुढणारा स्वभाव दिसत नव्हता. इला शांतपणे म्हणाली, ‘‘डॉक्‍टर मला होणारे दुखणे खरे आहे. अनेक डॉक्‍टरांकडे मी गेले आहे आणि प्रत्येक जण मला कसा मानसिक ताण आहे आणि या लक्षणांना काही अर्थ नाही हे समजावून थकला आहे. माझ्या नवऱ्याचे सुद्धा हळूहळू हेच मत झाले आहे. मी वेडी आहे असे त्याला वाटते. पण मी तुम्हाला सांगते, की मला खरेच काहीतरी शारीरिक आजार आहे.’’ 

मी आता प्रवीणकडे बघितले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ‘पाहिलेत! आता तुम्हीच बघा’ असा भाव होता. अशा केसेसना आम्ही ‘गुगली केसेस’ म्हणतो. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या मतावर अवलंबून न राहता निःपक्षपातीपणे रुग्णाला बघणे अशा वेळी आवश्‍यक असते. माझा विद्यार्थी प्रशांत शेजारी बसला होता. त्याच्याकडे बघून मी हसलो. कारण मणक्‍याचे मानसिक व शारीरिक आजार कोणते, याविषयी थोड्या वेळापूर्वीच चर्चा झाली होती. अशा वेळी रुग्णाची कहाणी नीट ऐकणे व तर्काची कास न सोडणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात याची मी स्वतःला आठवण करून दिली. म्हणालो, ‘‘इला, तुला इतर डॉक्‍टरांनी जे सांगितले ते क्षणभर विसरून जा आणि अगदी मोकळ्या मनाने माहिती सांग.’’ 

‘‘डॉक्‍टर, चार ते पाच वर्षांपासून हा त्रास आहे. डोक्‍याच्या मागचा भाग, मान व खांदे अचानक दुखून येतात व दुखणे सुरू झाले की या भागात मुंग्या पण येतात. जोरात शिंक आली किंवा खोकला आला तर हे दुखणे सुरू होते व मानेचे स्नायू कडक होतात. कधी कधी शिंक आल्यावर चेहरा, मागचे डोके व हातापायात मुंग्या येतात आणि त्या काही काळ टिकतात.’’ 
‘‘इला, तुला कधी पायात त्रास होतो का?’’ 

‘‘खरे तर गेल्या सहा महिन्यात कधी कधी चालताना पाय अडखळतो. पण गेल्या काही दिवसात नवीन कोणतीही तक्रार सांगायला मी घाबरत होते. विशेषतः मागच्या आठवड्यात जेव्हा दिवे गेले होते तेव्हा चालताना माझा चांगलाच झोक जात होता.’’ इलाला आता थोडाफार धीर आला होता. आणखी एक गोष्ट हल्ली जेव्हा ठसका किंवा शिंक आल्यावर मानेत कळ येते तेव्हा घाम येऊन घाबरल्यासारखे होते. इलाच्या प्रत्येक वाक्‍याबरोबर माझ्या मनातले तिच्या आजाराविषयीचे निदान पक्के होत होते. या पार्श्‍वभूमीवर मी तिची तपासणी केली. तपासताना माझ्या लक्षात आले, की तिच्या दोन्ही हातापायातील ‘रिफ्लेक्स’ गडबडलेला आहे. या दोन्ही तपासण्या मज्जारज्जूच्या अगदी वरच्या भागात दाब असल्याचे सूचित करतात. त्यानंतर मी तिला तोंड उघडायला सांगून तिच्या घशातला रिफ्लेक्‍स बघितला. (अन्न पाणी गिळण्यासाठी ज्या नसा आवश्‍यक असतात त्या या चाचणीत तपासल्या जातात.) इलाच्या डाव्या बाजूच्या अन्न गिळण्याच्या नसा नीट काम करत नव्हत्या. अर्थात याचा तिला अजून तसा त्रास जाणवायला लागलेला नव्हता. पण इलाची कहाणी ऐकून व मी केलेली तपासणी विचारात घेऊन एकच निदान मला स्पष्ट दिसायला लागले -'किआरी मालफॉर्मेशन’. 

हा आजार खरे तर जन्मजात दोषामुळे झालेला असतो. आपला लहान मेंदू (सेरेबलम) हा कवटीच्या अगदी खालच्या भागात स्थित असतो. या भागाच्या तळाला एक छिद्र असते. ज्याला पोरामेन मॅग्नम (मोठे छिद्र) म्हणतात. या छिद्रातून मेंदूचा मेड्युला हा एखाद्या झाडाच्या बुंध्यासारखा भाग बाहेर पडतो व मज्जारज्जू म्हणून मणक्‍यात प्रवेश करतो. या भागाला केनिओ (कवटी) व्हर्टिब्रल (मणक्‍याचा) जंक्‍शन (जोड) म्हणतात. ‘किआरी’च्या आजारात लहान मेंदूचा खालचा भाग (टॉन्सिल) मोठ्या प्रमाणात छिद्रातून खाली येतो व मज्जारज्जूच्या या अतिशय नाजूक भागावर दाब निर्माण करतो. वय वाढेल तसा हा दाब वाढत जातो व लक्षणे दिसू लागतात. ‘किआरी’च्या आजाराची लक्षणे सुरवातीला विचित्र असू शकतात. (उदा. शिंकल्यावर डोक्‍यात, मानेत कळ येणे, घाम येणे, घाबरल्यासारखे वाटणे, हातापायात करंट येणे इत्यादी) या आजाराचा वैद्यकशास्त्राला उलगडा होण्याआधी या रुग्णांना ‘मानसिक रुग्ण’च समजले जायचे. पण आता त्याचे निदान करता येणे शक्य झाले आहे. 
इलाच्या आजाराचे पक्के निदान करण्यासाठी एमआरआयची गरज होती व नंतरच्या माझ्या निदानावर शिक्कामोर्तब होणार होते. त्यामुळे कवटी व मणक्‍याच्या ‘जंक्‍शन’चा एमआरआय करायचा सल्ला देऊन मी तिला पाठवून दिले. माझा विद्यार्थी प्रशांत मात्र गोंधळला होता. ‘‘सर, आजच तुम्ही टीएमएसबद्दल सांगत होता. मला वाटले, नेमकी तीच केस आली.’’ 

‘‘प्रशांत, नातेवाइकांचे मत, इतर डॉक्‍टरांची मते व तुमचे रुग्णाबद्दलचे वरकरणी झालेले मत या गोष्टी तुमचे निदान चुकवू शकतात, पूर्वग्रहदूषित करू शकतात. स्वतःच्या तर्कशक्तीवर लक्ष पूर्ण केंद्रित करणे न्यूरोसर्जरीत आवश्‍यक असते. पण आपण एमआरआय बघितल्यावरच पुढच्या गोष्टी बोलू,’’ मी त्याला समजावले. 

दुसऱ्या दिवशी इला व प्रवीण एमआरआयचा रिपोर्ट घेऊन आले. त्यात ‘किआरी मालफॉर्मेशन’ अगदी स्पष्टपणे दिसत होते. अर्थात आमचे निदान बरोबर होते. तिला मानसिक नव्हे तर, शारीरिक व्यंग होते. इलाला मी तिचे निदान व आजारपणाबद्दल सविस्तर सांगितले. आधी या प्रकारचा आजार झालेल्या लोकांचे अनुभव व एमआरआय दाखवले. ‘किआरी मालफॉर्मेशन’ या आजारात शस्त्रक्रिया करुन दाब काढण्याची गरज असते. कवटीचा मागचा भाग, पहिला व दुसरा मणका (मानेचा) या भागात हा दाब असतो. इलाचा लहान मेंदूचा टॉन्सिल पहिल्या मणक्‍याच्या कॅनॉलच्या खालपर्यंत आलेला होता. आपला आजार हा मानसिक नसून शारीरिक आहे आणि शस्त्रक्रियेने बरा होण्यासारखा आहे हे ऐकून इलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यावर आनंदित झालेला रुग्ण मी पहिल्यांदा पाहिला. पण त्याचे कारणही तसेच होते. इला तर तत्क्षणी  व्हायला तयार होती. पण मी तिची समजूत घातली, ‘‘अहो मॅडम, शस्त्रक्रिया आम्हालासुद्धा ‘प्लॅन’ करावी लागते. आपण चार दिवसानंतरची वेळ ठरवून शस्त्रक्रिया करू,’’ मी हसतच म्हणालो. 

‘किआरी’ची शस्त्रक्रिया मेंदू व मणका या दोहोंवर एकदमच करावी लागते. न्यूरोमायक्रोस्कोपचा खूपच उपयोग यात होतो. लहान मेंदू (मणक्‍यात उतरलेला) व मज्जारज्जू यांना दाब काढून मोकळे करणे व कवटीच्या खालच्या, मागच्या भागातील जागा वाढवणे हा या शस्त्रक्रियेचा उद्देश असतो. इलाची शस्त्रक्रिया नेहमीपेक्षा थोडी अधिक कठीण होती. कारण कवटीतील छिद्राचा आकारच जन्मजात लहान होता. त्यामुळे या छिद्राच्या दोन्ही कडांपर्यंत माक्रोड्रिलने हाड ड्रिल करणे गरजेचे होते. या भागात ‘व्हर्टिब्रल आरटरी’ नावाच्या दोन रक्तवाहिन्या असतात. या मेंदूच्या अतिशय महत्त्वाच्या भागाला रक्तपुरवठा करतात. या भागातील जन्मजात आजारांच्या व्यक्तींमध्ये या रक्तवाहिन्यांची रचना नेहमीपेक्षा वेडीवाकडी असू शकते व लक्षात ठेवले नाही, तर त्यांना इजा होण्याची शक्‍यता असते. शस्त्रक्रियेच्या गडबडीत ही गोष्ट विसरून चालणार नव्हते. प्रत्यक्ष शस्त्रक्रियेदरम्यान याची प्रचितीच आम्हाला आली. इलाची उजव्या बाजूची ‘व्हर्टिब्रल आरटरी’ नेहमीपेक्षा लांब होती व तिचे एक वेटोळे नेमके ड्रिल करण्याच्या हाडावर आले होते. 

‘‘प्रशांत, या शक्‍यतेचा विचार आपण केला होता म्हणून ही रक्तवाहिनी आपल्याला दिसते आहे व आपण काळजीपूर्वक तिला बाजूला करणार आहोत. लक्षात ठेव, Eyes do not see what your mind does not...'' प्रशांतला या केसमधून अनेक गोष्टी शिकायला मिळत होत्या. सरते शेवटी ‘किआरी’मुळे आलेला दाब पूर्णपणे गेल्याची आमची खात्री झाली. हाडाच्या आत ‘ड्युरा मेटर’ला सुद्धा या भागात एक रबर बॅंडसारखा ‘गळफास’ होता. तोसुद्धा उघडून आतले भाग पूर्णपणे मोकळे केले व मगच शस्रक्रिया थांबवली. शस्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी इला रुग्णालयाच्या आवारात चालत असताना मी तिला भेटलो. ‘‘डॉक्‍टर, दोन्‍ही गोष्टी - एक म्हणजे चालताना मला चांगलाच आत्मविश्‍वास आला आहे आणि डोक्‍यात अचानक येणारी कळ, त्या बरोबर येणारा घाम आणि छातीवरचे दडपणसुद्धा कमी झाले आहे.’’ 

आता इला आत्मविश्‍वासाने जीवन जगते आहे. पाठीचे दुखणे अनेक वेळेला मानसिक असते हे खरे आहे. पण हे निदान करण्याआधी न्यूरोसर्जनने त्या रुग्णाला पूर्णतः तपासायला पाहिजे, असे मात्र प्रकर्षाने वाटते. 

इलाच्या केसमुळे हा धडा आम्हाला अतिशय प्रकर्षाने मिळाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feeling psychic, but physical illness article written by Dr Jaydev Panchwagh