प्रजननक्षमतेची समस्या

डॉ. फेस्सी ल्युइस टी
Friday, 12 July 2019

आपल्या समाजात वंध्यत्व ही केवळ वैयक्तिक समस्या राहात नाही, त्याला कौटुंबिक व सामाजिक आयामही असतात. सध्याच्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाची समस्या वाढताना दिसते आहे. वंध्यत्वावर उपचार करून घेण्याआधी या सगळ्या उपायांची माहिती करून घेणे आवश्‍यक आहे.

वंध्यत्व ही वैयक्तिक समस्या असते खरी, पण तिचे कौटुंबिक व सामाजिक परिणाम दूरगामी असतात. यामुळे, वंध्यत्वाचे निदान व उपचार यांना कमालीचे महत्त्व आले आहे. वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. उपचार सुविधांविषयी जागृती वाढत आहे. लग्नाचे वाढलेले वय, उच्चभ्रू वर्गांतील रुग्णांनी स्वेच्छेने पत्करलेले वंध्यत्व, पती सतत घराबाहेर असणे, ही प्रजननक्षमतेत घट होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. सर्वसाधारण गर्भधारणेचे (निरोगी जोडप्यांमध्ये प्रति चक्र अपेक्षित असणारी गर्भावस्था) चक्र आता केवळ १५-२०टक्के आहे. आपले गर्भधारणा चक्र नियमित आहे, असे समजून वंध्यत्वविषयक तपासण्या करण्यामध्ये एका वर्षापर्यंत विलंब केला जाऊ शकतो. परंतु, उशिरा लग्न झालेल्या जोडप्यांमधील समस्या माहीत असणे आणि अशा विशेष स्थितींमध्ये लवकर तपासण्या व उपचार सुरू करणे आवश्‍यक असते.  

सर्वसाधारण महिलेमध्ये दोन मासिक पाळींच्या मध्यामध्ये बीजकोषात बीजांडांची निर्मिती होते. लैंगिक संबंधांनंतर पुरूषाचे शुक्राणू स्त्रींच्या बीजांडांच्या दिशेने प्रवास करतात व बीजवाहक नलिकेच्या बाह्यटोकाला गर्भधारणा होण्यासाठी बीजांडाला जाऊन मिळतात. बीजांड फलित होऊन निर्माण झालेले भ्रूण गर्भाशयापर्यंत जाते व त्यामध्ये प्रस्थापित होते. तेथेच बाळाची पूर्ण वाढ होते. या सर्वसाधारण क्रमादरम्यान कोणत्याही घटनेने हस्तक्षेप केला तर वंध्यत्व निर्माण होऊ शकते, जसे -
 
 सदोष बीजनिर्मिती   
शुक्राणूंमधे समस्या
 शुक्राणूंच्या हालचालीतील समस्या
 स्त्रीबीज व शुक्राणू यांचे सदोष मीलन
 लैंगिक समस्या
 स्पष्ट न करण्यासारखे वंध्यत्व
 

पुरूषांमधील वंध्यत्वाचे दीर्घ काळ दुर्लक्षित असणारे एक सर्वात महत्त्वाचे कारण असे की, एक तर पुरेशा प्रमाणात शुक्राणूंची निर्मिती होत नाहीत किंवा ते निर्माण केले तरी ते पुरेसे सक्षम नसतात. काही वेळा पुरुषांना लैंगिक समस्या असतात. यामुळे वीर्यस्खलन व योनीमध्ये शुक्राणू सोडले जाणे यामध्ये हस्तक्षेप होतो. पुरुषामध्ये शुक्राणूंची निर्मितीच होत नाही, असेही घडू शकते. अशा टोकाच्या प्रकरणात कोणतेही उपचार करता येत नाहीत. पुरुषांतील वंध्यत्वाच्या अन्य कारणांवर वैद्यकीय पद्धतीने किंवा शस्त्रक्रियांद्वारे उपचार होऊ शकतात. या उपचारांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही तर आयूआय (इंट्रायटरिन इन्सेमिनेशन), आयसीएसआय (इंट्रासिटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्‍शन) अशा प्रगत तंत्रांनी अनेक जोडप्यांना पालक होण्यासाठी मदत केली आहे.

 सदोष बीजनिर्मितीची समस्या हे स्त्रियांच्या वंध्यत्वाला कारणीभूत ठरणारे दुसरे सर्वात महत्त्वाचे व सर्रास आढळणारे कारण आहे. नव्वद टक्के केसेसच्या बाबतीत सदोष बीजनिर्मितीची समस्या आढळते. पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिंड्रोममुळे (पीसीओएस) ती निर्माण होते. प्रोलॅक्‍टिनसारखे हार्मोन वाढणे किंवा थायरॉइज, एफएसएच व एलएच अशा हार्मोनमध्ये घट झाल्याने किंवा विविध हार्मोनची पातळी असंतुलित असणे, अशा कारणांमुळेही या प्रकारची समस्या क्वचित निर्माण होते. अनियमित किंवा दीर्घ काळ चालणारी मासिक पाळी, स्थूलता व केसांची अधिक वाढ, अंडाशयामध्ये लहान गाठी ही लक्षणे पीसीओएसमध्ये दिसतात. पीसीओएसच्या प्रत्येक रुग्णांमध्ये यापैकी सर्व वैशिष्ट्ये असतीलच असे नाही. पीसीओएस होण्याची कारणे अनेक असल्याने प्रत्येक रुग्णाकडून मिळणारा प्रतिसादही वेगवेगळा असतो. वंध्यत्वासाठीच्या पीसीओएससाठी उपचाराचे पर्याय ओव्ह्युलेशन इंडक्‍शन, ओव्हरिअन ड्रिलिंग किंवा एआरटी यानुसार वेगवेगळे असतात. या प्रकारच्या रुग्णांमध्ये साध्या गोळ्यांपासून महागड्या हार्मोन इंजक्‍शनपर्यंत किंवा लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेपर्यंतचे उपचार असतात. काहीवेळा आयव्हीएफ किंवा आयसीएसआय अशा पुनरुत्पादन सहायक तंत्रांचीही गरज लागू शकते. काही रुग्णांमध्ये कदाचित कोणत्याच उपचारांना प्रतिसाद मिळणार नाहीत, हेही ध्यानात घ्यायला हवे. 

  गर्भाशयाला चिकटलेले श्‍लेष्मल (एंडोमेट्रिओसिस) : हे महिलांमधील वंध्यत्वाचे एक सर्रास आढळणारे कारण आहे. या आजारामध्ये, गर्भाशयाच्या आतील वरच्या थरातील पेशी गर्भाशयाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळतात. मासिक पाळीच्या दरम्यान या ठिकाणांहून रक्तस्राव होतो. हे रक्त शरीरातून बाहेर पडू शकत नाही व त्यामुळे अशा ठिकाणी चिकटून राहू शकते. त्याचे एक श्‍लेष्मल तयार होऊन गर्भाशयाला चिकटून राहतो. हा प्रकार बीजकोष, बीजवाहिनी व गर्भाशयाभोवती आढळतो. त्यामुळे मासिक पाळी वेदनादायी होते. सर्वसाधारण शरीररचनेवर दुष्परिणाम होतो. तसेच चांगल्या बीजनिर्मितीलाही फटका बसतो. तसेच, वाहिनीद्वारे बीजांडाचे वहन होण्यावरही परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणेमध्ये अडथळे येतात. या समस्येचे अनेकदा अल्ट्रासाउंडमुळे निदान करणे शक्‍य होते, पण काही वेळा केवळ लॅपरोस्कोपीद्वारे निदान करता येते. सध्या या समस्येवर उपलब्ध असणारी सर्वोत्तम उपचारपद्धती म्हणजे लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया. परंतु, काही जणींमध्ये आयव्हीएफ, आयसीएसआय यासारखे उपचारही उपयुक्त ठरू शकतात.

 प्रजनन अवयवांमधील संसर्गासारख्या कारणांमुळे अंडनलिकेत अडथळा (ब्लॉक व अधेशन) तयार होऊ शकतो. अशा प्रकारे अडथळा निर्माण झाल्यास लॅपरोस्कोपीने उपचार केले जाऊ शकतात. काही वेळा  लॅपरोटॉमीची गरज भासू शकते. मात्र अन्य रुग्णांना केवळ आयव्हीएफ / आयसीएसआय या तंत्रांद्वारे गर्भधारणा होऊ शकते.

 काही वेळा स्त्रीरुग्णाच्या अंडनलिकेत द्रव साचते (हायड्रोसॅलपिंक्‍स). अंडाशय व गर्भाशय या अंडनलिकेने जोडलेले असते. या अंडनलिकेत द्रव जमा झाल्यामुळे तेथे अडथळा निर्माण होतो. दोन्ही अंडनलिकांमध्ये द्रव साचून अडथळा तयार झालेला असल्यास शस्त्रक्रियेनंतरही केवळ दहा-वीस टक्के रुग्णांना सर्वसाधारण रीतीने गर्भधारणा होऊ शकते. बाकीच्या रुग्णांना बहुतांशी आयव्हीएफ उपचाराचीच गरज भासते. 

लैंगिक समस्या हे वंध्यत्वाचे एक महत्त्वाचे कारण आहे. लैंगिक समस्यांची कारणे वेगवेगळी असू शकतात. स्थूलत्व, नैराश्‍य, ताणतणाव ही कारणे असण्याची शक्‍यता असते. मात्र यावर अवैद्यकीय व अशास्त्रीय उपचार करू नयेत. बहुतेक लैंगिक समस्यांवर मानसिक समुपदेशनाद्वारे उपचार करता येऊ शकतात.
 
निदान पद्धती 
वैद्यकीय विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे वंध्यत्वाचे निदान व उपचार अधिक शास्त्रीय पद्धतीने करता येऊ लागले आहेत. विर्याचे विश्‍लेषण हा वंध्यत्वाच्या तपासणीतील अविभाज्य भाग आहे. विश्वासार्ह लॅबमध्ये वीर्य तपासणी केल्यानंतर हे विश्‍लेषण महत्त्वपूर्ण ठरते. यामधे शुक्रजंतूंची संख्या व गतीशीलता पाहिली जाते. याबरोबरच, वीर्य विश्‍लेषणात पीएच, फ्रक्‍टोजची पातळी, आकार यांचीही गुणवत्ता पाहिली जाते. काही वेळा वंध्यत्वाचे कारण कळत नाही. अशा अनाकलनीय वंध्यत्वाचे निदान करण्यासाठी अंत-स्त्रावांचा अभ्यास उपयोग होतो. ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाउंड पद्धतीमुळे वंध्यत्वाशी संबंधित बहुतेक समस्यांचे निदान करणे अधिक सोपे झाले आहे. पूर्वी बाहेरून सोनोग्राफी करून निदान केले जात होते. पण विशेषत- स्थूल स्त्रियांमध्ये पोटाची भिंत अचूक निदान करण्यात अडथळा असायची. आता योनीमार्गातून प्रोब आत नेऊन प्रजनन अवयवांची तपासणी करता येऊ लागली आहे. यामुळे निदान करणे सोपे झाले, तसेच उपचारावर देखरेख करण्यासाठीही मदत होऊ लागली आहे. विशेषत- गर्भाशयाला चिकटलेले श्‍लेष्मल तपासण्यासाठी हे उत्तम साधन आहे. तसेच, यामुळे प्रजनन अवयवांतील गाठींचेही निदान करता येऊ शकते हिस्टिरोलॅपरोस्कोपीमुळे वंध्यत्वावरील उपचारांमध्ये जणू क्रांती झाली आहे. 
 
उपचारांचे पर्याय
 इंट्रा युटरिन इन्सेमिनेशन (आययूआय) - हा अतिशय सोपा उपचार आहे. प्रजननक्षमता थोडी दुय्यम असणाऱ्या जोडप्यांमध्ये प्रजननक्षमतेचे प्रमाण वाढू शकते. यामध्ये विषारी घटकांपासून विलग केलेले,  दर्जेदार गुणवत्तेचे शुक्राणु लॅबमध्ये वेगळे काढले जातात. स्त्रीच्या बीज पक्व होण्याच्या काळात तिच्या गर्भाशयाच्या वरील भागात हे निवडलेले शुक्राणू सोडले जातात. वंध्यत्वाचे नेमके कारण स्पष्ट होत नसेल, योनीधारणेतील कमतरता, शुक्राणूंची अल्पसंख्या अशा समस्यांमध्ये आययूआय उपचारपद्धती अधिक स्वीकारार्ह आहे. परंतु या उपचारादरम्यान योग्य ती खबरदारी न घेतल्यास, या उपचार पद्धतीत प्रजनन अवयवात संसर्ग होण्याचा व त्यामुळे अंडनलिकेत अडथळा निर्माण होण्याचा धोका असतो. 

टेस्ट ट्युब बेबी ट्रिटमेंट (आयव्हीएफ व आयसीएसआय) - ल्युसी ब्राउन यांनी विकसित केलेल्या असिस्टेड रिप्रॉडक्‍टिव्ह टेक्‍निकद्वारे स्त्रीमधील बीजांड व पुरूषांतील शुक्राणू यांचे शरीराबाहेर मिलन घडवले जाते. हा वंध्यत्वावरील उपचारातील महत्त्वाचा मैलाचा टप्पा आहे. 

शस्त्रक्रियेद्वारे बरा करता येणार नाही, असा अंडनलिकेतील अडथळा असणाऱ्या स्त्रीरुग्णासाठी ही उपचार पद्धती पहिल्यांदा वापरण्यात आली. तोपर्यंत अशा स्थितीवर कोणताही उपचार नव्हता. त्यानंतर हा उपचार कारण स्पष्ट होत नसलेले वंध्यत्व, प्रजनन अवयवातील अडथळे, गर्भाशयाला चिकटलेले श्‍लेष्मल, पीसीओएस या समस्यांबाबतीतही करण्यात येत आहे.

दुर्दैवाने काही वंध्यत्वाच्या समस्यांमधे उपचारच नाहीत. उदाहरणार्थ, जर पुरूषामधे शुक्राणूच तयार झाले नाहीत किंवा स्त्रीमध्ये बीजांडच तयार झाले नाही, तर ते निर्माण करण्याचे कोणतेही उपचार नाहीत. शुक्राणू व बीजांड असेल तरच उपचार शक्‍य होतात. आयसीएसआय (इंट्रा सिटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्‍शन) उपचाराद्वारे १९९२ मधे जन्माला आलेले बाळ हा एक नवा टप्पा होता. यामध्ये, थेट अंड्यामध्ये केवळ एकाच जोमदार शुक्राणूचे रोपण करण्यात येते. त्यातून फलन होऊन भ्रूणाची निर्मिती होते. आयसीएसआयमध्ये भ्रूणाची निर्मिती करण्यासाठी केवळ एकच जोमदार शुक्राणू पुरेसा असल्याने पुरुषांशी संबंधित प्रश्न या पद्धतीद्वारे सोडवता येऊ शकतात. पारंपरिक आयव्हीएफच्या तुलनेत, फलनामध्ये अपयश येण्याची शक्‍यता कमी असते. साहजिकच गर्भधारणेची शक्‍यता अधिक असते. आता आयव्हीएफ उपचारासाठी येणाऱ्या बहुतांश जोडप्यांवर आयसीएसआय केले जाते. 

 वंध्यत्व तंत्रांच्या बाबतीतील प्रगती: सर्व आधुनिक उपचार उपलब्ध असूनही एआरटीद्वारे गर्भधारणेचे प्रमाण अंदाजे ३०टक्के आहे. यश मिळण्याचे प्रमाण वाढण्याच्या हेतूने अनेक प्रगत पद्धती निर्माण झाल्या आहेत. यातील बहुतेक पद्धती भारतात उपलब्ध आहेत.

लेसर : या पद्धतीमुळे, शुक्राणूंच्या गतीमानतेतील अडथळे दूर करता येतात. तसेच भ्रूण निर्मितीला सहाय केले जाते. याचा उपयोग आयसीएसआय प्रक्रिया अधिक सुधारण्यात होतो. वय वाढलेल्या स्त्रियांमध्ये, तसेच गर्भधारणेत वारंवार अपयशी झालेल्यामध्ये गर्भधारणेची शक्‍यता वाढवते.

ब्लास्टोसिस्ट कल्चर : या पद्धतीमध्ये ट्रिपल गॅस इन्क्‍युबेटर्स व स्पेशल मिडियास अशा सुविधा असतील तर भ्रूण पुन्हा गर्भाशयात ठेवण्यापूर्वी ब्लास्टोकास्ट टप्प्यापर्यंत शरीराबाहेर वाढवता येऊ शकते. यामुळेही गर्भधारणेचे प्रमाण वाढण्यासाठी, उपचारादरम्यान माता व अर्भकाचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

पीजीडी (प्रिइम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नॉसिस) : एआरटी उपचारातील ही सर्वात नवी घडामोड आहे. मातेकडे हस्तांतरित करण्यापूर्वी सर्वसाधारण भ्रूण ओळखणे, हा या उपचारामागील विचार आहे. भ्रूणामध्ये असणारे डाउन सिंड्रोमसारखे आजार उपचाराच्या सुरुवातीला ओळखण्याची व ते वगळण्याची क्षमता या उपचारामध्ये आहे. एकदा हा उपचार प्रस्थापित झाला की तो अन्य अनेक रुग्णांच्या बाबतीत यश मिळण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

थोडक्‍यात, कोणत्याही जोडप्याला वंध्यत्वावर उपचार करायचे असल्यास त्यांना वंध्यत्वाविषयी व उपलब्ध तपासण्या व उपचार पद्धतींविषयी मूलभूत माहिती असणे उपयुक्त ठरते. यामुळे जोडप्यांना अधिक आत्मविश्वासाने उपचाराकडे पाहण्यासाठी व उपचारांचा अवलंब करण्यासाठी मदत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertility issue